भारतीय देशी गायी
डांगी (महाराष्ट्र)
महाराष्ट्रामध्ये नाशिक व ठाणे ह्या जिल्ह्यांतील पर्वतरांगामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो व पर्जन्यकाळ हा जास्त कालावधीचा आहे अशा ठिकाणी शेतीमधील काम समर्थपणे करणारा गोवंश म्हणजे डांगी गोवंश होय. दुर्गम डोंगरात जाऊन चरुन येणे, मोठ्या पावसामध्ये शेतीची कामे करणे, भातलावणीचे वेळी रेड्यांप्रमाणे उत्तम चिखलणी करणे ही या गोवंशाच्या बैलांची खास वैशिष्टये आहेत. या गोवंशाला डांगी हे नाव डांग पर्वतरांगामधील गाय ह्या वरून पडल्याचे सांगितले जाते. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कवळण व या जिल्ह्यातील पश्चिमेकडील प्रदेश; तसेच ठाणे जिलह्यातील पुर्वेकडील तालुक्यांमध्ये आणि अहमदनगर जिलह्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्यांचे जवळील प्रदेशामध्ये हा गोवंश चांगल्या पद्धतीने सांभाळला जातो व विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो.
वैशिष्ट्ये- स्थानिक निसर्गाशी जुळवून घेणारा वंश असल्याने हा गोवंश लहानसर हे मध्यम ठेवणीचा आहे. ह्या गोवंशाच्या कातडीखाली तैलग्रंथीचा हलका स्तर असतो. ह्यामुळे मोठ्या पावसामध्ये गायी/बैल भिजले तरीही पाणी अंगात मुरत नाही व आजारपण येत नाही. हे सर्वात मोठे नैसर्गिक वरदान या गोवंशाला प्राप्त आहे. हा गोवंश काळ्या रंगावर पांढरे ठिपके, पांढर्या रंगावर काळे ठिपके अशा संमीश्र रंगाचा असतो. ह्या रंगाच्या मिश्रणानुरुप स्थानिक परिभाषेत सहा प्रकारे संबोधला जातो 1) काळाबाळा 2) पांढराबाळा 3) मणेरी 4) लालबाळा 5) लाला 6) बाळा.
या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय सर्वसाधारणपणे 36 ते 44 महिन्यांचे असते. विशेष मेहनत घेतलेल्या कालवडी 30 ते 32 महिन्यांच्या माजावर येऊन गाभण राहिल्याच्या गोशाळांमध्ये नोंदी आहेत. या गायींचे दोन वेतांमधील अंतर 20 ते 24 महिन्यांपर्यंत आहे; तसेच संपूर्णत: भाकडकाळ 9 ते 10 महिन्यांच्या सुद्धा असू शकतो. या गोवंशाच्या गायी उत्तमप्रकारे चरून आल्यावर नगदी खाणे ( पेंड, भूस इ.) नसले तरीही दिवसाकाळी 3 ते 4 लिटर दूध सहज देतात. या गायींच्या दुधामधील स्निग्धांशाचे प्रमाण 3 ते 3.5% पर्यंत असते. या गोवंशापासून संकर केलेल्या जर्सी/होल्स्टीन 50% पर्यंतच्या कालवडी उत्तम गुणवत्तेच्या व दुधाळ सिद्ध झाल्या आहेत तसेच 50% संकरीत खोंडे सुद्धा शेतीकामात उत्तम काम करतात. वयाची 4 वर्षे पूर्ण झाली की खोंडे शेतीकामासाटी योग्य ठरतात. या गोवंशाचे बैल एकजागी उत्तम जपणुकीवर 15 ते 16 वर्षे उत्तम काम करतात तसेच गायींची उत्तम मेहनतीवर 8 ते 10 वेमी सहज होतात. या गोवंशावर नाशिक व ठाणे जिल्ह्यांमध्ये सरकारी गोशाळा किंवा खाजगी गोशाळांमध्ये चांगल्या प्रकारे उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने संशोधनात्मक प्रयत्न चालू आहेत. डांगी गोवंश हा सह्याद्री पर्वतरांगामधील शेतकर्यांचेसाठी वरदान ठरलेला असा गोवंश आहे.
