पुणे : राज्यातील धरणांत 83 टक्के पाणीसाठा … राज्यात सर्वत्र जुलैमध्ये जोरदार बरसलेला पाऊस ऑगस्टमध्येही आजवर बहुतांश ठिकाणी मुक्कामी आहे. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये आतापर्यंत सरासरी 83 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. राज्यातील 141 मोठ्या प्रकल्पातील सरासरी पाणीसाठा तब्बल 90 टक्क्यांवर पोहोचला आहे…
राज्यात एकूण 3,267 लहान-मोठे धरण प्रकल्प असून त्यातील उपयुक्त पाणी क्षमता सुमारे 1,439.69 टीएमसी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत तब्बल 1174 टीएमसी म्हणजेच सरासरी 83 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. यामुळे राज्यभरात पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटण्यास त्यामुळे मदत झाली आहे.
यंदा राज्यात जून महिन्यात पाऊस रुसलेला होता. नंतर मात्र जुलै महिन्यात तो दमदार कोसळला. त्याने एकाच महिन्यात दोन्ही महिन्यांची सरासरी ओलांडली. एक जून ते 31 जुलै या कालावधीत राज्यात 677.5. मिलिमीटर म्हणजेच 27 टक्के अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली. जुलै महिन्यात सुरु झालेला 25 जुलैनंतर काहीसा ओसरला. मात्र, 4 ऑगस्टपासून राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले. राज्यातील बहुतांश नद्या दुथडी भरून वाहिल्या आणि अनेक ठिकाणी पूरस्थिती होती. त्यामुळे धरणेही पूर्ण क्षमतेने भरली. गेल्या काही दिवसांत उघडीप मिळाल्याने धरणातील पाणीसाठा अंशतः कमी झालेला असला तरी गेल्या वर्षीपेक्षा तुलनेत त्याचे प्रमाण अधिक आहे.
नाशिक विभागातील 571 धरणांत 173 टीएमसी म्हणजे 77.41 टक्के पाणीसाठा आहे. पुणे विभागातील 726 धरणांत 477 टीएमसी म्हणजेच 88 टक्के पाणीसाठा आहे. अमरावती विभागातील 446 धरणांत 118 टीएमसी म्हणजेच 81 टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्यात 964 धरणांत 193 टीएमसी म्हणजेच 74 टक्के पाणीसाठा आहे. तर नागपूर विभागातील 384 धरणांत 83 टक्के पाणीसाठा आहे. कोकणातील 176 धरणात 91 टक्के पाणीसाठा आहे.
राज्यातील धरण प्रकल्पातील साठा
प्रकल्प संख्या टक्के
मोठे प्रकल्प 141 90
मध्यम प्रकल्प 258 78
लघू प्रकल्प 2,868 52
एकूण 3,267 83
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
कृषी वीज वितरण कंपनी : राज्यात लवकरच शेतीसाठी स्वतंत्र वीज पुरवठा करण्याचा महाप्रीतचा प्रस्ताव
आला पोळा कपाशी सांभाळा … पिकांवर का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी, जाणून घ्या अमावस्येचे पीक व्यवस्थापन …