वाघ …..वन्यजीवन आणि जंगलांच्या संपन्नतेचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणामुळे संपूर्ण वन्यजीवन आणि वनक्षेत्रातील परिसंस्थेचे संरक्षण होत असते म्हणूनच वाघांचे संरक्षण करणे म्हणजेच पर्यावरणाचे संरक्षण करणे होय. मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठीही व्याघ्र संवर्धन अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. वाघ वन्यजीवन आणि वनक्षेत्रातील इकोसिस्टममध्ये (परिसंस्थेमध्ये)सर्वोच्च स्थानी असलेला मांसाहारी प्राणी असून, अन्न साखळीच्या शिखरावर आहेत. इकोसिस्टममधून जर सर्वोच्च मांसाहारी प्राणी नाहीसा झाला तर समूहातील शाकाहारी प्रजातींच्या सापेक्ष विपुलतेवर व्यापक परिणाम होत असतो.
सजीव सृष्टीचे परस्परावलंबन आणि वाघांचे महत्व:
वाघांसह बिबट्या, सिंह, रानकुत्रे, रानमांजर इत्यादी मांसाहारीं प्राणी आपल्या उपजीविकेसाठी तृणभक्षी-शाकाहारी प्राण्यांचे भक्षण करतात; म्हणून त्यांना मांसाहारी किंवा मांस भक्षक प्राणी म्हणतात; त्यामुळे सृष्टीचक्रात संतुलन आणि नियंत्रण राखण्याची प्रक्रिया स्वाभाविकपणे आणि सातत्याने सुरु असते, किंबहुना अन्न साखळीच्या अस्तित्वासाठी आणि समन्वयासाठी संपूर्ण सजीवसृष्टी आणि निसर्गसृष्टी परस्परावर अवलंबून असते; कारण वाघ आणि अन्य मांसाहारी वन्यजीव त्याच्या अस्तित्वासाठी किंवा उपजीविकेसाठी इतर तृणभक्षी किंवा शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतात तर हरीण,ससे,गायी,रानम्हशी इत्यादी तृणभक्षी प्राणी हरित वनस्पती गवत, औषधी वनस्पती, झुडुपे, एकपेशीय वनस्पती, बुरशी आणि झाडे इ. वर अवलंबून असतात आणि वनस्पतींच्या अतिरिक्त वाढीवर संतुलन आणि समतोल राखतात, त्याचप्रमाणे पक्ष्यांचे जीवन वनौषधी, झुडुपे, फळे, फुले आणि फळांचा रस, कीटके आणि झाडे यांच्यावर अवलंबून असते; तसेच ते बीज प्रसारणाच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका निभावतात, अशा प्रकारे वाघ आणि संपूर्ण सजीव सृष्टी एकमेकांशी जोडलेले असतात ;म्हणूनच वाघांचे महत्व अनन्यसाधारण आहे. परंतु अन्न साखळीत एवढे महत्वपूर्ण स्थान असूनही वाघ जगात अनेक ठिकाणाहून नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वाघाचे अधिवास आणि अस्तित्व अनेक देशामध्ये नष्ट होत आहेत, ही खूप मोठी शोकांतिका आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आता वाघांच्या संवर्धनासाठी सर्वंकष प्रयत्न सुरु आहेत.
