‘आर.जे.ग्रृप ’च्या आदिती जोशी यांची उद्योगात धाडसी वाटचाल
संघर्ष अन् मेहनतीच्या जोरावर वडिलांनी उद्योगविश्व उभारले. या उद्योगविश्वाच्या पायाभरणीपासून ते त्याचे वटवृक्षात रुपांतर होण्यापर्यंतच्या काळात त्यांना आलेल्या अडचणी आदिती जोशी यांनी जवळून पाहिल्या. वडिलांना व्यवसायात येणार्या छोट्या-मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करता करता त्यांनी ‘नीम इंडिया प्रॉडक्टस् प्रा.लि’ या कंपनीची धुराच आपल्या खांद्यावर घेतली. वडिलांच्या शिकवण आणि प्रोत्साहन यामुळे उद्योग क्षेत्राचे विशेष शिक्षण नसताना देखील उद्योगविश्वात आज त्यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आदिती यांच्या रुपाने जोशी कुटुंबियांची दुसरी पिढी उद्योगविश्वात सक्रिय झाली आहे.
औरंगाबाद येथील आर.जे. ग्रृप हा कृषी निविष्ठा उत्पादित करणार्या नामांकित ग्रृपपैकी एक आहे. या समुहाची एक प्रमुख शाखा असलेल्या नीम इंडिया प्रॉडक्टस् प्रा.लि. या कंपनीच्या कार्यकारी व्यवस्थापक म्हणून आदिती राघवेंद्र जोशी काम पाहत आहेत. त्यांचे वडील राघवेंद्र श्रीपतराव जोशी यांनी सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यानंतर आपल्या करिअरची सुरवात मित्रासोबत भागीदारीत सुरू केलेल्या टॅक्सी व्यवसायापासून केली. त्यानंतर एमआरएफ कंपनीची फ्रंचाईझी घेतली. पुढे ते हॅचरीज आणि मग कृषी निविष्ठा उत्पादन व्यवसायात उतरले. मेहनतीच्या जोरावर या उद्योगात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी हळूहळू उद्योगाच्या कक्षा विस्तारण्यास सुरवात केली. मात्र, या प्रवासात त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अशा परिस्थितीत कन्या आदिती जोशी मदतीला सोबत आल्या. वडिलांना मदत करत असताना त्यांनी नीम इंडिया कंपनीची संपूर्ण जबाबदारी स्वतःकडे घेतली. आर.जे. ग्रृपमधील विविध कंपन्यांची छोटीमोठी जबाबदारी पार पाडताना आलेल्या अनुभवाच्या बळावर आज त्या नीम इंडियाची कंपनीची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. मे 2017 मध्ये त्यांनी या कंपनीची सूत्रे हाती घेतल्यावर उत्तम व्यवस्थापन कौशल्याने प्रगतीचा दोलायमान झालेला आलेख स्थीर केला. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, कंपनीचा जमा-खर्च, विपणन, मनुष्यबळाशी निगडीत अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी प्रसंगी कठीण निर्णय घेतले. अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न असताना उद्योगविश्वात त्यांनी दमदार सुरवात केली. नीम इंडिया कंपनीत कामाला सुरवात केल्यानंतर स्वतःला ओळखता आले, याचे समाधान त्यांना आहे. अजूनही माझ्या कामाचा स्पीड फूल स्विंगमध्ये नाही. पुढील दोन वर्षात कंपनीला आणखी उंचीवर नेण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. बालपण ते नीम इंडियाच्या कार्यकारी व्यवस्थापक पदापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडला.
