कांदा-लसूण, वेल वर्गीय पीके, कोबी वर्गीय पीके, टोमॅटो
कांदा-लसूण
कांदा रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण
• फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, फिप्रोनील (5 एससी) 1 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 1 मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२25 ईसी) 2 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
• मर रोग व मातीतून पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी, मेटॅलॅक्झिल + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण करून रोपांच्या ओळीत ओतावे.
• काळा किंवा तपकिरी करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा ट्रायसायक्लॅझोल (75 डब्ल्यूपी) 1 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल (5 ईसी) 1 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात पानांवर फवारणी करावी.
• फवारणीवेळी 0.5 मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.
कांदा-लसूण :
रांगडा कांदा रोपवाटिका –
• रांगडा हंगामासाठी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात बी पेरून रोपांची पुर्नलागवड ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी.
• एक एकर कांदा लागवडीसाठी दोन गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी दोन ते तीन किलो बी पुरेसे होते.
• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 2 ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी 200 किलो शेणखतासोबत 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे.
• रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून 10 ते 15 सें.मी. उंच, 1 ते 1.2 मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात.
- वाफे तयार करताना 1,600 ग्रॅम नत्र, 400 ग्रॅम स्फुरद, 400 ग्रॅम पालाश प्रति 200 वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत.
- रुंदीशी समांतर 5-7.5 सें.मी. अंतरावर रेघा पाडून 1-1.5 सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे.
- पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे.नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे.
- तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन 2 मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- पेरणीनंतर 20 दिवसांनी हाताने खुरपणी करून, 800 ग्रॅम प्रति 200 वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
टोमॅटो
ब्लॉसम अँड रॉट टोमॅटो पिकामध्ये कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्याची वाढ खुंटून शेंडा ठिसूळ व अशक्त होतो. फळांचे देठ कमकुवत होऊन फळगळ वाढते. फळांच्या खालच्या बाजूस काळसर भाग (ब्लॉसम अँड रॉट) तयार होऊन थोड्या दिवसांनी ही फळे कुजून गळून पडतात. फळ नासणे, फळ बारीक होऊन सुकल्यासारखे होणे, फळे तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे अशा समस्या दिसून येतात.
- कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते.
- माती परीक्षणानुसार कॅल्शिअमची कमतरता असल्यास पिकाच्या सुरुवातीच्या काळापासून कॅल्शिअमयुक्त खते वापरावीत.
- जमिनीमधून कॅल्शिअम नायट्रेट, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समद्वारेसुद्धा कॅल्शिअमचा पुरवठा केला जाऊ शकतो.
- टोमॅटो पुनर्लागवडीनंतर रोपावस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत चिलेटेड कॅल्शिअम 0.5 ते 1 ग्रॅम किंवा कॅल्शिअम क्लोराईड 2 ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
कोबीवर्गीय पिके
रोग नियंत्रण
करपा
प्रसार रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो.
लक्षणे
• प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर एकात एक वलये असलेले तपकिरी काळे ठिपके पडतात.
• ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.
उपाययोजना
• रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
• फवारणी (प्रति लिटर पाणी) मँकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड 2.5 ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील 2.5 ग्रॅम अधिक स्टीकर 1 मि.लि.
केवडा
प्रसार
रोगाचा प्रादुर्भाव बियाणे आणि जमिनीतून होतो. तसेच रोगग्रस्त झाडाचे अवशेष, पाणी व वाऱ्यामार्फत दुय्यम प्रसार होतो.
लक्षणे
• रोगामुळे पानाच्या वरील भागावर पिवळसर रंगाचे तर खालील भागावर जांभळट, तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. सदर डागांवर नंतर भुरकट बुरशीची वाढ होते.
• प्रादुर्भाव रोपावस्थेत जास्त प्रमाणात होतो. पोषक वातावरणात संपूर्ण पाने करपून रोपे मरतात.
• पुनर्लागवडीनंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास पाने गळतात. त्यामुळे गड्डे चांगले पोसत नाहीत. गड्ड्यांची काढणी लांबल्यास त्यावर तपकिरी काळपट चट्टे पडतात आणि ते सडू लागतात.
• फुलकोबीचा मुख्य दांडा व आतील भाग काळा पडून सडतो.
उपाययोजना
• पीक स्वच्छ तणविरहित ठेवावे.
• फवारणी (प्रति लिटर पाणी) मेटॅलॅक्झिल + मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2.5 ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील 2.5 ग्रॅम अधिक स्टीकर 2 मि.लि.
वेल वर्गीय पिके
फळकूज/ फळसड हा रोग काकडी, भोपळा, कारली, घोसाळी, पडवळ आणि इतर वेलवर्गीय पिकांवर येतो. पिथिअम, फायटोप्थोरा, फ्युजॅरिअम, बोट्रायटीस, चोनेफोरा, रायझोक्टोनिया अशा विविध रोगकारक बुरशींच्या प्रादुर्भावामुळे फळसड होते.
व्यवस्थापन
• फळांचा जमिनीशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी.
• रोगाची लक्षणे दिसताच, कॉपर ऑक्झिक्लोराईड (50 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा कॅप्टन (50 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील (75 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• फळावर कापसासारख्या पांढर्या बुरशीची वाढ असेल, तर मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
Comments 3