व्याघ्र संवर्धनात भारताचे योगदान :
वाघांच्या संवर्धनाचा सर्वंकष विचार करण्याच्या अनुषंगाने वाघाचे अस्तित्व असणाऱ्या देशांच्या सरकार-प्रमुखांनी सेंट पिट्सबर्ग, रशिया येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. या सर्व राष्ट्र प्रमुखांनी मान्यता दिलेल्या जाहीरनाम्यानुसार जगभरातील वाघांची संख्या 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. या बैठकी दरम्यान 29 जुलै हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करण्याचेही ठरवले होते. त्यानुसार जगभरात व्याघ्र संवर्धनासंबंधी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. जागतिक व्याघ्र दिन 29 जुलै 2019 हा भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस होता. याचदिवशी पंतप्रधानांनी जाहीर केल्याप्रमाणे व्याघ्र संवर्धनाचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांनी देशभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारताकडून चार वर्ष आधीच गाठले गेले. भारतातील वाघांची संख्या आता 2967 झाली असून ती जगभरातील व्याघ्र संख्येच्या 70 टक्के एवढी आहे. भारतातील वन्यजीवांचे कॅमेरा trap मार्फत करण्यात आलेले सर्वेक्षण जगभरातील सर्वात मोठे व्यापक सर्वेक्षण असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी 2019 मध्ये भारतातील वाघांच्या सद्यस्थितीबद्दल उत्साह वर्धक अहवाल मांडला होताच, त्यानंतर ह्याच सर्वेक्षणाच्या आधारावर अधिक सखोल आणि व्यापक सर्वेक्षण देशपातळीवर करण्यात आले आणि अतिशय सर्वंकष असा अहवाल भारताच्या वनमंत्र्यांनी 28 जुलै 2020 रोजी देशासमोर सादर केला; हा अहवाल अतिशय विस्तृत आणि उत्साहवर्धक असा आहे. गेल्या तीन सर्वेक्षणात (2006, 2010, आणि 2014) मिळालेल्या माहितीची तुलना 2018-19 च्या सर्वेक्षणाशी करत, भारतातील वाघांची अंदाजित संख्या केंद्रीय वनमंत्र्यांनी याअहवालात सादर केली आहे. याशिवाय या अहवालात उपलब्ध असणाऱ्या वनांची संख्या, एखाद्या ठिकाणी एकत्रितपणे आढळणाऱ्या वाघांची संख्या तसेच त्यांचे अस्तित्व नाहीसे होण्याचा दर या सगळ्यांची तुलना करत, वाघांच्या अधिवासाची दर शंभर किलोमीटरमागे बदलणारी स्थिती आणि त्याला जबाबदार असणारे घटक याची माहितीही सादर करण्यात आली आहे विशेष म्हणजे याअहवालात, वाघांचे अधिवास जोडणाऱ्या मार्गिका किंवा संचार मार्गांचे पृथक्करणही करण्यात आले आहे; वेगवेगळ्या अधिवासातील मार्गिकांमध्ये आढळणारे वेगवेगळे धोकादायक क्षेत्र आणि त्याठिकाणी व्याघ्रसंरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीही अधोरेखित करण्यात आल्या आहेत, वाघ आणि इतर वन्यजीव यांची माहितीही या अहवालात नमूद करण्यात आली असून देशभरातील त्याच्या संख्येची घनता आणि विपुलता यासंबंधीची सविस्तर माहिती सदर आहवालात आढळून येते.
व्याघ्र गणना अहवालाची वैशिष्टे :
चौथ्या भारतीय व्याघ्र गणनेचा सविस्तर अहवाल खालील कारणांमुळे विशेष महत्वाचा आहे;
- सह-भक्ष्यी आणि इतर प्रजातींचा विपुलतेचा निर्देशांक या अहवालात नोंदवला गेला आहे. आतापर्यंत या व्याघ्र गणना केवळ अधिवासापुरतीच मर्यादित होत होती.
- व्याघ्रगणनेसाठी कॅमेरा लावलेल्या सर्व स्थळांवर वाघांचे लिंग गुणोत्तर प्रथमच नोंदवण्यात आले आहे.
- लोकसंख्येचे मानववंशशास्त्रीय परिणाम प्रथमच सविस्तर पद्धतीने मांडण्यात आले आहेत.
- अभयारण्यातील वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये असलेल्या व्याघ्र संख्येची विपुलता प्रथमच प्रात्यक्षिक पद्धतीने दाखवण्यात आली आहे.
भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर 4 वर्षांनी व्याघ्रगणना करण्यात येते. देशात सर्वप्रथमव्यापक स्वरुपात व्याघ्र गणना 2006 मध्ये करण्यात आली होती; व्याघ्रगणनेनुसार 2006 मध्ये देशात 1411 वाघ होते. 2010 मध्ये दुसरी गणना झाली तेव्हा 1706, 2014 मध्ये तिसरी गणना झाली तेव्हा देशात 2226 वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन आता देशात 2967 वाघ झाले आहेत. महाराष्ट्रातही वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे, महाराष्ट्रात 2006 मध्ये 103 वाघ होते. 2010 मध्ये ते वाढून 168 झाले. 2014 मध्ये झालेल्या व्याघ्रगणनेत ही संख्या वाढून 190 झाली. मागील 4 वर्षात राज्यातील वाघांच्या संख्येत अंदाजे 65 टक्के वाढ होऊन आता ही संख्या 312 इतकी झाली आहे. वाघांच्या संख्येत महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला आहे.
सातपुडा landscape ( विस्तृत वनक्षेत्र) :
महाराष्ट्र राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा आणि सह्याद्री, ताडोबा-अंधारी असे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. देशात वाघांच्या संख्येत मध्यप्रदेशचा अव्वल क्रमांक आहे. येथील वाघांची संख्या 2014 च्या व्याघ्रगणनेत 308 होती, ती आता 2019 मध्ये 526 इतकी झाली आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तेथील वाघांची संख्या 406 वरुन 524 इतकी झाली आहे. व्याघ्रसंवर्धनात तिसरा क्रमांक उत्तराखंड राज्याने पटकावला आहे. येथील वाघांची संख्या 340 वरुन 442 इतकी झाली आहे. महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून राज्यातील वाघांची संख्या 190 वरुन 312 इतकी झाली. पाचव्या स्थानावर तामिळनाडू राज्य असून येथील वाघांची संख्या 229 वरुन 264 झाली आहे.
देशभरातील विशेषतः राज्या राज्यामधील या गणनेचा विचार करीत असताना या ठिकाणी अजून एका महत्वपूर्ण मुद्याकडे लक्ष वेधावेसे वाटते ते म्हणजे सातपुडा landscape मधील व्याघ्र संवर्धन. सातपुड्यातील हे विस्तृत वनक्षेत्र छत्तीसगड –मध्यप्रदेशपासून ते महाराष्ट्र – गुजरात पर्यंत पसरलेले असून वन्य प्राण्यांचा हा शाश्वत संचार मार्ग आहे. जगातील सर्वाधिक वाघ या सातपुडा landscape मध्ये आढळून येतात; आणि याच क्षेत्रात वाघांची संख्या विपुलप्रमाणात वाढण्याची क्षमता आहे, आणि या अनुषंगाने संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न सुरु आहे. याविस्तृत वनक्षेत्रात कान्हा,पेंच( मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र), सातपुडा, नवेगाव –नागझिरा,ताडोबा –अंधारी,मेळघाट हे व्याघ्र प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. सातपुडा landscape चे पश्चिम क्षेत्र मात्र तुलनेने दुर्लक्षित राहिले आहे. विशेषत: मेळघाट नंतर जळगाव –धुळे नंदुरबार( खान्देश) जिल्हयातील वनक्षेत्रातही वन्यजीव विशेषतः वाघांचा अधिवास सिद्ध झाला आहे, परंतु या क्षेत्रातील संवर्धनासाठी शासकीय आणि अशासकीय स्तरावर व्यापक प्रयत्न झालेले नाहीत, ही वास्तविकता आहे.
