आनंद ढोणे, परभणी (प्रतिनिधी) :- परभणी जिल्ह्यातील पेडगाव येथील युवा शेतकरी (वय 35) शिक्षण ( बि ए डी एड्) मंगेश प्रतापराव देशमुख यांनी आपल्या शेतीत,शेतीला जोड धंदा म्हणून सिताफळ, पपई, झेंडू, रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन या पिकाची आधुनिक पध्दतीवर लागवड करुन त्याचे योग्य रितीने व्यवस्थापन करीत त्यापासून भरघोष उत्पादन घेऊन शेती समृद्ध केली आहे. यंदा 2021 ला चालू आर्थिक वर्षात त्यांना दोन एकर सिताफळ, दोन एकर पपई, दहा गुंठे झेंडू, साडे बारा एकरवर रुंद सरी वरंबा पध्दतीवर आणि तिस गुंठ्यात टोकन पध्दतीने सोयाबीन लागवड या पिकाच्या उत्पादनातून खर्च जाता 1157630/ (अकरा लाख सत्तावन हजार सहाशे तीस) रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
पेडगाव हे परभणी जिल्ह्यातील परभणी पासून पाथरी रोडवर 15 किमी अंतरावरील 10 हजार लोकसंख्येचे गाव आहे. तसेच रेल्वे मार्गावरील परभणीहून औरंगाबाद( संभाजीनगर) ला जातानाचे पहिले रेल्वे स्टेशन आहे. गावात प्रवेश करताना दक्षिणेस प्रथमदर्शनी श्री रेणूकामातेचे मंदिर लागते.येथील रेणूकामाता मंदिर परिसरात नवरात्री महोत्सवात भावीक भक्तांची मोठी रेलचेल असते.भक्तांचे मोठे श्रध्दास्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे.गावातील नागरीकांचे अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे येथील शेती सर्व पिक उत्पादनात सदा अग्रेसर आहेत. याच गावातील प्रयोगशिल युवा शेतकरी मंगेश प्रतापराव देशमुख यांची पेडगाव शिवारात तीन ठिकाणी एकूण 18 एकर शेती आहे.येथे देशमुख फार्म पेडगाव म्हणून त्यांची शेती आहे. मंगेश यांनी वर्ष 2012 ला बि ए डि एड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनाच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाच्या जागा उपलब्ध नव्हत्या आणि खाजगी शिक्षण संस्थेत डोनेशन देवून शिक्षकीपेशाची सेवा करने परवडत नसल्यामुळे नौकरीच्या मागे न लागता आपली वडिलोपार्जित शेतीच कसण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वडील कापूस, सोयाबीन, तूर, मुग उडीद असी पारंपरिक पिके घ्यायचे त्यातून उत्पादन कमी येवून निव्वळ उत्पन्नही अतिशय कमीच हाती यायचे.मंगेश शेतीत आल्यापासून त्यांनी पारंपरिक पिक पध्दतीला फाटा देण्याचे ठरवून आधुनिक शेतीची कास आवलंबीण्यास सुरुवात केली. शेतीत विहीर, बोअरवेल घेऊन बागायती पिकासाठी सोय केली. शेतातील बैलजोडी 86000 हजार रुपयास विकून काही रक्कम डाऊनपेमेंट भरुन बाकी फायनान्स करुन यांत्रिकीकरण शेती करण्यासाठी 24 एच पी चा छोटा कुबोटा ट्रॅक्टर 4 लाख 25 हजार रुपयास खरेदी केला. सोबतच औजारेहे घेतले. आणि मग सुरु झाली ख-या अर्थाने यांत्रिकी पध्दतीने आधुनिक शेती. पारंपरिक पीक पध्दतीत फारसे उत्पन्न हाती येत नसल्याचे वडीलांना लक्षात आणून देत शेतीत फळपिके, फुलशेती लागवड करणचे सांगून तसा प्रारंभही केला. त्याचबरोबर सोयाबीन पीकाचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रुंद सरी वरंबा पध्दतीवर सोयाबीन लागवड करण्यास वर्ष 2014 पासून सुरुवात केली. बेडवर टोकन पध्दतीने शुध्दा सोयाबीन लागवड करतात. या पध्दतीने आधुनिक शेती करीत असल्याने दुपटीने उत्पादनात वाढ होवू लागली आहे.पर्यायाने उत्पन्नात मोठी भर पडली.
