फोर्स मोटर्सने रविवार, 31 मार्चपासून भारतातील कृषी ट्रॅक्टर व्यवसाय आणि संबंधित सर्व उद्योग बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने शुक्रवारी यासंबंधी घोषणा केली. फोर्स कंपनी आता भारतात ट्रॅक्टरऐवजी इतर वाहनांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणार आहे.
आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कृषी ट्रॅक्टरच्या विक्रीचा कंपनीच्या एकूण महसुलात 3.66% वाटा होता, असे फोर्स मोटर्सने म्हटले आहे. हा व्यवसाय बंद करणे, कंपनीच्या उत्पादन तर्कसंगत कार्यक्रमाचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले. कंपनी आता भारतात शेअर्ड मोबिलिटी ट्रान्सपोर्टेशन, लास्ट माईल मोबिलिटी आणि नागरी, तसेच संरक्षण अनुप्रयोगांसाठी विशेष वाहनांची निर्मिती यासारख्या मुख्य विभागांवर लक्ष केंद्रित करणार आहे.
फोर्स ही जीप व मेटाडोरसारख्या बहु-सीटर प्रवासी वाहनांसाठी ओळखली जाणारी कंपनी असून भारतात बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या आलिशान कारसाठी इंजिन बनवते. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 48% कमाई वाहनांच्या विक्रीतून होते, तर सुमारे 36% महसूल कंत्राटी इंजिन उत्पादनातून प्राप्त होतो.
फोर्स मोटर्सने ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत, सलग चौथ्या तिमाहीत नफा नोंदवला. कोविड महामारीनंतरच्या आर्थिक क्रियाकलापांमध्ये वाढ झाल्यामुळे या महाराष्ट्रस्थित कंपनीला चांगला नफा मिळण्यास मदत झाली होती.