सांगली जिह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यापासून 15 किमी अंतरावर मळणगाव हे गाव आहे. गावातील 1000 च्या वरती शेतकरी एकत्र येवून जॉयफुल फार्मर्स प्रोडयूसर कंपनीची स्थापना करून प्रगतीची वाटचाल सुरु केली आहे. या वाटचालीचे वाटसरू आहेत दत्ताजीराव संपतराव शिंदे . 2005 ते 2016 पर्यंतच्या वाटचालीचा इतिहास जाणून घेवू त्यांच्याच तोंडून.
दत्ताजीराव शिंदे हे उच्चशिक्षित आहेत एम.ए. पर्यंतची उच्च पदवी त्यांनी मिळवली आहे. शिंदे यांना शेतीची विलक्षण आवड आहे. त्यामुळे त्यांना कृषी डिप्लोमाला प्रवेश घ्यायचा होता, पण परिस्थितीमुळे ते घेऊ शकले नाही. नाराज होवून 4 वर्षे शेतीचा नाद सोडला. मफपण शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते घेतल्या शिवाय प्रगती होणारच नाही हे लक्षात आल्या नंतर त्यांनी शिक्षणाची वाट धरली. शिक्षण घेत असताना मेणबत्ती बनवणे व यासारखे इतर छोटे छोटे कोर्सेस पूर्ण केले. कॉलेजमध्येही ग्रुपमध्ये नेहमी शेतीविषयाचीच चर्चा असायची.
- 2003-2004- भयावह दुष्काळ -2003 -2004 साली अतिशय भयावह दुष्काळ होता. पाणी नव्हतेच गावकरी पाण्यासाठी आर्तटाहो फोडत होती. हजारो एकर द्राक्षबागा वळून गेल्या. वाळलेली झाडे काढताना शिंदे यांच्या डोळ्यात आसवे जमा झाली होती, होत्याचे नव्हते झाले होते. द्राक्षबागेसाठी काढलेल्या 8 लाखांच्या कर्जाचा डोंगर झोप लागू देत नव्हता. त्यासाठी शिंदे यांनी 10 एकर मधील 2 एकर वडिलोपार्जित जमीन विकून टाकून कर्जाचा डोंगर कमी केला. हा सर्व घटना क्रम सांगताना शिंदे याना अश्रू अनावर झाले. अशा घटना पुन्हा कधीही घडू नयेत म्हणून उपायोजना करण्याचे ठरले.
- 2005 साली जय किसान कृषी विज्ञान मंडळाची स्थापना -2005 नंतर थोड्याफार प्रमाणात वरुण राजाची कृपा होण्यास सुरुवात झाली. तेव्हा पुन्हा शेतकर्यांनी द्राक्ष बागा लावण्यास सुरुवात केली. विचारांची देवाणघेवाण असल्याशिवाय शेतीत प्रगती करता येत नाही, हे कळल्यानंतर सर्व शेतकर्यांना एकत्र आणण्याचे काम शिंदे यांनी केली. सुरवातीला खूप त्रास झाला. 30 शेतकर्यांना एकत्र करून अंबाबाईच्या मंदिरात संध्याकाळी 8 वाजता चर्चासत्र व नियोजन चालू केले. काही लोकांनी या उपक्रमात विघ्न आणण्याचे काम केले. लाईट घालवणे,टोमणे देणे,यासारखे प्रकार घडले. 200 सभासद एकत्र करून 2005 ला जय किसान कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. सध्या या मंडळात 1500 च्या वरती सभासद आहेत. मंडळाला जय किसान हे नाव देण्याचाही एक उद्देश आहे की शेतकर्यांचा विजय हा झालाच पाहिजे त्यासाठी हे नाव देण्यात आले आहे. या मंडळातर्फे आजही विविध उपक्रम व कार्ये केली जातात .
- मंडळातर्फे केली जाणारे उपक्रम व कार्ये
- दररोज सायंकाळी 8 वाजता शेतकरी व सभासदांच्या दैनंदिन बैठकीचे आयोजन केले जाते .
- दररोज रात्री 08:05 मिनिटांनी लाउडस्पीकर वरून किसान वाणी कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येते .
