राहुल कुलकर्णी
जामगाव (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील तरुण शेतकरी उमेश बंग हे शेतीत रासायनिक आणि सेंद्रिय पद्धतीचा समन्वय साधून यशस्वी शेती करत आहेत. सेंद्रिय खते आणि जीवामृताचा वापर, उसाचे पाचट कुजवणे आदी उपयांमुळे शेतीचा खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यात त्यांना यश आले आहे. उच्चशिक्षित, प्रयोगशील उमेश बंग हे गेल्या वीस वर्षांपासून 27 एकर शेतीची जबाबादार सांभाळत आहेत.
जामगाव हे गोदाकाठी वसलेले गाव आहे. एकेकाळी येथे सुरू असलेल्या गंगापूर सहकारी कारखान्यांमुळे या गावाचा परिसर नावारूपाला आलेला होता. कारखान्यामुळे याठिकाणी मानवी वसाहत मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. त्यामुळे येथे छोट-मोठे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालायचे. उमेश बंग यांचे देखील वडिलोपार्जित किराणा दुकान होते. व्यवसाय किंवा नोकरी असे दोन्ही पर्याय त्यांच्यासमोर खुले होते. मात्र त्यांनी शेती करण्याचे ठरवले. त्यांचे वडिल हे किराणा दुकान चालवायचे मात्र अजोबा प्रयोगशील शेती करायचे. एक चुलत बंधू देखील उत्कृष्ट पद्धतीने शेती करायचे. हाच प्रयोगशील शेतीचा वारसा जपण्याचे उमेश बंग यांनी ठरवले आणि वीस वर्षांपूर्वी शेतीची प्रत्यक्ष सूत्रे हातात घेतली.
शेती तंत्राचा अभ्यास
उमेश बंग यांच्या शेतीत ऊस, कापूस, गहू या पिकाचे पारंपरिक पद्धतीने उत्पादन घेतले जायचे. याच पिकांचे उत्पादन आणखी शास्त्रशुद्ध पद्धतीने घेण्यासाठी त्यांनी सुरवातीला अभ्यास सुरू केला. यासाठी त्यांनी काही प्रयोगशील शेतकर्यांच्या शेतीला भेटी दिल्या. कृषी शास्त्रज्ज्ञ, तज्ज्ञांकडून माहिती घेतली. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापिठांना देखील भेटी दिल्या. यातून त्यांना शेतीच्या योग्य पद्धतीची माहिती होत गेली. या माहितीचा उपयोग त्यांनी आपल्या शेतीत करण्यास सुरवात देखील केली.
मातीच्या आरोग्याचा विचार
रासायनिक खत, आणि औषधींच्या अतिवापराने जमिनीचा पोत खराब होत असल्याचे उमेश बंग यांच्या लक्षात आले. जमिनीचे आरोग्य चांगले राहिले तरच आपण चांगले उत्पादन काढू शकतो, या गोष्टीची जाणीव त्यांना झाली. यामुळे कम्पोस्ट खत, मासळी खत आदी सेंद्रिय खतांचा त्यांनी वापर सुरू केला. सेंद्रिय खताच्या वापराने रासायनिक खतांचे प्रमाण कमी झाले. रासायनिक खत देताना त्यांना सेंद्रिय खताचे कोटींग केल्याने खताची कार्यक्षमता वाढली. मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्याचे त्यांनी ठरवले.
उसाचे पाचट कुजवले
जमिनीला जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय खत उपलब्ध व्हावे म्हणून गेल्या दहा वर्षांपासून ते ऊस तुटून गेल्यानंतर त्याचे पाचट जाळून न टाकता जमिनीत कुजवत आहे. त्यासाठी ऊस गेल्यानंतर ते व्यवस्थितरित्या पसरून घेतले जाते. या पाचटाची यंत्राच्या साह्याने बारीक कुट्टी केली जाते. त्यावर पाचट कुजवण्यास मदत करणारे करणार्या जीवाणूची फवारणी केली जाते. त्यानंतर ते पाचट व्यवस्थितरित्या मातीत मिसळले जाते. अशा पद्धतीने या उसाच्या पाचटापासून उत्कृष्ट पद्धतीचे सेंद्रिय खत तयार होते.
पाचटाचे अनेक फायदे
पाचटामुळे जमिनीला सेंद्रिय अच्छादन तयार झाले. यामुळे जमिनीत पोषक जीवाणूची संख्या वाढली. अच्छादन असल्याने अनावश्यक तणाची कमी प्रमाणात उगवण होते आणि पिकासाठी अन्नद्रव्ये मुबलक उपलब्ध होतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाचटामुळे जमिनीतील गांडुळांची संख्या वाढल्याने जमीन भूसभूसीत आणि पोषक बनली. जमिनीला जीवंतपणा प्राप्त झाला. पिकाला पाण्याच्या पाळ्या देण्याचे प्रमाण कमी झाले. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढले. कमी पाण्यात देखील पीक जोमदार वाढू लागले. पिकाला पोषक असे वातावरण मिळाले.
