प्रत्येक गोष्टीस (सजीव/निर्जीव) स्वतःचे असे एक मूल्य असते. असे असले तरी विविध प्रकारच्या जोखिमीमुळे एकतर मूल्य कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे नष्ट होऊ शकते व या दोन्हीही मुळे आर्थिक नुकसान होत असते. शेतकर्यांचे जीवन सर्वात जास्त जोखीमीचे आहे. अशावेळी कुटुंबाचे आर्थिक हित सांभाळण्यासाठी आयुर्विमा आवश्यक आहे.
आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स)
आर्थिक नियोजनात लाईफ इन्शुरन्स पॅालिसीचे अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणून पॅालिसी कधी, कशी, व किती कव्हर असणारी घ्यावी हे माहित असणे अत्यंत जरुरीचे असते. बहुतेकांकडे असलेल्या पॉलिसीजचा अभ्यास केला तर असे दिसून येते की सर्वसाधारणपणे लोक पॉलिसी घेताना वार्षिक प्रिमियममुळे किती प्राप्ती कर वाचेल व मुदतीनंतर किती पैसे मिळतील या बाबींचा प्रामुख्याने विचार करीत असल्याचे दिसून येते. मात्र आपल्याला इन्शुरन्सचे कव्हर नेमके किती असावे याबाबत विचार केल्याचे दिसत नाही. यामुळे इन्शुरन्सचा मूळ उद्देशच साध्य होत नाही. लाईफ इन्शुरन्स घेण्याचा मूळ उद्देश जर आपल्याला समजला तर योग्य प्रकारचा इन्शुरन्स घेतला जाईल.
लाईफ इन्शुरन्सचा उद्देश
एखाद्या व्यक्तीचे जेंव्हा अकाली निधन होते अशा वेळी त्या व्यक्तीस नियमित मिळणारे व्यवसायिक अथवा नोकरीतून तेथून पुढे खंडीत होणार असते आणि यामुळे मृत व्यक्तीवर अवलंबून असणार्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते. या आर्थिक संकटावर मात करता येईल इतके लाईफ इन्शुरन्सचे कव्हर असणे आवश्यक असते. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबियांना दरमहाच्या खर्चासाठी व मुलांच्या शिक्षणासाठी व अन्य उद्दिष्टांसाठी साधारणपणे किती खर्च येऊ शकतो (हा अंदाज करताना वाढती महागाई विचारात घेणे जरुरीचे असते) याचा अंदाज घेऊन आवश्यक तेव्हढे कव्हर घेणे योग्य असते. याला ह्युमन लाईफ व्हाल्यू पद्धती असे म्हणतात. सामान्य माणसास ही पद्धत समजण्यास काहीसी किचकट व गुंतागुतीची वाटते. यासाठी ठोबळ मानाने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 12 ते 15 पट कव्हर असणारी लाईफ इन्शुरन्स पॅालिसी घेतली तरी उद्देश साध्य होतो. याचा अर्थ प्रत्येकाने एव्हढे कव्हर घेतलेच पाहिजे, असे नाही. जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न त्याच्या मृत्यू नंतर फारसे कमी होणार नसेल उदा. शेतीचे उत्पन्न, भाड्याचे उत्पन्न, मानधन व अन्य काही उत्पन्न नियमित मिळणार असेल तर अशा व्यक्तीने इन्शुरन्स कव्हर घेतले नाही तरी चालू शकते. तसेच पती/पत्नी दोघेही कमावते असतील तर कव्हर कमी प्रमाणात घेऊन चालते.