जळगाव जिल्हा: व्याघ्र संचार मार्गाचा केंद्र बिंदू –
जळगाव जिल्ह्यातील वनसंपदा आणि जैविकविविधता अतिशय उच्च कोटीतील मानली जाते, दक्षिण-पश्चिमेला सातपुडा पर्वतराजी, पूर्वेला सातमाळाचे डोंगर आणि उत्तरेला अजिंठा पर्वतराजीतील वनक्षेत्र अशाया वैभवसंपन्न वनक्षेत्रातील वन्यजीवनही व्यापक प्रमाणात आहे. विशेष म्हणजे फार पूर्वीपासून या क्षेत्रात वाघांचा आणि अन्य वन्यजीवांचा अधिवास अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा हा असा एकमेव जिल्हा आहे की, ज्याच्या सभोवताली यावल, आनेर आणि गौताळा हे तीन अभयारण्ये आहेत आणि थेट मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि शुलपाणेश्वर (गुजरात) अभयारण्याला जोडणारा वन्यजीवांचा शाश्वत संचार मार्ग आहे, या अनुषंगाने यावल अभयारण्य हे केंद्रबिंदू मानले जाते यावलच्या दक्षिण-पूर्वेला अम्बाबरुवा अभयारण्य (बुलढाणा), पूर्वेला-वान अभयारण्य (अकोला) आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे तर पश्चिमेला आनेर, तोरणमाळ आणि शुलपाणेश्वर(गुजरात) अभयारण्य आहेत पुढे वढोदा–बोदवड–जामनेर मार्गे हे वनक्षेत्र उत्तरेला गौताळा (औरंगाबाद) अभयारण्याशी जोडले जाते ,दरम्यान पूर्वेकडे ज्ञानगंगा (बुलढाणा) अभयारण्य आहे. यावल अभयारण्याचे महत्व:
सातपुडा landscape मध्ये जळगाव जिल्ह्यातील यावल अभयारण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे, परंतु यावलची जैवविविधता गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर नष्ट होते आहे ,ही एक मोठी शोकांतिका आहे, विशेषतः वनहक्क कायद्याच्या दुरुपयोगामुळे सातपुड्याच्या या अत्यंत महत्वपूर्ण वनक्षेत्रात प्रचंड विध्वंस झालेला आहे, (तो आजही सुरु आहे). या पार्श्वभूमीवर यावलमध्ये वाघ परतणे हे एक दिवास्वप्नच होते परंतु 3 जानेवारी व ६ जानेवारी २०१६ रोजी यावल अभयारण्यात ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघ आढळून आला आणि वनसंवर्धन चळवळीत उत्साहवर्धक वातावरण तयार झाले. यावलचे महत्व सातपुड्यातील वनक्षेत्राची जोडणी करण्याच्या दृष्टीने अतिशय व्यापक आहे. सातपुड्याच्या पश्चिमेला थेट गुजरात पर्यंत (शूलपाणेश्वर अभयारण्य) वाघ केवळ यावल मधूनच पोहचू शकतात कारण गुजरातमध्ये सिहांचा अधिवास असला तरी वाघांचा अधिवास नाही, याच मार्गाने पुढे पश्चिम घाटातही वाघ जाऊ शकतात. यावलच्या पश्चिमेला आनेर – तोरणमाळ आणि पुढे शूलपाणेश्वर (डांग) असा शाश्वत संचारमार्ग आहे. (२००६ नंतर वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत हे मार्ग दुभंगले असले तरी) यावल अभयारण्य – रावेर वनक्षेत्र आणि केळीच्या शेती शिवारातून (हा अधिवास आणि त्यांची वैशिष्टे आता सिद्ध झाली आहेत) – पुढे वढोदा वनक्षेत्राची जोडले जाते – वढोदा वनक्षेत्र (पूर्वेला) – अंबाबरुआ अभयारण्य (बुलढाणा) – वान अभयारण्य (अकोला) – आणि पुढे मेळघाट व्याघ्र प्रकल्प असा अत्यंत महत्वपूर्ण संचार मार्ग आहे. हा संचारमार्ग पुढे मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र (मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र) प्रकल्प यांना जोडणारा आहे. हा शाश्वत संचारमार्ग असला तरी, आता मात्र ठिकठिकाणी अतिक्रमणामुळे तो नष्ट झाला आहे. त्यामुळे वाघांच्या अवागमनावर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र:
