- फुलकिडे :ओळख व प्रकार:-
फुलकिडे अत्यंत लहान असतात ते भिंगाच्या सहाय्याने पहावे लागतात. फुलकिडे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे काळ्या रंगाचे फुलकिडे याला कॅलिओथ्रिप्स इंडिकस म्हणतात आणि दुसरे पिवळसर पांढरर्या रंगाचे फुलकिडे याला फ्रॅक्लीनिओन शुल्टझी म्हणतात. काळ्या फुलकिड्यामुळे झाडाच्या खालच्या पानावर वरच्या बाजूने अतिशय पांढरे ठिपके पडतात. तर पिवळसर पांढर्या रंगाच्या फुल किड्यांमुळे खालच्या बाजूने पाने काळपट तर वरच्या बाजुने कोकडल्यासारखी व कडक होतात. व्यवस्थित पानाचे निरिक्षण केल्यास त्यावर काळ्या रेघा किंवा जळाल्यासारखा भाग दिसतो. काळे फुलकिडे पानाच्या वरच्या पृष्ठ भागावर असल्याने पाऊस पडल्यास वाहून जातात, मात्र पिवळे फुलकिडे झाडावरील मधल्या व कोरड्या पानाच्या खालच्या भागात राहतात. त्यामुळे जोराचा पाऊस किंवा पानाच्या खालच्या बाजूने फवारणी केल्यास त्याचा नाश होतो.
जीवनक्रम व प्रादुर्भाव :- फुलकिडे आकाराने लहान १ ते २ मिमी लांब सडपातळ, नाजूक व लांबोळे असतात. उष्ण व आर्द्र वातावरणात फार झपाट्याने वाढतात. पिल्ले गवती रंगाची असतात. प्रौढ किटकांच्या पंखावर दाट झालर असते. नरमादीचा संगम होऊन किंवा न होताही प्रजनन होते. दररोज २ ते ४ अंडी पानाच्या कोवळ्या उतीमध्ये घालते. एक मादी २० ते ४० दिवस जगते आणि ५० ते १०० अंडी देते. १० ते १४ दिवसात नवीन पिढी तयार होते. फुलकिड्यांच्या तोंडात भाल्यासारखा एक अवयव असतो त्याला मँडीबल म्हणतात. हा ‘मँडीबल’ वारंवार पानात टोचून अनेक जखमा करून त्यातून निघणारा द्रव तोंडाद्वारे शोषून घेतात.जखमेतील रस शोषल्यानंतर जखमेत पोकळी निर्माण होते व त्यात हवा शिरते. जखम भरल्यानंतर हवा आतमध्ये राहते व त्याचा आरशासारखा चमकदार भाग तयार होतो. म्हणून फुलकिड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास पाने खालच्या बाजूने कडक होऊन चमकतात. पानांचा रंग तपकिरी होऊन शेवटी पाने विटकरी दिसतात. किडीची तिव्रता वाढल्यास पाने चंदेरी, मुरडलेली, भुरकट तपकिरी दिसतात. शेवटी पाने वळतात. झाडवर मधल्या व खालच्या पानापेक्षा शेंड्याकडील पानावर किटकांचा प्रादुर्भाव जास्त दिसतो.
- पांढरी माशी : – कापसाच्या कोवळ्या पानावर खालच्या बाजूने पांढरी माशी अंडी घालते. ०.२० मिलीचे अंडे असते. अंडी घालताना मादी मेणासारखा पांढरा पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे अंडी पानावर चिकटतात. जास्त अंडी घातली असल्यास पाने खालच्या बाजूने पांढरट दिसतात. प्रत्येक मादी जास्तीत जास्त १२० ते सरासरी २८ ते ४३ अंडी घालते. अंडी अवस्था उन्हाळ्यात ९ ते १४ आणि हिवाळ्यात १७ ते ८१ दिवस असते. कोषावस्था २ ते ८ दिवस असते. पांढर्या माशीचा जीवनक्रम पुर्ण होण्यास हवामानानुसार १४ ते १०७ दिवस लागतात. वर्षभर प्रजनन होत असल्याने सर्व अवस्थेतील कीड कापूस पिकावर आढळते. बर्याच वेळा तर मादीचे मिलन न होताच प्रजनन होते असते. वर्षभरात १० ते १२ पिढ्या तयार होतात.
प्रादुर्भाव :- किटकनाशकांच्या सतत फवारणीमुळे पांढर्या माशींचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढतो. कारण पांढर्या माशीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झालेली आहे. मे -जून महिन्यात पेरलेल्या नवीन कापसाचे पिकावर ही कीड येते. जून ते ऑगस्ट महिन्यात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात प्रादुर्भाव कमी होतो. मात्र पाऊस संपल्यावर पुन्हा वाढतो. जास्त तपमाना व कमी पाऊसमान ह्या किडीस अनुकूल असते. त्यामुळे पानांच्या प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येतो.
नुकसानीचा प्रकार :- ही माशी पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर पांढरे डाग पडून पान जळल्यासारखे दिसते. नंतर गळून पडते. पांढरी माशी रस शोषून
घेतल्यानंतर विष्टेद्वारे गोड पदार्थ शरीराबाहेर टाकते. यावर काळी बुरशी वाढते. संपुर्ण पान काळे पडते. या बुरशीलाच ‘कोळशी’ म्हणतात. यामुळे बोंडे, पाती गळतात किंवा गोंड पुर्ण उमलले जात नाही.
पांढर्या माशीचे जैविक नियंत्रण :- पांढर्या माशींना प्रतिकारक असणार्या जातींची लागवड करावी. या जातींची पाने चोपडी दाट किंवा आखूड लावा असणारी सिलीका व फेनालचे प्रमाण अधिक असून पाने रसदार नसलेली असतात.
तसेच पिवळ्या रंगाकडे पांढरी माशी लगेच आकर्षित होत असल्याने तेलाचे पिवळे डबे अथवा पिवळे कापड एरंड तेलामध्ये बुडवून कापसाच्या झाडाच्या १ फुट उंच बांधावे किंवा मजुरांकडून एरंड तेलामध्ये बुडविलेले
पिवळे कापड कापसाच्या पिकातून फिरवावे म्हणजे असंख्य पांढर्या माशी कापडाकडे आकर्षित होऊन चिकटून मरतात. कडू निंबाचे तेल आणि कडूनिंबाचा निंबोळी अर्क प्रत्येकी ५ मिली प्रति लि. पाण्यातून फवारणी करावी.