निरा नदीच्या काठावर कोर्हाले नावाचे गाव वसले आहे. ऊस शेतीला दूध धंद्याची जोड हा शस गावचा शेतीचा पॅटर्न. याच पॅटर्नला बोअर शेळी पालनाची जोड देण्यात सुनील वायाळ यांना यश आले आहे. शेती, दूध उत्पादन व बोअर शेळी संगोपनाच्या माध्यमातून त्यांची शाश्वत विकासाची वाट गवसली आहे. बोअर जातीच्या शेळी संगोपनातून वर्षाला चार लाख रुपये उत्पन्न त्यांना मिळत आहे. बोअर शेळीपालन क्षेत्रात बाहुबली सारखी कामगिरी करणार्या वायाळांची यशकथा अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे.
बारामती शहरापासून हाकेच्या अंतरावर कोर्हाले नावाचे गाव आहे. गाव निरा नदीच्या काठावर वसलेले असल्याने बारमाही पाणी उपलब्ध असते. नदीत कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. बंधार्यामुळे उन्हाळ्यातही शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध असते. मुबलक पाण्यामुळे ऊस शेतीला दूध उत्पादनाची जोड देण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. गावात भैरवनाथाची यात्रा भरत असून या यात्रेत महिलांना विशेष स्थान दिले जाते. गावच्या सरपंच पदाची धुरा सध्या एका महिलेकडेच आहे. कोर्हाले गावातील प्रत्येक कुटुंबाकडे सरासरी दहा गायी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. यामुळे गावात एकूण तीन डेअरी आहेत. त्यातील नवनाथ डेअरीचे नाव राज्यस्तरावर झाले आहे.
कोर्हाले गावात रामदास व इंदुमती वायाळ या दाम्पत्याचे कुटुंब आहे. निरा नदीला लागुणच वायाळ कुटुंबियांची दहा एकर बागायती शेती आहे. शेतीला दुध उत्पादनाची जोड त्यांनी दिली. सुनील व अजित नावाची दोन मुले त्यांना आहेत. शेतीच्या बळावरच त्यांनी दोन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. मोठा मुलगा सुनील कला शाखेत तर, लहान मुलगा अजित विज्ञान शाखेचा पदवीधर आहे. अजितने डिझेल मॅकॅनिकचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मोठा मुलगा सुनील यांनी निरा नदीच्या प्रवाहात वाळू व्यवसाय सुरू केला. वाळू व्यवसायातील जोखीम लक्षात घेत हा व्यवसाने बंद करण्याचा निर्णय त्याने घेतला. याच दरम्यान सुनील यांचा विवाह कळस (ता. इंदापूर) गावातील ज्योती यांच्याशी झाला. विज्ञान शाखेच्या पदवीधर असलेल्या ज्योतीताई शेतकरी कुटुंबातीलच. त्यामुळे या दाम्पत्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. वडीलांनी शेतीची सुत्रे या दाम्पत्याच्या हातात सोपवली. शेतीला पूरक उद्योग उभारण्याची चर्चा वायाळ कुटुंबात सातत्याने होत होती.
शेळीपालनाची संकल्पना
फलटण येथील मुधोजी महाविद्यालयात सुनील यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. फलटण परिसरात शेळी व मेंढी पालन क्षेत्रात भरीव काम करणार्या निमकर फार्म बद्दल त्यांना माहिती होती. निमकर फार्मला भेट देण्यापूर्वी सुनील यांनी शेळीपालन संदर्भात कुटुंबियांशी चर्चा केली. पत्नी, भाऊ, आई व वडील यांनी हा व्यवसाय करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. निमकर फार्मला दिलेल्या पहिल्या भेटीतच सुनील यांनी शेळीपालन करण्याचा निर्णय घेतला. ऊस शेतीला दुग्ध व्यवासायाची जोड होतीच, सोबतच शेळीपालनचा आणखी एक स्त्रोत मिळाला. शेळीपालनासाठी सुनील यांनी बोअर जातीच्या शेळीची निवड केली. वर्ष 2012 पासून ते शेळीपालन क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या पाच वर्षांच्या अनुभवाच्या बळावर बोअर शेळी पालनात त्यांनी महारथ प्राप्त केली. डिजीटल मार्केटींग हे या व्यवसायातील यशाचे रहस्य असल्याचे वायाळ सांगतात.
शेळीपालनाचे प्रशिक्षण
वर्ष 2012 मध्ये फलटणच्या निमकर फार्म येथे वायाळ यांनी शेळीपालनाचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा कालावधी तीन दिवसांचा होता. प्रत्येक दिवसासाठी 900 रुपये, या प्रमाणे 2700 रुपये खर्च वायाळ यांना आला होता. प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक कामांना विशेष महत्त्व असल्याचा वायाळ यांचा अनुभव आहे. प्रशिक्षणा दरम्यान लसीकरण ते विक्री व्यवस्थापनाच्या विविध टप्प्यांचा अंदाज शेतकर्यांना येण्यासाठी निमकर फार्ममध्ये प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आला होता.
