पिकांच्या वाढीच्या प्रमाणात पात्यांची / बोंडांची संख्या जास्त झाल्यास अन्नासाठी स्पर्धा होते. गरजेच्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा न झाल्यामुळे पाते व बोंडांची गळ होते.हवामानाचे घटक, किडींचा प्रादुर्भाव, झाडातील शरीरक्रिया या सर्वांचा बोंडे टिकण्यावर प्रभाव असतो.
हवामानाचे घटक : सुर्यप्रकाश कमी असणे, वाढलेले तापमान, पावसाचा खंड / जमीनीत ओल नसणे, ढगाळ हवामान इ. या घटकांमध्ये विपरीत बदल झाल्यामुळे झाडामध्ये तयार होणारे अन्नघटकाचे पात्या, फुले व बोंडे या भागांकडे वहन होण्यास अडथळा येतो व परिणामी त्यांची गळ होते.वाढलेल्या तापमानामुळे किंवा उमलणा–या फुलांवर पाऊस पडल्यामुळे परागसिंचन आवश्यक त्या प्रमाणात होत नाही तसेच फुलांवरील किडी इ. मुळे पाते फुलांची गळ होते.उशीरा लागवड झालेल्या पिकामध्ये गळ होण्याचे प्रमाण अधिक आढळते.कोरडवाहू लागवडीमध्ये पावसाची दीर्घकाळ उघडीप असणे व त्याच्या जोडीला तापमानात झालेली वाढ यामुळे पातेगळ होते.महाराष्ट्रामध्ये लागवड जुन-जुलै महिन्यात होते. सुरुवातीच्या काळात पाते लागण्याच्या वेळी जुलै -ऑगस्ट महिन्यात ढगाळ हवामानामुळे पिकास सुर्यप्रकाश अपूरा मिळतो. त्याचप्रमाणे बोंडे लागण्याच्या काळात ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे ओल कमी होते. या दोन कारणांमुळे वर उल्लेखल्याप्रमाणे पाते, फुले व बोंडांची गळ होते.
व्यवस्थापन
पाणी जमिनीत साचणार नाही म्हणून जमीन उत्तम निच–याची असावी फुले लागण्याच्या अवस्थेत अधिक तापमान, ढगाळ हवामान किंवा पावसाचा खंड येणार नाही अशाप्रमाणे लागवड करावी.
पीक व्यवस्थापन – एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाव्दारे आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. फवारणीव्दारे विद्राव्य खतांचा योग्यवेळी वापर करावा.
* शरीरक्रियात्मक कारणामुळे होणा–या पातेगळसाठी 20 पी पी एम नॅप्थॅलीन अॅसेटीक अॅसीड (एन ए ए) ची फवारणी करावी.
* संजीवकाची फवारणी करतांना त्यात अन्य कोणतेही रसायन मिसळू नये.
पाते लागणे ते फुले लागण्याच्या काळात 2% डी ए पी (200 ग्रॅम प्रति 10 लिटर) खताची 1-2 वेळा फवारणी करावी.
* एन ए ए व डी ए पी च्या फवारण्या शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी कराव्या.बागायती लागवडीमध्ये त्याचप्रमाणे नत्रयुक्त खते व वाढ संप्रेरकांचा वापर अधिक केल्यास काही वाणांमध्ये अवास्तव कायिक वाढ होते. अशावेळी पाने फुलांची गळ होऊ शकते. कायिक वाढ सिमीत ठेवण्यासाठी वाढ रोधकांचा (मॅपीक्वॅट क्लोराईड – 50 पी पी एम-12 मिली /10 लिटर) फवारणीव्दारे पाते लागतांना वापर करावा. यामुळे कायिक वाढ कमी होऊन उपलब्ध ओलाव्याचा वापर पाते, फुले व बोंडे वाढीसाठी होईल.
विद्राव्य खताचा वापर ः
फवारणीद्वारे विद्राव्य खते दिल्यास लवकर उपलब्ध होतात. पाते – बोंडे लागण्याच्या अवस्थेमध्ये डि. ए. पी किंवा युरिया खताची 2% (200 ग्रॅम / 10 लिटर) प्रमाणात फवारणी करावी. तसेच फुले लागणे व बोंडे भरण्याच्या काळात पोटॅशिअम नायट्रेट (13:0:45) 2% प्रमाणात फवारणीद्वारे द्यावे.
सध्याच्या बदलत्या हवामानांमुळे वातावरण अचानक ऊन किंवा अचानक पाऊस असे होते या बदलत्या हवामानाचा परिणाम हा पिकांवर होतो व त्याच्या अन्नसाखळीत खंड पडतो. यामुळे जमिनीतील मूळ हे अन्नद्रव्ये घेऊ शकत नाही परिणामी नैसर्गिकरीत्या कापसाच्या किंवा कोणत्याही पिकाची पातेगळ होते. त्यावेळी planofix ४ ते ५ मिली प्रती पंप कोणत्याही गरजेनुसार कीटकनाशकांसोबत फवारणी करू शकतात.
तसेच आताच्या परिस्थितीत सुरु असलेला पावसाने फुलात पाणी साचून बुरशी तयार होते त्यामुळे फुलगळ होते ते थांबविण्यासाठी bavistin हे बुरशीनाशक १५-२० ग्राम प्रती पंप कोणत्याही गरजेनुसार कीटकनाशकांसोबत फवारणी करावी. त्याचप्रमाणे जमिनीत पाणी साचू न देता त्याला जमिनीच्या उतारानुसार बाहेर काढावे.
मधुकरराव बडगुजर
वरीष्ठ विभागीय अधिकारी निजुविड सीड