किटकनाशक हे 1968 च्या कायद्यानुसार मान्यताप्राप्त परवानाधारक कृषि सेवा केंद्रातूनच घ्यावेत. तसेच केंद्रीय किटकनाशक बोर्डाने (सी.आय.बी.) मान्यता दिलेलेच सिलबंद किटकनाशक खरेदी करावे. स्थानिक, अमान्यता प्राप्त, मुदतबाह्य, सिलबंद नसलेले, विक्रीस बंदी असलेले, अति स्वस्त किंवा अति महाग किटकनाशक खरेदी करू नये.खरेदी करताना पक्के बिल मागून घ्यावे. त्यावर कंपनी, बॅच क्रमांक उत्पादन तसेच अंतिम तारीख नमुद करून घ्यावे. किटकनाशक खरेदी करताना पॅकिंगवरील आणि लेबल वरील विषाचे प्रमाण दर्शविणारा त्रिकोण पाहून कमी विषारी किटकनाशक खरेदी करावे.
विषाचे प्रमाण दर्शविणारे त्रिकोण पुढीलप्रमाणे असतात.
कमी विषारी किटकनाशक – याच्या पॅकिंगवर हिरवा त्रिकोण असतो. त्यावर सावधान असे नमुद केलेले असते.
साधारण विषारी कीटकनाशक– याच्या पॅकिंगवर निळा त्रिकोण असतो. त्यावर धोका असे नमुद केलेले असते.
जास्त विषारी कीटकनाशक– याच्या पॅकिंगवर पिवळा त्रिकोण असतो. त्यावर विष असे नमुद केलेले असते.
अति विषारी कीटकनाशक– याच्या पॅकिंगवर लाल त्रिकोण असतो. त्यावर विष असे नमुद केलेले असते शिवाय मानवी कवटी व हाडाचे धोक्याचे चित्र असते. असे किटकनाशक शक्यतो खरेदी करू नये.
पेरणीपासून ते उगवणी पर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या किड व रोगांचे आक्रमण होत असते.या किडींचे वेळेवर नियंत्रण न केल्यास उत्पादनामध्ये ३० ते ७० टक्क्यांपर्यंत घात येऊ शकते.हि घात टाळण्यासाठी पिकांवरील किडींचे नियमित सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.सर्वसाधारण आठवड्यातून एक वेळा,तर नियमित तीव्र प्रादुर्भाव क्षेत्रात दोन वेळा किडींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
किटकनाशक खरेदी करताना घ्यावयाची दक्षता
- पिकावर रस शोसणाऱ्या किडींचा १५ – २० टक्के झाडावर व खोडकिडे, बोंड आळ्या, पोखरणाऱ्या ,गुंडाळणाऱ्या, खाणाऱ्या आळ्याचा उपद्रव ५ टक्केपेक्षा जास्त असल्यास रासायनिक कीडनाशकांचा वापर करावा व यापेक्षा कमी असल्यास जैविक कीडनाशक वापरावे.
- फ़क़्त तज्ञाद्वारे, कृषीदर्शनी, पिक संरक्षण पुस्तिका, विश्वास पात्र दैनिके, नियतकालिके याद्वारे शिफारस केलेलीच कीडनाशके घ्यावीत.
- शिफारशीत पिके, मात्रा, काढणीपूर्व कालावधी, कमाल अवशेष मर्यादा, विषबाधा होऊ नये यासाठीची खबरदारी व अनावधानाने विष बाधा झाल्यास करावयाचे प्रथमोपचार इ माहितीसाठी पकिंगवरील लेबल काळजीपूर्वक वाचावे.
- किटकनाशके नेहमी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनचा खरेदी करावीत व दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल घ्यावे व ते हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे.किटकनाशक बाटल्या,पाकिटे खरेदी करताना त्यावर वापराची पद्धत व अंतिम तारीख बघून घ्यावी.
- सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे कीटकनाशकाच्या पकिंगवर वेगवेगळ्या रंगामध्ये दर्शवलेले त्रिकोण त्या औषधाची तीव्रता निर्देशित करतात.
