विक्रम पाटील
महाराष्ट्रातील आणि समग्र भारतीय उपखंडात शेती एकात्मिक पद्धतीची होती. त्यात बदल होत गेला आणि आताच्या काळात एक पीक पद्धतीची शिफारस केली जाते. एक पीक पद्धतीची शेती प्रमुख्याने पैसा केंद्रीभूत शेती आहे. अधिक उत्पादन, अधिक उत्पन्न या हेतूने एक पीक पद्धतीचा विकास घडला आणि शेतीतील प्रश्न बदलले. समस्या बदलल्या तसे उपायही बदलले आणि नकळत किंवा जाणतेपणी आपण शेतात विषाची पेरणी करू लागलो. या विष पेरणीने एकात्मिक शेतीची रया हरवत चालली आहे, हे उद्याचे मोठे संकट आहे. संकट उत्तरोत्तर भीषण होत चालले आहे. त्यात पर्यावरणाचा -हास भर घालतोय. हवामान बदलाने आम्हास हे थोडेसे अवगत होते आहे; पण पुढे कसे जायचे ते कळत नाही. त्याचा उत्तम नमुना म्हणून आपण गिधाड पक्षांचा गेल्या सुमारे पन्नास वर्षाचा अस्तित्वाचा लढा समजून घेऊ, म्हणजे आपणास शाश्वत शेतीच्या दृष्टीने काही आकलन होईल.
निसर्गाचे सफाई कर्मचारी अशी गिधाडांची ओळख वैज्ञानिक दृष्टीने आपणास झालेली आहे. पूर्वी हे सार्यांनी अनुभवलेले आहे. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी प्रत्येक गावात, प्रत्येक कुटुंबात भरपूर पाळीव प्राणी असत. शेतक-याच्या दावणीला गाई, बैल, म्हशी, रेडा, शेळ्या, एखादे घोडे, कुत्रेही असायचे. शेतमजूराकडे शेळ्या असायच्या. दावणीचे जनावर वयोमानानुसार दावणीलाच मरायचे. हे मेलेले जनावर गावाच्या एका दिशेला निश्चित जागी शेतकरी नेऊन ठेवायचा. तेथे चामडी कमावणारे त्या गुराची त्वचा वेगळे करायचे. त्वचा काढल्यानंतर एखाद-दोन दिवसात तेथे हमखास गिधाडे यायचे. त्या मेलेल्या जनावराच्या मांसाच्या कुजण्याची प्रक्रिया व्हायच्या आत गिधाडे ते मांस खाऊन टाकायचे. गिधाडासोबत कुत्री, तरस, कावळे यांचाही राबता होता; पण प्रमुख्याने गिधाडे मोठे कार्य उरकायचे. गिधाडे नसते तर ते मांस जागेवरच सडले-कुजले असते. तेथे रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरली असती. मृत जनावरांच्या मांसाची विल्हेवाट लावण्याचे काम गिधाडे जंगलात नियमित करत आलेत म्हणून त्यांना जंगलांचे स्वच्छता दूत म्हणतात.
भारतात आढळतात सहा प्रकारची गिधाडे : महाराष्ट्रभरात सहा प्रकारची गिधाडे आढळतात. पांढरे गिधाड, पांढर्या पुठ्ठ्याचे गिधाड, लांब चोचीचे गिधाड, युरेशियन गिधाड, काळे गिधाड आणि राज गिधाड. गिधाड आकाराने धिप्पाड, मात्र दिसायला विरुप पक्षी आहे. लहान गिधाड सुमारे 60 सेंटिमीटर पेक्षा मोठे तर मोठ्या गिधाडांची लांबी सुमारे 130 सेंटिमीटर दरम्यान असते. शरीर साधारणत: पिसारा झडलेल्या मोराएवढे असते. बाकदार आणि मजबूत चोच, मानेवर पिसे नसतात. मान लांब आणि वक्राकार असते. मेलेल्या मोठ्या गुरांच्या अस्थी पिंजर्याच्या आत मान घालून अन्न मिळविण्यास त्याचा उपयोग गिधाडांना होतो. त्यामुळेच ते दिसायला ओंगळवाणे वाटतात. अस्वच्छता, धिप्पाड देह यामुळे कुत्री गिधाडांवर हल्ला चढवत नसावी. गिधाडे अन्न मिळवताना एकत्र दिसत असले तरी ते बहुदा एक-एकटे असतात. गिधाडांची घरटी निबीड अरण्यात मोठ्या वृक्षांवर किंवा डोंगरदर्यात उंच कड्यांवर, अवघड सुळक्यावर असतात. गिधाडांचा प्रजनन दर कमी असून घरटी एक अंडी किंवा जास्तीत जास्त पाच अंडी आढळतात. गिधाडांच्या वयासंदर्भात अनेक समज-गैरसमज आहेत; परंतु गिधाडांचे वय सुमारे पन्नास वर्षे असावे. गिधाडांची मादी नरापेक्षा किंचित मोठी असते.
