अभियांत्रिकी शिक्षण तेही २० वर्षापूर्वी झालेले असेल तर आज ती व्यक्ती नक्कीच कुठेतरी नोकरी करत असेल असा कुणाचाही समज होईल. पण नगर जिल्ह्यातील कोळगाव ता. श्रीगोंदा येथील प्रशांत पांडूरंग लगड यांचे अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण झाले असले तरी त्यांनी शेतीचा पर्याय निवडला व शेतीला पुरक व्यवसाय म्हणून रेशीम व्यवसाय सुरु केला. त्यासाठी त्यांनी पहिल्या वर्षी एक एकर व दुसऱया वर्षी एक एकर तुतीची लागवड केली. दोन वर्षापासून रेशीम व्यवसायात यश मिळवत आर्थिक प्रगती साधली. शेतीतही लिंबू, ऊसाचे उत्पादन घेऊन फायदेशीर शेती करण्याचा त्याचा प्रयत्न दिसत आहे. फक्त रेशीमच्या माध्यमातून ते वार्षिक साडेतीन लाख रु निव्वळ नफा १ एकरमधून मिळवत आहेत.
नोकरी ऐवजी शेतीतच दाखवला रस
नगर जिल्ह्यामधील कोळगाव परिसरात पाण्याची चांगली उलब्धता. त्यामुळे या भागात शेतकरी ऊसासह इतर नगदी पीके घेतात. लिंबाचीही या भागात लागवड केलेली आहे. येथील प्रशांत पांडूरंग लगड यांची वडिलोपार्जीत दहा एकर शेती आहे. त्यांचे अभियांत्रिकी डिप्लोमाचे शिक्षण झाले आहे. वीस वर्षापुर्वी शिक्षण झाले आणि काही दिवसात वडीलांचे निधन झाले. त्यामुळे प्रशांत यांनी नोकरी न करता शेतीच करण्याचा निर्णय़ घेतला. दहा एकर शेतीत ऊस, लिंबू यासह इतर पीके असतात. सध्या त्यांच्याकडे पाच एकर ऊस, दोन एकर लिंबाची बाग आहे. बारामाही पीक म्हणून लिंबाकडे पाहिले जाते. वर्षभरातून लिंबू उत्पादनातून साधारण दोन ते तीन लाखाचे आर्थिक उत्पन्न मिळते. लिंबाची स्थानिक बाजारात विक्री करतात.
प्रशांत यांनी शेतीला जोड म्हणून पुरक व्यवसाय सुरु करण्याचा निश्चय केला. त्याचे काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील मित्र अविनाश धामणे साधारण पंधरा वर्षापासुन रेशीम व्यवसाय करतात. याशिवाय त्यांनी पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी जाऊन रेशीम व्यवसायाची पाहणी केली आणि रेशीम व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोन वर्षापुर्वी अंडीपुंजी ठेवण्यासाठी साडेतीन लाख रुपये खर्च करुन शेड उभारले. लोणी (ता. राहाता) येथून रोपे आणून एक एकरवर तुतीची लागवड केली. पहिल्या वर्षी चांगले रेशीम उत्पादन घेतल्यानंतर यंदा त्यात वाढ करुन दोन एकरावर तुतीची लागवड केली आहे.
असे घेतले जाते रेशीम उत्पादन
नगरला शासकीय अनुदानावर अंडीपुंज उपलब्ध होतात. अंडपुजी आणल्यानंतर त्याची पहिले सहा दिवस घरातच संगोपन केले जाते. त्यानंतर रेशीम आळ्यांचा जन्म चार दिवसात होतो. सातव्या किंवा आठव्या दिवशी त्यासाठी उभारलेल्या शेडमध्ये नेले जाते. आळ्याच्या चार आवस्था असतात. सुरवातीला तुतीपाला कापुन व भुगा करु टाकला जातो. नंतरच्या काळात थेट पाला कापुन टाकला जातो. साधारण पंधरा ते सोळा दिवस आळीची मोठी आवस्था असते. शेवटचे सहा ते सात दिवस 75 टक्के तुती चारा लागतो. नंतर शेवटचे सहा दिवस आळी कोषात जाते व रेशीम तयार करायला सुरवात करते. त्यानंतर साधारण जन्मानंतर पंचवीस दिवसांनी त्यावर चंद्रीका (जाळी) टाकली जाते. त्यानंतर तीन ते चार दिवसात पुर्ण रेशीम तयार होते.