जळगाव जिल्ह्यातील वाघांचे संवर्धन आणि वन्यजीवांसाठी समृद्ध-विस्तृत वनक्षेत्र आणि सुरक्षित संचार मार्गाची निर्मिती ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव वनविभाग, यावल वनविभाग आणि वन्यजीव विभाग (यावल अभयारण्य) यांनी जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन चळवळीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या आणि तज्ञांच्या सहकार्याने सर्वकष योजना तयार करण्याची आवश्यकता आहे, कारण सध्या वाघांचा अधिवास जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रात ( मुक्ताई नगर तालुक्यातील वढोदावनक्षेत्र) या ठिकाणी सिद्ध झालेला आहे ,या वनक्षेत्रात 8-10 वाघांचे अस्तित्व आहे , आणिहे वनक्षेत्र अंबाबरुआ अभयारण्यला (बुलढाणा) लागूनच आहे, अंबाबरुआतील जळगाव जामोद वनक्षेत्रा पर्यंत मेळघाट व्याघ्र प्रकल्पचे बफर क्षेत्र( बाह्य क्षेत्र ) पोह्चेले आहे, जळगाव जामोद वनक्षेत्रापासून मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र ( वढोदा) अवघे 29 किलोमीटर आहे, त्यामुळे मेळघाट मधून वन्यजीव विशेषत: वाघमुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रामध्ये येत असतात. मेळघाट मधील वाघ प्रजननासाठी (breeding) मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रात येतात, हे सिद्ध झाले आहे .परंतु एवढ्या महत्वपूर्ण वनक्षेत्राकडे मात्र कमालीचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे गेल्या चार वर्षात तीन वाघांची हत्या झाली आहे, ही एक मोठी शोकांतिका आहे, कारण गेल्या कित्येक वर्षापासून वाघांचे आणि इतर वन्यजीवांचे अस्तित्व सिद्ध होऊनही आणि संचार मार्गांचे मह्त्व अधोरेखित होऊनही मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र हे अभयारण्य किंवा व्याघ्र प्रकल्प घोषित होऊ शकलेला नाही, वन्य जीवनक्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे नोव्हेंबर-२०१३ मध्ये वन विभागाचे तत्कालीन सचिव श्री. प्रवीणसिंह परदेशी यांनी या क्षेत्राला भेट दिली होती, त्यानंतर मे २०१४ मध्ये शासनाने यावन क्षेत्राला मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र घोषित केले, परंतु हे प्रयत्न अतिशय तोकडे ठरले आहे,त्यामुळे केवळ मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रच नव्हे तर यावल आणि आनेर अभयारण्य त्याचप्रमाणे अंबाबरुआ- ज्ञानगंगा- आणि गौताळा यासर्ववनक्षेत्राच्या विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे, या अनुषंगाने काही उपयायोजना सुचविण्यात येत आहे .
- अल्पकालीन उपाययोजना:
- वन हक्क कायद्यातील तरतुदीनुसार डोलरखेडा वनक्षेत्रा सक्रिटिकल वाइल्ड लाईफ हॅबीटॅट (धोका ग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र )घोषित करण्याची प्रक्रिया सुमारे एक वर्षापासून सुरू झाली आहे, याअनुषंगानेमा. उपवनसंरक्षक जळगाव, वन विभाग यांनी समितीसुद्धा गठीत केलेली आहे, परंतु अद्याप यासमितीची बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे सदर प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही, तरी या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे, वास्तविकत: सदर प्रक्रिया अत्यंत सुलभ असून, कोणत्याही प्रकारची गुंतागुंत नसल्यामुळे मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रास धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र म्हणून मान्यता मिळू शकते, त्यामुळे या वनक्षेत्रातील वाघांना कायदेशीर अस्तित्व प्राप्त होऊ शकते. या पार्श्वभूमीवर डोलारखेडा ग्रामसभेने ठराव सुद्धा केलेला आहे,
- महाराष्ट्र राज्याने अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पातील आणि बफर क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी जन-वन योजना कार्यान्वित केलेली आहे, या योजनेच्या अंतर्गत दिनांक २०-०२-२०१९रोजी झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रातील गावांचा समावेश करण्यात आला आहे, या अनुषंगाने प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे, त्यामुळे व्याघ्र संवर्धनाच्या प्रक्रियेमध्ये लोकसहभाग वाढवता येईल आणि गावांचा विकासही होईल.
- मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राचा विकास आराखडा जळगाव वनविभागाच्या वतीने शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे, सदर आराखड्यानुसार निधी मंजूर झाल्यास संवर्धनाच्या कार्याला गती प्राप्त होईल. वढोदा वनक्षेत्रात खूप चांगल्याप्रकारचे वन्यजीवन असूनही, येथे निधीची कमतरता, प्रशिक्षित कर्मचार्यांचा अभाव सातत्याने जाणवत असतो, त्यामुळे शिकारी, तस्करी, वनजमिनीवरील आक्रमणे, तसेच शेळ्या-मेंढ्यांनी वनक्षेत्र कायम व्यापलेले असते. वनक्षेत्राचे व्यवस्थित व्यवस्थापन न झाल्यामुळे रानतुळस आणि तरोट्या सारख्या विध्वंसक वनस्पती जंगलात फोपावल्या आहेत, त्यांच्यामुळे गवताळ क्षेत्राचा विकास होऊ शकला नाही त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, परिणामतः येथील वाघांना गावातील गुरांवर अवलंबून रहावे लागते, वास्तविकता हरणांच्या विविध प्रजाती, नीलगाई, रानडुकरे, रानगवेई. वन्य प्राण्यांचा अधिवास मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्रात आढळून आला आहे परंतु त्यांच्या संवर्धनाची सर्वंकष योजना निधी अभावी हाती घेता येत नाही, त्यामुळे मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राचा आराखडा नव्याने तयार करून (अद्ययावत करून) तातडीने मंजूर करण्यात येणे आवश्यक आहे.
- डोलरखेडा वनक्षेत्राच्या मधोमध २०० एकर जमीन १९ शेतकऱ्यांची आहे, या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन आपली शेती कसावी लागत आहे, सदर शेतजमीनजर CA (Ccompensatory Afforestation) अंतर्गत खरेदी करण्यात आली, तर शेतकऱ्यांना आपल्या जमीनीचा योग्य मोबदला मिळेल, आणि वाघांसाठी विस्तृत क्षेत्र उपलब्ध होईल, या योजनेस स्थानिक शेतकऱ्यांनी अनुकूलता दर्शवली असून गृप ग्रामपंचायत सुकळी (डोलारखेडा) यांनी तसा ठरावही केलेला आहे, सदर ठरावाची प्रत आणि याविषयीचे स्वतंत्र पत्र तसेच केंद्र आणि महाराष्ट्र शासना सोबत झालेला पत्र व्यवहार आपणाकडे सादर केलेला आहे.
- दीर्घकालीन उपाय योजना:
- वढोदा वनक्षेत्र व्याघ्रसंवर्धन आणि संचार मार्गाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण केंद्र असून वन्य प्राण्यांचा हा शाश्वत मार्ग आहे. प्रजननाच्या दृष्टीने सुद्धा या वनक्षेत्रातील परिसर अतिशय अनुकूल मानला जातो. मेळघाटातील वाघांचाही या क्षेत्रात कायम वावर राहिला आहे. तसेच, या क्षेत्रातील वाघ पुढे रावेर वनविभाग, यावल वनविभाग मार्गे यावल अभयारण्यमध्ये ही संचार करीत असतात हेही पुराव्यां निशी सिद्ध झाले आहे, याच मार्गाने पुढे आनेर, तोरणमाळ आणि गुजरात मधील शूल्पानेश्वर पर्यंत वाघ जाऊ शकतात, हे सिद्ध झाले आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे मुक्ताईनगर बोदवड आणि जामनेर मार्गे हे क्षेत्र पुढे गौताळा अभयारण्याशी जोडले जाते, यावरून मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते. या पार्शवभूमीवर २०१३ मध्ये जळगाव जिल्ह्यातील तिन्ही वनविभागांच्या वतीने मेळघाट ते अनेर डॅम अभयारण्यपर्यंत व्याघ्रसंचार मार्ग विकसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही,.
