आजची तरुण पिढी शेतीचे महत्त्व जाणून शेतीकडे वळू लागली आहे. तरुण आज शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. तसेच पारंपारिक शेतीला बगल देत आधुनिक पध्दतीने शेती पिकांची लागवड करत आहेत. यातून चांगला नफा देखील ते मिळत आहेत. अनेक तरुण शेतीकडे रोजगार आणि उद्योगाचा दृष्टीने बघत आहेत. शेतीसोबतच आज शेतीपूरक व्यवसाय उभ करण्याकडे तरुणांचा कल आहे. आज आपण अशाच एका तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. नवीन तंत्रज्ञानाची साथ आणि मनात जिद्द असली तर अशक्य काहीच नाही. हे 22 वर्षीय तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. या तरुण शेतकऱ्याचे नाव साहिल मोरे असून गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील ते रहिवासी आहे. आठ एकर शेतीत या तरुण शेतकऱ्याने 40 लाखांच्या लाल मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
मागासलेला तालुका अशी ओळख असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मिरची पिकाची लागवड केली जाते. याच तोहोगावातील साहिल यांनी मात्र कमालच केली आहे. ज्या जमिनीत काही काही लाख रुपयांचा नफा होत होता त्याच जमिनीत साहिल यांनी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. साहिल हे उच्चशिक्षित आहे. युवा शेतकरी साहिल यांनी दहावीनंतर हॉर्टिकल्चर सायन्स या विषयात अभ्यास केला. त्यानंतर ते आता बीएससीच्या द्वितीय वर्ष शिक्षण घेत आहे. ते डिग्री घेऊन नोकरीसाठी वणवण फिरले मात्र, त्यांना नोकरी करण्याची संधीच मिळाली नाही. थोडे दिवस त्यांनी नोकरीसाठी आणखी प्रयत्न केले पण नोकरी मिळाली नाही. मग साहिल यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. आणि आज याच निर्णयामुळे त्यांनी शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन मिरचीतून विक्रमी उत्पादन घेतले आहे. साहिल यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती त्यांनी हातात घेतली. साहिल यांची आज प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख आहे.
मिरची पिकाची लागवड करण्याचा घेतला निर्णय
साहिल मोरे यांची वडिलोपार्जित शेती ही वर्धा नदी पात्रा जवळ आहे. साहिल यांचे वडील हे पारंपरिक शेती करायचे. हरभरा, कापूस, सोयाबीन अशा पिकांचे ते उत्पादन घेत होते. पण हा भाग पूरग्रस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा वडिलांना मोठ्या प्रमाणात नुकसानीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे साहिल यांनी शेतात काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा विचार केला. बऱ्याच ठिकाणी त्यांनी शेतीची माहिती घेतली आन शेवटी मिरची पिकाची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. कारण मिरचीचे पीक नोव्हेंबर महिन्याच्या आधी येते. हा पूरग्रस्त भाग असल्यामुळे मिरची पिकाची लागवड केल्यास पुराची भीती राहणार नाही. मिरची पिकाचे उत्पादन कमी येते यासाठी आधुनिक पद्धतीने ही शेती कशी केली जाऊ शकते ?, याची साहिल यांनी माहिती मिळविली. माहिती घेतल्यानंतर साहिल यांनी नवीन शेती प्रणालीचा अभ्यास केला.
नदीतील शेवाळ्यांचा केला वापर
नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ असते. या शेवाळामध्ये उपयुक्त प्रोटीन देखील जास्त प्रमाणात असते. नदीचे पाणी मिरची पिकाला दिले जाते पण सोबतच या पाण्यामध्ये असलेली शेवाळ जर मिरची रोपांपर्यंत पोहोचली तर ते अधिक फायदेशीर ठरू शकते. याची साहिल यांनी शक्कल लढवली. आज शेतात ड्रम फिल्टर बसवून घेतले. ज्याद्वारे नदीच्या पाण्यातील असलेली शेवाळ ही त्या ड्रम फिल्टरमध्ये जमा होईल. साहिल यांनी ड्रम फिल्टरमध्ये शेवाळ जमा केली आणि शेवाळाचे सूक्ष्म तुकडे केले. शेवाळाचे सूक्ष्म तुकडे रोपांपर्यंत जाण्यासाठी ड्रीप इरिगेशन करून घेतले. आणि या माध्यमातून प्रोटीन युक्त शेवाळ रोपांपर्यंत पोहचविली.
शेतीवर होणारा खर्च केला कमी
शेती आता खर्चिक झाली आहे, अशी ओरड नेहमी ऐकायला येते. मात्र, यावर देखील साहिल यांनी वेगळा प्रयोग केला आहे. शेतीला लागणारे मजूर आणि खत यांच्यावरील लागणारा खर्च कमी कारण्यासाठी साहिल यांनी नवीन प्रणालीचा वापर केला. ही पद्धत आहे वेंचुरी.. पाण्याच्या फोर्सवर वेंचुरी ही पद्धत चालते. सर्वात आधी वेगवेगळ्या ड्रममध्ये खतांचे मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण पाईपच्या माध्यमातून फिल्टरपर्यंत पोहचवले जाते. या फिल्टरमध्ये अनावश्यक भाग बाजूला केला जातो आणि खत रोपांपर्यंत पोहोचविले जाते. या पद्धतीमुळे साहिल यांचा दहा पटीने खर्च तर कमी झालाच पण खतांचा योग्य वापर होऊन ते खत थेट रोपांपर्यंत पोहचले आणि यामुळे पिकांची वाढ चांगली झाली. साहजिकच पिकांची वाढ चांगली झाली तर उत्पादनही चांगले येते.
मिरचीतून झाला 40 लाखांचा नफा
वेंचुरी, ड्रम फिल्टर आणि ड्रीप इरिगेशन सिस्टीम या नवीन प्रणालीचा वापर साहिल यांनी त्यांच्या शेतीत करून मिरचीतून विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी त्यांच्या आठ एकर शेतीमध्ये जवळपास दोनशे क्विंटल मिरचीचे उत्पादन घेतले. या निघालेल्या उत्पादनातून खर्च वजा जाता 40 लाख रुपयांचा नफा झाला आहे.