आर.जे. ग्रृपचा इतिहास
आदिती जोशी यांचे वडील राघवेंद्र जोशी हे मूळचे लातूर जिल्ह्यातील उदगीरचे. व्यवसायानिमित्त ते औरंगाबादेत आले. सिव्हील इंजिनिअरींग पूर्ण केल्यावर त्यांनी 1983 च्या काळात सुररुवातीला मित्रासोबत टॅक्सीचा व्यवसाय केला. त्यानंतर 1986 मध्ये एमआरएफ कंपनीची फ्रंचाईझी घेऊन औरंगाबादेतील जालना रोडवर मारुती टायर नावाने टायर रिमोल्डींगची कंपनी स्थापन केली. ही आर.जे. ग्रृपची पायाभरणी होती. पुढे पोल्ट्री उद्योगाशी निगडीत खडकेश्वर हॅचरीज कंपनी उभारली. याच काळात त्यांनी बोकुडजळगावला जमीन घेतली. तेथे कृषी निविष्ठा उत्पादित करणार्या कंपनीचे काम सुरू झाले. अशाच प्रकारे पुढे 1998 मध्ये मारुती फर्टोकेम (मिश्र खते उत्पादित करणारी कंपनी), 2002 मध्ये नीम इंडिया प्रॉडक्टस् प्रा.लि. आणि 2004 मध्ये आर.जे. बायोटेक या कंपन्यांची सुरवात झाली. आज आर.जे. गृ्रपच्या कक्षा विस्तारल्या असून तो कृषी निविष्ठा उत्पादित करणार्या देशभरातील अग्रगण्य समुहापैकी एक आहे.
शैक्षणिक वाटचाल
आदिती जोशी यांचे इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण औरंगाबादेतील महाराष्ट्र पब्लिक स्कूल, सरस्वती भुवन येथे घेतले. त्यानंतर इयत्ता आठवीसाठी त्यांच्या पालकांनी विशाखापट्टणम् येथील सीबीएसई पॅटर्न असलेली गुरुकूल पद्धतीच्या शाळेत पाठवले. तेथे त्यांनी संस्कृत, तेलगू व इंग्रजी या भाषांचा अभ्यास केला. तेलगू भाषेच्या अडचणीमुळे इयत्ता नववीसाठी पालकांनी त्यांना परत औरंगाबादला शारदा मंदिर गर्ल्स स्कूलमध्ये शिफ्ट केले. दहावीपर्यंत त्या याच शाळेत शिकल्या. अभ्यासात हुशार असल्याने त्या नेहमी वर्गाच्या मॉनिटर म्हणून विद्यार्थ्यांमधून निवडून येत. खेळांची आवड असल्याने त्यांनी टीम लीडर म्हणूनही आपली क्षमता सिद्ध केली. शारदा मंदिर गर्ल्स स्कूलमध्ये मिळालेली शिकवण आणि पालकांचे संस्कार यामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होण्यास मदत झाली. माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना ड्राईंग, फोटोग्राफीची आवड जडली. आपल्यात कलाकार दडला असल्याची त्यांची भावना होती. त्यामुळेच त्यांनी दहावीनंतर मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. त्यासाठी तेथील वातावरण आणि शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी त्या काही काळ मुंबईत काकांकडे वास्तव्याला होत्या. परंतु, पालकांनी सायन्स शाखेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. पालकांचा सल्ला पटल्याने त्यांनी अकरावी सायन्ससाठी औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजला प्रवेश घेतला. 12 वी सायन्स उत्तीर्ण झाल्यावर पुढे काय करावे? हा प्रश्न होता. सायन्स झालेले असले तरी मेडिकलला जायचे नाही, हे त्यांनी आधीच ठरवले होते. आर्किटेक्ट किंवा इंटेरिअर डिझायनर व्हावे, असा त्यांचा विचार होता. म्हणून त्यांनी आर्किटेक्टची प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेसोबतच त्या इंजिनिअरींगची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या होत्या. आर्किटेक्टची आवड असल्याने त्यांनी आईच्या मैत्रिणीकडे क्लासही लावला. तेथे आर्किटेक्ट अभ्यासक्रमाचा आवाका समजला. तसेच वडिलांच्या शिक्षकांकडून इंजिनिअरींग क्षेत्राची माहिती झाली. शेवटी इंजिनिअरींग करायचे ठरल्याने त्यांनी औरंगाबादला न थांबण्याचा निर्णय घेतला. परदेशात शिक्षणासाठी जायची इच्छा असल्याचे त्यांनी पालकांना सांगितले. मात्र, या निर्णयामुळे त्यांच्या पालकांना धक्काच बसला. शेवटी मुंबई किंवा पुण्यात इंजिनिअरींग करण्यावर सर्वांचे एकमत झाले. मुंबईपेक्षा पुणे सोयीचे असल्याने त्यांनी पुण्यातील सिंहगड इंजिनिअरींग कॉलेजला प्रवेश घेतला. वर्ष 2009 मध्ये त्या सिव्हील इंजिनिअर झाल्या.