- आपल्या पिकासाठी व प्रादुर्भाव झालेल्या किड व रोगाच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम च्या अनुषंगाने योग्य त्या औषधाची निवड करावी.
- शक्यतो अतिविषारी गटातील कीटकनाशकाचा वापर टाळावा
- नेहमी बंद पाकीट/डब्यातीलच किटकनाशके खरेदी करावीत.पकिंग फुटलेले असल्यास खरेदी करू नये.
- आपणास हवे असलेले कीडनाशक,तांत्रिक नाव व त्यातील घटक पाहून खात्री करून घ्यावे.
- शिफारस केलेलेच किटकनाशक विकत घ्यावे.
- फुटलेले ,मोहोर नसलेला डबा, पुडा खरेदी करू नये.
किटकनाशके मिश्रण तयार करताना घ्यावयाची काळजी
- किटकनाशके हाताळताना संरक्षण कपडे, रबरी हातमोजे, मास्क इ. साधनांचा वापर करावा.
- किटकनाशक डबा, पुड्यावर हाताळण्याची माहिती दिली असते,त्या सूचनांचे पालन करावे.
- मिश्रण तयार करण्यासास्ठी खोल व प्लास्टिकच्या भांड्याचा वापर करावा.
- किटकनाशक मिश्रण हाताने ढवळू नये,काठीचा वापर करावा.
- औषध मोजण्यासाठी योग्य साधनांचा वापर करावा.
- फवारणीस आवश्यक तेव्हडेच मिश्रण तयार करावे.
- मिश्रण जास्त काळ तसेच ठेवू नये.
- भुकटी किंवा दाणेदार किटकनाशके डब्यातून,पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा.
- फवारणी करताना वापरावयाचे पाणी स्वच्छ व गाळलेले असावे
- मिश्रण करताना विरुद्ध दिशेस उभे राहू नये.
- मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी ग्यावी.
- मिश्रणासाठी वापरलेली भांडी,वस्तू इ इतर कामासाठी वापरू नये.
- औषध वापरताना डब्याचे झाकण व्यवस्थित बंद करून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी.
- किटकनाशक डबे सुरक्षित जागी ठेवावेत.
किटकनाशक वापरताना घ्यावयाची काळजी
- फवारणी नंतर हात पाय तोंड साबणाने स्वच्छ धुवावे.
- फवारणी वेळी वापरलेले कपडे भांडी फवारणी यंत्रे स्वच्छ धुवावेत
- फवारणी क्षेत्रापासून लहान मुले, गुरे,पाळीव प्राणी आणि इतर माणसे यांना दूर ठेवावे.
- फवारणी क्षेत्रातील गवत कापून चारा म्हणून वापरू नये.
- फवारणीची भांडी, कपडे, अवजारे, नदी, नाला, तलावात धुवू नये.
- धुण्यासाठी वापरलेले पाणी पडीक जमिनीत अथवा खोल खड्यात टाकून मातीने बुजवावे
- रिकामे डबे,बाटल्या इतर कामांसाठी वापरू नये ती दगडाने ठेचून खोल खड्यात बुज्वावीत.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी
- शिफारशीत किटकनाशक योग्य मात्रेमध्ये घेऊन सांगितल्याप्रमाणे द्रावण तयार करावे,फवारणी करताना हात पंपाला ( नपसक स्प्रेयर)हॉलो कोन नोझल वापरावे.या नोझलमधून ४० ते ८० पी.एस.आय. दाब उत्पन्न होऊन फवाऱ्याचे कव्हरेज मिळते. या पंपाने सर्वसाधारणपणे पिक वाढीच्या अवस्थेनुसार ३५० ते ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर लागेल.पिक मोठे असल्यास व दोन ओळींतील जागा पूर्ण झाकल्यास पावर पंपाचा वापर करावा.या प्म्पातून प्रतिमिनट 0.५ ते ५ लिटर द्रावण बाहेर पडू शकते. सर्वसाधारणपणे या पावर पंपाने १७५ ते २०० लिटर पाणी लागेल.
