नांदणी येथील अजित लठ्ठे यांची शेती ठरली आदर्श बदलत्या काळानुसार शेतीत येणार्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकरी आता स्विकार करु लागले आहेत. पारंपरिक शेती काही प्रमाणात मागे पडत असून बाजारातील गरज लक्षात घेऊन बहुसंख्य शेतकरी लागवडीत बदल करुन आपली आर्थिक उन्नती साधत आहेत. यात प्रयोगशील शेतकर्यांनी प्रगती केल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील रहिवासी असलेल्या अजित लठ्ठे यांनी कर्नाटक- महाराष्ट्राच्या सीमेवरील बेळगाव जिल्ह्यातील शेतीत कष्टाने नवीन प्रयोग करुन आपल्या कृतीयुक्त कामातून इतर शेतकर्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सुरवातीला संरक्षित शेतीत सिमला मिरचीचे अपेक्षित उत्पादन घेतल्यानंतर त्यांनी दर्जेदार फुलांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले आणि आज दररोज तब्बल 35 हजार जरबेरा फुलांची काढणी त्यांच्या शेतातून केली जाते.
भाजीपाला उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावात अजित लठ्ठे यांचा जन्म एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. श्री. लठ्ठे हे दोन वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे आई आक्काताई यांनी दुसर्यांच्या शेतांमध्ये मजुरी करुन आपल्या चारही मुलांचे संगोपन केले. वडिलोपार्जित एक एकर जिरायती शेती करीत श्री. लठ्ठे यांनी इतरांच्या शेतात मजुरीसह ऊस तोडणीचे काम करुन बी. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच नांदणी गावात 1995 मध्ये भाजीपाल्याच्या पॅकिंगसाठी लागणार्या बारदान व पॅकिंग मटेरियलचे दुकान त्यांनी सुरु केले. आपल्या शेतातून ते पारंपरिक पिकेच घेत होते. अशा परिस्थितीत आपण काही तरी वेगळे करावे, असा ध्यास त्यांनी घेतला आणि शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान ते आत्मसात करु लागले. यातून त्यांना बाजारपेठेत कोणत्या शेतीमालाला अधिक मागणी आहे, हे लक्षात आले. साधारणतः 2015-16 मध्ये महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील हंचनाळ गावात फोंड्या माळावर साडेसात एकर शेत जमिन विकत घेतली. 2016-17 साली एक एकर पॉलीहाऊसमध्ये नर्सरी व दीड एकरमध्ये ढोबळी मिरचीचे (कलर कॅप्सीकम) उत्पादन घेण्यास सुरवात केली. पहिला प्रयोग म्हणून त्यांनी संरक्षित शेतीतून लागवड केलेल्या सिमला मिरचीचे त्यांना चांगले उत्पादन झाले. मात्र, भाजीपाला बाजारातील अस्थिरतेमुळे पाहिजे तसा अपेक्षित भाव मिळाला नाही. अशातच व्यवसाय आणि शेती यांची योग्य सांगड घालता न आल्यामुळे शेती व्यवसायात प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले.
बाजाराचा केला अभ्यास
श्री. लठ्ठे यांनी ही शेती करण्यापूर्वी फुलशेती करणार्या उत्पादकांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन भेटी घेतल्या. फुलांच्या व्यापार्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या पॉलीहाऊसमध्ये जरबेरा पिकवण्यासाठीचा अंतिम निर्णय घेतला. बाजारात दिलेल्या या भेटींमुळे त्यांची मानसिकता पूर्णपणे बदलली आणि यातूनच त्यांना फुलशेती क्षेत्रातील अफाट क्षमता लक्षात आल्या. त्यांनी फुलांचे वाण, रंग प्राधान्ये, त्यांचा दर्जा आणि लागवड साहित्यांची माहिती जाणून घेतली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांनी लगेचच के. एफ. बायोप्लॉट्स कंपनीच्या अधिकार्यांना भेटून त्यांच्याची चर्चा केली. यातूनच पुढे के. एफ. बायोप्लॉट्स आणि श्री. लठ्ठे यांच्यातील संबंध दृढ झाले. कंपनीतील अधिकार्यांचे मार्गदर्शन त्यांना मोलाचे ठरले आणि यातूनच पुढे त्यांनी दर्जेदार फुलांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले.
