पुणे (प्रतिनिधी) दि.१६: – राज्यातील कृषी विद्यापीठांनी महत्वपूर्ण संशोधन केले असून कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यात विद्यापीठांचे महत्वाचे योगदान आहे. त्याच धर्तीवर राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
शिवाजीनगर येथील उद्यानविद्या महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्यावतीने राज्यातील कृषी विज्ञान केंद्राची आढावा बैठक कृषीमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृषी परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर, कृषी आयुक्त धीरजकुमार, कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. रावसाहेब भागडे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांतकुमार पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे, कृषी परिषदेचे संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के, डॉ. हरिहर कोसडीकर आदी उपस्थित होते.
2022-23 असणार ‘मिलेट इअर’..
कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांसोबतच कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र यांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. राज्यातील अनेक कृषी विज्ञाने केंद्राचे काम चांगले आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्राचा उल्लेख करून याप्रमाणे इतर कृषी विज्ञान केंद्रांनी नाविन्यपूर्ण काम करावे, असे त्यांनी सांगितले. शेती संदर्भात विविध प्रशिक्षणाचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहीजे. प्रशिक्षित नागरिकाला योजनेचा लाभ देत त्याला सक्षमपणे उभे करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कृषी विज्ञान केंद्राचा सहभागही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. देशपातळीवर २०२२-२३ हे वर्ष ‘मिलेट इअर’ म्हणून साजरे करण्यात येणार असल्याचेही श्री. भुसे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केव्हीकेनी काम करावे – आबिटकर
श्री. आबिटकर म्हणाले, कृषी विद्यापिठे, कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र यांची एकत्रित सांगड झाली तर शेती क्षेत्रात अधिक चांगले काम होईल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांनी काम करावे. संशोधन व विस्तारासोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात कृषी विज्ञान केंद्राचे काम महत्वाचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक डॉ. कोकाटे म्हणाले, राज्यातील कृषी विज्ञान केंद्राचे बळकटीकरण अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. कृषी विज्ञान केंद्रांनी ‘मॉडेल फार्म’ तयार करावे, अशी सूचना त्यांनी केली.
बैठकीत राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालक यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या कामकाजाबाबत सादरीकरण केले. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.