मुंबई : Cotton Rate 2022 … हरियाणा, पंजाब, गुजरात आणि महाराष्ट्रात नवीन कापसाची आवक सुरू होऊन प्रति क्विंटल साधारणतः दहा हजारांच्या वरच सरासरी भाव शेतकऱ्याला मिळू लागला होता. अशातच शेअर बाजारातील नियामक संस्था असलेल्या ‘सेबी’ने कमोडिटी म्हणजे एमसीएक्स वायदे बाजारातील कापूस व्यवहारांना तडकाफडकी महिनाभराची स्थगिती दिली आहे. वस्त्रोद्योग कंपन्या, व्यापारी आणि सटोडियांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याची टीका करत शेतकरी संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनो, यंदा कापसाला उच्चांकी दर राहणार असल्याने कापूस विक्रीची घाई करू नका तसेच एकाच टप्प्यात सर्व कापूस विकू नका.
यामुळे कापसाचे दर चढेच राहणार
गेल्या वर्षी गुलाबी व बोंड अळीच्या हल्ल्याने देशात कापसाचे उत्पादन घटल्याने दर चांगलेच तेजीत राहिले होते. तेव्हापासूनच वस्त्रोद्योग कंपन्यांची ओरड सुरू झाली होती. यंदाही देशात अळीच्या भीतीने कापूस लागवड क्षेत्र घटले आहे. त्यातच अमेरिकेतील टेक्सास, चीन आणि पाकिस्तान या प्रमुख कापूस उत्पादक देशात नैसर्गिक आपत्तीने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजाराचीही भिस्त भारतीय कापसावर अवलंबून राहणार आहे. देशांतर्गत घटलेले उत्पादन आणि घरगुती तसेच जागतिक बाजारातून मोठी मागणी यामुळे यंदा कापसाचे भाव चढेच राहतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांनो धीर धरा, कापूस विक्रीची घाई करू नका
“सेबी”ने महिनाभरासाठी कापूस वायदा व्यवहारांवर बंदी घालून कापसाचे भाव खाली आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जात आहे. खालावलेल्या भावात शेतकऱ्यांकडे आलेला कापूस माल खरेदी करून घेण्याचा हा कापूस व्यापारी, दलाल, सटोडिये आणि वस्त्रोद्योग कंपन्यांचा “सिंडिकेट” प्रयत्न असल्याचाही शेतकरी संघटनांचा आरोप आहे. वायदा बाजारातील तज्ञ आणि कृषी क्षेत्रातील जाणकारही अशा स्थितीत शेतकऱ्यांना धीर धरण्याचा सल्ला देत आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनो धीर धरा, कापूस विक्रीची घाई करू नका तसेच घरात आलेला सर्व कापूस एकाच वेळी विकू नका.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
मानसिक दबावाला मुळीच डगमगू नका
तत्कालीन घटना काहीही असल्यास तरी शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि कापूस आता लगेच बाजारात आणून विकू नये, असा सल्ला दिला जात आहे. भलेही काही दिवस कापसाचे भाव पाडून शेतकऱ्यांवर मानसिक दबाव आणला जाऊ शकतो. मात्र, मुळीच डगमगू नका. देशातच काय संपूर्ण जगात कापसाचे अत्यंत कमी उत्पादन असल्याने कापसाला चांगले भाव मिळतील. शेतकऱ्यांनी 2-4 आठवड्यांपूर्वीच्या बातम्या, अंदाज व विश्लेषण दुर्लक्षित करावी, आता परिस्थिती बदलली आहे, असेही सांगितले जात आहे.
कापसाच्या साठ्यातून सटोडियांची नफेखोरी
शेतकरी संघटनेचे नेते व कापूस, कृषी प्रश्नांचे अभ्यासक विजय जावंधिया म्हणतात, “कापूस दरातील विक्रमी वाढीचा खरा लाभ शेतकऱ्यांना होण्यापेक्षा दलाल आणि वायदे बाजारातील म्होरक्यांनाच झाला आहे. कमोडिटी बाजारात कापूस व्यवहार स्थगित करण्याचा निर्णय गिरणी मालकांच्या हितासाठीच घेतला गेला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा सरकार आजिबात विचार करत नाही. आता या निर्णयानंतर सटोडिये शेतकऱ्यांकडील कापूस कमी भावात खरेदी करून साठा करून ठेवतील आणि नंतर देशांतर्गत व जागतिक मागणीत वाढ होताच त्यातून नफेखोरी करू शकतात. यामुळे केंद्र सरकारने साखर धोरणाप्रमाणेच आता कापूस दर धोरण निश्चित करण्याची गरज आहे.”