1995 पासून कमी होताहेत गिधाडे :
सन 1996 पर्यंत गिधाडांच्या सर्व सहा जाती जळगाव जिल्ह्यात नोंदवल्या गेल्या होत्या. साधारणतः सन 1995 पासून ते 2000 पर्यंत गिधाडांची संख्या कमी-कमी होत आता लुप्त होण्यापर्यंत येऊन ठेपली आहे. शेती जसजशी अधिकाअधिक अर्थकेंद्री होत गेली, तसे बिनकामाची गुरे विक्री वाढली. त्यामुळे वाढलेली दावणीची गुरे कमी -कमी होत गेली. अर्थात दावणीला गुरे मरायचे प्रमाण कमी-कमी होत गेले. गिधाडांचे अन्न कमी होत गेले, हे एक कारण; पण यापेक्षा दुसरे कारण अधिक महत्वाचे आणि प्रभावी ठरले. कोणते आणि कसे ते समजून घेऊ.
डायक्लोफिनॅक औषधाने गिधाडांचा जन्मदर घसरला
महात्मा ज्योतिराव फुले यांचे प्रसिद्ध कवण आपण जाणतोच.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली॥
नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले॥
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले॥
शूद्रांच्या -हासाचा सुरेख संदर्भ आणि विद्येची महती आपणास क्रांतीसुर्यांनी दाखवली. विद्या आणि शूद्र यांचा संबंध सहा ओळीत स्पष्ट केला. गिधाडांच्या -हासास असेच एक औषध कारणीभूत ठरले, ते म्हणजे डायक्लोफिनॅक. डायक्लोफिनॅक ही औषधी गुरांच्या काही आजारांवर गुणकारी म्हणून दिली जात होती. त्यामुळे गुरांचा आजार दुरुस्त व्हायचा, मात्र या औषधीचा अंश गुरांच्या शरीरात साठत होता. ज्या गुरांच्या स्नायूत डायक्लोफिनॅक औषधी आहे, असे जनावर मेल्यानंतर हे औषध गिधाडांच्या शरीरात अन्नाद्वारा प्रविष्ट झाले. गिधाडांच्या जीवनप्रणालीवर त्याचा मोठा परिणाम झाला. तो म्हणजे गिधाडांच्या अंड्याचे कवच ठिसूळ झाले. पर्यायाने गिधाडांच्या अंड्यातून पिलांचा जन्म होणे जिकिरीचे झाले. अंड्यातच पिलू मरण पावल्याने गिधाडांची संख्या कमी-कमी होत गेली. गिधाडे दिसेनाशी झाली.
नाशिकच्या हरसूल, अंजनेरीत जगली गिधाडे : उशिराने का होईना, समाजाला जाग आली तशी गुरांना डायक्लोफिनॅक औषधी वापरण्यावर बंदी आली. त्यामुळे पाळीव गुरांच्या शरीरात डायक्लोफिनॅकचा अंश कमी-कमी होत गेला; पण नामशेष होण्याच्या मार्गावरील गिधाडे परत येतील कशी? त्यांची संख्या वाढेल कशी? पक्षी अभ्यासक आणि पर्यावरणवादी यांच्या चर्चांमधून सतत याविषयी खल होत राहिला. सरकारास दोष देणे सुरू होते. काहीतरी केले पाहिजे; पण नेमके काय करावे, हा प्रश्न होता. महाराष्ट्रात सह्याद्रीने काही गिधाडे वाचवलेली होती. त्यांचे तुरळक का होईना दर्शन घडत होते. त्या परिणामी नाशिक जिल्ह्यात गिधाड दिसणारी जागा म्हणजे नाशिकच्या वायव्येस असणारा हरसूल, अंजनेरी गावादरम्यानचा पट्टा. येथे गिधाड नजरेस पडत असे. येथे लहान लहान वीस-बावीस गावे आहेत.
सर्वभक्षी कावळे उरलेल्या
अन्नाची लावतात विल्हेवाट
कावळे सर्वभक्षी आहेत. ते भाकरी, पोळी, वडे, मांस, अंडी खातात. उंदीर, सरड्या, पाल, कोंबडीची लहान पिलं, सापाची पिल्ले यांची शिकारी करतात. मंदिरातील देवाच्या नैवेद्यातील फळे, पोळ्या, भात, कुरडया, भजी सारे काही खातात. मयतास दिलेल्या नैवेद्याचा फडशा पाडतात. त्यामुळे ते हॉटेल परिसर, मांस विक्रेते, उकिरडे, डम्पिंग ग्राउंड, स्मशानभूमी, अन्नधान्याची व्यापारी जागा अशा ठिकाणी स्वैर संचार करतात. ते एकेएकटे उडताना दिसत असले तरी त्यांच्यात सामाजिक ताळमेळ उत्तम असतो.