वडिलांकडून उद्योगक्षेत्राचे बाळकडू
बालपणापासून त्यांनी वडिलांची उद्योगविश्वातील धावपळ पाहिली होती. त्यामुळे त्यांना वडिलांकडूनच उद्योगासाठी आवश्यक असणार्या व्यवस्थापन कौशल्याचे बाळकडू मिळाले होते. वडिलांनी खडकेश्वर हॅचरीज सुरू केल्यानंतर बोकुड जळगावला सिडस् कंपनीसाठी जागा घेतली तेव्हा त्या पहिलीत होत्या. टायर रिमोल्डींग व हॅचरीज कंपनीच्या कामानिमित्त वडिलांची नेहमी धावपळ होत असे. त्याच वेळी त्यांच्या आई एम.एस्सी. बीएड्.चे शिक्षण घेत होत्या. म्हणून भाऊ-बहिणीचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणीही राहत नसे. अशा परिस्थितीत त्या नेहमी वडिलांसोबत दुचाकीवरून फिरायच्या. त्यामुळे कंपनीच्या अनेक कामांची माहिती त्यांना लहानपणापासूनच झाली. बोकुडजळगाव ते औरंगाबाद असा 40 किलोमीटरचा प्रवास त्यांना शाळेसाठी करावा लागत होता. आई-वडिलांचे दैनंदिन वेळापत्रक व्यस्त राहत असल्याने त्या अनेकदा ट्रॅक्टर, ट्रक, सायकलीवरून एकट्या शाळेत गेल्या आहेत. वडील कामात असले की, त्या एकट्याच शाळेतून घरी परत येत असत. एरवी त्यांना शाळेतून आणण्यासाठी वडील येत. परंतु, कंपनीचे काम असल्याने ते त्यांना सोबतच फिरवत असत. त्यामुळे घरी येण्यास रात्री 8 ते 9 वाजायचे. चौथीनंतर शिक्षणासाठी त्यांच्या आईने घर बोकुड जळगाव येथून औरंगाबादला शिफ्ट केल्याने ही कसरत थांबली. पालकांनी कधी त्यांच्यावर कोणत्या गोष्टीचे बंधन घातले नाही. कंपनीतील कर्मचार्यांच्या कुटुंबासोबत त्या आणि त्यांचा भाऊ बालपणी राहिले आहेत.
यशात इंजिनिअरींगचा वाटा
इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम प्रचंड अवघड असल्याने त्याचे मनावर दडपण असते. हे दडपण झेलून अभ्यासक्रम पूर्ण करणे एकप्रकारे कसबच असते. इंजिनिअरींग केल्यानेच दबावातही चांगले काम कसे करावे? हे शिकता आल्याचे त्यांनी सांगितले. इंजिनिअरींग पूर्ण झाल्यावर त्यांनी पुण्यात तसेच बंगळुरूत नोकरी केली. इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांना जे मार्गदर्शक होते; त्यांच्या एका प्रोजेक्टवर बंगळुरूत त्या काम करत होत्या. 6 ते 7 महिने नोकरी केल्यावर त्या मार्गदर्शकांनी त्यांना बांधकाम व्यवस्थापन विषयावर कोर्स करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्या युनायटेड किंगडम्ला गेल्या. तेथे तो कोर्स केल्यानंतर त्या दीड वर्षांनी भारतात परतल्या. भारतात आल्यावर पुढे काय करायचे, हे निश्चित नसल्याने त्या वडिलांना कंपन्यांच्या कामांमध्ये मदत करू लागल्या. तेथूनच त्यांना सीड इंडस्ट्रितील कामाची आवड निर्माण झाली. आधी कामाची पद्धत समजणे त्यांना कठीण गेले. परंतु, हळूहळू त्यांनी कामाची पद्धत समजून घेतली.