पॅालिसीची माहिती
इन्शुरन्स कव्हर विविध प्रकारच्या पॅालिसीद्वारा घेता येते. यासाठी आपल्याला या सर्व पॅालिसीची सविस्तर माहिती असणे आवश्यक असते व या प्रत्येक पॅालिसीचे फायदे तोटे व आपल्यासाठी उपयुक्तता समजावून घेणे आवश्यक असते. प्लॅन, लाईफ इन्शुरन्स पॅालिसी हा इन्शुरन्स कंपनी व संबंधित व्यक्ती यांच्यातील एक दीर्घकालीन करार असून कालावधी 5 ते 30/35 वर्षे इतका असू शकतो. या करारानुसार उभयपक्षी मान्य असेल इतके विमा कव्हर विमा कंपनी ठराविक कालावधीसाठी ग्राहकास देऊ करते व या कालावधीत संबधित व्यक्ती कंपनीस ठरल्यानुसार प्रिमियम देण्याचे मान्य करते. देय प्रिमियम हे व्यक्तीचे वय, आरोग्य, जीवनशैली, कव्हरची रक्कम व कालावधी यावर प्रामुख्याने अवलंबून असते. मात्र सुरवातीस जो प्रिमियम ठरविला जातो तो संपूर्ण कालावधीसाठी कायम राहतो. प्रिमियम मासिक, तिमाही, सहामाही व वार्षिक यापैकी आपल्याला सोयीच्या अशा पद्धतीने भरता येतो. मात्र प्रिमियम नियमित भरला गेला तरच पॅालिसी चालू राहते अन्यथा रद्द होऊ शकते. मात्र या कराराची दोन मूळ तत्व असे, की हा करार परस्पर विश्वासावर असतो आणि त्यानुसार सबंधित व्यक्तीने व विमा कंपनीने एकमेकास सत्य व संपूर्ण माहिती देणे आवश्यक असते. दिलेली माहिती चुकीची असल्याचे सिद्ध झाल्यास करार बंधनकारक रहात नाही. इन्शुरन्स कव्हर घेणार्याचा इन्शुरेबल इंटरेस्ट असणे आवश्यक असते. लाईफ इन्शुरन्सच्या दृष्टीने सबंधित व्यक्तीस स्वतःमध्ये, आपली पत्नी/पती, मुले, यांच्यात इन्शुरेबल इंटरेस्ट असू शकतो अन्य कोणात असून चालणार नाही.
लाईफ इन्शुरन्सचे प्रकार
टर्म इन्शुरन्स
टर्म इन्शुरन्स हा एक कमी प्रिमियम मध्ये आवश्यक तेवढे कव्हर मिळू शकणारा उत्तम पर्याय आहे. यामध्ये फक्त इन्शुरन्स कव्हर मिळते. मात्र कोणत्याही प्रकारची गुंतवणूक होत नसल्याने मुदती नंतर पॅालिसी धारकास काहीच रक्कम मिळत नाही. थोडक्यात टर्म पॅालिसीस केवळ डेथ बेनीफिट असतो अन्य पॅालिसी सारखा मॅच्युरिटी बेनीफिट मिळत नाही. या पॅालिसीच्या कालावधीत पॅालिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारसास पॅालिसी कव्हर इतकी रक्कम डेथ क्लेम म्हणून दिली जाते. मात्र जर पॅालिसी धारक मुदती नंतर ह्यात असेल तर मात्र त्याला मॅच्युरिटी क्लेम मिळत नाही. कंपन्या ऑनलाईन पद्धतीने पॅालिसी देत असल्याने प्रिमियम खूपच कमी झाले आहे.
सिंगल प्रिमियम टर्म पॅालिसी
संपूर्ण कालावधीचा प्रिमियम हा सुरवातीसच एक रक्कमी भरावा लागतो व हा प्रिमियम संपूर्ण कालावधीसाठी नियमित भराव्या लागणार्या एकत्रित प्रिमियमच्या तुलनेने कमी असतो. उदा. 35 वर्षे वयाच्या व्यक्तीस 1 कोटीच्या 25 वर्षे मुदतीच्या पॅालिसीस सिंगल प्रीमियम 2.60 लाख इतका पडतो आणि तर वार्षिक प्रीमियम 17 हजार 500 रु. इतका पुढील 25 वर्षे भरावा लागेल व ही एकत्रित रक्कम रु.4लाख 37 हजार 500 रु. इतकी होते. फरक 1 लाख 77 हजार 500 रु. येतो ही फरकाची रक्कम 10 टक्के व्याजाने बँकेत गुंतवली तर वार्षिक प्रीमियम इतके व्याज दरवर्षी मिळेल व सुरवातीसच 82 हजार 500 रु. एव्हढी रक्कम वाचते आणि म्हणूनच अशी पॅालिसी घेणे फायदेशीर नाही. तसेच नवीन सुधारित नियमानुसार हा प्रिमियम कर सवलतीस पात्र होत नाही.
कर्ज संरक्षण टर्म पॅालिसी
गृह कर्जासारखे मोठ्या रकमेचे वैयक्तिक कर्ज घेताना अशी टर्म पॅालिसी घेणे हितावह असते. कारण दुदैवाने जर कर्जदाराचे कर्ज घेतल्या नंतर निधन झाले तर कर्ज परतफेड करणे अवघड होऊन जाते अशा वेळी बँकेस तारण असलेले घर विकून वसुली करणे भाग पडते. प्रसंगी वारसास बेघर होण्याची वेळ येते मात्र कर्जदाराने अशी होम लोन प्रोटेक्शन पॅालिसी घेलेली असेल तर विमा कंपनीकडून बँकेस कर्जाची रक्कम दिली जाते व यामुळे घर विकण्याची वेळ येत नाही व वारसांची गैरसोय होत नाही. ही पॅालिसी सिंगल प्रिमियम स्वरुपाची असते व हल्ली हा सिंगल प्रीमियम कर्ज रकमेत समाविष्ट करून त्यानुसार दरमहाचा हप्ता ठरवितात.
