सचिन कावडे, नांदेड
शेतांमध्ये रासायनिक खतांचा अतिवापरा होत असल्याने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. याला सेंद्रिय शेती हा सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे. आपल्या कुटुंबासह इतरांचेही आरोग्य चांगले राहावे, यासाठी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील वासरी गावातील विठ्ठल लष्करे हे गेल्या चार-पाच वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने विशेषतः भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. आपल्या 24 गुंठे शेतातील उत्पादनातून अवघ्या तीनच महिन्यात त्यांनी विशेषतः भाजीपाल्यातून लाखोंचे उत्पन्न घेतल्याने त्यांची शेती इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
नांदेड शहरापासून अवघ्या 12 किलोमीटर वासरी गाव आहे. मुदखेड तालुक्यातील शिकारघाट ते कामळज रस्त्यावरील गोदावरी नदीच्या काठी असलेले हे गाव श्री संत नारायणगिरी महाराज यांचे समाधीस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे. गावाची लोकसंख्या जवळपास साडेतीन हजार असून येथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावाच्या आजूबाजूच्या परिसरात जवळपास पन्नास वीटभट्ट्या आहेत. या गावातील विठ्ठल नारायण लष्करे (32) यांना शालेय जीवनापासूनच शेतीची आवड निर्माण झाली. ते 16 वर्षांचे असताना त्यांनी वडिलांना मदत म्हणून शेतीमध्ये उतरले. श्री. लष्करे हे शैक्षणिकदृष्ट्या नववी उत्तीर्ण असले तरी त्यांना शेतीचा चांगला अनुभव असल्याने त्यांचे शेतीबद्दल असलेले प्रेम आणि ज्ञान पाहता जणू काही ते कृषी पदवीधर आहेत, असेच वाटतात. 2003-04 च्या दरम्यान कृषी विभागाच्या शेतकरी सहलीला जाण्याचा त्यांना योग आला. या सहलीच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील विविध कृषी विद्यापीठांना भेटी दिल्या. या काळातच सेंद्रिय शेतीची माहिती त्यांना मिळाली आणि आपल्या वडिलोपार्जित तीन एकर शेतीमध्ये त्यांनी नवनवीन प्रयोग करण्याचा जणू ध्यास घेतला.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून…🥭
खालील व्हिडिओ पहा..
उसाचे 180 टन उत्पादन
विठ्ठल लष्करे हे शेतीमध्ये पारंपारिक पिकांसोबत ऊस आणि केळी ही पिके घ्यायचे. 2012-13 मध्ये पारंपारिक पिकांतून मिळणारे उत्पन्न कमी होऊ लागले. अशातच अवकाळी पाऊस व गारपिटीने केळीचे मोठे नुकसान झाले होते. याच कालावधीत श्री. लष्करे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊन त्या ठिकाणी सात दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान, होणार्या नुकसान भरपाईला पर्याय म्हणून त्यांनी आपल्या अडीच एकर शेतीमध्ये पाच फुटांवर सरी मारुन दोन डोळा पद्धतीने 3 टन बेण्याची लागवड केली. पूर्वी लागणार्या 9 पैकी 6 टन बेण्याची बचत झाल्यामुळे सेंद्रिय खतांचा संपूर्ण खर्च निघाला. उसाची दोन डोळा पद्धतीने लागवड केल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन एकरी 72 टन तर अडीच एकरमध्ये उसाचे 180 टन उत्पादन त्यांना झाले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात एका टनाला 2 हजार रुपयांचा दर मिळत होता. श्री. लष्करे यांच्या 180 टन उसाचे 3 लाख 60 हजार रुपये मिळाले. मशागत, खत, बेणे, ठिबक सिंचन व औषध फवारणी आदींवर सुमारे 84 हजार रुपयांचा खर्च आला होता. तो वजा जाता त्यांना 2 लाख 76 हजारांचा निव्वळ नफा मिळाला होता.
सेंद्रिय भाजीपाला लागवडीचा निश्चय
श्री. लष्करे यांनी 2018 पासून अडीच एकर उसामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा, पत्ता व फुलकोबीची लागवड केली होती. ज्यामुळे उसावर होणारा खर्च या भाजीपाल्याच्या उत्पादनातून भागवण्यास त्यांना चांगली मदत झाली. पुढे कृषी विभाग व आत्मा यांच्या माध्यमातून गुजरात येथील भास्कर सावे प्राकृतिक कृषी प्रशिक्षण केंद्राला त्यांनी भेट देऊन त्या ठिकाणी सात दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणातून त्यांना खूपच मोलाची माहिती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करुन आपल्या वासरी गावी आल्यानंतर त्यांनी तीन एकरपैकी 24 गुंठे क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करण्याचा निर्णय घेतला. कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, त्यांनी सुरवातीला फुलकोबीची लागवड केली.