के. एफ. बायोप्लॉट्सचे सहकार्य
शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळण्याऐवजी नुकसान होत असल्याने शेती विकण्याचा निर्णय घेतला. मात्र, अशातच 2016-17 ला एक एकर पॉलीहाऊसमध्ये के. एफ. बायोप्लॉट्स कंपनीच्या जरबेरा फुलांची लागवड केली. अतिशय उच्च दर्जाची फुले उत्पादीत होत असल्याने बाजारात मागणी वाढली. त्यामुळे 2018 ला दीड एकरवर जरबेरा फुलांची पुन्हा लागवड केली. 2020 मध्ये पडलेल्या लॉकडाऊनचा सुमारे अडीच एकर जरबेरा व 30 एकरवरील भाजीपाल्याला मोठा फटका बसला. बाजारपेठ ठप्प झाल्यामुळे श्री. लठ्ठा यांना तब्बल एक ते सव्वा कोटीच्या नुकसानीचा सामोरे जावे लागले. लॉकडाऊननंतर हळूहळू बाजारपेठेतील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागताच पुन्हा फुलांना मागणी वाढली. गेल्या दोन वर्षांपासून श्री. लठ्ठे हे 13 एकर पॉलीहाऊस व दोन नेटहाऊसमध्ये जरबेरा, जिप्सोफिलाच्या उच्च दर्जाच्या फुलांचे उत्पादन घेत आहेत. याशिवाय दहा एकरवर ब्ल्यू डिजे, गोल्डन डिजे, कामिनी, येलो व रेड ड्रेसिना अशा विविध प्रकारच्या सजावटीसाठी वापरल्या जाणार्या फिलर मेटरियल्सचे दर्जेदार उत्पादन ते घेत आहेत. अत्यल्प कालावधीत श्री. लठ्ठे यांनी फोंड्या माळाचे नंदनवन करीत जरबेरा उत्पादनात देशपातळीवर आपल्या ओम फ्लावर्स नावाचा ब्रॅन्ड नंबर एकवर नेला आहे. सद्यःस्थितीत ओम फ्लावर्सच्या फुलांना पुणे, मुंबई, सुरत, अहमदनगर, हैदराबाद, विजयवाडा, दिल्लीसह इतरही अनेक मेट्रोसिटीतून प्रचंड मागणी असते. सध्या श्री. लठ्ठे यांच्या 10 एकर क्षेत्रावर जरबेरा आणि 3 एकरवर जिप्सोफिला या फुलांची लागवड केली असून या 13 एकरमधून सद्यःस्थितीत दररोज 35 हजार फुलांची काढणी केली जाते. श्री. लठ्ठे यांच्या फुलांचा ब्रॅन्ड आता देशभरातील फ्लोरिकल्चर मार्केटमध्ये प्रसिद्ध झाला असून त्यांचे उत्पादनही कौतुकास्पद ठरले आहे.
श्रमाचे मिळाले फळ
श्री. लठ्ठे यांनी स्वतःला शेतीमध्ये समर्पित केल्यामुळे श्रमाच्या बळावर चांगले उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांना के. एफ. कंपनीची साथ मिळाली. लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्या फुलांना बाजारात चांगला दर मिळाला. जवळपास तीन दशकांपासून के. एफ. बायोप्लांट्स सर्व प्रगतीशील शेतकर्यांना तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यात आघाडीवर आहेत. कंपनीचे अधिकारी व व्यवस्थापक प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच सर्वोत्तम तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी अथक परिश्रम करतात. श्री. लठ्ठे यांना मिळालेल्या या सहकार्यामुळेच त्यांची फुलांची शेती त्यांच्या दृढनिश्चयाचे ज्वलंत उदाहरण ठरली आहे. कृषी क्षेत्रात होणार्या बदलांचा स्विकार केला तरच शेतीत शेतकर्यांना प्रगती साधता येते, हे अजित लठ्ठे यांनी यांच्या कृतीतून समोर आले आहे.
