पुणे : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) शुक्रवार, 2 सप्टेंबर रोजीही राज्यात पावसाचे भाकीत केले आहे. त्यानुसार, विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातली 10 जिल्ह्यांत आयएमडीने यलो ॲलर्ट जारी केला आहे. दरम्यान, गणरायांच्या मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.
शिर्डीत 1969 नंतर 53 वर्षांतील सर्वाधिक पाऊस
राज्यात बऱ्याच ठिकाणी काल, 1 सप्टेंबर रोजी पावसाचा जबरदस्त रुद्रावतार पाहायला मिळाला. औरंगाबाद शहर व परिसर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी तसेच पुणे जिल्ह्यात जुन्नर, नारायणगाव येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. दुष्काळग्रस्त सांगलीलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. सोलापूरला पावसाचा तडाखा बसला. शिर्डीत तर गेल्या 53 वर्षांतील सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला. तिथे अवघ्या अडीच तासांत तब्बल 5 इंच म्हणजे 127 मिमी पाऊस झाला. यापूर्वी सप्टेंबर 1969 मध्येच असा पाऊस झाल्याची माहिती राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली. दोन दिवसांपूर्वीच कोपरगावातही अवघ्या तासाभरात 3 इंच पाऊस झाला होता. काल औरंगाबाद शहरातही तासाभरात 3 इंचाहून अधिक पाऊस झाला.
स्थानिक बाष्प, तापमानाच्या परिणामाने सध्याचा पाऊस
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणातील आर्द्रता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सध्या महाराष्ट्रात ताशी 30-40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे, सध्याचा पाऊस स्थानिक बाष्प आणि तापमानाचा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्वांचल आणि चेन्नईमध्येही 2 दिवस पावसाचा जोर राहील. सप्टेंबरच्या मध्यानंतरच देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल, असेही आयएमडीने म्हटले आहे.
मान्सूनची ट्रफ लाइन हिमालयात
सध्या मान्सूनची ट्रफ लाइन हिमालयातून जात आहे. त्यामुळे उत्तर भारतातही पावसाची पूर्ण शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि पूर्वेकडील राज्यात अनेक ठिकाणी यलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. परिसरात 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात तर काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
काही जण देतात पुराणातील दाखले
जुन्या पिढीतील काही जाणकारांच्या मते, गणपतीचे मस्तक हे ऐरावताचे आहे. ऐरावत हे इंद्राचे वाहन आहे. ऐरावताला पावसाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच गणपतीच्या आगमनासोबत पाऊस येतोच येतो, असे अनेक वर्षातील अनुभवाचे दाखले देऊन बुजुर्ग मंडळी छाती ठोकापणे सांगते. अर्थात, वैज्ञानिक कसोटीवर त्याला निश्चित हवामानशास्त्रीय कारण काय असू शकेल, ते ही मंडळी सांगू शकत नाही.
या जिल्ह्यांत आज यलो ॲलर्ट
1. नाशिक
2. अहमदनगर
3. पुणे
4. सातारा
5 सोलापूर
6. सांगली
7. कोल्हापूर
8. सिंधुदुर्ग
9. रत्नागिरी
10. रायगड
याशिवाय, औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
खरीप पिकांना दिलासा: काही ठिकाणी मात्र नुकसान
राज्यातील काही भागात, विशेषत: मराठवाड्यात गेले तीन आठवडे पाऊस रुसलेेला होता. त्या भागात आताच्या पावसाने खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या कापूस, सोयाबिनसारख्या पिकांना फटका बसू शकतो. पावसाच्या विश्रांतीने मराठवाड्यात सोयाबीन पिकाला शेवटच्या क्षणी शेंगा भरण्याच्या स्थितीमध्येच फटका बसला आहे. सोयाबीनचा पाचोळा झाला आहे. सरकारने ओला आणि आताच्या कोरड्या दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान द्यावे, पीक विम्याच्या माध्यमातून उभारी द्यावी, अशी मागणी होत आहे.
परतीचा पाऊस महाराष्ट्राला देणार दणका
सप्टेंबरमध्ये शेवटच्या टप्प्यात राज्याच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या कालावधीत संपूर्ण देशभरात सरासरीच्या तुलनेत 109 टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा आदी जिल्ह्यांत या महिन्यात अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस, सांगली कोरडेच
1 जून ते 31 ऑगस्टपर्यंत राज्यात सांगली जिल्हा वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात सरासरीपेक्षा 18 टक्के अधिक पाऊस झाला आहे. नाशिक आणि वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या 53 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यानंतर नांदेडमध्ये सरासरीच्या 50 टक्के अधिक तर नागपुरात सरासरीच्या 47 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपुरात सरासरीच्या 30 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुणे आणि पालघरमध्येही सरासरीच्या 30 टक्के अधिक पाऊस बरसला आहे. मुंबई शहरात मात्र सरासरीच्या 15 टक्के कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे.
अंबोली घाटात झाला सर्वाधिक पाऊस
1 जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत सह्याद्री घाटात सर्वाधिक 652 सेंटीमीटर पाऊस आंबोली घाटात नोंदविला गेला. देशभरातही सप्टेंबरमध्ये महिन्याच्या सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. देशभरातही सप्टेंबरमध्ये सरासरी 168 मिमी पाऊस होतो.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Monsoon Update … बाप्पांच्या स्वागताला वरुणराजाची हजेरी, राज्यात आजपासून तीन दिवस पुन्हा पावसाचे!
आयएमडीने जारी केले हवामानाविषयी शेतकरी बुलेटिन; 26 ऑगस्टपर्यंत कशी असेल राज्यातील पावसाची स्थिती…
Comments 1