पावणे चार लाखांचा निव्वळ नफा
श्री. लष्करे यांनी उत्पादीत केलेली ही फुलकोबी ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने 90 क्विंटल फुलकोबीची 40 ते 50 रुपये किलोदराने विक्री करुन त्यांना जवळपास 4 लाख 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. बियाणे, खते, औषध फवारणी व वाहतूक यासाठी त्यांना 70 ते 75 हजार रुपये खर्च आला होता. तो वगळता विठ्ठल लष्करे यांना 3 लाख 75 हजार रुपयांचा निव्वळ नफा एकट्या कोबीतून झाला.
नऊ हजार रोपांची लागवड
श्री. लष्करे यांनी 24 गुंठ्यात ट्रॅक्टरच्या सहाय्याने पल्टी मारुन दोन महिन्यापर्यंत जमीन तळू दिली. त्यानंतर घरच्या घरीच तयार केलेले 10 टन शेणखत त्यावर शिंपडले. आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर मारुन चार फुटावर बेड पाडून घेतले. सव्वा फूटावर एक ठिंबक संच अंथरला. दोन हजार फुलकोबीच्या बिया असलेले 280 रुपयांचे एक पाकीट याप्रमाणे त्यांनी पाच पाकिटे खरेदी केले. कोकोपीठ ट्रे आणून 25 दिवसात तब्बल नऊ हजार रोपांची त्यांनी निर्मिती केली. या सर्व रोपांची यशस्वी लागवड करुन फुलकोबीच्या उत्पादनावरच लक्ष केंद्रीत केले.
खत व व्यवस्थापन
24 गुंठ्यातील बेडवर झिगझॅक पद्धतीने रोपांची लागवड केल्यानंतर पाच दिवसांनी बुरशीनाशक ट्रायकोडर्माची आळवणी केली. ठिबकद्वारे सुमारे 60 लिटर वर्मीवाश सोडले. साधारणतः 25 दिवसानंतर जैविक व गांडूळ खत एकत्रित करुन कोबीच्या बुडाजवळ टाकले. 27 दिवसानंतर ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक ठिबकद्वारे दिले. यानंतर दोनशे लीटर डीकम्पोझर ठिबकद्वारे सोडले. पुढे 35 दिवसांनी रायझोबियम पीएसबी अझ्याटोबॅक्टर हे जैविक खत ठिबकद्वारे दिले. 40 दिवसानंतर जीवामृताची आळवणी केली. या दरम्यान, बुरशीनाशक, वर्मीवाश, गोकृपामृत, दशपर्णी व लिंबोळी अर्क या मात्रेची सहा वेळा फवारणी केली. जवळपास 50 दिवसानंतर गाईचे 60 लिटर गोमूत्र ठिबकद्वारे दिले तर 60 व्या दिवशी वर्मीवाश दिले.
कोबीचे 90 क्विंटल उत्पादन
लागवडीपासूनच योग्य व्यवस्थापन केल्यानंतर 60 दिवसांनंतर संपूर्ण पीक बहरले होते. त्यानंतर 15 दिवसांनी प्रत्यक्षात फुलकोबीची त्यांनी काढणी सुरु केली. भाजीपाला उत्पादनाच्या या पहिल्याच प्रयत्नात श्री. लष्करे यांना जवळपास 90 क्विंटल कोबीचे उत्पादन झाले. सध्या बाजारात सेंद्रिय भाजीपाला विकत घेण्याकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याने त्यांनी नांदेड शहरातील इतवारा बाजारासह वेगवेगळ्या ठिकाणच्या बाजारात 40 ते 50 रुपये किलोदराने ही फुलकोबी विक्री केली.
तीन महिन्यात लाखोंचे उत्पन्न
केवळ 24 गुंठ्यात घेतलेल्या सेंद्रिय भाजीपाला उत्पादनातून तीन महिन्यात लाखोंचे उत्पन्न होऊ लागल्यामुळे श्री. लष्करे यांचा आत्मविश्वास वाढला. फुलकोबीच्या काढणीनंतर त्यांनी त्याच बेडवर चार बाय तीन अंतरात अर्धा किलो बियाणे टाकून टोकन पद्धतीने भेंडीची लागवड केली. कोबीप्रमाणेच भेंडीचे लागवडीपासून योग्य व्यवस्थापन त्यांनी ठेवले. दोन महिन्यानंतर भेंडी काढण्याला सुरवात केल्यानंतर एक दिवसाआड 80 किलो भेंडी याप्रमाणे तीन महिन्यापर्यंत त्यांना एकूण 3 टन 600 किलो भेंडीचे उत्पादन झाले. उत्पादीत झालेली त्यांची सेंद्रीय भेंडी बाजारात 30 ते 35 रुपये किलोदराने विक्री झाली. 3 टन 600 किलो भेंडीच्या उत्पादनातून 1 लाख 44 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भेंडीचे बियाणे, खते, औषध, फवारणी, मजुरी व वाहतूक असा एकूण खर्च सुमारे 25 हजार झाला. तो वगळता भेंडीतून त्यांना 1 लाख 19 हजारांचा निव्वळ नफा झाला.
