मुंबई : नैऋत्य मोसमी वारे कमकुवत असल्याने मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच असल्याची स्थिती आहे. भारतीय हवामान खात्याचे (IMD) पावसाबाबत अनुमान (Monsoon Update) चिंताजनक आहे. कमकुवत वाऱ्यांमुळे मान्सूनची प्रगती महाराष्ट्राच्या तळाला, उत्तर कोकण भागातच थांबली आहे. यंदा राज्यात जूनमध्ये पावसाची मोठी तूट अपेक्षित आहे. जूनच्या अगदी अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आयएमडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कमकुवत पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम वाऱ्यांमुळे मुंबईसह महाराष्ट्राच्या उत्तर कोकण भागात मान्सूनच्या प्रगतीला मोठा धक्का बसला आहे. गेल्या आठवड्यातच मान्सून रत्नागिरीत दाखल झाला. साधारणत: अनुकूल हवामानात मान्सूनला रत्नागिरीहून मुंबईत पोहोचण्यास सुमारे 48 तास लागतात. मात्र, क्षीण असलेल्या पश्चिम आणि नैऋत्य वाऱ्यांमुळे रत्नागिरीतच जवळपास आठवडाभरापासून मान्सून थांबून राहिला आहे.
CNBCTV-18 ने हवामान खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, “उत्तर कोकण भागात सध्याची परिस्थिती मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी प्रतिकूल आहे,” असे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, “उत्तर कोकण भागात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्याची परिस्थिती अनुकूल नाही. मान्सूनच्या प्रगतीसाठी जोरदार पश्चिम आणि नैऋत्य वारे आवश्यक आहेत. या प्रदेशात पश्चिम आणि नैऋत्येचे वारे तर आहेत; परंतु मान्सून उत्तर कोकणातून मुंबई प्रदेशाकडे खेचण्यासाठी ते अजून पुरेसे मजबूत नाहीत.”
अजूनही मान्सूनपूर्व पाऊसच – स्कायमेट
सध्या कोकण-मुंबईसह राज्यात अधूनमधून पाऊस सुरू आहे. मात्र, चक्रीवादळाने काही प्रमाणात निर्माण केलेल्या आर्द्रतेमुळे होणारा हा पाऊस अजूनही मान्सूनपूर्व पाऊसच असल्याचे “स्कायमेट”ने म्हटले आहे. कोकणासह मुंबई प्रदेशात आणि राज्यात अजूनही ढगांची कमतरता आहे. उत्तर कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात पावसाचा जोर नसल्याने मान्सूनच्या प्रगतीचा परिणाम राज्यात अजूनही नक्कीच दिसत नाही. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही पाऊस अजून सुरू झालेला नाही.
सध्याच्या हवामानाच्या स्थितीनुसार, उत्तर कोकण आणि मुंबईत जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीलाच पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात जून महिन्यात पावसाची लक्षणीय तूट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात जूनमध्ये इतके टक्के पाऊस पडण्याची शक्यता
गेल्या आठवड्यात मुंबई विभागाचे IMD प्रमुख सुनील कांबळे यांनी CNBCTV-18 ला सांगितले की, “महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीच्या फक्त 20-30 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.” जून महिना हा पेरणीचा हंगाम असल्याने कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाचा महिना आहे. शेतकरी पेरणीसाठी मान्सूनवर अवलंबून असतात. मात्र, उशीरा झालेल्या पावसामुळे पेरणीचा हंगाम उशीरा येतो आणि एकूण कापणीच्या चक्रातही व्यत्यय येतो.
2022 मधील उष्णतेची लाट आणि 2023 मधील अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीतून अद्यापही न सावरलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांसाठी सध्याचा मान्सूनचा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे. मान्सूनच्या विलंबामुळे राज्यातील शेती, शेतकरी आणि एकूणच परिस्थिती दिवसेंदिवस आणखी बिकट होत आहे.