अर्थकारण
वर्षभरात साधारणपणे ५-६ बॅच घेतल्या जातात. एका एकरच्या तुतीवर ३०० अंडीपुंज पोसली जातात. फवारणी , मजुरी व वाहतूक खर्च असा एकूण १५००० पर्यंत खर्च एका बॅचसाठी होतो. प्रशांत यांनी पहिल्या वर्षी एका एकरावर केलेल्या तुती लागवडीपासून वर्षभरात चार टप्प्यात सुमारे दिड हजार किलो रेशीमचे उत्पादन घेतले. त्यासाठी त्यांना मजुरी एक लाख रुपये खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना निव्वळ साधारण साडेलाख रुपये उत्पन्न मिळाले. पहिल्या वर्षी चांगले उत्पन्न मिळाल्याने त्यांनी दुसऱया वर्षी पुन्हा एक एकरावर तुतीची लागवड केली. दुसऱया वर्षी आतापर्यत चार टप्प्यात तीन लाखाचे रेशीम उत्पादन घेतले आहे. मजुराची सध्या सातत्याने टंचाई जाणवते, मात्र प्रशांत यांना आई शोभा व पत्नी सुप्रिया हे रेशीम उत्पादनासह शेत कामाला मदत करतात. याशिवाय प्रत्येक रेशीम उत्पादन टप्प्यात दोन ते तीन मजुर बाहेरचे लावतात.
शेतकऱयांना रेशीमाची विक्री करण्यासाठी जवळच असलेल्या बारामती तसेच जालना येथे बाजार उपलब्ध आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरही रेशीम खरेदी कऱणारे व्यापारी येतात. प्रशांत यांनी रेशीम उत्पादन घेतलेल्या रेशमाची आतापर्यत शक्यतो बारामती बाजारातच विक्री केली आहे. त्यांना सरासरी साडेतीनशे रुपये किलोचा दर मिळाला आहे. आतापर्यत दोन वर्षात त्यांनी एक हजार किलो किलो रेशीमाची विक्री केली आहे. प्रत्येक टप्प्यात आडीचशे ते तीनशे किलो रेशीम निघते.
प्रयोगशील प्रशांतचे इतरही आहेत उत्पन्नाचे श्रोत
प्रशांत उच्च शिक्षित असले तरी ते शेतीत राबूनच आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी स्वतःच्या शेती कामासाठी सहा वर्षापुर्वी पाच लाख रुपये खर्च करुन करुन टॅंक्टर खरेदी केला आहे. त्याच टॅक्टरच्या मदतीने घरच्या शेतीसह बाहेरही रोजंदारीने टॅंक्टरने कामे करतात. त्यातून त्यांना वर्षाला दोन ते तीन लाखाचा आर्थिक हातभार लागतो. ऊस व लिंबूच्या बागेपासून देखील चांगले अर्थार्जन होते.
प्रयत्नांती परमेश्वर आणि प्रयोगांती रेशीम
रेशीम शेतीत प्रशांत यांना लगेच यश मिळाले पण तत्पूर्वी प्रशांत यांनी शेतीत दुग्धव्यवसाय तसेच भाजीपाला लागवडीचे प्रयोग केले. त्यांनी वीस वर्षापुर्वी सोळा संकरित गाईंचे पालन करुन सात वर्ष दुध व्यवसाय केला. मात्र दुध व्यवसायासाठी मजुरांची टंचाई आणि दुधाला मिळत असलेला दर परवडत नसल्याने दुध व्यवसाय बंद केला. त्यानंतर त्यांनी दोन ते तीन एकरावर सहा वर्षापुर्वी वेगवेगळ्या या भाजीपाल्याची लागवड करुन साधारण तीन वर्ष भाजीपाला उत्पादनही घेतले. मात्र मजुरांची टंचाईमुळे त्यांनी भाजीपाला उत्पादनही घेणे बंद केले.
‘‘शेतीला पुरक म्हणून रेशीम व्यवसाय चांगला फायदेशीर आहे. एका एकरापासून साधारण तीन ते साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळते. य़ाशिवाय नुकसानीची धोका कमी आहे. जिद्दीने आणि चिकाटीने हा व्यवसाय केला तर निश्चित प्रगती साधता येते. नेहमीच्या नगदी पिकांपेक्षा रेशीम शेती हमीचे उत्पन्न देते. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे.’’
प्रशांत पांडूरंग लगड,
मो. 9881981054