मुंबई : वर्षानुवर्षे, पारंपारिक ज्वारीचे पीक घेणाऱ्या कोरडवाहू पट्ट्यात आता ज्वारीऐवजी गहू खाणे वाढले आहे. त्यानुसार मागणी आणि बाजारपेठातील अर्थकारण लक्षात घेऊन ज्वारीची शेती (Jowar Farming) कमी होऊन गव्हाचा पेरा वाढत चालला आहे. मात्र, ज्वारी लागवडीखालील क्षेत्र कमी होऊन गव्हाचे लागवड क्षेत्र वाढत असल्याचे गंभीर परिणाम होत आहेत. पीक पेरणीचा हा असमतोल भविष्यात अनेक समस्या उभ्या करू शकतो. या साऱ्याचे दुष्परिणाम नेमके काय होताहेत ते आपण जाणून घेऊया.
“नेचर सायंटिफिक” या जगातील अग्रगण्य पर्यावरणीय संशोधन प्रकाशनाच्या ताज्या अंकात ज्वारी आणि गव्हासंदर्भातील तुलनात्मक अभ्यासाच्या निष्कर्षावर आधारित संशोधन अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यंदाचे वर्ष हे संयुक्त राष्ट्रसंघाने बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष (Millet Year) म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे, पारंपरिक पिकांचा पेरा कमी कमी होऊन गव्हाचा पेरा वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
Jowar Farming : ज्वारीचे क्षेत्र 21 टक्क्यांनी घटले
2000 पासून, गेल्या 2 दशकात भारतातील गव्हाच्या उत्पादनाखालील क्षेत्र तब्बल 17 टक्क्यांनी वाढले आहे. उत्तर तसेच उत्तर पश्चिम भारतात होणारा पारंपारिक गहू पेरा हळूहळू देशाच्या अर्ध-शुष्क (कोरडवाहू) भागाकडे म्हणजेच मध्य भारतातही वाढत चालला आहे. या कालावधीत, मध्य भारतातील ज्वारीच्या लागवडीखालील क्षेत्र 21 टक्क्यांनी कमी झाले आहे. वाढत्या जागतिक तापमानात (Golbal Warming) पीक पेऱ्यातील हा असमतोल अतिशय चुकीचा असल्याचे संशोधकांचे मत आहे.
Wheat Farming : गव्हाची उत्पादकता घटणार, पाण्याची गरज वाढणार
गहू व ज्वारी या दोन्ही पिकांच्या हवामान संवेदनशीलतेची तुलना करणारा नवीन अभ्यास दिशादर्शक ठरणार आहे. या अभ्यानुसार, वाढत्या तापमानामुळे भारतातील गव्हाचे उत्पादन 2040 पर्यंत 5% आणि 2050 पर्यंत 10% ने कमी होऊ शकते. याउलट, वाढलेल्या तापमानाचा ज्वारीच्या उत्पादकतेवर फारसा परिणाम होत नाही, असे संशोधकांना आढळून आले आहे. सध्याच्या उच्च तापमानवाढीच्या परिस्थितीत, 2030 पर्यंत गव्हासाठी एकूण पाण्याची गरज 9 टक्क्यांनी वाढू शकते. तुलनेने ज्वारीसाठी पाण्याची गरज 6 टक्क्यांनी वाढेल.
कृषी विद्यापीठांनी ज्वारीची उत्पादकता वाढवावी
न्यू यॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र आणि शाश्वत विकास विभागाच्या प्रमुख लेखिका आणि प्राध्यापक रुथ डेफ्रीज म्हणाल्या, “जर ज्वारी-गहू पीक पेरा संतुलन टिकवून ठेवायचे असेल, तर रब्बी हंगामात तृणधान्य उत्पादन वाढवण्यासाठी गव्हाऐवजी ज्वारीचे पीक हे हवामानास अनुकूल पर्याय ठरते. मात्र, शेतकऱ्यांसाठी ज्वारीची शेती फायदेशीर बनवण्यासाठी उत्पादकता वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार आणि कृषी विद्यापीठांनी मिळून प्रामाणिकपणे, योग्य प्रयत्न करायला हवेत.”
ज्वारी म्हणजे “पिकांमधील उंट”
खरेतर, ज्वारीला (Sorghum) “पिकांमधील उंट” म्हणून ओळखले जाते. कारण अतिशय कमी पाण्यात, कोरडवाहू पट्ट्यात ज्वारीचे पीक घेता येते. गव्हाला ज्वारीपेक्षा दीड पट अधिक पाणी लागते. दुसरीकडे, गव्हाची उत्पादकता अधिक आहे. गव्हाचे उच्च उत्पादन म्हणजे प्रति थेंब जास्त पीक (मोअर क्रॉप पर ड्रॉप). प्रति टन गव्हासाठी ज्वारीच्या तितक्याच उत्पादनपेक्षा सुमारे 15% कमी पाणी वापरले जाते, ज्याला वॉटर फूटप्रिंट म्हटले जाते. अर्थात हा फायदाही भविष्यात कमी होऊ शकतो. 2050 पर्यंत ज्वारीसाठी पाण्याच्या गराजेत 4% वाढीच्या तुलनेत गव्हाच्या “वॉटर फूटप्रिंट” मध्ये तब्बल 12% वाढ होऊ शकते, असे कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आढळले.
