जेरुसलेम : इस्त्रायली संशोधक हिब्रू विद्यापीठात शेतकऱ्यांसाठी व्यावसायिक पीक म्हणून व्हिंटेज टेफ बियाणे विकसित करत आहेत. त्यामुळे पारंपरिक इथिओपियन सुपरफूड टेफ आता जगभर जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. अमेरिकी क्विनोआसारखेच उपयुक्त पोषणमूल्य असलेले असे हे सुपरफूड टेफ आहे. टेफ हे लाखो इथिओपियन लोकांसाठी मुख्य अन्न आहे.
(teff – the staple food for millions of Ethiopians & quinoa like superfood)
क्विनोआसारखेच उपयुक्त पोषणमूल्य असलेले सुपरफूड टेफ
सुपरफूड टेफ हे ग्लूटेन-मुक्त आहे. अमीनो ऍसिड, प्रथिने, फायबर आणि खनिजांनी ते समृद्ध आहे. ते कठोर परिस्थितीत आणि दुष्काळ-प्रवण हवामानात वाढू शकते. त्यामुळेच इस्त्रायली संशोधकांचे प्रयत्न यशस्वी झाल्यास भारतात सुपरफूड टेफ लागवड आणि व्यावसायिक उत्पादन शक्य होऊ शकेल. आताही भारतात इथिओपियन वाणाची लागवड होऊ शकते; मात्र उत्पादनक्षमता तशी कमी राहू शकते.
सर्वात शक्तिशाली, पौष्टिक सुपरफूड
सध्या जगभरात उपयुक्त पोषणमूल्य असलेली सुपरफूड शोधली जात आहेत. टेफ हे अशाच सुपरफूड्सपैकी एक आहे, जे जगभरातील फिटनेस प्रेमींना आकर्षित करत आहे. क्विनोआ, बाजरी, फारो यासह बरीच प्राचीन धान्ये अलीकडे वनस्पती-आधारित प्रथिने, फायबर, खनिजे आणि हळूहळू पचणारे कर्बोदकांचे उत्कृष्ट स्रोत म्हणून चर्चेत आहेत. परंतु या धान्यांपैकी हे सर्वात लहान आणि सर्वात न ऐकलेले धान्य आहे, जे सर्वात शक्तिशाली, पौष्टिक आहे. पोषणमूल्याशिवाय टेफमध्ये किंचित दाणेदार पोत असतो, जसा रव्यात रवेदारपणा असतो तसाच. कोणत्याही रेसिपीमध्ये त्यामुळे उत्कृष्ट क्रंच निर्माण होतो.
इथिओपियन धावपटू, ऍथलीट्सच्या यशाचे रहस्य
इथिओपियन धावपटू आणि ऍथलीट्सच्या जगभरातील सर्वोत्तम कामगिरीचे रहस्य टेफच आहे. ते आता जगासमोर आले आहे. गहू, मका, बार्ली आणि ज्वारी यांसारख्या संपूर्ण धान्याचे पीठ म्हणून वापरल्या जाणार्या इतर तृणधान्यांच्या तुलनेत टेफ ग्रेनमध्ये लोहाचे प्रमाण आणि इतर खनिजे, जसे की कॅल्शियम, तांबे आणि जस्त देखील जास्त असते.अलीकडील अभ्यासानुसार, टेफ हे पॉलीफेनॉलसह बायोॲक्टिव्ह यौगिकांचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे, विशेषत: फ्लेव्होनॉइड डेरिव्हेटिव्हमध्ये खूप समृद्ध आहे, जे इतर सामान्य धान्यांमध्ये दुर्मिळ आहे.
