- एका गाईपासून सुरुवात, आज ४० गायी
- मुक्त संचार पध्दतीचा गोठा
- देशी व विदेशी गायीच्या दुधासाठी दोन वेगवेगळे ब्रांड
- महिना दीड लाखाचा निव्वळ नफा
- डेअरीच्या माध्यमातून ८ कुटुंबाना रोजगार उपलब्ध
- आदर्श गोपालक म्हणून २०१९ साली जिल्हा परिषदेचा पुरस्कार
- स्वतः हायड्रोपोनिक्स तंत्राने हिरव्या चाऱ्याची निर्मिती
कमी भांडवल, कमी क्षेत्र, कमी पाणी हे अडथळे असतांना नवा व्यवसाय सुरु करु पाहणाऱ्याला बऱ्याचदा अनेकांच्या टीकेचा धनी व्हावं लागतं. मात्र नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांनाच आव्हान देत यशाकडे जातो. वरखेडा येथील उफाडे बंधुंची यशोगाथाही अशीच आहे. कुटुंबाचे अवघे दोन एकर क्षेत्र असतांना त्यांनी पारंपारिक भाजीपाला शेतीकडून दुग्ध व्यवसायात उडी घेतली. मागील 5 वर्षात एका गायीपासून सुरुवात करुन ४० गायींपर्यंत मजल मारली आहे. मुक्त संचार पध्दतीच्या गोठ्यातून पूरक व्यवसायाची नवी वाट त्यांनी शोधली आहे. आज त्यांना या व्यवसायातून महिन्याला ६ लाखाचे शास्वत असे उत्पन्न मिळत असून खर्च वजा जाता दीड लाख रु निव्वळ नफा मिळत आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वरखेडा हे गाव तसे प्रयोगशील द्राक्षशेतीसाठी प्रसिध्द आहे. लखमापूर फाट्याहून वरखेडा गावाकडे जातांना जनता विद्यालयाजवळ प्रल्हाद पुंजाजी उफाडे यांची शेती आहे. टोमॅटो, द्राक्षे, कोबी ही पिके घेणारे प्रयोगशील शेतकरी अशी त्यांची ओळख आहे. मागील काही वर्षात बदलत्या वातावरणामुळे ही पिके अडचणीत आली. यातच पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन करण्याची वेळ त्यांच्यावर आली. प्रल्हादराव जिद्दीने शेती करीत असतांनाच शिकत असलेल्या जालिंदर, वैभव, चेतन या मुलांनी हळूहळू शेतीची सर्व जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेण्यास सुरवात केली. भाजीपाला शेती परवडत नसल्याचे समोर आल्यानंतर या तिघांनी दुग्ध व्यवसायाकडे वळावयाचे ठरवले. त्याला आई वडिलांनीही प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना आदर्श गोपालक म्हणून २०१९ साली जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
जालिंदरचं वय 32, वैभवचं वय 26, तर चेतनचं वय 22 आहे आणि चेतनने LSS डिप्लोमा पूर्ण केला आहे. जालिंदर आणि वैभव गावालगत असलेल्या एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. तर चेतन मात्र पूर्णवेळ दुग्ध व्यवसायात आहेत. दोघेही भाऊ नोकरी शिवाय पूर्णवेळ या व्यवसायातच असल्याचे सांगतात. तिघांनीही व्यवसायातील कामाची जबाबदारी वाटून घेतली आहे. तिघांचा समन्वय आणि व्यवस्थापनात वडिल प्रल्हाद व आई नंदाबाई, जालिंदर यांची पत्नी वर्षा यांचा सहभाग यामुळे उफाडे कुटुंबाचा “ईश्वरी डेअरी फार्म’ दमदार वाटचाल करीत आहे. जालिंदर यांच्या पहिल्या कन्येचं नाव ‘ईश्वरी’. हेच नाव डेअरी फार्मला दिलं आहे. याशिवाय त्यांनी देशी गाईच्या दुधाची ‘गोधन’ या ब्रांडद्वारे नाशिक व पिंपळगांव या ठिकाणी विक्री केली जाते.