गिधाडे क्षुधा शांती गृहचा उपक्रम : त्या परिसरात एका ओसाड जागेवर 2015 ला एक वल्चर रेस्टॉरंट म्हणजे गिधाडे क्षुधा शांती गृह चालवायचे ठरवले. मेलेली गुरे त्या रेस्टॉरंटला नेऊन टाकायची, अशी त्याची सुरुवात झाली. त्या कामी शासनाचा वन विभाग, शासन आणि स्थानिक नागरिकांची संयुक्त वनव्यवस्थापन समिती, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, पक्षी अभ्यासक आणि स्थानिक नागरिक असे सारे एक झाले. स्थानिक परिसरात लोक प्रबोधन घडवले गेले. परिसरातील शेतकरी दावणीला बांधलेले मेलेले गुरे तेथे पोहोचवतात. त्यासाठी वनविभागाकडून शेतकर्याचा अल्पसा मोबदला रुपये पाचशे प्रति गुरांसाठी अदा केला जातो. तेथे आता गिधाडे दिसू लागलीत. मात्र, आतापर्यंत गिधाडांच्या दोनच जाती तेथे आढळतात – पांढर्या पुठ्ठ्याचे गिधाड आणि पांढरे गिधाड. एकदा युरेशियन गिधाड आढळल्याची नोंद स्थानिक मित्र अनिल माळी कळवतात. आता या गिधाडांच्या क्षुधा शांती गृहा वर त्या परिसरातील रस्त्यावरील, अपघातात मरण पावलेली भटकी कुत्री, डुकरे, शेतकर्यांकडील खुंट्यावर मेलेली गुरे येतात. अशा स्वरूपातील आणखी एक गिधाड क्षुधा शांती केंद्र नुकतेच त्याच परिसरात सुरू झालेले आहे.
निसर्गातील सजीव अधिवास सुरक्षित करण्याची गरज : गिधाड क्षुधाशांती केंद्राची ही साखळी वाढली पाहिजे. आता शेतातून गुरांची संख्या कमी होत चालली आहे. गुरांचे नैसर्गिक मरण कमी झाले आहे. टोकाच्या अर्थ केंद्री मानव समाजात गुरे गोठ्यात मरण्यापेक्षा वेळीच बाजारात नेऊन विकून टाकायचे, हा शिरस्ता झाला आहे. परिणामी गिधाडांचे खाद्य घटले आहे. जंगलक्षेत्र कमी झाले. तेथील वन्यजीव कमी झाले म्हणजे गिधाडांचे जंगलातील अन्नसुद्धा कमी झालेले आहे. गिधाडे जिवंत प्राण्यांवर हल्ले करत नाहीत मग जगतील कसे? थोडक्यात म्हणजे कोणत्याही परिसंस्थेतून एखादा सजीव हद्दपार होण्याच्या मार्गावर असला तर त्याचे पुनर्वसन बर्यापैकी अवघड असते. अलीकडे महाराष्ट्रात आणि भारतातही बरेच सजीव अधिवासाच्या र्हासाच्या परिणामी अडचणीत आलेले आहेत. आपण हे सारे अधिवास सुरक्षित केले पाहिजेत. कोणत्याही अधिवासावर होणारे अतिक्रमण, कोणत्याही पर्यावरण प्रणालीवर होणारे अतिक्रमण थांबवले पाहिजे. एकात्मिक शेती साठी शाश्वत शेतीसाठी ते अत्यंतगरजेचे आहे.
कावळाही आहे स्वच्छ निसर्गाचा पहारेकरी : कावळा आपल्या सार्यांच्याच परिचयाचा पक्षी. धीट स्वभाव, चपळ हालचाली, सर्वत्र संचार, वेगवान उड्डाण, लक्षवेधी आवाज या गुणवैशिष्ट्यांमुळेही असेल कदाचित तो सार्यांच्या परिचयाचा असतो. कावळ्यांच्या दोन जाती महाराष्ट्रभर आढळतात. कावळा (राखी मानेचा) आणि डोमकावळा (संपूर्ण काळा). त्यांचा काळाकुळीत रंग जवळून न्याहाळता आल्यास त्यावर सुंदर निळसर चकाकी दिसते. कावळ्या पेक्षा दोमकावळा थोडासा मोठा असतो. कावळा गावात तर डोमकावळे गावाबाहेर राहणे पसंत करतात. नरमादी सारखे असतात, मादी आकाराने थोडीशी मोठी असते. दोघे स्वतंत्र असले तरी विणीच्या काळात नर-मादी मिळून काटक्या जमा करून घरटे करतात. झाडाच्या तीन-चार फांद्यांच्या उगमाच्या जागी घरटे करतात. ग्रामीण भागात कावळ्याचे घरटे झाडाच्या शेंड्यावर उंच जागी असल्यास कमी पाऊस पडेल, तर घरटे झाडांच्या मध्यभागी असल्यास भरपूर पाऊस पडेल असा समज आहे. परंतु त्यास काही आधार नाही. पावसाच्या आगमनाच्या काळात घरटी करतात म्हणून समज प्रचलित झाला असावा.