इथिओपियन सुपरफूड टेफ जगभरात होतेय लोकप्रिय
अलीकडे, उत्कृष्ट पौष्टिक गुणधर्मांमुळे जागतिक लोकप्रियता मिळवणाऱ्या सुपरफूड ग्रेनमध्ये रस वाढत आहे. सुपरफूड टेफ सुद्धा आता जगभरात लोकप्रिय होत आहे. प्रथिने आणि इतर खनिजांमध्ये अपवादात्मकपणे आढळणारी उच्च मूल्य सुपरफूड टेफ मध्ये आढळून येतात. त्यामुळे ते हळूहळू जगाच्या आहारात क्विनोआचे स्थान घेत आहे. टेफचे खाद्यपदार्थ फायबरने समृद्ध असतात. टेफमध्ये उच्च प्रथिनांचे प्रमाण, उत्कृष्ट संतुलन आणि आवश्यक अमीनो ऍसिडचा संपूर्ण संच आहे, ज्यामुळे शरीरात प्रतिकारशक्ती व सहनशक्ती निर्माण करणारे अन्न म्हणून त्याला दर्जा मिळालाय. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड्ससह जगातील अनेक भागांमध्ये आता त्याची लागवड सुरू झाली आहे, तर इस्राईलमध्ये अधिक उत्पादनक्षम वाण विकसित करणारे संशोधन सुरू आहे.
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👇🏻
इथिओपियन लोकांचे मुख्य अन्न
साधारणतः आपल्याकडील नागली, राजगिरा किंवा खसखससारखेच सुपरफूड टेफ हेही धान्य असते. गव्हाच्या दाण्याच्या शंभराव्या भागाइतके म्हणजे रवा किंवा राईसारखे ते बारीक असते. गेली 3,000 वर्षे हे इथिओपियन लोकांचे पारंपरिक मुख्य अन्न आहे. त्यापासून आपल्याकडे रोटी किंवा भाकरी असते तसे ते लोक इंजेरा बनवतात. घावण किंवा डोसा सारखाच हा आंबवलेला फ्लॅटब्रेड किंवा पॅनकेक असतो. आता या टेफचे वर्णन अमेरिकी क्विनोआ सारखेच नवीन सुपरफूड म्हणून केला जात आहे.
जगातील 95 टक्के टेफ इथिओपियात
जगातील 95 टक्के टेफ इथिओपियामध्ये घेतले जाते. त्यातील फारच कमी निर्यातीसाठी उपलब्ध आहे. देशांतर्गत उपलब्धता राहावी म्हणून इथिओपियन सरकारने 2006 आणि 2015 दरम्यान टेफच्या सर्व विदेशी विक्रीवर बंदी घातली होती. आताही देशांतर्गत स्थिती पाहून वेळोवेळी निर्यात निर्बंध लादले जातात. सध्या होणारी अल्प निर्यात ही मुख्यतः अमेरिका आणि युरोपात आहे.
हिब्रू विद्यापीठात सुरू आहे संशोधन
आफ्रिकेतील भूमध्यसागरात उगवणारे टेफ हे पारंपरिक पीक हे बाहेरील जगाच्या शेतीसाठी सोपे नाही. परंतु जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठात त्यासाठी नवीन वाण विकसित करण्याबाबत संशोधन सुरू आहे. प्रोफेसर शुकी येहोशुआ स्रनागा यांच्याकडे त्याची सूत्रे आहेत. आधुनिक, यांत्रिक व्यावसायिक लागवडीसाठी सर्वात योग्य अशी शेकडो जातींपैकी एक जात ओळखून ती विकसित करणे, हे मोठे आव्हान आहे, असे ते सांगतात. प्रोफेसर स्रनागा आणि त्यांची टीम इस्रायलमध्ये टेफला व्यावसायिक पीक म्हणून विकसित करण्यासाठी, ग्राहकांना ग्लूटेन मुक्त पर्याय प्रदान करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. गरीब, कष्टकरी इथिओपियन शेतकरी समुदायाला त्यांच्या पारंपारिक मुख्य धान्याचा स्थिर आणि वाजवी दर मिळावा, यासाठीही हे संशोधन उपयुक्त आहे.
उपयुक्त पोषणमूल्य तरीही “अनाथ पीक”
नव्या संशोधनाचा उद्देश केवळ इस्रायलमधील शेतात टेफ बियाणे पेरणे आणि सर्वोत्तम उत्पादनची आशा करणे, असा नाही. सुपरफूड टेफ उत्कृष्ट पोषणमूल्य असूनही “अनाथ पीक” म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचा व्यापार होत नाही. त्यामुळेच गहू, मका, तांदूळ, बार्ली आणि ओट्सचे जास्तीत-जास्त उत्पादन मिळवण्यासाठी जसे अफाट संशोधन झाले, तसा विकासाचा फायदा टेफ पिकाला झालेला नाही.