बोअर जातीच्या शेळीची निवड
प्रशिक्षणाच्या दरम्यान बोअर जातींच्या विविध वैशिष्ट्यांची माहिती वायाळ यांना झाली. कमी खर्चात अधिक मांसाचे उत्पादन देणारी ही शेळी आहे. प्रजननाची सर्वोत्तम क्षमता बोअर जातीमध्ये आहे. शेळ्यांचा गाभण काळ पाच महिन्यांचा आहे. पिलांना तीन महिने दूध पाजल्यानंतर आठ महिन्यात शेळ्या पुन्हा तयार होतात. त्यामुळे बोअर जातीच्या शेळ्यांना वायाळ यांनी पसंती दिली. गोटफार्मला कोणाचे नाव द्यायचे? हा प्रश्न सुनील यांना भेडसावत होता. शेवटी आईचे नाव देण्याचा निर्णय सुनील यांनी घेतला. यांनी इंद्रायणी गोटफार्म सन 2012 साली सुरू केला.
बंदिस्त गोठा व्यवस्थापन
प्रशिक्षणा दरम्यान बोअर शेळीसाठी पूर्ण बंदिस्त गोठा सर्वोत्तम असल्याचे सुनील यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे बोअर जातीच्या शेळीसाठी त्यांनी पूर्ण बंदिस्त गोठा उभारण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीचा गोठा बांधण्यासाठी अडीच गुंठे क्षेत्राचा वापर करण्याचे त्यांनी निश्चित केले. सुरवातीला त्यांनी 30 बाय 30 चे शेड बांधले त्याचे तीन विभाग केले. दुसरे शेड 50 बाय 20 चे बांधले त्याचे दोन विभाग केले. पहिल्या 30 बाय 30 च्या शेडचे त्यांनी तीन विभाग केले आहेत. पहिल्या विभागात बोकड ठेवले आहेत. दुसर्या विभागात करड ठेवली आहेत. तिसर्या विभागात अजारी असलेली करड ठेवण्यात आली आहेत. दुसर्या 50 बाय 20 च्या शेड मध्ये दोन विभाग करण्यात आले आहेत. त्यातल्या पहिल्या विभागात गाभण शेळ्या व दुसर्या विभागात व्यालेल्या शेळ्या ठेवल्या जातात. गोठा बांधणीसाठी 2 लाख रुपये खर्च आला होता.
बोअर शेळ्यांची खरेदी
निमकर फार्ममधून वायाळ यांनी बोअर जातीच्या दोन पिल्लांचे जोड खरेदी केले होते. खरेदी केलेल्या पिलांचे वय त्यावेळी 3 महिने होते. एक जोडी खरेदीसाठी त्यांना 92 हजार रुपये खर्च आला होता. दोन जोड्यांसाठी त्यांना 1 लाख 84 हजार रुपये खर्च आला होता. दोन जोड्यांसोबतच त्यांनी सात वर्षे वयाची शेळी देखील खरेदी केली होती. शेळीसाठी त्यांना सत्तर हजार रुपये रक्कम द्यावी लागली होती. बोअर शेळ्यांच्या खरेदीसाठी त्यांना 2 लाख 39 हजार रुपये खर्च आला होता.
खाद्य व्यवस्थापन
बोअर जातींच्या शेळ्यांच्या खाद्य व्यवस्थापनासाठी वायाळ सकाळी 6 पासून सुरवात करतात. इंद्रनील गोळी, शेंगदाणा पेंढ व मका यांचे मिश्रण सकाळी 6 वाजता शेळ्यांना दिले जाते. गाभण शेळीला 300 ग्रॅम, व्यालेल्या शेळ्यांना 200 ग्रॅम व पैदाशीच्या बोकडांना 700 ग्रॅम या प्रमाणात खाद्य दिले जाते. उन्हाळ्यात शेळींना हिरवा चारा देण्याच्या उद्देशाने सुनील यांनी आठशे सुबाभळाची झाडे लावली आहेत. सकाळी 9 वा सुबाभळीचा हिरवा चारा व शेवरीच्या झाडाचा पाला गरजेनुसार दिला जातो. पावसाळा व थंडीच्या कालावधीमध्ये मका कुट्टी 400 ग्रॅम, हरभरा आणि तूर यांचे भूस दिले जाते. सायंकाळी 4 वा सकाळी दिलेले मिश्र खाद्य पुन्हा एकदा दिले जाते. त्याच बरोबर सायंकाळी 5.30 वाजता मेथी घास गरजेनुसार दिला जातो. हिरव्या खाद्याची गरज भागविण्यासाठी वायाळ यांनी 3 गुंठे क्षेत्रात मेथी घासाची लागवड केली आहे. त्याच बरोबर 2 गुंठे क्षेत्रात मका लागवड केली आहे.
