धुळे प्रतिनिधी- भूषण वडनेरे
वडिलोपार्जीत केवळ तीन एकर शेती…शेतीतून हवे तसे उत्पन्न येत नसल्यामुळे तू उच्च शिक्षण घेऊन नोकरी कर, असा घरच्यांचा आग्रह…पण मला शेती करण्याची मनापासून आवड असल्यामुळे नोकरीच्या मागे न धावता शेतीत लक्ष घातले..शेतीपूरक उद्योग सुरु करण्यासाठी धुळे येथील कृषि विज्ञानं केंद्रातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले… त्यानंतर स्वताची कंपनी सुरु केली… त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या निर्मितीसह संशोधनही सुरु केले…कंपनीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाला…आज या कंपनीची यशस्वी वाटचाल सुरु असून वार्षिक 50 लाखांची उलाढाल होत आहे, सांगताहेत समाधान विजय बागुल (रा.अंतुर्ली, ता.शिरपुर जि.धुळे).
धुळे जिल्ह्यात शिरपुर तालुक्यातील अंतुर्ली या गावी समाधान बागुल (28) या तरुणाची वडिलोपार्जीत 3 एकर शेती होती. शेतात पारंपरिक पिक घेतले जाई. परंतु, शेतात सर्वजण राबुनही हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मुलाने उच्च शिक्षण घेऊन नोकरी करावी, अशी समाधान यांच्या घरच्यांची इच्छा होती. त्यामुळे समाधान यांनी 2011 मध्ये डी.एड् केले. सोबत शेतीचेही काम सुरु केले. त्यानंतर एग्रीकल्चर डिप्लोमा केला. घरच्यांच्या इच्छेनुसार नोकरीसाठी अर्ज भरणे सुरु केले. पण समाधान यांचा कल नोकरीपेक्षा शेतीकडेच अधिक होता. काळी आई आपल्याला खुणावत आहे, हे पाहून समाधान यांनी शेतीकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. शेतीतील आणखी बरकावे माहित व्हावे व नविन काहीतरी करता यावे, यासाठी समाधान यांनी लोणखेड़ा कॉलेजमध्ये यशवंतराव चव्हान मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी.एस्सी अग्रि. ला प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी नोकरीसाठी अर्ज वैगरे करणे बंद केले आणि स्वताला पुर्णवेळ शेतीत झोकून दिले. त्यातही सेंद्रिय शेतीवर भर दिला.
भूमिपुत्र गटाची स्थापना!
समाधान यांनी आपल्या तीन एकर शेतीत सेंद्रिय शेतीचे प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मात्र परिश्रम आणि नविन प्रयोग रबविन्यावर भर दिला. त्यातूनच इतर शेतकऱ्यांना देखील सेंद्रिय शेतीकडे वळवत सन 2013 मध्ये गावात भूमिपुत्र हा शेतकरी गट स्थापन केला. याच कालावधीत उत्पादकता वाढल्यामुळे आर्थिक स्तर देखील उंचावला. यातून नव्याने 3 एकर शेती खरेदी केली. या कालावधीत शेतात कोणतीच रासायनिक खते किंवा फवारणी औषध वापरत असल्यामुळे किड नियंत्रणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबबित राहिले.
प्रशिक्षण ठरले टर्निंग पॉइंट!
सेंद्रिय शेतीत नवनवीन प्रयोग सुरु असतांनाच काहीतरी वेगळे करण्याचे स्वप्न समाधान यांना स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे त्यांनी पूरक उद्योगासाठी नवनवीन माहिती मिळविणे सुरु केले. दरम्यान, त्यांना कृषी केंद्रातील प्रशिक्षणाची माहिती मिळाली आणि 2015 मध्ये त्यांनी तांत्रिक प्रशिक्षण घेतले. याठिकाणी केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ.दिनेश नान्द्रे आणि शास्रज्ञ डॉ.पंकज पाटील यांच्याकडे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतल्यानंतर समाधान बागुल यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
कंपनीची स्थापना!
कृषि विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतल्यानंतर समाधान बागुल यांनी सन 2017 मध्ये कृषिरत्न प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. त्यातून सेंद्रिय शेतीसाठी लागणारे गांढुळ ख़त, दशपर्णी अर्क, निबोळी अर्क, निंबोळी पावडर तसेच येलो ट्रैप्, ब्लू ट्रैप, प्रकाश सापळा (लाइट ट्रैप), मधमाशा पेट्या, पिवळे चिकट सापळे इ. चे उत्पादन करणे सुरु केले. शिवाय संशोधनावरही भर दिला आहे. आज या कंपनीत दहा तरुण काम करत असून त्यांना या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. हे सर्व तरुण शेतिविषयक पदवी प्राप्त केलेले आहेत. या कंपनीचे 500 शेतकरी सभासद आहेत. कंपनीमार्फ़त त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. शिवाय कंपनीचा माल खान्देशातील धुळे, जळगाव व नंदुरबार येथील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविला जातो.
सापळ्याचे मिळवले पेटंट!