सिताफळ लागवड प्रयोग
मंगेश यांच्या 18 एकर जमीनी पैकी काही क्षेत्र हे चांगल्या तर काही जमीन मध्यम हलक्या प्रतीची आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी फळ पीके आहेत हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सिताफळ लागवड करण्याचा निर्णय घेवून 2017 ला सिताफळ लागवड केली.
ज्या जमीनीत सिताफळ लागवड करायची ती जमीन उन्हाळ्यात आडवी उभी नांगरटी व कुळवाच्या पाळ्या देवून मशागत केली. मे 2017 मध्ये 10 बाय 10 फूट अकारावर खड्डे खणून त्यात योग्य प्रमाणात शेणखत व बुरशीनाशक टाकले. त्यानंतर 12 जून 2017 रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील नर्सरीतून प्रती रोप 35 रुपये दराने खरेदी करुन दोन एकर क्षेत्रात बाळानगर जातीच्या 800 सिताफळ रोपांची लागवड केली. त्याच्या सिंचनासाठी थिबक संच बसवण्यात आला आहे.
रोपांच्या वाढीसाठी असी दिली खतांची मात्रा
लागवडीनंतर पहिल्या वर्षी कोणताही खत दिला नाही. दुसर्या वर्षी प्रती झाड 4 कि ग्रा शेणखत, 2 कि ग्रा सिंगल सुपर फॉस्फेट ही खतमात्रा दिली. त्याच प्रमाणे दरवर्षी शेणखत मात्रा देतात. शिवाय गरजेनुसार ड्रिपमधून 0-0-50,पोटॅशियम सोनाईट ही विद्राव्य खते दिली जातात.तसेच 10-26-26, 0-52-34,सुक्ष्म अन्नद्रव्ये देखील दिली जातात. सिताफळ बागेस अधिक असी कोणत्या खतमात्रेची गरज भासत नाही.
येणारे रोग व त्याचे नियंत्रण
सिताफळ बागेवर फुला फळावर बुरशी, मावातुडतुडे, मिलीबग अशा रोगाचा कधी कधी प्रादुर्भाव होत असतो. त्याच्या नियंत्रणाकरिता साफ, टाटा माणिक, 0-52-34, बुरशीनाशक, सुक्ष्म अन्नद्रव्ये असी औषधी फवारुण नियंत्रण केले जाते.
पाणी व्यवस्थापन
सिताफळ बागेसाठी उन्हाळ्यात वाफसा स्थितीनुसार चार ते आठ दिवसाआड थिबक द्वारे पाणी देतात. पहिले तीन चार वर्षे सिताफळ बागेस पाणी लागते. उन्हाळ्यात 1 फेब्रुवारीला पाणी देणे बंद करुन ताण दिला जातो. जून महिन्यात पहिला मोठा पाऊस पडला की, बाग कोवळ्या डि-या फूटून हिरवी होते. व लगेच जुलै मध्ये फुलधारणा होण्यास सुरुवात होते.
फांद्यांची छाटणी
दरवर्षी एप्रिल महिन्यात खालच्या बाजूच्या काही व झाडावरील काही अनावश्यक फांद्यांची छाटणी केली जात असते. छोट्या पेन्सिल आकाराच्या कांड्या ठेवल्या जातात. फांद्या छाटणी मुळे झाडाची सरळ योग्य वाढ होण्यास मदत होत असते. बाग योग्य रीत्या वाढत जाते. त्यामुळे लागवडीपासून तीन वर्षाच्या नंतर दरवर्षी फांद्यांची छाटणी करावी लागते.