उत्पन्न कमी चालेल पण शाश्वत हवं!
जालिंदर म्हणाले, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भाजीपाला पिके घेत होतो. कधी चांगलं उत्पन्न यायचं तर कधी मोठा तोटा व्हायचा. स्थिर उत्पन्न कधीच नसायचं. 2010 मध्ये लागवड केलेल्या टोमॅटो पिकाला क्रेटला 1100 पर्यंत दर मिळाला. त्यावेळी एका एकरातून 10 लाखाचे उत्पन्न मिळाले होते. त्याच्या दुसऱ्या वर्षी दर इतका कमी मिळाला की खर्च तर गेलाच वरुन अडीच लाखाचा तोटा झाला होता. हा अनुभव आमच्यासाठी “टर्निंग पाईंट’ ठरला. आता उत्पन्न कमी मिळालं तरी चालेल, पण शाश्वत उत्पन्न कसं मिळेल याचा आम्ही शोध घेऊ लागलो. दुग्ध व्यवसायाचा पर्याय समोर आला. हा यशस्वी होणारा व्यवसाय नाही, गोठ्याकडे वळू नका. असं अनेकांनी आम्हाला सांगून हे न करण्याचे सल्ले दिले. मात्र आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो.
अर्थकारण
वर्ष 2012 पासून दुग्ध व्यवसायाकडे वळले. सायखेडा बाजारातून पहिल्यांदा गाय खरेदी केली. याबाबत अनुभव नव्हता. एका मध्यस्थाच्या मदतीने गाय खरेदी केली. दुसऱ्या वेताची समजून गाय खरेदी केली होती. प्रत्यक्षात ती पाचव्या वेताची गाय होती. हे उशीराने कळले. फसवणूक झाल्यानंतर आमची समज वाढली होती. दुसऱ्या वर्षी नगर मधून बाजारातून चार होल्स्टन फ्रिजियन गाई घेतल्या. 2015 मध्ये भीषण पाणीटंचाई होती. या काळात चांगल्या 10 कालवडी विकाव्या लागल्या. आता 5 वर्षानंतर गोठ्यात होल्स्टन फ्रिजियन १६, गिर ८, थारपारकर १६, अश्या ४० गायी आहेत. या सर्व घरच्या वेताच्याच गाई आहेत. या गायींकडून निघणारे दररोज ३८० लीटर दूध विकले जाते. दुधाची स्थानिक नाशिक व पिंपळगांव मार्केटला विक्री केली जाते. देशी गाईच्या दुधाला ८० रु आणि होल्स्टन फ्रिजियनच्या दुधाला ३२ रु दर मिळतो.
घरी फक्त 2 एकर शेती असल्याकारणाने चारा हा विकत घेतला जातो त्यामुळे खर्च थोडा जास्त होतो त्यामुळे नफ्याचे प्रमाण कमी होते. ३८० लिटर दुधापासून महिन्याला सहा लाखापर्यंत उत्पन्न मिळते. गायीच्या संगोपन व दुध वितरण यासाठीच्या ८ मजुरांचा खर्च, महिन्याला लागणारा संतुलित पशुआहार, (ढेप व मिनरल मिक्श्चर) औषोधोपचार व चारा यावर ४५००००/- रु खर्च होतात तर राहिलेला १५००००/- हा नफा या माध्यमातून मिळतो. मुक्त संचार गोठ्यातील शेण ४ महिन्यांपर्यंत तसेच राहू दिले जाते. यातच गोमुत्र पडत असल्याने यात नत्राचे प्रमाण चांगले असते. दुसरी गोष्ट हे ओले तसेच साठवलेले नसल्याने यात शेणकिडा (अळी) तयार होत नाही. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांकडून या खताला चांगली मागणी होते. हे खत महिन्याला 2 ट्रोली ४००० रु दराने विकले जाते. या शिवाय गोमुत्राचीही विक्री केली जाते. स्लरीसाठी शेणाचीही विक्री होते.