विशेष म्हणजे समाधान यांच्या कंपनीने वजनाने हलक्या अशा सोलर सापळ्यांचा शोध लावला आहे. सोलरवर काम करणाऱ्या या सापळ्यात शत्रु किटकांचा नाश होण्यास मदत होते. पांढरी माशी, तुड़तूड़े, फुलकिडे, करड़ा ढेकुन या सारख्या रस शोषक आकर्षित होतात. कापूस, टोमॅटो, कांदा, भुईमुगासह सर्व प्रकारच्या पिकांमध्ये हे सापळे फायदेशीर ठरतात. सौर उर्जेवर चालणारे हे उपकरण चिकट सापळा, कामगंध साप प्रकाश सापळा यांचे काम करते. या संशोधनाचे कंपनीने पेटंटही मिळवले आहे. शिवाय आता सोलरवर चालणाऱ्या प्रकाश सपळयाच्या पेटंटसाठीही अर्ज केला आहे. यामुळे कमी खर्चात व विजेशिवाय किटकांचा नाश करणे शक्य झाले आहे.
शेतीपुरक सहित्याची निर्मिती!
समाधान यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. यात रसशोषक किटकांना आकर्षित करणारा कॉम्बो पेस्ट ट्रैप, कडूनिंबापासून तयार केलेले निम्बोली अर्क, गांढूळ ख़त, अत्याधुनिक कीटकरोधक असे पिवळे चिकट सापळे, पिकांची रोगप्रतिकारक शक्ति वाढविणारे गांढुळ पाणी, अपायकारक बूरशीची वाढ नियंत्रणात ठेवणारे ट्रायकोडर्मा, फूलकिड्यांच्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे, सगळ्या प्रकारच्या कीड़ी पहिल्या अवस्थेतील अळया नियंत्रित करण्यासाठी दशपर्णी अर्क इ. शेतीपुरक साहित्याची निर्मिती या कंपनीत केली जाते. विशेष म्हणजे कंपनीचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना ही उत्पादने वाजवी दरात उपलब्ध केलि जातात. शिवाय वापरण्याबाबत मार्गदर्शनही केले जाते.
50 लाखांची उलाढाल!
समाधान यांनी प्रशिक्षणाच्या जोरावर कंपनी सुरु केल्यामुळे अनेकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. कंपनीत समाधान यांच्या बरोबरीचे 10 तरुण उत्पादनांच्या निर्मितीसह संशोधन करीत आहेत. आज या कंपनीसोबत सुमारे 500 शेतकरी जोडले गेले आहेत. यात धुळे जिल्ह्यासह नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना वाजवी दरात उत्पादनानांचा पुरवठा केला जातो. आज या कंपनीची वार्षिक उलाढाल 50 लाखपर्यंत गेली आहे. शिवाय शेतीतून मिळणारे उत्पन्न वेगळे. शेतीकामाची मनापासून आवड असल्यामूळेच हे सर्व शक्य झाल्याचे समाधान बागूल हे अभिमनाने सांगतात.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन!
समाधान यांनी सुरुवतिपासूनच सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे. शिवाय परिसरातील शेतकऱ्यांनाही ते वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. सेंद्रिय शेतीचे फायदे ते समजावून सांगतात. याचा परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होत आहे. त्यांच्या कंपनीचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांनाही ते मार्गदर्शन करत असतात. समाधान यांनी स्व:ता आपल्या शेतात सेंद्रिय केळी व पपईची लागवड केली आहे. यात 6 एकरपैकी 1.5 एकर मध्ये केळी, 4 एकरमध्ये पपई तर उर्वरीत जागेत जनवरांसाठी चाऱ्याची लागवड केली आहे. समाधान यांनी शेतीत आपले कर्तुत्व सिद्ध केल्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाचीही त्यांना साथ मिळत आहे. परिणामी, शेतीतूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
ठरवुनच शेतीकडे वळलो!
शेतीची आवड असल्यामुळे मी ठरवूनच शेतीकडे वळलो. धुळ्यातील कृषि विज्ञान केंद्रात घेतलेल्या प्रशिक्षणाचा मला खुप फायदा झाला. आज माझ्या कंपनीची वार्षिक 50 लाखांची उलाढाल होत आहे. ग्रामीण बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा माझा उद्देश् आहे. पण आजचे तरुण शेती करण्यापेक्षा 2-4 हजाराची नोकरी करण्यात धन्यता मानतात. तरुणांना एकच सांगेन, की कोणतेही काम मनापासून केल्यास यश आपल्याच हातात असते.
-समाधान बागुल
शेतकरी, अंतुर्ली ता.शिरपुर जि.धुळे
एका परीवाराला मिळाला रोजगार!
समाधान बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेड़ा तालुक्यातील चूडाने येथे संजय कोळी यांनी ट्रायकोडर्माचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. कृषिरत्न कंपनीचाच एक भाग म्हणून हे उत्पादन घेण्यात येते. या माध्यमातून संजय कोळी यांच्या परीवाराला सक्षम रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील तरुणांना कृषी आधारित रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कृषि विज्ञान केंद्रातर्फे रोजगरक्षम प्रशिक्षण देण्यात येते. त्याअंतर्गत समाधान बागुल यांनी प्रशिक्षण घेऊन इतर तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल असा व्यवसाय उभारला आहे. यामुळे इतर तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
-डॉ.पंकज पाटील
शास्रज्ञ, कृषि विज्ञान केन्द्र, धुळे