मुंबई : Cooperation सहकार से समृद्धी अर्थात सहकारातून विकास या कार्यक्रमातून गावोगावच्या विकास सोसायट्यांच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारने पाच महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी हे आणखी एक दमदार पाऊल उचलले आहे. सहकाराला बळकटी देणारे, शेती-शेतकरी आणि ग्रामीण भारताला समृध्द करू शकणारे “हे” पाच निर्णय कोणते, ते जाणून घेऊया …
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. या बैठकीला सहकार मंत्रालय आणि खत विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.
विकास सोसायटी, गावे, सहकारातून विकासासाठी घेतलेले 5 महत्वाचे निर्णय असे-
1. देशभरात सुमारे 1 लाख प्राथमिक कृषी पत सहकारी संस्था म्हणजेच विविध कार्यकारी सेवा संस्था (विकासो, विकास सोसायटी) आहेत. किरकोळ खत विक्रेते म्हणून कार्यरत नसलेल्या प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मॅपिंगच्या आधारे शोधल्या जातील आणि त्यांना टप्प्याटप्प्याने व्यवहार्यतेच्या आधारे किरकोळ खत विक्रेते म्हणून काम करण्यास प्रोत्साहित केले जाईल.
2. ज्या विकास सोसायटी सध्या प्रधान मंत्री किसान समृद्धी केंद्रे (PMKSK) म्हणून कार्यरत नाहीत त्यांना PMKSKच्या कक्षेत आणले जाईल.
3. सेंद्रिय खतांच्या मार्केटिंगसाठी देशभरातील विकास सोसायट्यांना जोडले जाईल, विशेषत: आंबलेले सेंद्रिय खत (FoM), द्रव आंबलेले सेंद्रिय खत (LFOM) आणि फॉस्फेट रिच ऑरगॅनिक खत (PROM) यांच्या विक्री व वापराला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावच्या विकास सोसायट्यांना कार्यरत केले जाईल.
4. खत विभागाच्या मार्केट डेव्हलपमेंट असिस्टन्स (MDA) योजनेंतर्गत, खत कंपन्या विकास सोसायट्यांना प्राधान्य देतील. जैव-सेंद्रिय खतांच्या पुरवठा आणि मार्केटिंग साखळीतील घाऊक/किरकोळ विक्रेते म्हणून सोसायट्या काम करतील. छोट्या व्यावसायिक जैव-सेंद्रिय उत्पादकांच्या उत्पादनांचे मार्केटिंग व विक्रीसाठीही गावोगावच्या विकास सोसायट्या एकत्रित काम करतील.
5. खते आणि कीटकनाशके फवारणीसाठी ड्रोन वितरक, विक्रेते म्हणून देखील विकास सोसायट्या काम करू शकतात. ग्रामीण भागातील मालमत्तेच्या सर्वेक्षणासाठीही ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.
सहकार विभागाच्या निर्णयांचे फायदे
या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे प्राथमिक कृषी पतसंस्थांचे (विकास सोसायटी) उत्पन्न वाढेल, ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढतील. शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके, बियाणे आणि कृषी यंत्रे स्थानिक पातळीवर मिळू शकतील. ड्रोनही गावातच सोसायट्यांमार्फत विकत किंवा वापरायला भाड्याने मिळू शकतील.