एन्डोमेंट प्लॅन
एन्डोमेंट इन्शुरन्स प्लॅन हा टर्म इन्शुरन्स व गुंतवणूक यांचे कॉम्बिनेशन आहे. यात पॅालिसी घेणारास ठराविक रक्कम विमा संरक्षण म्हणून दिली जाते व प्रिमियमचा काही भाग यासाठी घेतला जातो, काही थोडा भाग व्यवस्थापकीय खर्चासाठी घेतला जातो व प्रिमियमची उर्वरित रक्कम गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायात (उदा. सरकारी कर्ज रोखे) गुंतवली जाते. या गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न पॅालिसी धारकास बोनसच्या स्वरुपात दिले जाते. प्रतिवर्षी बोनस स्वरुपात मिळणारी रक्कम पॅालिसी कालावधी संपेपर्यंत साठविली जाऊन मुदतीनंतर पॅालिसी धारकास सम अश्युर्ड अधिक साठलेला बोनस इतकी रक्कम दिली जाते. जर पॅालिसी धारकाचा मुदतीपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला तर पॅालिसी धारकाच्या वारसास सम अश्युर्ड अधिक मृत्यू पर्यंतच्या कलावधीत साठलेली बोनसची रक्कम अशी एकत्रित रक्कम डेथ क्लेम म्हणून दिली जाते. रिटर्न व महागाई वाढीचा दर (7 ते 8 टक्के) विचारात घेता एन्डोमेंट पॅालिसीमधील गुंतवणूक फारसी फायदेशीर तर होतच नाही शिवाय मिळणारे विमा संरक्षण (कव्हर) प्रिमियमच्या प्रमाणात खूपच कमी असते.
व्होल लाईफ पॉलिसी
या पॅालिसीचा प्रिमियम अन्य एन्डोमेंट पॅालिसीच्या तुलनेने कमी असतो. मात्र प्रिमियम आयुष्यभर भरावा लागतो व सम अश्युर्ड अधिक बोनसची रक्कम पॅालिसी धारकाचा मृत्यू झाल्यास वारसास किंवा वयाची 85 वर्षे पूर्ण झाल्यावर पॅालिसी धारकास दिली जाते.
चिल्ड्रन प्लॅन
या मध्ये लहान (अज्ञान) मुलांच्या नावाने पॅालिसी घेता येते व असे प्रपोजल मुलाचे पालक करू शकतात. यात मुलाला लाईफ कव्हर असते मात्र असे कव्हर मुलाच्या ठराविक वयानंतर कार्यान्वित होते. समजा पॅालिसी मुलगा 6 वर्षाचा झाल्यावर घेतली आणि जर ही पॅालिसी त्याच्या वयाच्या 15 नंतर कार्यान्वित होणार असेल तर मधल्या 9 वर्षाच्या काळाला डेफरमेंट पिरीयड असे म्हणतात. या कालावधीत मुलास इन्शुरन्स कव्हर नसते तर डेफरमेंट पिरीयड संपल्यावर ज्या तारखेपासून ही पॅालिसी कार्यान्वित होते त्या तारखेस डेफरड डेट असे म्हणतात. मूल सज्ञान (मेजर) झाल्यावर म्हणजे वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर पॅालिसीचे टायटल सदर मुलाच्या नावावर अपोआप वर्ग होते. याला व्हेस्टींग असे म्हणतात. डेफरड डेट व व्हेस्टींग डेट एकच असेल असे नाही.
मनी बॅक पॉलिसी
ही एक ठराविक मुदतीची पॅालिसी असून (उदा. 15, 20, 25, 30 वर्षे ) सम अश्युर्डच्या काही टक्के (15, 20 किंवा 25 टक्के) इतकी रक्कम 4 किंवा 5 वर्षांनी पॅालिसी धारकास दिली जाते. शिवाय सम अश्युर्डचे कव्हर संपूर्ण कालावधी साठी चालू राहते व नियमानुसार मिळणारा बोनसही मिळत असतो. जर मधेच मृत्यू झाल्यास सम अश्युर्ड अधिक बोनसची रक्कम वारसास दिली जाते. या पॅालिसीचा प्रिमियम अन्य एन्डोमेंट पॅालिसीच्या तुलनेने जास्त असतो.
