सचिन कावडे, नांदेड :-
मराठवाडा-विदर्भातील शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करुन पूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव पौळ हे पायाला भिंगरी बांधल्यासारखे वेगवेगळ्या जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन शेतकर्यांना मार्गदर्शन करत आहेत. तर सेंद्रिय शेतीकडे वळणार्या प्रत्येक शेतकर्याला पौळ यांच्याकडून पहिल्यांदा 2 किलो गांडूळबीज मोफत वाटप करण्यात येत आहे. यामुळे सेंद्रिय शेतीच्या वाढीला एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे.
गांडूळ खत निर्मितीसाठी 10 बेडपासून सुरुवात
हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील बळवंतराव पौळ (48) यांना वयाच्या 16 व्या वर्षापासून शेती व्यवसायाचा छंद होता. त्यांची वडिलोपार्जित 15 एकर शेती असताना त्यांनी शेतीतून मिळविलेल्या उत्पन्नातून पुन्हा 8 एकर शेती नव्याने विकत घेतली. अशा एकूण 23 एकर शेतीत सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सुरुवात करुन सन 2009 पासून रासायनिक शेती पूर्णतः बंद केली.
दरम्यान, 2009 मध्ये 30 बाय 30 च्या जागेवर शेड उभारुन 10 बेडवर गांडूळखत निर्मिती करण्यास सुरुवात केली. कोल्हापूर येथून 10 बेड (खतासाठी) त्यांनी मागवले. एका बेडची उंची 2 फुट असून लांबी 12 फुट तर रुंदी 4 फुटापर्यंत असते. या बेडमध्ये अर्धाफूट कचरा, अर्धाफूट शेणखत अशा प्रकारे 4 थर पाणी मारत मारत भरण्यात येतात. 4 दिवसानंतर थंड झाल्यानंतर गांडूळ बीज एका बेडला 3 किलो याप्रमाणे 10 बेडला एकूण 30 किलो टाकण्यात आले होते. एका बेडमधून जवळपास 1 टन गांडूळखत निघते.
एका वर्षात चारवेळा गांडूळखताची निर्मिती
सेंद्रिय शेतीला अधिक चालना मिळावी, यासाठी पौळ यांनी 10 बेडपासून सुरु केलेला खत निर्मितीचा व्यवसाय सन 2012 पर्यंत 40 बेडवर पोहचला आहे. गांडूळखत निर्मितीसाठी प्रत्येक बेडमध्ये कुटार, चारा, शेण गोमुत्रामध्ये घुसळून थरावर थर दिला जातो. पंधरा दिवस पाणी शिंपडून त्यातील उष्णता काढली जाते. प्रत्येक बेडमध्ये 2 किलो गांडूळ सोडली जातात. सेंद्रिय घटक लवकर कुजण्यासाठी 3 ते 4 किलो गुळ अधिक दोन लिटर दही, 3 किलो हरभरा पीठ व 25 ते 30 लिटर पाणी असलेले द्रव बेडवर नियमित शिंपडले जाते. तीन महिन्याला एक बेडमधून जवळपास 1 टन गांडूळखताची निर्मिती करण्यात येते. 40 बेडमधून वर्षाकाठी 40 टन खताच्या निर्मितीपैकी 20 टन खताचा वापर घरी केला जातो. तर उर्वरित 20 टना खताची 40 किलो प्रमाणे एक बॅग तयार करुन 600 रुपये दराने विक्री केली जाते.
घरच्यांचा विरोध; आता कौतुक
2009 मध्ये शेतीत रासायनिक खतांचा पूर्णतः वापर बंद करुन सेंद्रिय शेतीकडे वळायचे, असा निश्चय केल्यानंतर बळवंतरावांना सुरुवातीला घरच्यांनीच विरोध केला. त्यांचे वडील देवराव पौळ हे जिल्हा मध्यवर्ती बँकेतून मॅनेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी देखील पण सेंद्रिय शेतीला खूप मेहनत आहे, तुझ्याने मेहनत होणार नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान करु नकोस, रासायनिक पद्धतीनेच आपली शेती बरी असे सांगून त्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्यास विरोध केला होता. परंतु बळवंतरावांनी सेंद्रिय शेती करण्याचा दृढनिश्चय केला होता. आज गांडूळखत निर्मितीसह 23 एकर शेतीही सेंद्रिय पद्धतीने ते करतात. सुरुवातीच्या काळात विरोध करणारे त्यांचे कुटुंब आता कौतुक करत आहेत.
जिल्हाधिकारी, साईओंसह कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी
हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथील गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाने मराठवाड्यासह विदर्भातही डंका वाजविला आहे. या प्रकल्पाला तत्कालीन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी तुकाराम मोटे व कृषी क्षेत्रातील तज्ञांनी भेटी देऊन गांडूळखत निर्मितीच्या प्रक्रियेचे कौतुक केले होते. तसेच जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन गांडूळखत निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेऊन पौळ यांचे कौतुक केले.