पाणी व खत व्यवस्थापन
पाणी व खते देण्याचे व्यवस्थापन करताना पॉटमधील रोप लागण ही कोकोपॉटमध्ये केली जाते. त्यामुळे पॉटमधील खत व पाणी व्यवस्थापन फार काळजीपूर्वक करावे लागते. ए, बी, सी अशा तीन टँक करावे. ए टँकमध्ये कॅल्शियम नायट्रेट, 13.0.45 व एफ. ई., बी टँकमध्ये 13.0.45, 0.0.50, 0.52.34, मॅग्नेनियम नायट्रेट, झिंक, कॉर्नबाय तर सी टँकमध्ये नायट्रीक अॅसिड असावे. यात एक आठवड्याचे स्टॉक सोल्यूशन तयार करावे व ते दीड ते तासाला गरजेनुसार प्रती प्लॅन्ट 75 ते 100 मिलीलीटर याप्रमाणे एक सायकल असे 4 ते 6 सायकली वातावरण बघून द्यावे.
पॉट लागवड व्यवस्थापन
पॉटमधील रोपे लागण करत असताना प्रथम स्टिलचे रॅक बनवणे गरजेचे आहे. साधारणतः 32 पॉटचा एक रॅक असावा. त्या रॅकमध्ये पॉट व्यवस्थित मांडून घ्यावे. त्यात प्रोसेस केलेले कोकोपीट भरावे व रोप लागण करावे.
किड व रोग व्यवस्थापन
यासाठी वातावरणाचा अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. जरबेरा पिकामध्ये माईट्स, अळी, सायक्लोमाईट्स, पावडरी, निमॅरोड, ब्लॅकस्पॉट, रुटरॉट, कॉलररॉट असे प्रॉब्लेम येतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही औषधांचा वापर करावा लागतो. माईट्स निमुर्लनासाठी एम. इम्पॅक्ट मॅजिस्टर, सायक्लोमाईट्ससाठी अॅबसीन, एक्सोडोस, पावडरीसाठी निमरॉड, लूना, निमॅरोडसाठी निमॅटोसन, कार्बोफिरॉन, ब्लॅकस्पॉटसाठी अॅमिस्टार व स्कोर तसेच रुटरॉट किंवा कॉॅलररॉटच्या निमुर्लनासाठी अॅलेट किंवा एन्ड्रॉकॉल अशी औषधे वापरली जातात.
लॉकडाऊनमध्ये 75 दिवस शेतात
लॉकडाऊनच्या काळात शेतकर्यांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती. त्याला अजित लठ्ठे देखील काही अपवाद नव्हते. त्यांची शेती तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवर असल्याने पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. लॉकडाऊन जाहीर झाले, त्यावेळी श्री. लठ्ठे हे आपल्या एका मजुरासह शेतातच होते. त्यांचे घर महाराष्ट्रात तर शेती कर्नाटकात अशी परिस्थिती असल्याने त्यांना शेतातून घरी जाताच आले नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातील तब्बल 75 दिवस त्यांनी शेतात काढले. शेतातील आपल्या मजुर कुटुंबाजवळच ते राहिले. मात्र, शेतात वास्तव्याचा हा काळ त्यांना खूप काही शिकवणारा ठरला. या काळातच त्यांनी शेतीतील तंत्रज्ञान आत्मसात केले. दिवसभर शेती एके शेतीच असल्याने त्यांचा शेतीबाबत खूपच गाढा अभ्यास झाला. शेती संदर्भातील अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि यातूनच त्यांना प्रेरणाही मिळाली.
(सौजन्य : के. एफ. बायोप्लॉट्स)