मुंबई : Jalyukta Shivar Abhiyan… राज्य शासनाच्यावतीने शेती उत्पादन वाढावे यासाठी विविध योजना, अभियान राबविले जातात. 2015 ते 2019 या कालावधीत राज्य सरकारने असेच एक अभियान हाती घेतले होते. मात्र, मागील काही काळात हे अभियान ठप्प झाले होते. दरम्यान, हे बंद पडलेले अभियान पून्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या अभियानामुळे राज्यातील शेतकर्यांना सिंचनाच्या सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे.
राज्यातील शेतकर्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सरकारच्यावतीने 2015 ते 2019 या कालावधीत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले होते. या अभियानामुळे राज्यातील 39 लाख हेक्टर शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या होत्या. मात्र, मागील काही काळात हे अभियान ठप्प झाले होते. दरम्यान, आता हे अभियान पुन्हा सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 म्हणून ही योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. आता नव्याने सुरू होणार्या या अभियानात येत्या 3 वर्षांत सुमारे 5 हजार गावे नव्याने समाविष्ट केली जाणार आहेत.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
या ठिकाणी राबविणार अभियान
राज्यातील 22 हजार 593 गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले व यामध्ये 6 लाख 32 हजार 896 कामे पूर्ण झाली तर 20 हजार 544 गावे जलयुक्त झाली होती. या कामांमुळे 27 लाख टीसीएम पाणीसाठा क्षमता निर्माण झाली. यामुळे कृषीचे विशेषत: रब्बी हंगामातील उत्पादन वाढले होते. जलयुक्त शिवार अभियान टप्पा-2 मध्ये प्रथम टप्यातील पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रम न राबविलेल्या पात्र गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे घेण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे ज्या गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाचा पहिला टप्पा राबविला गेला आहे परंतु, अद्याप गावांमध्ये पाण्याची गरज आहे. तेथे देखील ही कामे लोकसहभागातून करण्यात येणार आहेत.
अशा गावांची होईल निवड
जलयुक्त शिवार अभियानाच्या दुसर्या टप्प्यासाठी जलयुक्त शिवार अभियान पहिला टप्पा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प व आदर्श गाव तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकासाची कामे पूर्ण झालेली गावे वगळून उर्वरित गावांची निवड करण्यात येणार आहे.
आराखड्यामध्ये या बाबींचा असेल समावेश
अभियानासाठी गाव आराखडा तयार करताना पाणलोट क्षेत्र हा नियोजनाचा घटक असणार आहे. अंतिम आराखड्याला ग्रामसभेची मान्यता झाल्यानंतर तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. गाव आराखड्यानुसार कामे झाल्यानंतर गावाचा जल परिपूर्णता अहवाल तयार करण्यात येणार आहे. पूर्ण झालेल्या योजनांसाठी देखभाल दुरुस्ती परिक्षण देखील करण्यात येईल. गावांमधील ग्रामस्थांची जलसाक्षरता अभियानाद्वारे जनजागृती देखील करण्यात येईल. पिकाच्या उत्पादकतेमध्ये शाश्वतता आणणे त्याचप्रमाणे सामुहिक सिंचन सुविधा निर्माण करणे या व इतर बाबींचा आराखड्यामध्ये समावेश असणार आहे.
अभियानाच्या सनियंत्रणासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतील. कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी 3 लाखांपेक्षा अधिकचे काम ई-निविदेमार्फत करण्यात येईल. सर्व मृद व जलसंधारण कामाचे मेपिंग करून नकाशे अद्ययावत करून जिओ पोर्टलवर टाकण्यात येतील.