एमडब्लूपी अॅक्ट पॉलिसी
मॅरीड वूमन प्रॅापर्टी अॅक्ट 1874 सेक्शन 6 नुसार पतीस लाईफ इन्शुरन्स पॅालिसी घेता येते व या पॅालिसीचे लाभार्थी त्याची पत्नी किंवा मुले अथवा पत्नी व मुले असतात विशेष म्हणजे या पॅालिसीचा क्लेम हा फक्त लाभार्थीस दिला जातो. या क्लेमवर कोणत्याही प्रकारची टाच येऊ शकत नाही. थोडक्यात पतीचे कोणत्याही प्रकारचे देणे यातून वसूल करता येत नाही. यामुळे आपल्या पत्नी मुलांचे संभाव्य आपत्ती पासून अर्थिक संरक्षण करता येते. विशेष म्हणजे पतीस लाभार्थी नंतर बदलता येत नाही किंवा या पॅालिसीवर कर्ज घेता येत नाही किंवा तारण देता येत नाही. तसेच नॉमिनेशन करता येत नाही.
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन
युलीप हे इन्शुरन्स व म्युचुअल फंड यांचे कॉम्बिनेशन असलेली इन्शुरन्स पॅालिसी होय. यामध्ये आपल्या प्रिमियम मधील अलॉटमेंटचार्जेस, मॅारटॅलीटी प्रिमियम, पॉलिसी अॅडमीन चार्जेस व फंड व्यवस्थापन चार्जेस वजा जाता उर्वरित रक्कम शेअर्स, डिबेंचर, सरकारी कर्ज रोखे यामध्ये ग्राहकाच्या इच्छेनुसार गुंतविली जाते. असे असले तरी बहुतेकांनी आपला पर्याय शेअर्स मध्ये गुंतवणुकीस दिला असल्याने सुरवातीस वर उल्लेखिलेले चार्जेस जाऊन सुद्धा शेअर मार्केट तेजीत असल्याने ग्राहकास अपेक्षेपेक्षा जास्त रिटर्न मिळत असल्याचे दिसून आले याचा फायदा घेऊन खाजगी कंपन्याने युलीप वर विशेषत्वाने भर दिला आणि त्यामुळेच 2000 ते 2009 या त्यांचा सुरवातीच्या काळात फार मोठ्या प्रमाणार युलीप प्लॅन दिले गेले. इतकेच नव्हे तर त्यांच्या एकूण व्यवसायातील युलीपचा हिस्सा सुमारे 70 ते 75 टक्के इतका होता. युलीपचा हा प्रतिसाद पाहून एलआयसी सारख्या सरकारी कंपनीने सुद्धा विविध युलीप योजना बाजारात आणून खाजगी कंपन्याशी स्पर्धा करावयास सुरवात केली. ग्राहकांनी युलीप नीट समजून न घेता अन्य पॅालिसी पेक्षा जास्त रिटर्न मिळणार असे गृहीत धरून मोठ्या प्रमाणावर युलीप मध्ये गुंतवणूक केली. सुरवातीच्या 5 ते 6 वर्षात रिटर्न चांगला मिळत असल्याचे दिसून आले तथापि 2008 मध्ये शेअर मार्केट गडगडल्यावर मात्र बहुतेकांना आपल्या गुंतवणुकीचे बाजार मूल्य हे झालेल्या गुंतवणुकीपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आणि मग युलीप विरोधात ग्राहकांच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्या. या सर्व बाबींचा विचार करून सेबीने 1 आक्टोबर 2010 पासून प्रचलित युलीपच्या विकिवर बंदी आणली व आता नव्याने मार्गदर्शक सूचना देऊन ग्राहक हिताच्या दृष्टीने सोयीस्कर अशा युलीप योजना उपलब्ध करून देण्यास अनुमती दिलेली आहे.
रायडर म्हणजे काय?