२.मुक्ताई भवानी संवर्धन क्षेत्र (वढोदा वनक्षेत्र) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राशी जोडले जाणे हा अतिशय चांगला सुवर्ण मध्य ठरणार आहे, कारण बफर क्षेत्रातील कोणत्याही गावांचे पुनर्वसन केली जात नाही, त्याच प्रमाणे शेत जमिनींनाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, (अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पाच्या सूचनेला स्थानिक लोक प्रतिनिधींनी कायम टोकाचा विरोध दर्शविला आहे) उलट व्याघ्र प्रकल्पातील अनेक योजना या क्षेत्रात कार्यान्वित होतील तसेच रोजगाराच्या आणि पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रांमध्ये मेळघाट अभयारण्य, गुनामल राष्ट्रीय उद्यान, नरनाळा अभयारण्य, वान अभयारण्य, अंबाबरूवा अभयारण्य यांचा समावेश असून, एकूण १२६८ चौरस किलोमीटरचे एकूण बफर क्षेत्र आहे. अंबाबरूवा अभयारण्यातील जळगाव जामोद वनक्षेत्र पर्यंत, म्हणजेचवढोदावनक्षेत्रपासूनअवघ्याकाहीकिलोमीटरअंतरापर्यंतमेळघाटव्याघ्रप्रकल्पाचेबफरक्षेत्रआहे,
3.मुक्ताईभवानीसंवर्धनक्षेत्रालाअभयारण्यघोषितकरण्याविषयीवेळोवेळीमागणीकरण्यातआलेलीआहे, सदरक्षेत्रअभयारण्यझाल्यासयावलअभयारण्याशीसुद्धाजोडतायेईल, त्यामुळेयाक्षेत्रातीलवन्यजीवाचेनियोजनबद्धसंवर्धनआणिसंरक्षणकरतायेईल, म्हणुनअभयारण्यनिर्मितीच्यादृष्टीनेआपणकृपयाशिफारसकरावी.
- यावल अभयारण्याचे सध्याचे क्षेत्र १७७ चौ.कि.मी. आहे. या क्षेत्राचा विस्तार आणि विकास आवश्यक आहे. यावल पूर्व आणि पश्चिम मधील काही कम्पार्टमेंट जोडून यावल अभयारण्याची पुनर्रचना करण्यात यावी. कारण अभयारण्य आणि आसपासच्या क्षेत्रात चार वाघांचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे आता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि आदिवासी विकास मंत्रालयाने वनहक्क कायद्याच्या तरतुदीनुसार अभयारण्यांना धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र घोषित करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. या अनुषंगाने मंत्रालयाने दि ६ मार्च २०१८ रोजी नव्या मार्गदर्शक सूचना आणि नोटिफीकेशन जारी केले आहे, त्यामुळे यावलला धोकाग्रस्त अधिवास क्षेत्र आणि धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया सुरु करणे आवश्यक आहे.
- यावल आणि डोलारखेडा या दोन अभयारण्यांच्या निर्मिती नंतर एकत्रित पणे व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात यावी, यावल आणि डोलारखेड्यात गाभाक्षेत्र (Core Zone) निर्माण करून सर्व सभोवतालच्या वनक्षेत्रात आणि गावांमध्ये Buffer Zone निर्माण करून या गावांच्या आणि तेथील लोकांच्या सर्वंकष विकासाची योजना आखण्यात यावी.
या सर्व उपाययोजनांचाविचार शासकीयआणि अशासकीयस्तरावर विचार करून सर्वंकष योजना आणि आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे तरच व्याघ्र संवर्धनाच्या प्रक्रियेला खानदेशात आणि पश्चिम सातपुड्यात गती मिळेल आणिपर्यटन विकास आणि स्थानिक लोकांनारोजगार उपलब्ध होऊन ताडोबा नंतर जळगाव जिल्हाही व्याघ्र संवर्धनात जगाच्या नकाश्यावर येईल आणि ज्याप्रमाणे भारतात सर्वत्र वाघांची संख्या वाढत आहे , त्याचप्रमाणे पश्चिम सातपुड्यातही वाघांचीसंख्यावाढू शकेल,आणि हेच वाघ पुढे गुजरात आणि सह्याद्रीत जातील…. स्वाभाविकपणे येथील वनक्षेत्र पुन्हा एकदा समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करतील,ही एक राष्ट्रीय आवश्यकता आहे .
राजेंद्र नन्नवरे
कार्यकारी संचालक, पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळा, जळगाव
९८२३१०६६६३.