शाळेच्या वादाने डावपेच कळाले
औरंगाबादेतील सातारा परिसरात आर.जे. ग्रृपची रिव्हरडेल नावाची शाळा होती. या शाळेत एकदा वाद शिक्षक आणि पालकात वाद निर्माण झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी आदिती जोशी त्याठिकाणी गेल्या. तेव्हा शाळेचे व्यवस्थापन मंडळाच्या कार्यपद्धतीत त्रुटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. म्हणून त्यांनी अनेक फेरबदल सूचवले. हा हस्तक्षेप खटकल्याने प्राचार्य, अकाउंटंट नोकरी सोडून गेले. नंतर ते एकेक शिक्षक शाळेतून नेत होते. हे राजकीय डावपेच जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. घडलेल्या प्रकाराबाबत सर्व माहिती जाणून घेतली. त्यावर रिअॅक्ट न होता प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत मार्ग काढला. शाळेतील या वादाने त्यांना व्यवस्थापनातील राजकारण, स्वतःची क्षमता कळाली. पुढे हाच अनुभव त्यांना कंपनीचे व्यवस्थापन सांभाळताना कामी आला.
स्वतःला केले अपडेट
नीम इंडियाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी वेळोवेळी स्वतःला अपडेट केले. कंपनीचे व्यवस्थापन, जमा-खर्च, विपणन या सार्या बाबींची माहिती त्यांनी तज्ज्ञांकडून समजून घेतली. विशेष म्हणजे, अकाउंट विभागाचा त्यांना कोणतेही शिक्षण किंवा अनुभव नव्हता. तरीही त्यांनी टॅलीची माहिती इंटरनेट, युट्यूबवरून घेतली. अकाउंटचा सिलॅबस, बॅलन्स शीट कशी वाचावी, आऊटस्टँडिंग व रिकव्हरीच्या इंट्री कशा कराव्यात, विक्री मूल्य कसे निर्धारीत करावे हे सारे त्या इंटरनेटच्या मदतीने शिकल्या. नीम इंडियाचे व्यवस्थापन सांभाळल्यानंतर कंपनीसमोर खूप अडचणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी प्रसंगी कठीण निर्णय घेतले. सुरवातीला रिकव्हरी नसल्याने कंपनीचे आऊटस्टँडिंग खूप होते. त्यामुळे त्यांनी पैशांचा विनियोग कसा, कुठे होत आहे? हे तपासले. त्यानंतर आऊटस्टँडिंग क्लिअर करण्यावर भर दिला. प्रॉडक्शन कॉस्ट कमी केली. लेबर कॉस्टवरील खर्चालाही कात्री लावली. कच्च्या मालाचा साठा गरजेपुरताच केला. याच काळात कोईम्बतूर शाखेतील घोटाळे समोर आले. त्यामुळे ती शाखा कर्नाटकमध्ये विलीन केली. म्हैसूर शाखेतील अधिकारीही कामाचे आऊटपूट दाखवत नव्हते. त्यामुळे त्यांना नारळ देण्यात आला. नंतर कर्नाटक, गुजरातमधील शाखांवर लक्ष केंद्रित केले. कामचुकारांमुळे कंपनीविषयी मार्केटमध्ये चुकीचा संदेश जात होता. त्यामुळे ग्राहक, वितरकांच्या भेटी घेऊन त्यांचे गैरसमज दूर केले. या दोन्ही राज्यातील आऊटस्टँडिंग क्लिअर झाल्यावर तेथील शाखा बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी आता फक्त महाराष्ट्रात फोकस केला आहे.
डेडलाईननुसार काम
कामे सुरळीत व्हावीत म्हणून त्यांनी कामांचे दिवस, आठवडा आणि महिनानिहाय टप्पे केले आहेत. त्यानुसार प्रत्येकाला कामांची डेडलाईन दिली जाते. ठरलेल्या वेळेआधी त्या कोणालाही कामाबाबत विचारणा करत नाहीत. परंतु, डेडलाईन पूर्ण झाल्यावर मात्र सबब ऐकली जात नाही. कामाची विभागणी झाल्यावर संबंधिताकडून त्याचा रिझल्ट हवाच. जर ते काम झेपावत नसेल तर संबंधिताने तशी कल्पना द्यावी. त्यावर लगेचच विचार करून त्या कामाची विभागणी केली जाते. या पद्धतीमुळे कामाचा कोणावरही दबाव येत नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी प्रत्येक कर्मचार्यात कंपनीविषयी आपुलकीची भावना रुजवली आहे. त्यामुळे प्रत्येक जण झोकून देऊन काम करतो. रविवारी कंपनीला सुट्टी असते. या दिवशी अपवाद वगळता कोणीही कंपनीच्या कामानिमित्त एकमेकांना फोन करत नाही. कार्यालयीन वेळ संपल्यावरही हाच नियम पाळला जातो. त्यांच्या वडिलांनी सुरुवातीला या नियमाला विरोध दर्शवला. परंतु, तरीही त्या निर्णयावर ठाम राहिल्या. वडिलांनी सुरवातीला 2 तासांची मुभा मागितली. आता त्यांनाही सवय झाली असून ते कार्यालयीन वेळेनंतर फोन बंद करतात. एक ते दीड महिन्यानंतर 3 ते 4 दिवसांची सुटी घेऊन त्या पतीसह सासरच्या मंडळीला वेळ देतात.