या आधी उल्लेख केलेल्या तीन्ही प्रकारच्या इन्शुरन्स पॉलिसीस रायडरची सुविधा असते अशी सुविधा घेण्यापूर्वी रायडर म्हणजे काय व त्याचा लाभ घेणे कितपत फायदेशीर आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. रायडर म्हणजे मूळ पॅालिसीला जोडलेले एक कलम की, ज्यामुळे काही वाढीव फायदा पॅालिसी धारकास होऊ शकतो. मात्र रायडर घेणे बंधन कारक नसते तसेच रायडर स्वतंत्रपणे घेता येत नाही तर ते मूळ पॅालिसी सोबतच घ्यावे लागतात. या रायडर्स मुळे तीन प्रकारचे वाढीव विमा संरक्षण मिळू शकते. असे रायडर घेण्यासाठी पॉलिसी प्रिमियम शिवाय वाढीव रायडर प्रिमियम द्यावा लागतो व हा प्रिमियम मूळ पॅालिसी प्रिमियमच्या जास्तीतजास्त 30 टक्के पर्यंत असतो. रायडर व त्यापासून मिळणारा फायदा पुढीलप्रमाणे असतो,
1) अॅक्सीडेंट रायडर ः हा रायडर मूळ पॉलिसी सोबत घेतल्यास पॉलिसी धारकास अपघाती मरण आले असता सम अश्युर्ड व्यतिरिक्त सम अश्युर्ड इतकी किंवा दुप्पट रक्कम वारसास क्लेम म्हणून दिली जाते. उदा. समजा एखाद्याने रु.25 लाख सम अश्युर्ड असलेली टर्म पॉलिसी घेतली असून सोबत तितक्याच रकमेचा अॅक्सीडेंट रायडर घेतला आहे आणि दुर्दैवाने या व्यक्तीचे दोन वर्षांनी अपघाती निधन झाले तर वारसास एकूण रु. 50 लाख इतकी क्लेमची रक्कम मिळेल. मात्र जर मृत्यू जर अन्य कारणाने झाला तर मात्र रु.25 लाखाचाच क्लेम वारसास मिळेल. अपघात झाल्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत मृत्यू झाला तरच अॅक्सीडेंट रायडरचा फायदा मिळतो.
2) डिसेबलिटी रायडर ः हा रायडर मूळ पॉलिसी सोबत घेतल्यास पॉलिसी धारकास अपघाती अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या स्वरूपानुसार क्लेम दिला जातो. उदा. कायम स्वरूपाचे अपंगत्व आल्यास सम अश्युर्ड इतकी रक्कम क्लेम पोटी दिली जाते. अंशतः अपंगत्व आल्यास सम अश्युर्डच्या 50 टक्के इतकी रक्कम क्लेम पोटी दिली जाते. तात्पुरत्या स्वरूपाचे अपंगत्व येऊन जर पॅालिसी धारकास हॉस्पीटलमध्ये रहावे लागले तर आठवड्यास सम अश्युर्डच्या 10 टक्के परंतु जास्तीत जास्त 5 हजार रु. इतकी रक्कम 104 आठवड्यापर्यंत किंवा हॉस्पीटलायझेशन कालावधी यातील कमी असणर्या काळासाठी दिले जातात.
3) क्रिटीकल केअर रायडर ः क्रिटीकल केअर ही सुविधा रायडर स्वरुपात किंवा स्वतंत्र पॉलिसी स्वरुपात सुद्धा घेता येतो. यासाठी क्रिटीकल केअर म्हणजे काय हे आधी पाहू. क्रिटिकल केअर सुविधेनुसार पॉलिसी धारकास पॉलिसी कालावधीत कॅन्सर, किडनी ट्रान्सप्लांट, हार्ट अॅटॅक, ब्रेन ट्यूमर या सारखा कोणत्याही गंभीर आजाराचे निदान झाल्यास पॉलिसी धारकास या रायडरनुसार असलेली सम अश्युर्ड इतकी रक्कम त्वरित दिली जाते व त्या पुढे पॅालिसी चालू रहात नाही या गंभीर आजारांचे वर्गीकरण अ गटात केले जाते या शिवाय अन्य त्यामानाने कमी गंभीर स्वरूपाच्या 25 आजारापैकी एखद्या आजाराचे निदान झाल्यास सम अश्युर्डच्या 50 टक्के इतकी रक्कम पॅालिसी धारकास त्वरित दिली जाते व पॅालिसी उर्वरित काळासाठी पुढे चालू रहाते शिवाय या पुढील काळासाठी प्रिमियम भरावा लागत नाही. या कमी गंभीर स्वरूपाच्या आजारांचे वर्गीकरण ब गटात केले जाते. पॉलिसी डॉक्युमेंट मध्ये अ आणि ब गटातील आजारांचा स्पष्ट उल्लेख केलेला असतो. ही पॅालिसी जास्तीत जास्त 20 वर्षाच्या कालावधी साठी दिली जाते. तसेच जास्तीत जास्त 60 वर्षे वयापर्यंत दिली जाते. ही पॉलिसी लाईफ व जनरल इन्शुरन्स दोन्ही पद्धतीने घेता येते. असे असले तरी शक्यतो आपली इन्शुरन्स नेमकी गरज लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर टर्म पॅालिसी घेणे निश्चितच हितावह असते.
मो.नं. 9423002014
(लेखक पुणे येथील नामवंत वित्तीय सल्लागार आहेत.)