- फवारणी करताना पिकाच्या घेरानुसार व पानांच्या आकारमानानुसार यापूर्वी सांगितल्यानुसार निवड करावी.हातपंपाला हॉलो कोन नोझल किंवा इतर योग्य नोझल निवडावे.सर्वसाधारणपणे १००-३०० मायक्रोन आकाराचे थेंब यावेत.
- कडक उन आणि हवेच्या तीव्र गतीमध्ये फवारणी केल्यामुळे औषधाच्या मिश्रणाचे थेंब झाडावर आवश्यक आकाराने व संखेने जमा न झाल्याने औषधाचा प्रभाव कमी होतो.
- सुक्ष्म थेंबांना झाडावर चिकटणारा उपयुक्त पदार्थ जर औषधाच्या मिश्रणात नसेल तरी प्रभावकारी कितनियंत्रण होणार नाही.
- फवारणी नंतर पूस आल्यास औषधीचा प्रभाव पर्याप्त राहत नाही.
- नपसक किंवा पावर पंपाने फवारणी करताना पिकाच्या ओलीमाधीन सारख्या वेगाने चालावे अन्यथा औषधांचा झाडावर सारख्या प्रमाणात फैलाव होणार नाही व मिश्रणाची मात्र देखील प्रभावित होते.
- फाव्रणी यंत्राच्या टाकीत उत्पन्न होणाऱ्या दाबामुळे आणि नोझल मधून निघतेवेळी दाब, नोझलचा प्रकार यांचा मिश्रणाच्या थेंबाचा आकार, त्याचे वितरण आणि संख्या प्रभावित होऊन अंततः किड अथवा रोगाच्या प्रभाव कार्यतेवर प्रतिकूल परिणाम होतो.
- औषध फवारणी धुरळणी शक्यतो सकाळी अथवा सायंकाळी हवा शांत असताना करावी.शक्यतो हवेचा वेग ५ किमी प्रति तासापेक्षा जास्त असल्यास फवारणी टाळावी.
- फवारणी अथवा धुरळणी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये,म्हणजे फवारणी करणाऱ्याच्या अंगावर औषध उडणार नाही
- फवारणी करताना औषधांचा शरीराशी संपर्क येऊ देऊ नये.
- औषध फवारणी धुरळणी चालू असताना खानपिणे धुम्रपान टाळावे.
- लहान मुलांना कीटकनाशकांची फवारणी करू देऊ नये.
- फवारणी चालू असताना नोझल बंद झाल्यास त्यास तोंडाने न फुंकता तारेचा अथवा टाचणीचा वापर करावा.
- तणनाशक फवारणी यंत्र किटकनाशक फवारणीसाठी वापरू नये.
- उंच झाडावर फवारणी करताना फवारा अंगावर उडणार नाही याची दक्षता घ्यावी.
- औषधी फवारणी कामासाठी हातापायावर जखमा असलेल्या माणसाची निवड करू नये.
- फुले फळे पालेभाज्या यांची तोडणी अथवा खोडणी झाल्यावर फवारणी करावी.
- फवारणी अगर धुरळणी करताना शरीराचा जास्तीत जास्त भाग कपड्याने झाकून घ्यावा.
- फवारणी यंत्राच्या टाकीचा आंतरिक दाब आवश्यक तेवढ्या स्तरावर कायम ठेवावा.
- औषधीचे मिश्रण तयार करतेवेळी गढूळ आणि क्षारयुक्त पाण्याचा प्रयोग करू नये.
बाधित व्यक्तीची घ्यावयाची काळजी:
- कीटकनाशक पोटात गेल्यास किंवा त्वचा,डोळे,श्वसनइंद्रिय याद्वारे विष बाधा होऊ शकते.व्यक्तीस विषबाधा झाल्यास अपघात स्थळापासून दूर न्यावे,त्याच्या अंगावरील कपडे बदलावे.
- कीडनाशक पोटात गेल्यास बाधित व्यक्तीस पाणी,दुध विडी पिण्यासाठी देऊ नये.
- बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांकडे घेऊन जावे.
इंजी.वैभव सूर्यवंशी
विषय विशेषज्ञ, कृषि विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव (मो.नं.०९७३०६९६५५४)