- दररोज पाहाटे 05 वाजता ,सकाळी 08 वाजता ,दुपारी 2:30 वाजता सायंकाळी 5:30 ,रात्री 08 वाजता सायरन (भोंगा ) सतर्कतेसाठी वाजवला जातो .
- शेती व शेती पूरक व्यावसाय या विषयांचे ग्रंथ, मासिक, वृतपत्र, कात्रणे, जय किसान ग्रंथालयात उपलब्ध आहेत.
- ट्रॅक्टर, नांगर, दात्री, रिजर, बळीराम नांगर, चंद्रकोरी कुळव, तणनाशक पंप, इत्यादी अवजारे नाममात्र किंमतीत भाडे तत्वावर शेतकर्यांना पुरवली जातात .
- कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन व विकास संस्था ,कृषी विद्यापिठे या ठीकाणी दरवर्षी शेतकरी सहलीचे आयोजन केले जाते .
- मार्गदर्शन शिबीर, कार्यशाळा प्रशिक्षण, शेतीशाळा पिक परिसंवाद, स्लाईड शो या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
- निवडक क्षेत्रावरती गहू ,हरभरा या पिकांचा बिज उत्पादन कार्यक्रम घेतला जातो .
- कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.
- उत्कृष्ट पिक स्पर्धा घेतल्या जातात.
- आपत्कालीन पिक परिस्थितीमध्ये कृषीतज्ञ, शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी यांच्या शिवार भेटी घडवून आणल्या जातात .
- मृदा व जल संधारण ,गतिमान पाणलोट विकास कार्यक्रम ,श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे इत्यादी जलविषयक कार्यक्रमात संस्था अग्रभागी असते .
- केंद्र व राज्य सरकार तसेच कृषी विभागाच्या विविध योजना शेतकर्यांच्या बांधावर पोहचविण्यात संस्था सदैव तत्पर असते .* कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (अत्मा) योजने अंतर्गत 50 विविध पिक उत्पादक शेतकरी स्वयसहाय्यता गटांची स्थापना केली आहे .
- नुकतीच जॉयफुल फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड मार्फत शेती मालाच्या उत्त्पादना बरोबरच शेतीमालावर प्रक्रिया तसेच ग्राहकांना थेट विक्री व्यवस्था उभारता येणार आहे. त्यामुळे शेतीमालाला अधिक भाव देता येणे शक्य झाले आहे .
- माजी पाटबंधारे मंत्री आजीतराव घोरपडे (सरकार )यांचे सहकार्य -2004-2005 च्या दुष्काळात संपूर्ण गाव होरपळून निघाला होता. जनजीवन पूर्ववत होण्यासाठी पाण्याची खूप गरज होती, एकेकाळची ए-वन द्राक्ष निर्मितीचे माहेर घर असणार्या मळन गावाचे संपूर्ण वैभव धुळीस मिळाले होते. तालुक्याचे माजी आमदार तथा माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नातून मेशाळ योजनेतून गावास पाण्याची उपलब्धता करून दिली आहे .त्याच बरोबर जय किसान कृषी मंडळाला वेळोवेळी भेट देवून मार्गदर्शन केले आहे. त्यांनी शेतीमालावर प्रक्रिया व थेट विक्रीचा दिलेला मूलमंत्रा यावरतीच काम करण्याचे ठरवले .
अजितराव घोरपडे यांच्या कामाच्या पद्धतीचा किस्सा शिंदे यांनी सांगितला. स्वत ते शेतकर्यांना घेवून मुंबईला गेले. दादर मध्ये 200 रुपये द्राक्षाची थेट विक्री केली. होणारा नफा शेतकर्यांच्या लक्षात आणून दिला. दूरदृष्टीचा नेता लाभल्याचा विश्वास शेतकर्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता . - जय किसान शेतकरी स्वयं सहाय्यता गट ़फेडरेशन-जय किसान विज्ञान मंडळाच्या वतीने शेतकरी स्वयं सहाय्यता गट फेडरेशन ची स्थापना करण्यात आली आहे. या गटाचेही दत्ताजी शिंदे हे अध्यक्ष आहेत. यामध्ये 52 गट सक्रीय आहेत. एका गटात 30 ते 20 शेतकरी असतात. तर 52 गटातून 1040 शेतकर्याचा लक्षणीय सहभाग आहे. हे संपूर्ण गट निर्मितीसाठी आत्माचे (बिटीएम) रविकिरण पवार यांची मोलाची साथ लाभली आहे .
- जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची निर्मिती –
आत्मा प्रकल्प संचालक सुरेश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मे 2015 रोजी जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. एका कंपनीची स्थापना करण्यासाठी साधारणत: 20 गटाची आवशकता असते. आमच्या कंपनी मध्ये 400 शेतकर्यांचा सहभाग आहे. कंपनीची नोंदणी होण्यासाठी 4.5 लाख रुपये कंपनीच्या नावे असणे बंधनकारक आहे. हि रक्कम सभासदाकडून 5 दिवसात 7.5 लाख रुपये शेअर्सच्या स्वरुपात गोळा करण्यात आले. गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाची पावती मिळाली. सर्व सभासदांनी विश्वास दाखवला. कंपनीचे 10 सभासदांचे संचालक मंडळ आहे. कंपनीचे चेअरमन दत्ताजीराव शिंदे तर सेक्रेटरी मनोज कुमार भोसले आहेत . - महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प – जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी महाराष्ट्र शासनाच्या विशेष संकल्पनेतून तयार झाली आहे .आतापर्यत कोणतीही कंपन्या मोठ्या भांडवलदारांच्या मालकीच्या असायच्या पण शासन व शेतकरी यांच्या सहकार्यातून तयार झालेली कंपनी आहे. या कंपनीचा एकच उद्देश आहे शेती मालावर प्रक्रिया व थेट विक्री या हेतूला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प कडून 13.5 लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून त्याच बरोबर सभासदांच्या शेअर्स मधून पॅकहाउसची उभारणी करण्यात आली आहे. शेतमाल एकत्र करण्यासाटी 10 गुंठे जागा 30 वर्षासाठी करार तत्वावर घेतली आहे. वाहतुकीसाठी पिकअप व्हॅन घेण्यात आले आहे. शासनाच्या या योजनेचा शेतकर्यांना चांगला फायदा होत आहे.
- जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीकडून शेतकर्यांचा माल योग्य भावात खरेदी करत आहोत. शेतकर्यांचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येते. भविष्यात जॉयफुल कंपनीतर्फे परदेशात हि माल पाठविण्याचा मानस आहे. कंपनीतर्फे बेरोजगाराना नोकरीच्या संधी निर्माण केल्या आहेत.
व्यवस्थापक 1,
अकाऊंटंट 1,
क्लर्क 1,
मार्केटिंग असिस्टंट 2,
प्रचारक 2,
केंद्रीय समन्वयक 1,
कृषी संघटक 1 प्रती गाव,
वाहन चालक 1,
भारवाहक 4,
हमाल 4.
अशा पद्धतीची नोकरीची निर्मिती कंपनीतर्फे करण्यात आली आहे.
दत्ताजीराव संपतराव शिंदे
(चेअरमन जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी)
मु.पो. -मळणगाव तालुका -कवटेमहांकाळ
जिल्हा -सांगली
फोन नंबर -7588586134
शासनाने शेतकरी कृषी कंपन्या वरती इन्कम टॅक्स आकारू नये. तपासणी , ऑडिट ,नेहमी करावे. टाकावू माल हि योग्य दरात घेत आहोत. त्याच बरोबर शेतकर्यांना येणारा खर्च, होणारे कष्ट यांचा विचार करून भाव देणार आहोत. सध्या भाजीपाल्याची प्रतवारी करून थेट विक्रीसाठी शहरात स्व:तचा ग्राहक तयार करून जॉयफुलचा नवीन ब्रांड तयार करत आहोत .
मनोजकुमार माणिकराव भोसले
मुपो -मळणगाव, तालुका -कवठे महांकाळ
जिल्हा -सांगली, सेक्रेटरी – जॉयफुल फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी.
गावातील प्रत्येक शेतकर्यांनी गट शेती केल्यास फायदा नक्कीच होणार आहे .त्यासाठी दत्ताजीराव शिंदे यांच्या सारख्या कष्टाळू ,जिद्दी शेतकर्यांचा आदर्श घेतला पाहिजे. मालाच्या विक्रीसाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न चालू आहेत.
सुरेश मगदूम
आत्मा प्रकल्प संचालक सांगली
फोन नंबर -9404954402.