मुंबई : किसान कॉल सेंटर्सवर (KCC) प्राप्त होत असलेल्या कॉलमध्ये सातत्याने घट होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच किसान कॉल सेंटर्सच्या रचना आणि तंत्रज्ञानात मोठे बदल करणार आहे. आता किसान कॉल सेंटर्स हाय-टेक होणार आहेत. त्यावर लवकरच व्हिडिओ कॉल मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध होईल. याशिवाय, शेतकरी थेट शेतातून आपली समस्या, पीक स्थिती दाखवू शकतील. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत ही माहिती दिली.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
लोकसभेतील एका तारांकित प्रश्नावरील लेखी उत्तरात तोमर यांनी सांगितले, की कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांवर विचार केला आहे. त्यानुसार, किसान कॉल सेंटर्समध्ये काळानुरूप सुसंगत असे तांत्रिक बदल केले जाणार आहेत. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून कॉल सेंटर्समध्ये सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
किसान कॉल सेंटर्समध्ये वापरली जाणार ही साधने
चॅटबॉट, व्हिडिओ कॉलिंग, द्वि-मार्गी (टू-वे) व्हिडिओ/ऑडिओ क्लिप, द्वि-मार्गी एसएमएस, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)/मशीन लर्निंग (एमएल)आधारित निर्णय समर्थन प्रणाली यासारखी प्रगत कम्युनिकेशन साधने आता किसान कॉल सेंटर्समध्ये वापरली जातील. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना रिअल-टाइम प्रतिसाद देण्याचा त्यातून प्रयत्न केला जाईल.
लोकसभेसोबत शेअर केलेल्या डेटानुसार, किसान कॉल सेंटर्सवर प्राप्त झालेल्या एकूण कॉल्सची संख्या 2021-22 मध्ये 47.87 लाखांवरून 2022-23 मध्ये 35.22 लाखांवर आली आहे. 2020-21 मध्ये प्राप्त झालेल्या एकूण कॉलची संख्या 58.38 लाख होती. त्यापैकी उत्तर दिलेल्या कॉलची संख्या 2021-22 मध्ये 45.81 लाख आणि 2020-21 मध्ये 54.74 लाख होती. त्या तुलनेत 2022-23 मध्ये उत्तर दिलेल्या कॉलची संख्या 33.53 लाख होती. याचाच अर्थ, 2022-23 मध्ये अनुत्तरित कॉल्सची संख्या 1.69 लाख, 2021-22 मध्ये 2.06 लाख आणि 2020-21 मध्ये 3.64 लाख होती.
किसान कॉल सेंटर्सच्या कामकाजातील बदलांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य फायद्यांवर प्रकाश टाकताना केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले, की शेतकरी व्हॉईस टेक टूल्सद्वारे शेतीविषयक सल्ला प्राप्त करून प्रश्न-समस्यांचे रिअल-टाइम निरसन करून घेऊ शकतील. पीक वाढीच्या हंगामात, कीड व रोग नियंत्रण, बाजार, हवामान तसेच उत्पादनक्षम तंत्रज्ञान अशा माहितीशी संबंधित शंका शेतकरी व्हॉइस मेसेज, ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलवर मिळवू शकतील.
शेतकरी शेतातील समस्यांची छायाचित्रे देखील पाठवू शकतात. याशिवाय, ते व्हिडिओ कॉल करू शकतात आणि त्यांच्या शेतातील समस्यांचे निराकरण करू शकतात. किसान कॉल सेंटर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे चालवल्या जाणार्या विविध योजना/कार्यक्रमांची माहिती शेतकरी मिळवू शकतात.