संपूर्ण महाराष्ट्रातला मान्सून हंगाम संपला; हवामान विभागाची घोषणा

मुंबई : भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत संपूर्ण महाराष्ट्रातून नैऋत्य मोसमी पावसाने पूर्णपणे माघार घेतल्याचे म्हणजेच राज्यातील मान्सून हंगाम संपल्याचे जाहीर केले आहे.
आयएमडीनुसार, संपूर्ण महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांतून मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्ण झाला आहे. मान्सून माघारीची सीमा आता २७.५° उत्तर / ८६.५° पूर्व, सुपौल, रांची, सुंदरगड, बारगढ, बिजापूर, हैदराबाद, बेळगाव आणि पणजीवरून अरबी समुद्रात १५° उत्तर / ७२° पूर्व अशा रेषेतून जात आहे. राज्याच्या सर्व विभागांतून, म्हणजेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ भागातून मान्सून पूर्णपणे संपुष्टात आला आहे.
यंदाची वैशिष्ट्ये
यंदा मान्सूनची माघार नेहमीपेक्षा लवकर झाली आहे. मुंबईतून मान्सून साधारणपणे 8 ऑक्टोबरला परततो, पण यंदा 3 ऑक्टोबरलाच तो परतला, ही 2002 नंतरची सर्वात लवकर झालेली माघार आहे. गेल्या वर्षी 2025 मध्ये मुंबईतून माघार 10 ऑक्टोबरला झाली होती.
मुंबई हवामान विभागाच्या हंगामी अहवालानुसार, यंदा संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून काळात 19% कमी पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सर्वात जास्त 40% कमी, विदर्भात 23% कमी, कोकण-गोव्यामध्ये 14% कमी आणि मध्य महाराष्ट्रात 11% कमी पावसाची नोंद झाली आहे.
View this post on Instagram
पुढे काय?
आयएमडीनुसार, कोकण आणि गोवा किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि आर्द्रतेमुळे ‘ऑक्टोबर हीट’ चा त्रास जाणवेल. कुलाबा येथे 37.4°C तर सांताक्रूझ येथे 36.9°C इतके कमाल तापमान नोंदले गेले आहे, जे सरासरीपेक्षा 4-5 अंशांनी जास्त आहे.
शेतकऱ्यांसाठी कृषी हवामान विभागाने सल्ला दिला आहे की, काढणी केलेले पीक सुरक्षित आणि कोरड्या जागी साठवून ठेवावे.