मुगासह पुन्हा कोबीचे उत्पादन
2019-20 मध्ये भेंडीच्या काढणीनंतर खरीप हंगामातील जून महिन्यात 3 ते 4 किलो मुगाच्या बियाणांची त्यांनी पेरणी केली. अडीच महिन्यात त्यांनी साडेतीन क्विंटल मुगाचे उत्पादन घेतले. जात्यावर घरगुती पद्धतीने मुगाची दाळ करुन 120 रुपये किलो प्रमाणे साडेतीन क्विंटल दाळीच्या विक्रीतून 42 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. मुगाच्या काढणीनंतर नोव्हेंबर 2021 मध्ये त्याच 24 गुंठ्यात पंजी करुन दहा दिवसानंतर ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटाव्हेटर फिरवले. चार फुटांवर बेड करुन त्यावर ठिबक अंथरुन पुन्हा फुलकोबीच्या 7 हजार 500 रोपांची लागवड त्यांनी केली. जानेवारीच्या पहिल्याच दिवसांपासून फुलकोबी काढायला सुरुवात केली. साधारणतः 28 जानेवारीपर्यंत श्री. लष्करे यांना 35 क्विंटल कोबीचे उत्पादन झाले. नांदेड शहरासह विविध ठिकाणी या कोबीची विक्री करताना एका किलोला 35 ते 40 रुपयाचा भाव मिळाला. 35 क्विंटल कोबीच्या विक्रीतून 1 लाख 40 हजारांचे उत्पन्न मिळाले. अजूनही त्यांची कोबीची काढणी सुरुच असून साधारणतः 50 ते 55 क्विंटल एकूण उत्पादन होईल, अशी विठ्ठल लष्करे यांना अपेक्षा आहे.
गांडूळ खताची निर्मिती
श्री. लष्करे हे शेतीसाठी लागणारे गांडूळ खत स्वतः तयार करतात. गांडूळ खताच्या निर्मितीसाठी त्यांनी 12 फूट लांब, 4 फूट रुंद व 4 फूट उंचीचे चार बेड केले आहेत. एका बेडद्वारे महिन्याकाठी 10 क्विंटल तर चार बेडद्वारे 40 क्विंटल गांडूळ खताची निर्मिती ते करतात. तसेच एका बेडच्या माध्यमातून महिन्याकाठी 20 ते 25 लिटर वर्मीवाश तयार होते.
बायोगॅसमुळे खर्चात बचत
मुदखेड पंचायत समितीच्या मार्फत राष्ट्रीय बायोगॅस योजनेंतंर्गत 7 बाय 10 चा बायोगॅस संच त्यांनी बसवला आहे. घरातील सहा जणांचा संपूर्ण स्वयंपाक त्यावर होत असल्याने गॅस सिलेंडरवर होणार्या खर्चात मोठी बचत झाली आहे.
कुटुंबातील सदस्यांची मदत
विठ्ठल लष्करे यांच्या कुटुंबात आई- वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असे सहा सदस्य आहेत. शेतीकामात वडील, आई व पत्नी यांची मोठी मदत होते. श्री. लष्करे हे सुरवातीपासूनच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यासाठी त्यांना कृषी विभागाच्या आत्माची चांगली मदत होत आहे. या अनुभवाच्या बळावर ते आता नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी होणार्या शेती कार्यशाळेत शेतकर्यांना मार्गदर्शन करीत असतात. श्री. लष्करे यांना कृषी विभागाचे तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. गिते यांच्यासह तालुका कृषी विभागाचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
वासरी येथील विठ्ठल लष्करे यांनी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्माच्या माध्यमातून हैदराबाद व गुजरात येथे होणार्या सेंद्रिय शेतीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन त्यांनी आपल्या 24 गुंठ्यात फुलकोबी सेंद्रिय पद्धतीने घेण्यास सुरुवात केली. वर्मीवाश, गांडूळ खत व जैविक खतांचा चांगला उपयोग करून कमी खर्चात चांगले उत्पादन ते घेत आहेत. यातून त्यांना अधिकचा भाव मिळत आहे. त्यांनी गावात अन्य शेतकर्यांना सोबत घेऊन सेंद्रिय शेतकरी गट देखील निर्माण केला आहे.
– विकास गित्ते, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, मुदखेड
(जि. नांदेड) मोबाईल : 7841964596
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
मागील आठ ते नऊ वर्षांपूर्वी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार, आज भाजीपालाच नव्हे तर सर्व पिके सेंद्रिय पद्धतीने घेत आहे. प्रत्येक शेतकर्याने आपल्या शेतामधील काही भागात सेंद्रिय पद्धतीने पिकांच्या लागवडीसाठी ठेवावा. त्याचे निश्चितच चांगले परिणाम दिसून येतील. हळूहळू संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर द्यावा. जैविकरित्या किड व्यवस्थापन करावे, सध्या काही वर्षांपासून कृषी विभागाच्या शेतकरी कार्यशाळेत जिल्ह्यातील शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी मार्गदर्शन करीत आहे.
– विठ्ठल लष्करे, वासरी (ता. मुदखेड, जि. नांदेड)
मोबाईल : 9511267316