जळगाव (प्रतिनिधी)
पश्चिमी वाऱ्यामुळे हवामानात बदल जाणवत आहेत. बदलणाऱ्या हवेच्या दाबामुळे दक्षिण भारतातील हवेचा दाब आणखी वाढून पावसाला पोषक असे वातावरण तयार होत आहे. यामुळे राज्यातील काही भागात सोमवार दि २७ एप्रिल रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तरेकडील ओडिशा, मणिपूर, मिझोराम, आणि त्रिपुरामधील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, आणि विदर्भा लगतच्या भागात एक चक्रीय वाऱ्याचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे मराठवाडा. कर्नाटक आणि तामिळनाडूवर हे वारे सक्रिय असल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे.
देशाच्या लगतच्या तिन्ही महासागरावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कलइतका वाढून ही परिस्थिती निर्माण होईल आणि हवामानतज्ञांच्या मते हाच दाब मान्सूनसाठी पोषक असतो. सोमवार दि २७ एप्रिल रोजी हा दाबाचा पट्टा अधिक सक्रीय होऊन त्यात वायव्य कडून येणारे थंड वारे मिसळल्यामुळे बहुंतांश ठिकाणी गारपीठ शक्य आहे. कोकण वगळता उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात २७ व २८ रोजी अवकाळी पावसाची शक्यता आहे तर जळगांव जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वातावरण ढगाळ राहील. मराठवाडा व विदर्भात सर्वात जास्त अवकाळीची शक्यता आहे.
प्रभावित होणारे क्षेत्र
हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील विदर्भ, उत्तर महाराष्ट्र (काही जिल्हे) व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे . अधुन-मधुन सुरू असलेल्या अवकाळी पावसाची मालिका अजुनही सुरूच आहे. वातावरण बदलाची ही शुंखला महाराष्ट्रात देखील सुरू आहे. तापमान ४३ अंशावर गेले असतांनाच दुसरीकडे २७ व २८ रोजी अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
खरिपाच्या मशगतीसाठी पोषक सुरूवात
काही भागात गेल्याच पंधरवाड्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नांगरटी, वखरटी, ट्रिलर, राेटाव्हेटर सारखी पुर्व हंगामी मशागतीची कामे करून घेतली आहेत. या आठवड्यात हाेणाऱ्या अवकाळी पावसानंतर देखील शेतीच्या मशागतीची कामे साेपी हाेतील. पावसानंतर योग्य वापसा आल्यानंतर नांगरटी केल्यास जमीन भुसभूशीत हाेते. त्यामुळे हवामानाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी या आठवड्यात शेतीच्या कामांचे नियाेजन करणे आवश्यक आहे. या पावसामुळे खरिपाच्या पूर्व मशागतीची कामे करणे सोयीचे होणार असली तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी आपला तयार शेतमाल व पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावे . शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घेऊन अवकाळी पावसापासून रब्बीच्या पीकांना वाचवावे. मका, कांदा, केळी,भाजीपाला काही भागातील उर्वरीत गहू पीकांची काळजी घ्यावी. भुईमुंगाची पेरणी केली असल्यास अवकाळी पावसानंतर भुईमुंग काढणे साेईचे हाेईल. शेतातील तयार शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. आपल्या पशुधनास संरक्षित ठिकाणी हलवावे.