नव्या कापसाला दहा वर्षांतील सर्वाधिक भाव
देशभरातील सर्व बाजारपेठांत नव्या कापसाला गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक भाव मिळतोय. जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे तर कापूस खरेदीच्या मुहूर्तालाच 16 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. अर्थात हे भाव नंतर 12 हजारांपर्यंत खाली स्थिरावले आहेत. जिल्ह्यातील इतर बाजारातही सरासरी 11 हजारांच्या वर खरेदी सुरू आहे. सरकारी हमी भावाच्या (एमएसपी) दुपटीला भाव भिडले आहेत. हरियाना आणि पंजाबनंतर गुजरातमध्येही नवीन कापसाची आवक कमी असून 12 हजार रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. देशातील कापूस बाजाराची स्थिती पाहता यंदा शेवटपर्यंत कापूस दर तेजीतच राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
सरकार, कंपन्या संघटनांचे दिशाभूल करणारे दावे
यंदाच्या खरीप कापूस पेरणी आणि उत्पादनाबाबत सरकारी पातळीवरील अनुमान तसेच कंपन्या व काही संघटनांचे अवास्तव दावेही शेतकरी संघटना, कृषी तज्ज्ञ आणि कमोडिटी बाजारालाही मान्य नाहीत. यंदा एकूणच सर्व पिकांची पेरणी खालावलेली असून सहा वर्षातील अन्न धान्य उत्पादन घटण्याची शक्यता आहे. असे असताना, पंजाबातील काही संघटनांनी अधिक कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज वर्तविला आहे. प्रत्यक्षात, गुलाबी अळी, बोंड अळी यांच्या हल्ल्यामुळे, चांगला भाव मिळूनही अनेक शेतकऱ्यांनी कपाशी पीक टाळले आहे. त्यातच देशातील अनेक भागात पावसाचा असमतोल अर्थात कुठे अधिक पाऊस तर कुठे पावसाचा मोठा खंड तर काही भागात पावसाची मोठी तूट याशिवाय गुलाबी बोंड अळी व इतरही विविध कीड, रोगांमुळे कापसाच्या उत्पादनात घट होण्याची संभावनाच अधिक आहे. त्यातच कापूसपट्ट्यात बहुतांश भागात यंदा पावसाळा सुमारे महिनाभर उशिरा सुरू झाल्याने त्याचाही उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
वस्त्र उद्योजक कंपन्यांच्या मागणीवरून व्यवहार बंद
एमसीएक्सवरील कापसाचे फ्युचर ट्रेडिंग व वायदा दर व्यवहार बंद करावेत, अशी मागणी वस्त्र उद्योजक कंपन्यांनी केंद्र शासनाकडे निवेदनाद्वारे केली होती. वायदे बाजारात (एमसीएक्स) कापसाचे व्यवहार सुरू केल्यापासून देशातील कापसाच्या भावात अनिश्चित तेही आल्याचे कंपन्यांनी निवेदनात म्हटले होते. कापसाचे दर दररोज खाली-वर होऊ लागल्याने देशातील उत्पादन, मागणी व पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचे टेक्सटाइल कंपन्यांचे म्हणणे होते.
महिनाभरातील व्यवहाराचा आढावा घेऊन पुढील निर्णय
कंपन्यांच्या निवेदनानंतर, केंद्र सरकारच्या निर्देशांवरून शेअर बाजार नियमाक संस्था सेबीने (भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड) बैठक घेतली. भारतीय कापूस महासंघ, वस्त्रोद्योग मंत्रालय, कमोडिटी एक्स्चेंज, टेक्सटाइल कंपन्या यांच्यासह विविध व्यापार-उद्योग संस्था, भागधारक प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. त्यात वायदे बाजारातील कापूस व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. सेबीकडून आता महिनाभरातील व्यवहाराचा आढावा घेऊन याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
महा ऊसनोंदणी MahaUs Nondani | व्वा, आता आपल्या शेतातूनच थेट करा ऊसाची नोंदणी, साखर आयुक्तालयाचे 1 नंबर ॲप
काय आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना? ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती !
Comments 2