कोकीळ, कावळीणीची अंडी घालायची धडपड : घरट्यात कावळीण अंडी घालते, नेमके त्याच वेळी कोकीळ मादीही कावळ्याच्या घरट्यात अंडी घालते. ते शक्य व्हावे म्हणून नर कोकीळ कावळ्याच्या घरट्याच्या परिसरात कावळा नर-मादीला चिडवत ठेवतो. कावळा-कावळी कोकीळ नराचा पाठलाग करतात आणि मादी कोकिळा कावळ्याच्या घरट्यात अंडी घालून पसार होते. कावळ्याची मादी एका हंगामात तीन ते सहा अंडी घालते. त्यात कोकिळेच्या अंड्यांची भर पडते. कावळा नर आणि मादी दोघे मिळून घरट्याचे संरक्षण करतात आणि अंडी उबवतात. कोकीळेची पिले चपळ असतात आणि यशस्वी उड्डाण करून घरटे सोडतात. कावळ्याची पिल्ले लवकर उडणे शिकत नाहीत. पालक कावळे त्यांना उडणे शिकवतात. यादरम्यान बर्याचदा कावळ्याची पिल्ले जमिनीवर पडतात आणि भरकटतात.
कावळे शेत शिवारात असल्यास शेताचा परिसर निसर्गसमृद्ध : कावळा त्याची अक्कलहुशारी आणि बदमाशी साठी प्रसिद्ध आहे. वाळलेली भाकरी खाण्यायोग्य नरम होईपर्यंत पाण्यात बुडवून नंतर खाणे, झाडाला कापडात बांधलेली शिदोरी गाठी उकलून पळवणे, गुरांच्या जखमांना टोचून मांस खायचा प्रयत्न करणे, भरधाव वाहने धावणार्या रस्त्यावर मेलेले पक्षी, उंदीर, खार, कुत्री यांचे मांस खाणे अशी कामं कावळे लीलया करतात. शाळातून ग्राउंड वर विद्यार्थी खिचडी खाताना, डबे खाताना नजर चुकवून त्यांच्या ताटातील अन्न पळवणे कावळ्यांना सहज शक्य होते. मुलं वर्गात गेले की उष्टे खरकटे आवरायचा उद्योग कावळ्यां आणि साळुंक्या करतात. असे हे कावळे शेत शिवारात असले तर शेताचा परिसर निसर्ग समृद्ध आहे असे समजावे. अशा परिसरात अन्नधान्य, मांस, भक्ष मुबलक आहे समजावे. तेथे जीवन समृद्ध आहे याचा तो पुरावाच असतो. आपल्या शेत शिवारात म्हणूनच कावळे महत्वाचे आहेत.
लेखक हे पक्षीमित्र आहेत. संपर्क ः 9970225538
लेख कोणी लिहिला असेल ते माहिती नाही मात्र लेख अतिशय अभ्यास पूर्ण असा आहे. लेख वाचून असे वाटते की लेखकाचा याविषयी सखोल अभ्यास आहे हे सिद्ध होते. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या गावाबाहेर थोड्या दुर अंतरावर जेथे मेलेली पाळीव जनावर फेकली जात होती ते गिधाडे, कावळे आणि भटके कुत्री तेथे येत असत… पण आज मात्र आपण सांंगितल्याप्रमाणे… शेतकरी आर्थिक कमजोर झाला आणि त्याची गुरे,ढोरे पाळण्याची ऐपत राहिली नाही… त्याचा निसर्ग चक्रावर एवढा मोठा परिणाम होईल असे वाटले नव्हते… भविष्यात गाय,बैल ,असे शेतकरी पाळत होता असे प्राणी का चित्रातच दिसतील असे वाटते… पूर्वी आमच्या कडे चार बैलजोड्या आणि गायी,म्हशीचे मोठे स्वतंत्र गोठे होते आज मात्र बोटावर मोजता येतील एवढीच संख्या आहे. नाहीतर रोज एखादे दोन ढोरे बांधायची मोकळी राहून जात होती… असो लिहायला भरपूर आहे.. पण मर्यादा येतात…🚩🚩🚩🙏🙏🙏
धन्यवाद दिलीप पाटीलजी.