यांत्रिक पेरणीपूरक वाण संशोधन
अरुंद पाने आणि लहान बिया असलेले टेफ इथिओपियामध्ये आजही हाताने पेरले जाते, वाढवले जाते आणि कापणी केली जाते. पेरणीपासून ते मळणीपर्यंत सध्या ते आधुनिक शेतीसाठी योग्य नाही. सिंचन, खते, यांत्रिक कापणी आणि इतर प्रगत तंत्रज्ञानासह त्यापैकी कोणते वाण “आधुनिक” म्हणून विकसित होईल, हे पाहण्यासाठी प्रा. स्रनागा यांनी गेल्या सात वर्षांत शेकडो बियाणांच्या जातींचे परीक्षण केले आहे. असे विकसित वाण इस्रायली शेतीसाठी तसेच इतर पाश्चात्य देशांसाठी अधिक योग्य असेल.
इथिओपियन सरकारकडून बियाणे पुरवठा नाही
इथिओपियन सरकार इस्राईलमशील संशोधनासाठी एकही टेफ बियाणे पुरवणार नाही, म्हणून प्रो स्रनागा यांना 1920च्या दशकात तेथे गोळा केलेल्या आणि जीन बँकांमध्ये गोठवलेल्या बिया वापराव्या लागत आहेत. ते म्हणाले, “आम्ही आंतरराष्ट्रीय संसाधनांमधून मिळवलेल्या टेफच्या पांढऱ्या, काळ्या, तांबड्या अशा 400 वाणांचे स्क्रीनिंग करण्याचे अल्प-मुदतीचे उद्दिष्ट आधीच गाठले आहे, कारण इथिओपियन सरकार देशाबाहेर एकही बीज सोडू देत नाही.” प्रयोगशाळेत अनेक जाती तपासल्यानंतर आता संशोधक लागवड धोरणाचे मूल्यांकन करत आहेत.
इस्त्रायली शेतात उगवले प्रायोगिक पीक
सध्या इस्रायलमध्ये 3,000 ते 5000 ड्युनम जमिनीवर (300 ते 500 हेक्टर) टेफचे प्रायोगिक तत्त्वावर पीक घेतले जात आहे. सध्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी हा आकडा सुमारे 10 पटीने वाढवणे आवश्यक आहे. या मोसमात, इस्राईलमध्ये गोलान हाइट्सपासून, दक्षिण नेगेवमधील किबुट्झ, योवतटापर्यंत शेतात संशोधित बियाण्यांसह प्रायोगिक टेफ पीक उगवले आहे. त्यामुळे ते संपूर्ण इस्रायलमध्ये वाढू शकते, हे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत टेफ चाचण्यांमध्ये सहभागी असलेले शेतकरी ते चारा आणि प्राण्यांचे अन्न म्हणून वाढवत आहेत आणि गायींना ते आवडत आहे. पुढील पाच वर्षांत टेफ हे इस्रायल आणि नंतर जगभर उपलब्ध होईल. नवे संशोधित वाण हे व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ग्लूटेन-मुक्त असेल. इस्राईलमध्ये पिकवलेले टेफ परवडणाऱ्या किमतीत विकले जाईल, अशी आशा आहे.
झुकणाऱ्या झाडांचे मोठे आव्हान
सध्या सर्वात मोठी समस्या म्हणजे टेफ झाडे सरळ वाढण्याऐवजी झुकतात किंवा एका बाजूला कलतात. इथिओपियातील शेतकऱ्यांना याचा फारसा त्रास होत नाही, कारण ते हाताने कापणी करतात. इस्राईलमध्ये मात्र मानवी मजूर नाहीत. वाकलेल्या पिकात सध्या कंबाईन हार्वेस्टर वापरणे अशक्य होते.
