देशभरात करोना व्हायरसच्या प्रादुर्भावाची परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नसताना आता ‘बर्ड फ्लू’चे नवे संकट घोंघावू लागले आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये बर्ड फ्लू विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. जपानमध्ये बर्ड फ्लू विषाणू जलदगतीने पसरत आहे. भारतातही याचा शिरकाव झाला असून गेल्या काही दिवसांत राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त पक्ष्यांचा बळी बर्ड फ्ल्यूने घेतला आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी मृत पक्षी आढळून आल्याने राज्याने बर्ड फ्लूची धास्ती घेतली आहे. कारण महाराष्ट्राने 2006मध्ये या संकटाचा अनुभव घेतला आहे. बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसर्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. बर्ड फ्लूमुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण पाहिले तर ते अतिशय कमी असले तरी यामुळे कुक्कुटपालन व पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा फटका बसतो. जशा बर्ड फ्लूच्या बातम्या येतात, तशा कोंबड्यांच्या पोल्ट्री खाली केल्या जातात, लाखो पक्षांना मारले जाते, अंडी व चिकनचे दर एकाएकी खाली उतरतात. यामुळे बर्ड फ्लूबाबत अफवा न पसरवता, हे संकट रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत व काय काळजी घेतली पाहिजे? याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
बर्ड फ्लू हा पक्षांमध्ये पसरणारा एक संसर्गजन्य रोग आहे. ज्याला बर्ड फ्लू वा एवियन एन्फ्लुयेन्झा असेही म्हणतात. पक्षांद्वारेच हा रोग माणसांपर्यंत पोहचतो. जे लोक पोल्ट्री व्यवसाय करतात, वा कोंबड्या वा इतर पक्षांची ज्यांचा जवळचा संबंध आहे, त्यांच्यामध्ये हा रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि केरळ या राज्यांमध्ये मोठ्या संख्येने पक्षी अचानक मरून पडल्याचे आढळले. यामध्ये स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. बर्ड फ्लू हे यामागचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने हिमाचल प्रदेशात मृतावस्थेत आढळून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’ म्हणजे एव्हियन इन्फ्लूएन्झामुळे झाला असल्याचा रिपोर्ट केंद्र सरकारला दिला आहे. तर राजस्थान, मध्य प्रदेश, केरळमध्येही बर्ड फ्लूच्या संसर्ग पक्ष्यांमध्ये झाल्याचे तपासात आढळले आहे. केरळच्या कोट्टयम आणि अलापुळामधल्या ज्या भागात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला तिथली बदकं, कोंबड्या आणि घरातले इतर पाळीव पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या शेतकर्यांकडचे पक्षी मारले जातील, त्यांना केरळ सरकार मदत देणार आहे. मध्य प्रदेशातही पक्ष्यांना जमिनीत पुरून मारण्यात येत आहे.
महाराष्ट्रामध्ये ठाण्यात काही पक्षी मरुन पडल्याचे आढळल्यानंतर खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकारने अलर्ट दिला आहे. 2006 साली पहिल्यांदा महाराष्ट्रातच बर्ड फ्लूने संक्रमित पक्षी आढळले होते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर असणार्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची नोंद झाली होती. त्यावेळी राज्यभरात तब्बल अडीच लाख कोंबड्या मारल्या गेल्या. तर 5 लाखांहून अधिक अंडी नष्ट करण्यात आली. या संक्रमण काळात कुठल्याही मृत्यूची नोंद सापडत नसली तरी यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसियकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते.