दिंडोरी भागातील आदिवासी भागात वळूच्या साह्याने शेतीची मशागत होते. त्या भागात वळूला मागणी असते. वळूंची त्या भागात विक्री केली. कालवडी गोठ्यात राहतात. यातही फक्त देशी गायीचे वळू विक्री केले जातात, तर HF वळू हे मोफत शेतकऱ्यांना दिले जातात.
व्यवस्थापन …
रोज सकाळी 5 वाजता कामाला सुरुवात होते.
-दुध काढण्यापुर्वी गायींना ढेप व मिनरल मिक्श्चर दिले जाते.
5 ते 6 या वेळात मिल्किंग मशीनने दुध काढले जाते.
दुध काढल्यानंतर चारा टाकला जातो.
8 वाजता गायी गोठ्यात मोकळ्या सोडून दिल्या जातात.
-9 वाजेपर्यंत गोठ्यातील स्वच्छतेची कामे आटोपतात.
-दुपारी 4 ते 5 या वेळात कुट्टी मशीनने वैरण, कडबा बारीक केली जाते.
-5 वाजता दुध काढले जाते. त्यापुर्वी ढेप, मिनरल मिक्श्चर दिले जाते.
7 पर्यंत सर्व काम आटोपते.
साडे सातला गायी गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात.
दुधाची काढणी – मिल्किंग मशीनचा वापर अगदी पहिल्या गायीपासून सुरु केला आहे. हाताने दुध काढतांना गाईला तसेच काढणाऱ्यालाही वेदना होतात. दुध एकसारखे काढले जात नाही. मशीनमुळे एकसारखे दुध मिळते. वेळ व श्रमाचीही बचत होते. सध्या उफाडे यांच्या डेअरीत 2 मिल्किंग मशीन्स आहेत.
चांगल्या दुधासाठी आहार व्यवस्थापनावर भर
दुध काढण्यापुर्वी ढेप, दुध काढल्यानंतर चारा (यात फुले जयवंत चाऱ्याची कुट्टी व मिनरल मिक्श्चरचा समावेश असतो). चारा दिल्यानंतर 1 तासाने पाणी दिले जाते.
एका गायीसाठी एका वेळी 1 किलो ढेप, 100 ग्रॅम कॅल्शियम, 20 ग्रॅम सोडा व 60 ग्रॅम मीठ असा आहार तयार करुन दिला जातो. यामुळे दुधाची गुणवत्ता 29.5 डिग्री, आणि 4 ते 4.8 फॅट, एसएनएफ हे 8.7 ते 8.8 या दरम्यान मिळते. याशिवाय स्वतः हायड्रोपोनिक्स तंत्राने हिरव्या चाऱ्याची निर्मिती केली जाते.
डेअरीच्या व्यवस्थापनातील महत्वाचे मुद्दे
गायींवर कोणताही तणाव राहणार नाही अशी मुक्त संचार पध्दती अवलंबली जाते.
दोन्ही वेळी दुध काढतांना बासरीचे मधुर संगीत ऐकविले जाते. संगीत दिले नसतांना एकदा गायींनी दिलेल्या दुधात 5 लीटरची घट झाली होती.
-आहार, स्वच्छता, लसीकरण या बाबी परफेक्ट सांभाळल्या जातात. आजारांचे प्रमाण अत्यल्प आहे.
-मागील 2 वर्षात औषधांचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटले.
-दुध काढण्याची वेळ निश्चित आहे. सकाळ व संध्याकाळी दोन्ही दुध काढणीतील अंतर 12 तासांचे आहे.चेतन स्वतः LSS असल्याने गाईंचे कृत्रिम रेतन हे स्वतः करतात
संपर्क : जालिंदर उफाडे : 9822329298