राज्यातील खरीप हंगाम संकटात; तीळ, कारळची पेरणीच नाही..! जाणून घ्या राज्यातील विभागवार पाणीसाठा
पाचटातून खताची उपलब्धता
एक हेक्टर क्षेत्रात साधारण 8 ते 10 टन पाचट उपलब्ध होते. एवढ्या पाचटातून 0.5 टक्के नत्र, 0.2 टक्के स्फूरद, 0.7 ते 1.0 टक्के पालाश आणि 20 ते 30 टक्के सेंद्रिय कर्ब मिळते. अर्थात यातून 40 ते 50 किलो नत्र, 20 ते 30 किलो स्फूरद आणि 75 ते 100 किलो पालाश मिळते. सोबतच जमिनीच्या सुपीकतेसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे 3 ते 4 हजार किलो सेंद्रिय कर्ब उपलब्ध होते. सेंद्रिय पदार्थ कुजताना कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडून तो पिकाला कर्बग्रहण कार्यात साह्यरूप ठरतो.
पिकाला जीवामृताचा वापर
पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी जमिनीत पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणार्या जीवाणूची संख्या वाढणे आवश्यक असते. यामुळे असे आवश्यक जीवाणू जमिनीत वाढावेत म्हणून वर्ष 2016 पासून उमेश बंग हे पिकाला जीवामृत देत आहेत. सुवातीच्या काळात शेण, गोमूत्र यापासून ते जीवामृत बनवायचे सध्या मात्र ते कृषी विज्ञान केंद्रातून मिळणारे जीवाणू कल्चर यासाठी वापरतात. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार सिंचनातून किंवा फवारणीतून पिकाला जीवामृत देतात. जीवामृताच्या वापरामुळे पिकाचे उत्पादन वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी उसाचे एकरी 50 टन उत्पादन त्यांना मिळत होते. जीवामृतामुळे सध्या साधारण 75 टन उत्पादन त्यांना मिळत आहे. जीवामृतामुळे रासायनिक खतांचा वापर देखील कमी झाला आणि उत्पादन खर्चात बचत झाली.
सिंचनासाठी ठिबक पद्धत
पिकाला सिंचनासाठी पाटपाणी पद्धतीचा वापर केला जायचा. वर्ष 2013 मध्ये त्यांनी सुरवातीला 5 एकर क्षेत्रासाठी ठिबक सिंचन केले. सध्या त्यांचे संपूर्ण 27 एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. यासाठी त्यांनी दोन शेततळ्यांची देखील निर्मिती केली. ठिबक सिंचनामुळे पिकाला पाणी देण्यासाठी होणारा मजूरीचा खर्च वाचला, पाण्याची बचत झाली आणि पिकाला योग्य प्रमाणात पाणी देता येते. ठिबक सिंचनातून ते पिकाला जैवीक खते आणि रासानिक खते देखील देतात. यामुळे खतांचा कार्यक्षम पद्धतीने वापर होतो.
विविध पिकांचे प्रयोग
उमेश बंग हे शेतीत विविध पिकाचे प्रयोग करत असतात. चार वर्षांपूर्वी त्यांनी दोन एकरात खपली गव्हाची पेरणी केली होती. 22 क्विंटल उत्पादन मिळाले आणि त्याला जागेवर 8 हजार रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. हा गहू तयार करण्याची पद्धत किचकट असल्याने त्यानंतर त्याची पेरणी त्यांनी केली नाही. यावर्षी 8 एकर ऊस लागवड करताना त्यात हरभरा हे अंतरपीक घेतले. त्यापासून 32 क्विंटल उत्पादन मिळाले. हरभरा पिकामुळे नत्राचे जमिनीत स्थिरीकरण झाले आणि त्याचा फायदा ऊस पिकाला देखील झाला आहे. यावर्षी त्यांनी उसाच्या 265 या वाणाच्या पायभूत बेण्याची लागवड केली आहे.
तरुणांनी अभ्यासपूर्वक शेती करावी
तरुणांनी आता आधुनिक शेतीची कास धरावी. शेती करताना बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. शेतीवरील खर्च कमी करून उत्पादन वाढ होणे गरजेचे आहे. यासाठी रासायनिक खते, औषधींचा कमीत कमी वापर करून सेंद्रिय खतांचा औषधींचा वापर शेतकर्यांनी करावा. उसाचे पाचट, इतर पिकांचे अवशेष जाळून न टाकता जमिनीत ते गाडल्याने जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो आणि पर्यायाने पिकाचे उत्पादन वाढते.
– उमेश शामसुंदर बंग,
जामगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद
मो. नं. ः 9823188544
Comments 2