पाणी व्यवस्थापन
गोठ्याच्या प्रत्येक विभागात पाणी पिण्यासाठी एक घमेले ठेवण्यात आले आहे. पाण्यामध्ये मिनरल मिक्चर मिसळले जाते. एकूण 4 लिटर पाण्यात 10 ग्रॅम मिनरल मिक्चर पावडर मिसळली जाते. दिवस भरासाठी प्रत्येक शेळीला पाच लिटर पाण्याची अवश्यकता असल्याचे सुनील यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्य व्यवस्थापन
सकाळी 6 वाजता शेळ्यांना खाद्य दिल्यानंतर 9 वाजता गोठ्याची पूर्ण स्वच्छता करण्यात येते. गोठा स्वच्छ पाण्याने धुवला जातो. सायंकाळी 4 वाजता खाद्याची दुसरी फेरी करण्यापूर्वी पुन्हा एकदा गोठा स्वच्छ केला जातो. दिवसातून दोन वेळा गोठा स्वच्छ केल्यामुळे रोगराई होत नसल्याचा वायाळ यांचा अनुभव आहे. बोअर जातीच्या शेळींसाठी रोग व्यवस्थापन अत्यंत महत्वाचा घटक आहे. शेळी पालन व्यवसाय सुरू केल्यानंतर दर तीन महिन्यांनी जंत नाशकाचा एक डोस दिला जातो. महिन्यातून एकदा गोठ्यामध्ये औषध फवारणी केली जाते. गव्हाणी चुन्याने रंगवल्या जातात. चुना दिल्यामुळे रोगराईंवर नैसर्गिक पद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
शेळी रेतनाची पद्धत
बोअर जातीच्या शेळ्या उन्हाळ्यात माजावर येत नाही. जून ते जानेवारी या आठ महिन्याच्या कालावधीत बोअर जातीच्या शेळ्या माजावर येतात. माजावर आल्यानंतर शेळ्या सतत शेपट्या हालवत असतात. एक सारख्या ओरडत असतात. शेळ्या सातत्याने बोकडांच्या दिशेने लक्ष केंद्रित करत असतात. रेतनासाठी पैदासीचे दोन बोकड ठेवण्यात आले आहेत. शेळ्यांच्या गरजे नुसार सकाळी एकदा व सायंकाळी बोकड फिरवला जातो. एकाच वंशावळीच्या शेळ्यांना भरवण्यासाठी त्याच वंशावळीचा बोकड वापरला जात नाही. त्यापासून निर्माण होणार्या शेळ्या कमकूवत दर्जाच्या होत असल्याचे वायाळ यांनी स्पष्ट केले. वंशावळ ओळखण्यासाठी वायाळ यांनी प्रत्येक शेळीला टॅग दिले आहे. टॅग लावल्यानंतर त्यावर पर्मनंट मार्करने आकडेवारी लिहली जाते. आकडेवारीमुळे वंशावळ ठेवण्यास मदत होते. शेळी पालनात नोंदवही अत्यंत महत्वाची आहे. शेळ्यांच्या जन्मांपासून ते विक्री पर्यंतची सखोल माहिती नोंदवहीच्या माध्यमातून मिळवली जाते. शेळ्यांच्या विक्रीसोबत त्यांची वंशावळ देखील नोंद वहीच्या माध्यमातून विक्रेत्याला दिली जाते. त्यामुळे शेळ्यांचे संगोपन सक्षम पद्धतीने होते.
विक्री व्यवस्थापन
उच्चशिक्षीत असल्याने वायाळ यांनी विक्रीसाठी डीजीटल तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यु ट्यूबवर त्यांच्या गोठ्याची सविस्तर माहिती त्यांनी चलतचित्रांच्या माध्यमातून अपलोड केली आहे. गेली चार वर्षे त्यांना बोअर जातीच्या शेळ्यांच्या विक्रीचा अनुभव आहे. त्यामुळे पुणे व मुंबईचे व्यापारी त्यांच्या गोटफार्मवर येवून शेळ्यांची खरेदी करतात. सरासरी 55 हजार रुपये या प्रमाणे शेळ्यांची विक्री केली जाते. सध्या वायाळ यांच्याकडे 30 शेळ्या आहेत. उत्पादन खर्च वगळता त्यांना यंदाच्या वर्षात 4 लाख रुपये नफा होण्याची आशा आहे. यंदाच्या मोसमात पुणे व मुंबई शहरातील हॉटेल व्यवसायिकां सोबत करार करण्यासाठी वायाळ प्रयत्नशील आहेत.
प्रतिक्रिया..
व्यवस्थापन हेच यशाचे रहस्य
काटेकोर व्यवस्थापनाच्या माध्यमातून कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो. शेतीला नवा जोडधंदा मला यशस्वी करायचा होता. त्यामुळे बोअर जातीच्या शेळ्यांचे नेमके व्यवस्थापन करण्याकडे माझा कल होता. सध्याचा जमाना डीजीटल आहे. डीजीटल जमान्यात मार्केटींग करणे सोपे झाले आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तुमच्या प्रोडक्टचे मार्केटींग सहजरित्या होते. याच तंत्रामुळे मला शेळ्यांची सहज विक्री करता आली. खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता आदी बाबींकडे बारकाईने लक्ष दिल्यास बोअर जातीच्या शेळी पालनात यश नक्कीच मिळते.
- सुनील वायाळ
रा. कोर्हाले खुर्द, ता. बारामती, जि. पुणे
मो.नं. 7057523353