भविष्यातील योजना
येत्या दोन वर्षात नीम इंडिया कंपनीला कार्पोरेट लेव्हलला घेऊन जाणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्या उत्पादित मालाची जास्तीत जास्त निर्यात करण्यावरही त्यांचा भर असणार आहे. देशातील शेतकर्यांनी फसव्या कृषी उत्पादनांचा वापर टाळावा, यासाठीही त्या प्रयत्नशील राहणार आहेत. फसवी कृषी उत्पादने कशी ओळखावीत, याबाबत त्या अॅक्शन प्लॅन तयार करत असून लवकरच त्याबाबत नीम इंडियाकडून जनजागृती सुरू होणार आहे.
आयुष्यातील टर्निंग पॉईंट
नीम इंडियाच्या कार्यकारी व्यवस्थापक म्हणून कामाला सुरवात करणे, हा आयुष्यातील टर्निंग पाईंट असल्याचे त्या म्हणाल्या. नीम इंडियामुळे स्वतःला ओळखता आले. निर्णय क्षमता कळाली. जबाबदारी कशी सांभाळावी? हे शिकता आले. मला सर्व काही आयते मिळाले, हा माझा प्लस पॉईंट होता. पण तेथून पुढे जाणे हे मोठे आव्हान होते. आहे त्या लोकांना सोबत घेऊन पुढे जाणे खूप चॅलेंजिंग होते. येथे काम करताना मी समाधानी आहे, असेही त्यांनी सांगितले.
उच्चशिक्षित कुटुंब
जोशी यांचे कुटुंब उच्चशिक्षित आहे. त्या स्वतः सिव्हील इंजिनिअर आहेत. त्यांचे वडील देखील सिव्हील इंजिनिअर, आई मीना जोशी या एम.एस्सी. केमेस्ट्री, बी.एड्., एम.ए. सायकोलॉजी तर लहान भाऊ हर्षवर्धन जोशी यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरींगनंतर मास्टर इन अॅग्रीकल्चर बिझनेसचे शिक्षण घेतले आहे. त्यांची युनाइटेड स्टेटमध्ये नीम ट्री नावाची कंपनी आहे. त्यांचे पती विकास शर्मा हे सिव्हील इंजिनिअर असून ते दिल्लीत कार्यरत आहेत. तरूण शेतकर्यांना संदेश देताना त्या म्हणाल्या; जे काम करताय ते खूप चांगल्या प्रकारे, नियोजबद्धरीत्या करा, नवनवे तंत्र शिकून घ्या. सेंद्रिय पद्धतीने शेती करा, असे सांगतात.
परदेशी व्यवहारात सावधगिरी
परदेशातील कंपन्यांसोबत व्यवहार करताना सावधगिरी बाळगावी. अन्यथा फसवणूक होऊ शकते. कोणत्याही परदेशी कंपनीसोबत व्यवहार करण्यापूर्वी त्या देशाच्या गव्हर्नमेंट इम्पोर्ट-एक्सपोर्ट साईटवर त्या कंपनीचा इआयसी कोड टाकावा. त्यामुळे आपल्याला त्या कंपनीचे प्रोफाईल कळते. हा कोड तपासूनच व्यवहार करावा. त्याचप्रमाणे कोणत्याही परदेशी कंपनीकडून जर जी-मेल अकाउंटवरून व्यवहाराचे प्रपोजल आले तर तो व्यवहार शक्यतो टाळावा. कारण जी-मेलवरून अनेकदा फेक ऑफर्स येतात. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असते, असाही सल्ला त्यांनी दिला.