मांस पूर्ण शिजवूनच खावे – जागतिक आरोग्य संघटनेचे निर्देश
भारतामध्ये अद्याप माणसांमध्ये बर्ड फ्लू झाल्याचे प्रकरण आढळलेले नाही…. पण हा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम होण्याची शक्यता असते. त्यामुळे न शिजवलेले मांस तसेच अन्य कोणतेही पोल्ट्री उत्पादन कच्च्या स्वरूपामध्ये खाऊ नये. मांस शिजवण्यासाठी वेगळी भांडी वापरावी, बर्ड फ्लूच्या संसर्गामध्ये मासांहार करणे टाळावे, तसेच संक्रमित भागामध्ये मास्कचा वापर करावा, हात कोमट पाणी व साबणाने स्वच्छ धुवावे. कच्ची अंडी खाऊ नयेत, अर्धेकच्चे मांसही सेवन करू नये. मांसाहार करायचा असेल, तर ते पूर्णपणे शिजवावे, कच्च्या स्वरूपातील ’रेडी टू इट’ पदार्थांचे सेवन टाळावे, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहेत. मात्र बर्ड फ्लूमूळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असतो. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या राज्यात बर्ड फ्लूच्या अफवा उठतात, त्याचा परिणाम थेट पशूपालन आणि पोल्ट्री उद्योग करणार्या शेतकर्यांवर होतो. कोंबड्यांचे दर पडतात. लाखो कोंबड्या मारल्या जातात, आणि लाखो शेतकर्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आताही कोरोना काळात चिकन आणि अंड्यांच्या घटलेल्या मागणीमुळे 2020 च्या पहिल्या सहामाहीत तोटा सहन केल्यानंतर कुक्कुटपालन उद्योग दुसर्या सहामाहीत आला आला होता तोच बर्ड फ्लूच्या घटनांनी पुन्हा एकदा कुक्कुट पालन व्यवसायाची धास्ती वाढली आहे.
राज्यात कोंबड्यांत बर्ड फ्लूची लक्षणे न दिसल्यानंतरही दोन दिवसांत ठोक बाजारात चिकन आणि अंड्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. बर्ड फ्लूची प्रकरणे वाढल्यास पुन्हा एकदा चिकन व अंड्यांची मागणी घटेल आणि उद्योगाला नुकसान सोसावे लागू शकते, अशी भीती व्यावसायिकांना आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर धोरणे आखली जातीलच मात्र आपणही बर्ड फ्लूबाबत पसरणार्या अफवांना फेसबूक, व्हाट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन व्हायरल करणे टाळले पाहिजे. आधीच शेतकरी व छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. आता सर्वांनी योग्य ती काळजी घेतली तर बर्ड फ्लूसारख्या विषाणूला हरविणे सहज शक्य होईल.
बर्ड फ्लूचा इतीहास.. पाहिल्यास 1900च्या दशकात इटलीमध्ये सर्वात आधी हा फ्लू आढळला होता. त्यानंतर 1961 मध्ये दक्षिण आफ्रिकेत या फ्लूमुळे लाखो पक्षी संक्रमित झाले. डिसेंबर 1983 ला पेन्सिलवेनिया आणि व्हर्जिनियात या फ्लूने थैमान घातले. त्यानंतर 50 लाख कोंबड्या आणि बदकांना मारण्यात आले. 1997मध्ये बर्ड फ्लूचे माणसांतल्या संसर्गाचे पहिले प्रकरण आढळले होते. 18 लोकांना हा फ्लू झाला. त्यातील 5 लोकांचा मृत्यू झाला. बर्ड फ्लूमुळे मृत्यू होण्याची ही जगातील पहिलीच घटना होती. त्यानंतर हाँगकाँगमद्ये तब्बल 15 लाख पक्षांना मारण्यात आले. 2019 ला जगभरात तब्बल 1568 लोकांना या फ्लूची लागण झाल्यानंतर त्यातील 616 लोक दगावल्याची नोंद आहे. बर्ड फ्लू माणसांमध्ये एका व्यक्तीकडून दुसर्याकडे सहजासहजी पसरू शकत नाही. जी लोकं एकमेकांच्या अगदी जवळच्या संपर्कात असतात, त्यांच्यातच याचा संसर्ग पसरल्याचे आढळून आले आहे.
डॉ.युवराज परदेशी, संपादक, दै. जनशक्ती..