मुंबई : जुलैमधील दमदार पावसानंतर संपूर्ण ऑगस्ट तसा कोरडाच गेला आहे. बहुतांश महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत होरपळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशात सप्टेंबरच्या पावसावर “एल-निनो”चे सावट दिसू लागले आहे. आता पुढील काही दिवस फक्त हलक्याच सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यातही हा पाऊस कोकण, ठाणे-मुंबई परिसरातच केंद्रीत राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवासाची तारीख जाहीर झाली आहे. यंदा देशात गेल्या 8 वर्षांतील सर्वात कमी पावसाची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
पूर्व राजस्थानमधून यंदा 17 सप्टेंबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्या वर्षी उशिराने, 20 सप्टेंबरपासून मान्सून माघारी गेला होता. यंदा महाराष्ट्रातून 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान मान्सूनचा प्रवास सुरू होईल.
आज राज्याच्या काही भागात हलक्या-मध्यम पावसाची शक्यता
भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) मुंबई प्रादेशिक विभागाच्या अंदाजानुसार, आज, बुधवारी राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबई-ठाण्यासह पालघर जिल्ह्यातही आज हलक्या ते मध्यम पावसाचे अनुमान आहे. कोकणासह सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि बीड जिल्ह्यातील तुरळक ठिकाणीही आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बहुतांश उत्तर महाराष्ट्र, विदर्भ कोरडाच राहण्याची शक्यता
उर्वरित मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दिसत आहे. आज विदर्भाचा बहुतांश भाग कोरडा राहू शकेल, तर तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात. गुरुवारपासून शनिवार दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हलक्या पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात मान्सून पुन्हा दमदारपणे सक्रीय केव्हा होणार?
मान्सून टर्फ (आस) सध्या हिमालयाच्या पायथ्याशी केंद्रीत आहे. 2 सप्टेंबरपासून मान्सून टर्फचे पूर्वेकडील टोक दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. त्यामुळे ईशान्य भारतात पुन्हा जोरदार मान्सून सक्रीय होईल. महाराष्ट्रात पुन्हा मान्सून दमदारपणे सक्रीय होण्यासाठी मात्र सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटण्याची शक्यता आहे.
राज्यात पाऊस का थांबलाय?
सध्या मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी सक्रीय असल्याने पश्चिमी वाऱ्याची गती देशात कमी झाली आहे. त्यामुळेच पावसाचा वेग मंदावल्याचे आयएमडी, पुण्याच्या हवामान तज्ज्ञ शिल्पा आपटे यांनी म्हटले आहे. पश्चिमी वाऱ्याची गती कमी झाल्याने पुढील काही दिवस महाराष्ट्रात हलक्या पावसाचीच शक्यता आहे. राज्यात कोठेही मुसळधार पाऊस होणार नाही. येत्या 2-4 दिवसात कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, राज्यात कोणत्याही भागात आयएमडीने ऑरेंज किंवा यलो अलर्टचा इशारा दिलेला नाही.
पिकांची गुणवत्ता व अधिक उत्पादनासाठी कृषिसम्राटचे रिवार्ड | Reword |
8 वर्षांतील सर्वात कमी पाऊस, 100 वर्षांतील सर्वाधिक कोरडा काळ
यंदा देशात मान्सून चांगलाच रुसला आहे. शिवाय, बरसलेल्या पावसाचे वितरणही असमान झाले आहे. जूनमध्ये रुसलेला पाऊस जुलैत दमदार बरसला; पण संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने सुटी घेतली. राज्याच्या अनेक भागांत पावसाने सरासरी गाठलेली नाही. देशातही यंदा पावसाची मोठी तूट दिसत आहे. यंदाच्या मान्सूनवर एल-निनोचा प्रभाव असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही कमी पाऊस पडण्याची भीती आहे. हा गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा ऑगस्ट-सप्टेंबर काळ असू शकतो. यंदा देशातील जून ते सप्टेंबर दरम्यानचा एकत्रित मान्सून हंगाम किमान 8 टक्के पावसाच्या कमतरतेसह संपणार आहे. 2015 नंतरचा हा सर्वात कमी वार्षिक पाऊस असेल.
एकूणच यंदा पावसाची सरासरी गाठली जाणे अवघड आहे. पर्यायाने राज्यावर दुष्काळाचे गडद सावट पसरलेले दिसत आहे. देशातील पूर्वोत्तर भारतात 17 टक्के कमी पाऊस झाला आहे. मध्य भारतात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी आतापर्यंत 6 टक्के कमी पाऊस झाला आहे. तसेच यंदा दक्षिण भारतात 16 टक्के कमी पाऊस पडला आहे. देशाची एकंदरीत सरासरी पहिल्यास पावसाची तूट 7 टक्के आहे. आता उशिराने माघारी जाणाऱ्या मान्सूनवर सारी भिस्त आहे. गेल्या वर्षी उत्तर आणि पूर्वेकडील राज्ये वगळता देशभरात सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. गहू आणि हरभरा पिकांसाठी सप्टेंबरचा पाऊस महत्त्वाचा असतो.
आयएमडी उद्या जाहीर करणार महिन्याचा अंदाज
हवामान खात्यातर्फे, उद्या 31 ऑगस्ट रोजी सप्टेंबर महिनाभराचा अंदाज जाहीर करणार आहे. यापूर्वीच्या पूर्ण हंगामाच्या अंदाजानुसार, एल-निनो प्रभाव गृहीत धरून आयएमडीने पावसाची 4 टक्के तूट वर्तवली होती. यंदा देश गेल्या 127 वर्षांतील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने जात आहे. देशात यंदा मान्सून कमालीचा अनिश्चित राहिला आहे. जूनचा पाऊस सरासरीपेक्षा 9 टक्क्यांपेक्षा कमी आहे, परंतु जुलैचा पाऊस पुन्हा सरासरीपेक्षा 13 टक्के जास्त राहिला आहे.