सिताफळाचे उत्पादन
योग्य व्यवस्थापन केल्यामुळे तिसर्या वर्षी म्हणजे 2020 ला फळधारणा झाली. या वर्षी त्यांनी सिताफळाची एका व्यापा-याला 86000 हजार रुपयास गुत्याने विक्री केली. जवळपास 20 किलो वजनाचे 137 कॅरेट फळे उत्पादन झाले होती. सुरुवात असल्याने किलोच्या दराने विक्री न करता गुतेच दिले.बाग लागवडीसाठी रोपे, थिबक, खते, फवारणी, मजूर याकरिता उत्पादन खर्च म्हणून पहिल्या वर्षी 36000 हजार रुपये खर्च आला त्यातून 86000 हजार रुपये वजा जाता 50,000/ हजार रुपये निव्वळ उत्पन्न राहिले. दुसर्या वर्षी सन 2021 ला 678 कॅरेट सिताफळ उत्पादन झाले. त्याची विक्री स्थानीक बाजार पेठ व वाशी मार्केट मुंबई येथे विक्री केली. विक्रीतून 270,000/ दोन लाख सत्तर हजार रुपये मिळाले तर त्यातून 35000/ हजार रुपये उत्पादन खर्च जाता 235000/ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. दोन्ही वर्षाचे एकूण 285000/ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.
पपईचे घेतले उत्पादन
ते गत दोन वर्षापासून तैवान 786 लिली वाणाच्या पपईची लागवड करीत आहेत. वर्ष फेब्रुवारी 2021 ला त्यांनी दोन एकर जमीनीची नांगरटी आणि पाळ्या देवून मशागत करुन घेतली. मशागत वेळी 5 ट्रॉली शेणखत जमिनीत रोटाव्हेटरने मिसळला. त्यानंतर 8 फूट रुंदीवर ट्रॅक्टरच्या साह्याने बेड तयार करुन घेतले. बेडवर योग्य खताचा बेसल डोस देवून थिबक अंथरले. त्यानंतर 27 मार्च 2021 रोजी बेडवर 6 फुट लांब अंतरावर पपई रोपांची लागवड केली.
दिलेली खतमात्रा
लागवडीनंतर रोपांना उन्हापासून सरंक्षण मिळण्यासाठी क्रॉप कव्हर बसवण्यात आल्यावर काही दिवसांनी 100 कि ग्रा निंबोळी पेंड, 100 कि ग्रा सिंगल सुपर फॉस्फेट, 50 कि ग्रा पोटॅशियम, 50 कि ग्रा 10-26-26,20 कि ग्रा सुक्ष्म अन्नद्रव्ये, शेवाळापासून बनवलेला खत 15 कि ग्रा व त्यानंतर काही दिवस अंतराने 2 कि ग्रा 19-19-19, 250 ग्राम ह्युमिक असीड, 50 कि ग्रा 10-26-26, 50 कि ग्रा सिंगल सुपर फॉस्फेट, 50 कि ग्रा पोटॅश, 10 कि ग्रा सुक्ष्म अन्नद्रव्ये, 5 कि ग्रा मॅग्नेशियम सल्फेट, 50 कि ग्रा डि ए पी, 1 कि ग्रा बोरॉन, 5 कि ग्रा कॅल्शियम नायट्रेट, 5 कि ग्रा अमोनियम सल्फेट या पद्धतीने बेड ड्रिपमधून खतांची मात्रा देण्यात आली.
रोगनिवारण
पपई पिकावर बुरशी, पाने गुंडाळणी, रिंग स्पॉट, पानावर गोल तेलकट चट्टे या सह आदी व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्याच्या निवारणाकरीता यलो मोझॅक, टाटा माणिक आदी रोगानुसार औषधाची फवारणी करुन रोगाचे निवारण करतात. आणि वाफसा कंडीशननुसार थिबक मधून पाणी सोडून सिंचन करत असतात.