गोमुत्र संकलनासाठी गोठा
गांडूळखत निर्मितीसाठी लागणारे जीवामृत तयार करण्यासाठी खुप मेहनत लागते तर गाईचे गोमुत्र धरण्यासाठी पौळ हे बाटलीचा वापर करीत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी एमआरजीएस योजनेतून गोठा बांधून देण्याचे आदेश दिले. या योजनेतून 12 बाय 20 चा गोठा 77 हजार रुपये खर्च करून बांधून देण्यात आला. सुरुवातीला पौळ यांच्याकडे 17-18 गायी होत्या. सद्यःस्थितीत 5 गायी व 2 बैल त्यांच्याकडे आहेत. गोठ्यामध्ये गोमुत्र संकलनासाठी गोठ्याच्या एका बाजूला हौद तयार करण्यात आला असून त्यात गोमुत्र जमा होते. पंचायत समितीकडून त्यांना बायोगॅस देखील बसवून देण्यात आला आहे. ज्यामुळे 6 ते 7 जणांचा स्वयंपाक त्यावरच होत असल्यामुळे पौळ यांनी गॅस सिलेंडरचा चक्क वापरच बंद केला आहे.
बनचिंचोलीचे 25 शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले
रासायनिक खतांमुळे जमीन खराब होते. अशा जमिनीत घेतल्या जाणार्या पालेभाज्या व अन्नधान्याच्या सेवनाने भविष्यात कॅन्सरसाख्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बिनविषारी शेतीमालासाठी आपण सेंद्रिय शेतीकडे वळालो पाहिजे, असा निश्चय करून बळवंतराव पौळ यांनी 2009 पासून केला व संपूर्ण 23 एकर शेती सेंद्रिय पद्धतीने करण्यास सुरुवात केली. पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली बनचिंचोली येथील 20 ते 25 शेतकरी रासायनिक खतांचा वापर बंद करुन सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत.
10 हजार शेतकर्यांची बांधणी
पौळ हे गेल्या 10 ते 12 वर्षांपासून सेंद्रिय शेती करीत आहेत. त्यांच्या गावासह मराठवाडा व विदर्भातील शेतकर्यांनी रासायनिक खतांचा वापर बंद करुन संपूर्णतः सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी ते मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहेत. तसेच कृषी विभागातर्फे शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमधूनही पौळ हे सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्याचे काम करीत आहेत. सेंद्रिय शेतीकडे वळणार्या प्रत्येक शेतकर्याला मोफत मार्गदर्शन करण्याचे त्यांचे काम अहोरात्र सुरु असल्याने आजघडीला जवळपास 10 हजार शेतकरी त्यांना जोडले गेले आहेत.
मार्गदर्शनासाठी कुटुंबियांचा पुढाकार
गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आजही जिल्ह्यासह बाहेरील शेतकरी मोठ्या संख्येने बनचिंचोलीला पौळ यांच्याकडे येत असतात. त्यांना बळवंतराव पौळ हे गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प दाखवून सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देतात. शेतकरी घरी आल्यानंतर एखाद्यावेळी बळवंतराव पौळ घरी नसतील तर त्यांचे सेवानिवृत्त वडील देखील शेतकर्यांना संपूर्ण माहिती देतात. तसेच त्यांच्या पत्नीही महिलांना सेंद्रिय शेतीकडे वळवण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात. एकूणच पौळ यांच्या कुटुंबीयांनी देखील सेंद्रिय शेतीचे महत्त्व लक्षात घेऊन सर्वांच्याच हितासाठी सेंद्रिय शेतीचा प्रचारच जणू सुरु केला आहे.
पुरस्काराने सन्मानीत
मराठवाडा-विदर्भातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीला सुरुवात करावी, म्हणून सेंद्रिय पद्धतीने शेती करणार्या शेतकर्यांना पौळ यांच्याकडून पहिल्यांदा 2 किलो गांडूळ बीज मोफत वाटप करण्यात येते. त्यानंतर शेतकरी स्वतःहून गांडूळ खताचाच आग्रह धरतात. कृषी विभागाने बळवंतराव पौळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत केले आहे.
मागील 10 ते 12 वर्षांपूर्वी बिनविषारी शेतीमाल घेण्याचे ठरवून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. त्यानंतर रासायनिक खतांचा वापर पूर्णतः बंद केला. जास्तीत जास्त शेतकर्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, यासाठी कृषी विभागाच्या शेतकरी कार्यशाळेतून शेतकर्यांना मार्गदर्शन करीत आहे. मराठवाडा व विदर्भातील कोणी शेतकरी सेंद्रिय शेती करण्यास इच्छूक असल्यास त्या शेतकर्याला मी स्वतः स्वखर्चाने जाऊन मोफत मार्गदर्शन करण्याचे काम मागील काही वर्षांपासून अविरतपणे करीत आहे.
– बळवंतराव पौळ ः 9552284040