मुंबई : “जिकडे-तिकडे चोहीकडे, पाणीच पाणी सगळीकडे” अशी स्थिती सध्या फक्त राज्यातच नव्हे तर देशभरातही सर्वत्र आहे. राज्यात शुक्रवार, 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचे अस्मानी संकट कायम राहणार आहे. नाशिक, पुण्यासह सात जिल्ह्यात “रेड ॲलर्ट” जारी करण्यात आला आहे. मुंबईसह सहा जिल्ह्यात गुरुवार, 14 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. जून महिन्यातील तूट भरून काढत राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. राज्यात काही ठिकाणी भूस्खलन, तसेच दरड कोसळल्याच्या घटना घडल्या असून अनेक रस्तेही रहदारीसाठी बंद आहेत. राज्यात आतापर्यंत पावसाने 100 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे, देशातील 25 राज्यातही धुवां”धार” सुरू आहे. राज्यासह देशातील अनेक नद्या क्षमतेहून अधिक पातळीवरून वाहत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक शहरे पाण्यात बुडाली आहेत.
राज्यात सर्वत्र का कोसळतोय पाऊस?
गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत सध्या द्रोणीय स्थिती कायम आहे. यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणावर बाष्प महाराष्ट्राच्या भूभागाकडे येत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर होता. आता बंगालच्या उपसागरात ओडिसाजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भासह झारखंड, मध्य प्रदेशात पाऊस वाढला आहे. अरबी समुद्राच्या बाजूनेही पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणिय स्थितीचा परिणाम होऊन कोकण किनारपट्टीसह सध्या गुजरात, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तेलंगणा,आसाम, मिझोराम, तमिळनाडू आदी भागांतही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांत मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे.
AGROWORLD’s Upcoming Exhibitions @ JALGAON, @ NASHIK, @ SHAHADA….
कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज
हवामान खात्याने (आयएमडी) येत्या 15 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. “आयएमडी”ने पुढील दोन दिवसांसाठी, या दोन विभागांसह, सहा जिल्ह्यांत ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारासह सात जिल्ह्यांत रेड ॲलर्ट जारी केला आहे. मुंबईतही समुद्राला जोरदार उधाण येण्याची शक्यता आहे. तिथेही भरती-ओहोटीच्या खेळात उंच लाटांचा (हाय टाईड) इशारा देण्यात आला आहे. आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. मुंबई, कोकणसह किनारी भागात नागरिकांना समुद्रकिनारी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
नाशिक, नागपूर जिल्ह्यांना मुसळधारेचा सर्वाधिक फटका
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसाने राज्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून, पात्रे ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे. दुसरीकडे, धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून अनेक प्रमुख धरणातून पूर्ण क्षमेतेने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोकण, मुंबईनंतर आता नाशिक आणि नागपूर जिल्ह्यांना मुसळधारेचा सर्वाधिक फटका बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यात नदीच्या काठावरची अनेक घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. गडचिरोली आणि अकोला जिल्ह्यातही पावसाने कहर केला आहे. हिंगोलीतही ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. खान्देशातील धुळे जिल्ह्यात पांझरा-कान तर जळगावातील तापी-पूर्णा नद्यांना मोठा पूर आला आहे. हतनूर, गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा, कोयना दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने कोल्हापूर, सांगली शहरे पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
अॅग्रोवर्ल्ड.. आता “युट्युब” वरही..! 🌱
जूनमध्ये रुसलेल्या पावसाने सर्व कसर भरून काढली
जून महिन्यात रुसलेला पाऊस जुलैच्या पूर्वार्धात मनसोक्त बरसत असल्याने राज्यातील खरीपाच्या रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत; पण अतिवृष्टीमुळे अनेक भागात आता पीके धोक्यात आली असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका आहे. दुसरीकडे, या पावसाने महाराष्ट्रातील महिनाभरातील पावसाची कमतरता पुसून टाकली असून, चारही उपविभागांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान नोंदविले गेले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 1 जून ते 10 जुलै पर्यंत, कोकण-गोव्यात 20%, मध्य महाराष्ट्रात 3%, विदर्भात 8% आणि मराठवाड्यात 20% जास्त पाऊस झाला आहे, जो या हंगामात सरासरीपेक्षा 43% जास्त आहे.
राज्यातील तीन विभागात अतिवृष्टीची शक्यता
आयएमडी, पुण्याचे हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांतील पावसाने पर्जन्यमानाची टक्केवारी आणखी वाढली आहे. कोकणात 21%, मध्य महाराष्ट्रात 12%, विदर्भात 15% आणि मराठवाड्यात 43% जास्त पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील अतिरिक्त पावसाची टक्केवारी 3 वरून 12 वर आणि विदर्भाची 8 वरून 15 वर गेली आहे. हवामान खात्याच्या निकषानुसार, जेव्हा एखाद्या उपविभागात सामान्य सरासरीपेक्षा 20% ते 59% अधिक नोंद होते, तेव्हा तो जास्त पाऊस (अतिवृष्टी) मानला जातो. उणे 19% ते +19% पाऊस हा तसा सामान्यच मानला जातो. महाराष्ट्रातील चार विभागांपैकी, कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भ या तीन विभागात अतिवृष्टीच्या श्रेणीहून अतिरिक्त पावसाचा अंदाज असून येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रातही तसाच अनुभव येईल.”
Comments 2