झेंडू लागवड उत्पादन व उत्पन्न
गेल्या काही वर्षांपासून ते गणेशोत्सव,दसरा-दिवाळी या सणाचे औचित्य साधून झेंडू फूल पिकाची लागवड करु लागले आहेत. सन 2020 पासून 10 गुंठे क्षेत्रात झेंडूची लागवड करु लागले आहेत. दरवर्षी जून महिन्यात झेंडू लागवडीसाठी नांगरटी, कुळव पाळ्या देवून जमीनीची मशागत केली जाते. यानंतर 4 फूट रुंदीचा बेड तयार करण्यात येतो. बेडवर 1 ट्रॉली शेणखत, 50 कि ग्रा सिंगल सुपर फॉस्फेट, 30 कि ग्रा 10-26-26, 5 कि ग्रा सुक्ष्म अन्नद्रव्ये असा बेसल डोस दिला जातो. यंदा 2021 ला त्यांनी बेडवर 5 गुंठे क्षेत्रात भगवा अष्टगंधा, तर 5 गुंठे पिवळा पितांबर रंगाच्या एकूण 10 गुंठे क्षेत्रात झेंडू रोपांची 4 बाय 2 पध्दतीने लागवड केली आहे. त्यासाठी लागवडीपासून 15 दिवसाला 2 कि ग्रा 19-19, 200 ग्राम ह्युमिक असीड, 3 कि ग्रा 12-61-0, 50 कि ग्रा 15-15-15 असी खतमात्रा दिली. रोगाच्या नियंत्रणासाठी कॉन्फीडार, अबासीन, ईमेमेक्टीन बेनझाईट, कस्टोडी, मायक्रोला या औषधांची योग्य प्रमाणात फवारणी करुन बुरशी, तांबेरा, मावा तुडतुडे, नाग अळी, फुले अळी या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारण्या केल्या. लागवड पासून 60 दिवसाला झेंडू फुले काढणीस येतात.
यंदा 10 गुंठे क्षेत्रात विजयादशमीला पहिला तोडा 7 क्विंटल फुलाचे उत्पादन झाले. त्यास प्रति किलो 60 रुपये दर मिळाला. तर आता दिपावली लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी दुसरा तोडा करावयाचा असून 6 क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. विजयादशमीला विक्री केलेल्या 7 क्विंटल झेंडू फुले विक्रीतून 42 हजार रुपये उत्पन्न मिळाले तर दिवाळीत 6 क्विंटल फुले उत्पादन विक्रीतून दर अधिक मिळाल्यास 60 हजार रुपये मिळू शकतात. त्यातून दोन्ही तोडा 13 क्विंटल फुले उत्पादनासाठी 15000/ खर्च जाता 85000/ हजार रुपये उत्पन्न पक्के आहे.
गत वर्षी दहा गुंठे झेंडू फुलापासून 19 क्विंटल उत्पादन झाले होते. त्यातून खर्च जाता पावणेदोन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. गतवर्षी 100 ते 150 रुपये दर मिळाला होता.
रुंद सरी वरंबा व टोकन पध्दतीने सोयाबीन लागवड
मंगेश यांना कृषी विभाग व मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाल्याने ते 2014 पासून रुंद सरी वरंबा (बी बी एफ)पध्दतीने सोयाबीन लागवड करीत आहेत. या पध्दतीत सोयाबीन पिकास हवा खेळती मिळते, रुंद सरीच्या दोन्ही बाजूला सरी पडत असल्याने जास्त पाऊस काळ झाल्यावर सरीतून पाणी वाहून जाते. शिवाय खरीपात पावसाने उघडीप दिल्यास सरीने पाटाचे पाणी देता येते. तसेच त्या सरीत तूषार संच बसवूनहे पाणी देता येते. याच बरोबर रुंद सरीवर सोयाबीन झाडाची चांगली वाढ व व्यवस्थापन होवून शेंगाची संख्या अधिक लगडून त्यातील शेंगा परिपक्व होत शेंगदाणे व्यास मोठा होतो.फांद्या अधिक फुटतात.बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो. अंतर मशागत व फवारणी करण्यासाठी उपयुक्त आहे. पर्यायाने उत्पादन क्षमतेत दुप्पट वाढ होते. रोगाचा प्रादुर्भाव कमी होते. नेहमी वाफसा अवस्था राहते.
