सातरगाव (ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) येथे रेशीम शेती रुजली आहे. गावातील एका व्यक्तीने रेशीम शेतीची कास धरली आणि या रेशीम शेतीचे फायदे कळाल्यानंतर पाच जणांनी त्यासाठी पुढाकार घेतला. केशव मासोदकर हा युवक देखील त्यापैकीच एक आहे. गेल्या तीन वर्षांपासून केशव यांनी रेशीम शेतीत सातत्य ठेवले आहे.
नांदगाव खंडेश्वर या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर सातरगाव आहे. या गावातील केशव मासोदकर यांची शेती आहे. या शेतीतून पारंपरिक पद्धतीने मिळणारे उत्पन्न देखील जेमतेमच होते. शेतीला काहीतरी जोडधंदा करावा असा विचार त्यांच्या डोक्यात होता. रेशीम संचलनालयातर्फे आयोजित एका अभ्यास दौर्यात ते सहभागी झाले. यानंतर रेशीम उत्पादन करण्याचा निश्चय त्यांनी केला. रेशीम उत्पादनाच्या सखोल अभ्यास त्यांनी केला. यानंतर प्रत्यक्ष उत्पादन देखील सुरू केले आणि यात ते यशस्वी देखील झाले.
पहिल्याच प्रयोग फसला
रेशीम शेती व्यवस्थापनात तापमान हा महत्त्वाचा घटक आहे. तापमानात वाढ झाल्यास तापमान नियंत्रित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. वर्ष 2001 मध्ये त्यांनी पहिल्यांदा रेशीम उत्पादनाचा प्रयोग केला. त्यावेळी पाण्याचे दुर्भीक्ष भासल्याने त्यांनी पहिल्याच प्रयोगानंतर रेशीम शेतीपासून फारकत घेतली. त्यानंतर वर्ष 2014 मध्ये परत एकदा रेशीम उत्पादनाकडे वळाले. रेशीम किटक संगोपनासाठी 23 बाय 50 फूट आकाराचे शेड उभारले. शेड उभारणीसाठी 2 लाख रुपये खर्च झाला आणि 63 हजार रुपये रेशीम संचलनालयाकडून अनुदान मिळाले.
तुती लागवड
मासोदकर यांनी तुतीची लागवड केली. तुती लागवड एकदाच करावी लागते. त्यानंतर कापणी करून पुन्हा त्याला पालवी फुटते. त्यामुळे 25 वर्षापर्यंत तुतीची झाडे टिकून राहतात. रेशीम संचनलयाकडून 50 अंडीपूंजाचे पाकीट त्यांना मिळाले. यामध्ये 1 लाख 30 हजार अंडी होती. त्यांच्यावर नंतर ब्लँकबॉक्सींग प्रक्रिया केली. ट्रे मध्ये पेपर टाकून त्यावर अंडीपूज टाकून त्यावर काळा कापड टाकला. या प्रक्रियेने सर्व अंडी एकाचवेळी फुटून अळ्या बाहेर आल्या. एकाचवेळी अंडी फुटल्याने रेशीम कोश एकाचवेळी परिपक्व झाले. यामुळे कोश बाजारात विक्रीसाठी एकाच वेळी मिळाले. अंडी फुटण्यापासून तर कोश तयार होण्यासाठी एकूण 28 दिवसाचा कालावधी लागला. या काळात वारंवार निरीक्षण त्यांनी नोंदवली.
रेशीम संचलनालयाशी करार
सात वर्षापर्यंत रेशीम व्यवसायापासून फारकत घेणार नाही, असा करार रेशीम संचनालयाशी मासोदकर यांनी केला. शंभर रुपयांच्या बॉण्डपेपरवर हे करारपत्र तयार केले. सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथील बाजारपेठेत रेशीम कोशाची ते विक्री करतात. ही बाजारपेठ ऑनलाईन असल्याने सोयीचे असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन बाजारामुळे दररोजच्या दरातील चढउताराची माहिती होते. सुरवातीला 90 किलो कोशाची उत्पादकता मिळाली. 370 रुपये किलोचा दर मिळाला. त्यानंतर दुसर्या वेळी 78 किलो उत्पादकता झाली व 310 रुपये किलोचा दर मिळाला. त्यांनी मालाचा दर्जा कायम राखला आहे. त्यामुळे 300 रुपये प्रती किलोपेक्षा अधिक दराने आमचा कोश विकल्याचे त्यांनी सांगितले. ‘ए’ दर्जाच्या रेशीम कोशाचे उत्पादन ते करतात. रेशीम शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी असला तरी सावधगिरी व निरीक्षणवृत्ती हेच या व्यवसायातील यशाचे गमक ठरते. निरीक्षण नसल्यास हे पीक वाया जाण्याचा धोका अधिक राहतो, असे त्यांनी सांगितले. अमरावतीवरुन बसची व्यवस्था असल्याने थेट सिकंदराबादला पोचता येते. आंध्रप्रदेशमधील रेशीम उत्पादक शेतकर्यांना किलोमागे 50 रुपयांचे अनुदान तेथील शासनाकडून दिले जाते. रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळावे याकरीता हा प्रयत्न सरकारने केला आहे. मात्र महाराष्ट्रात रेशीम कोश विक्रीची बाजारपेठच नाही अनुदान तर दूरच राहिले, अशी खंत केशव मासोदर यांनी व्यक्त केली.
फूल उत्पादनाचे प्रयोग
अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रावर दरवर्षी ते अॅस्टरची फुलझाडांची लागवड ते करतात. अॅस्टरच्या फुलांना गेल्यावर्षी 35 ते 40 रुपये प्रती किलोचा दर मिळाला होता. यावर्षी अॅस्टरच्या फुलांची विक्री अवघ्या 20 ते 25 रुपये किलो दराने करावी लागली. अर्धा एकर झेंडू लागवड यावर्षी केली होती. गेल्यावर्षी 100 रुपये किलो दराने विकला गेलेला झेंडू यावर्षी अवघ्या 10 ते 15 रुपये किलो दराने विकावा लागला. फुलांच्या बाजारपेठेतील ही घसरण चिंताजनक ठरली. अॅस्टर लागवडीत रोपाची खरेदी दीड रुपये प्रती नगाप्रमाणे केली. अर्धा एकरात 3 हजार रोपे लागली. त्यातील काही बाद झाल्याने रोपांची अधिक खरेदी करावी लागवड. रोपांची लागवड बेडवर 3 बाय 2 फूट अंतरावर केली. यावेळी तणनाशकाची दुसर्या पिकावर फवारणी केली होती. त्याच दरम्यान अॅस्टर लागवड झाली आणि हे पीक प्रादुर्भावग्रस्त झाले. यावेळी अॅस्टर लागवडीचा प्रयोग फसला असला तरी पुढीलवेळी मात्र योग्य ती खबरदारी घेण्याचा त्यांचा मानस आहे.
संपर्क
- केशव मासोदकर,
रा. सातरगाव, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती
मो.नं. 9421827262