शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो, जसजसे उत्पादन वाढत जाईल, तसे अधिकाधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करून आणखी उत्पादनात वाढ, कशी करता येईल, यासाठी शेतकरी झटत असतो. सांगली जिल्ह्यातील निपाणी येथील अमर पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी देखील यापैकीच एक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून अमर पाटील यांना त्यांच्या शेतीतील कामगिरीबद्दल वसंतराव नाईक पुरस्कार, पंजाबराव देशमुख कृषीरत्न, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आणि आणखी चार पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पाचव्या पिढीतील ऊस उत्पादक शेतकऱ्याने आपल्या ऊसाच्या शेतात शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करून दरवर्षी ‘विक्रमी उत्पादन’ मिळवले आहे. सोबतच पाण्याची बचतही त्यांनी केली. त्यांनी स्वत: संशोधन केलेल्या वेगवेगळ्या तंत्रांचा प्रयोग करून आठ वर्षांत महाराष्ट्रात ‘शुगर बेल्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील 39 वर्षीय अमर पाटील यांनी केवळ एक एकर शेतातून 130 टन ऊसाचे उत्पादन घेतले.
अमर पाटील मूळचे सांगली जिल्ह्यातील निपाणी गावचे. एकत्रित कुटुंब असल्यामुळे त्यांच्याकडे ३८ एकर क्षेत्र होत. कोरडवाहू असलेलले गाव मागच्या काही वर्षांमुळे पाणी पाणीदार झाले आहे. बारावीचे शिक्षण घेत असतानाच पाटील यांनी शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यानंतर त्यांनी कृषी अभ्यासात पदवी प्राप्त केली. पडीक असणाऱ्या जमिनीवर त्यांनी विविध प्रयोग चालू केले. अमर हे 2006 पासून GSK86032 या उसाच्या वाणाची लागवड करत आहेत. सर्वात आधी अमर यांनी झाडांना पाणी देण्याची पद्धत कालव्याच्या सिंचनातून ठिबक सिंचनात बदलली. पिकांना आवश्यक ठेवढेच पाणी दिल्यामुळे त्यांच्या उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली. मागील कापणी केलेल्या पिकाचे खोड हे तेथेच कुंजतात. यावरच पुन्हा लागवड केल्याने याचा झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. त्यासाठी अमर यांनी नवीन बियाणे विकत घेऊन त्याची रोपवाटिकेत लागवड केली. या सरावाने स्वच्छ कापणी सुनिश्चित केली. यामुळे 2013 मध्ये त्याचे उत्पादन सुमारे 70 टन प्रति एकरपर्यंत पोहोचले. 100 एकरांचा आकडा गाठण्याच्या इच्छेने आकर्षित झालेल्या अमर यांनी मातीचा अभ्यास करून मातीची गुणवत्ता सुधारण्याचे काम सुरु केले. यासाठी त्यांनी त्यांच्या पुतण्याची मदत घेतली. तसेच जमिनीची उत्पादकता आणि सुपीकतेवर परिणाम करणारे घटक समजून घेण्यासाठी त्यांनी सरकारी विभागातील कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.
संशोधनानंतर एक एकर जमिनीतून घेतले 100 टन उत्पादन
झाडांना मौल्यवान पोषक द्रव्ये मिळण्यासाठी त्यांनी सेंद्रिय खतांसह झाडांच्या फांद्या, डहाळ्या आणि फुलांचा कचरा यांसारखी नैसर्गिक द्रव्यांचा वापर शेतीसाठी केला. यामुळे रासायनिक खतांचा वापर कमीत कमी झाला. अमर यांनी जो काही खतांचा वापर केला तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर आणि संशोधनानंतर 2017 मध्ये अमर यांनी केवळ एक एकर जमिनीतून 100 टन उत्पादन घेतले. 100 टन उत्पादन निघाल्यानंतर अमर भारावून गेलेत. त्यांच्या शेजारील शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन पाहण्यासाठी येऊ लागले. त्याच वर्षी त्यांना वसंतराव नाईक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार कोरडवाहू शेती प्रणाली आणि जलसंधारणातील उत्कृष्ट संशोधन अनुप्रयोगांना ओळखण्यासाठी दिला जातो.
2019 मध्ये घेतले 130 टन उत्पादन
एक एकर शेतीतून 2019 मध्ये त्यांना 130 टन जास्तीचे उत्पादन मिळाले. ज्यातून एकट्या उसाच्या पिकातून त्यांना 3.5 लाख रुपये मिळाले. आज त्यांचे समर्पण पाहून अनेक शेतकरी त्यांनी वापरलेले तंत्रज्ञान स्वीकारू लागले आहे. आता काही मोजके शेतकरी आहेत ज्यांनी एक एकर जमिनीतून 100 टन किंवा त्याहून अधिक उत्पादन घेतले आहे. तसेच जमिनीची उपलब्धता कमी होत आहे अशातच कमी जमिनीतून अधिक उत्पादनाची गरज असल्याचे सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.
आता 151 टन उत्पादनाचे ध्येय..
अमर पाटील यांनी आता तर एकरी 151 टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे. अमर पाटील यांची प्रयोगशीलता आणि ऊस शेतीतील धडपड व सातत्याने केलेले प्रयत्न यांची दखल घेत अमर यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आले आहे.