कांदा चाळीत शिरले पावसाचे पाणी
https://youtube.com/shorts/vk-ycnhZ5LY?feature=share
Global Warming : वाढत्या तापमानामुळे गहू पीक असुरक्षित होतेय
वाढत्या तापमानामुळे (ग्लोबल वॉर्मिग) गहू पीक दिवसेंदिवस असुरक्षित होत चालले आहे. गव्हाच्या वाढीचा हंगाम उन्हाळ्यापर्यंत लांबत आहे. त्यामुळे गहू पीक उष्णतेच्या लाटेच्या अधिकाधिक संपर्कात येते. पुढील काळात हे अधिक वारंवार होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात, फेब्रुवारीमध्येच लवकर आलेल्या विक्रमी उष्णतेच्या लाटेने कापणीला आलेला बहुतांश गहू जळून खाक झाला. त्यातच युक्रेनमधील युद्धामुळे जगभराच्या पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यावेळी आपल्या गहू निर्यातीवर निर्बंध आणले गेले. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे. त्यामुळेच कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांना भारतात हा अभ्यास करण्यास प्रेरित केले.
ज्वारी पेरा झपाट्याने कमी होत चाललाय
मागील आकडेवारी आणि डेटा पाहिला असता संशोधकांना आढळले, की 1998 ते 2002 आणि 2012 ते 2017 या दोन भिन्न कालावधी दरम्यान भारतातील एकूण गव्हाचे उत्पादन तब्बल 42% इतके वाढले. गव्हाखालील पीक क्षेत्र आणि उत्पन्नात वाढ अनुक्रमे 17% आणि 26% वाढ झाल्याने तसे झाले. दुसरीकडे, याच काळात उत्पादनात 37% वाढ होऊनही ज्वारीचे एकूण उत्पादन मात्र 5% घटले. ज्वारी लागवडीखालील पीक क्षेत्रात 21% घट झाल्यामुळे असे घडून आले.
गव्हावर निरंतर संशोधन, सुधारित ज्वारी वाणाकडे दुर्लक्ष
कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी मध्य प्रदेशातील कोरडवाहू, दुष्काळी क्षेत्रातील बदलत्या पीक पद्धतीचा विशेष अभ्यास केला. या प्रदेशात ज्वारी आणि गहू दोन्ही गेले कित्येक वर्षे पिकवले जातात, परंतु आता गव्हाचे उत्पादन वाढले आहे. 2000 पासून या भागात दोन्ही तृणधान्यांचे उत्पादन वाढले आहे, परंतु गव्हाचे उत्पादन कितीतरी जास्त वाढून ज्वारीपेक्षा जवळपास दुप्पट झाले आहे. ज्वारीचे उत्पादन कमी होण्याचे एक कारण म्हणजे ज्वारीच्या नवीन उत्पादनक्षम वाणांच्या संशोधनाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. दुसरीकडे, गव्हाच्या जातींमध्ये मात्र निरंतर संशोधन, सुधारणा होत राहिल्या आहेत, असे संशोधकांना आढळले.
संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आता बाजरीसह नाचणी, ज्वारी वैगेरे त्या-त्या क्षेत्रातील पारंपरिक, स्थानिक पर्यावरणपूरक पिकांच्या स्थितीकडे लक्ष वेधले गेले आहे, असे कोलंबिया विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र प्राध्यापक रुथ डेफ्रीज यांनी नेचर मध्ये लिहिलेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे. भारत सरकारने आता मिलेटचे (बाजरी, नाचणी) उत्पादन आणि विपणन वाढवण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याबरोबरच ज्वारीकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रा. डेफ्रीज यांनी व्यक्त केले आहे. नेचर सायंटिफिक रिपोर्ट्समध्ये प्रकाशित अभ्यासासाठी, संशोधकांनी दैनंदिन तापमान वाढणे आणि उच्च तापमानवाढीच्या परिस्थितीत पर्जन्यवृष्टीसाठी धान्यांच्या संवेदनशीलतेचा अंदाज लावण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन मॉडेल्सचा वापर केला. अभ्यासाच्या अंदाजांमध्ये चांगले पीक व्यवस्थापन किंवा नवीन अनुकूल तंत्रज्ञान यासारखे घटक विचारात घेतले गेले नाहीत.