या पध्दतीचा आवलंब करीत या वर्षी 2021 ला तीन फूट रुंद सरी ओढून घेतली व त्यावर दोन लाईन सोयाबीन पेरणी केली.सुमारे साडेबारा एकरवर या पध्दतीने सोयाबीन लागवड केले आहे.पेरणी वेळी योग्य ती खतमात्रा दिली जाते. तसेच नंतर रोगाच्या नियंत्रणासाठी काही आवश्यक औषधांच्या फवारण्या ते करतात. त्यांना यंदा या पध्दतीने सोयाबीनचे एकरी 12 क्विंटल उत्पादन आले. तर याच वर्षी त्यांनी 30 गुंठे क्षेत्रात 3 फूट रुंदीचा बेड तयार केले. बेडच्या दोन्ही बाजूला 21 ईंच अंतरावर टोकन पध्दतीने सोयाबीन बियांची लागवड केली होती. त्यासाठी 14 किलो बियाणे लागले. तर 30 गुंठ्यात 12 क्विंटल 56 किलो उत्पादन मिळाले. त्यासाठी सर्व मिळून 17670 रु खर्च आला तर प्रति क्विंटल 5000/ दर पकडता 12 क्विंटल 56 किलो सोयाबीन विक्रीतून 62500/ रुपये मिळाले तर यातून उत्पादन खर्च 17670 वजा जाता 45130/ रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. तसेच बी बी एफ पध्दतीवरील साडेबारा एकरातील क्षेत्रात 150 क्विंटल उत्पादन झाले. एकरी उत्पादन खर्च जाता 562500 रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. म्हणजे यंदा त्यांना सिताफळ, पपई, झेंडू, सोयाबीन या पीक उत्पादन विक्रीतून 1157630/ रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. यामुळे पध्दतीने शेती पीक घेतल्याने मंगेश देशमुख यांचे कृषी जगतात कौतुक केले जात आहे.
पपईचे झालेले उत्पादन
यंदा आक्टोबर महिन्यात पहिल्या तोड्यात 4 टन पपईचे उत्पादन निघाले असून पुढील शेवट पर्यंतच्या तोड्यातून 70 टन उत्पादन निघण्याची अपेक्षा आहे. सध्या प्रति किलोला 12 रु दर मिळाला आहे. 4 टन पपई विक्रीतून 48000/ हजार रुपये मिळाले आहेत. पुढील 70 टनातून दराच्या अंदाजानुसार खर्च जाता 23,00000/ दोन लाख तिस हजार रुपये पपईचे निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे. गतवर्षी 2020 ला पपईचे चांगले आर्थिक उत्पन्न हाती आले होते. त्या पध्दतीने या पिकाचे व्यवस्थापन चालू आहे.
फळबाग शेती केल्यामुळे कमी पाण्यात कमी खर्चात अधिक उत्पादन घेवून शाश्वत उत्पन्न हाती येते. तसेच यांत्रिककरण शेती पध्दतीने मजूर बचत होते. पारंपरिक शेती पध्दतीत मजूरावर अवलंबून रहावे लागे.ते वेळेवर कामावर उपलब्ध होत नसत. खर्च अधिक लागे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या साह्याने मी मशागतीची सर्व कामे आणि ब्लोअर फवारणी यंत्राणे औषध फवारणी ही कामे कमी वेळात होतात.बी बी एफ पध्दतीने, टोकन पध्दतीने सोयाबीन पेरणी/ लागवड केले तर उत्पादनात दुपटीने वाढ होते हे मी अनुभवले आहे. ईतरही शेतक-यांनी याचा आवलंब करणे आवश्यक आहे. याचे अनेक फायदे आहेत. तसच तरुणांनी नौकरी पेक्षा शेती केली तर ती कधीही फायद्याचीच असून यात अमर्याद उत्पन्न मिळवता येते.
– मंगेश प्रतापराव देशमुख, पेडगाव, ता जि परभणी. मो. 9960310358.