प्रो स्रनागा सांगतात, “संपूर्ण भिन्न वातावरणातून असे नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी बराच वेळ लागतो. आहाला ते सारे टप्प्याटप्प्याने करावे लागेल. आमचे उद्दिष्ट हे आहे की, इस्त्रायलमधील नवीन पीक म्हणून टेफचा विकास करणे, नव्या लागवडीने इस्त्राईलमधील परिस्थितीशी जुळवून घेणे. यामुळे शेतकऱ्यांना एक नवे, अधिक नफा मिळवून देणारे नगदी पीक मिळेल, शिवाय त्यातून देशातील पीक रोटेशनमध्ये विविधता आणू शकतील.”
टेफ पीठाचा प्रतिकिलो दर 325₹, ग्लूटेन फ्री 1,382₹!
सुपरफूड टेफ धान्याचे पीठ हे सध्या इस्राईलमध्ये 12 ते 15 शेकेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साडेतीन ते साडेचार अमेरिकी डॉलर्स म्हणजे सरासरी सुमारे 325 रुपये किलो दराने विकले जाते. इस्राईलमध्ये हेल्थ फूड शॉप्समध्ये प्रमाणित ग्लूटेन फ्री उत्पादन म्हणून टेफ खरेदी केल्यास सध्या त्याची प्रति किलो किंमत 60 शेकेल तर आंतरराष्ट्रीय बाजारात 17.30 अमेरिकी डॉलर्स म्हणजे तब्बल 1,382 रुपये इतकी आहे.
इस्राईलमध्ये गव्हाच्या पिठाची किंमत तुलनेने फारच स्वस्त म्हणजे एक ते दोन शेकेल दरम्यान आहे. इस्राईलमध्ये शुद्ध स्टार्चसारखे अनेक पीठ वाटले जातात; परंतु टेफमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे असतात, त्यामुळे ते ब्रेडसाठी योग्य ठरतात. पारंपारिक ग्लूटेन मुक्त सामग्रीसह बनवलेला ब्रेड चवदार लागतो.
सुपरफूड टेफ देते अनेक आरोग्यापूरक फायदे
भारतीय आहार 50% धान्य, तृणधान्यांवर आधारित आहे, जे भारतामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन बी 12ची कमतरता असण्याचे प्रमुख कारण आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सुपरफूड टेफ योग्य पर्याय आहे. टेफ नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहे. विशेषत: सेलिआक रोग असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी, तुलनेने कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर सामग्रीमुळे टेफ हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे धान्य अतिशय परिपूर्ण ठरते. नैसर्गिकरित्या कमी सोडियम असल्याने, हे निरोगी जेवणासाठी योग्य आहे.
मुबलक ब जीवनसत्त्व
टेफ हे ग्लूटेन-मुक्त असून फायबरने समृद्ध आहे. त्याचे इतर हेल्थ बेनिफिट असे –
• आवश्यक अमीनो ऍसिडचे उत्कृष्ट संतुलन आणि संपूर्ण संचासह उच्च प्रथिने सामग्री.
• टेफच्या 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 13.3 ग्रॅम प्रोटीन असते.
• इतर तृणधान्यांच्या तुलनेत लोह सामग्री आणि कॅल्शियम, तांबे आणि जस्त यांसारखी इतर खनिजे जास्त असतात.
• टेफच्या 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये 7.6 मिलीग्राम लोह असते.
• पॉलिफेनॉलसह बायोएक्टिव्ह यौगिकांचा एक महत्त्वपूर्ण स्रोत, विशेषत: फ्लेव्होनॉइड डेरिव्हेटिव्हमध्ये खूप समृद्ध
• टेफच्या 100 ग्रॅम सर्व्हिंगमध्ये अर्धा कप दुधाइतकेच कॅल्शियम असते.
• टेफमध्ये आपल्या दैनंदिन मूल्याच्या 28 टक्के तांबे फक्त एका कपमध्ये असतात.
• टेफ हे बी जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजांचा उच्च स्त्रोत असल्याने, ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
• नैसर्गिकरित्या कमी सोडियम असते.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
Dairy Farming – नव्या पिढीला शेतीशी कनेक्ट करणाऱ्या डेअरी सिस्टर्स अर्थात न्यू यॉर्क फार्म गर्ल्स
नाशिक जिल्ह्यातील उच्चशिक्षित कुटुंब रमलंय आधुनिक शेतीत…दरवर्षी 20 लाखांचे निव्वळ उत्पन्न
Comments 3