देवणी (महाराष्ट्र)
भारतीय गोवंशामधील दुहेरी उपयुक्तता असलेले जे गोवंश आहेत, त्यामध्ये अत्यंत देखणा, विविध स्तरांवरील प्रदर्शनांमध्ये मानांकन सिद्ध करणारा गोवंश म्हणजे देवणी गोवंश आहे. ह्या गोवंशाला मराठवाडा भुषण अशी बिरुदावली सुद्धा प्राप्त झाली आहे. विदेशी संकर केल्यास उत्तम दुधाच्या गायी देणारा, दुग्धोत्पादन व शेतीकाम यांमध्ये समान उपयुक्ततेचा व दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये समर्थपणे तोंड देणारा असा हा गोवंश आहे. सुमारे 200 वर्षापूर्वी डांगी व गीर गोवंशाच्या संकरामधून मराठवाड्यात हा मदेवणीफ गोवंश उदयास आला. आपल्या महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, चाकूर, शिरूर अनंतपाळ, हरंगूळ, देवणी, निलंगा, अहमदपूर येथे तसेच मोठ्या प्रमाणांवर उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बिड या जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात खास हौशीने विक्रीसाठी पैदास करणारे शेतकरी आहेत.
वैशिष्ट्ये- या गोवंशाच्या गायी मध्यम आकाराच्या व आपोटशीर बांधण्याच्या असतात. गायींच्या मूळ रंग पांढरा व त्यावर काळ्या रंगाचे अनियमित आकाराचे पट्टे (ठिपके) येतात. गायींच्या कातडीला विलक्षण अशी देखणी चमक असते; त्वचा अत्यंत मऊ असते आणि कातडी शारीराला घट्ट चिकटलेली असते. या गोवंशाच्या कपाळाची ठेवण भरदार व नजरेत भरणारी असते, शिंगे मागाहून बाहेरच्या बाजूस येणारी बाकदार व दंडगोलाकृती असतात, शिंगाचा रंग काळा असतो, डोळे लांबट व अंडाकृती असतात, पापण्या संपूर्णपणे काळ्या असतात. बैलांच्या नजरेत जरब असते व कायम रोखून बघण्याची सवय असते. या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर येण्याची वय सर्वसाधारणपणे 30 ते 35 महिन्यांपर्यंत असते. परंतु उत्तम मेहनतीवर 24 ते 27 महिन्यांपर्यंत माजावर येऊन गाभण राहिल्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. ऐन दुधाच्या भरात दिवसाकाठी 6 ते 7 लिटर दूध सहज देतात, दूध सलगपणे विनातक्रार अंत 18 ते 21 महिने देतात. या गायींचे दोन वेतांमधील अंतर 18 ते 21 महिन्यांचे असते; दोन वेतांमधील भाकडकाळ हा 4 ते 6 महिन्यांचा असू शकतो. दुधाला सरासरी फॅट 3.5 ते 4.5 लागते. या जातीचा उत्तम बैल जोडीची किंमत रु. 1.50 लाखापर्यंत तर चांगल्या गायीची किंमत रु. 35 ते 40 हजारापर्यंत असते.
खिल्लार (महाराष्ट्र)
भारतीय गोवंशामध्ये अत्यंत चपळ, अत्यंत काटक व अत्यंत देखणा तसाच सर्वात जास्त किमतीचा गोवंश म्हणजे खिल्लार गोवंश होय. या गोवंशाला मपांढरे सोनेफ संबोधणे हेच उचीत ठरते. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी सर्वत्र तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण व पुर्वेकडील भाग तसेच कोकण व मराठवाड्यामध्ये काही प्रमाणात हा गोवंश वापरला जातो. आपल्या महाराष्ट्राच्या लगतच्या कर्नाटकातील सीमा भागत व गोवंशाची मोठ्या प्रमाणावर पैदास केली जाते. (या गोवंशाच्या भौगोलिक रचनेनुसार काही पोटजाती निर्माण झाल्या आहेत. उदा. माणदेशी खिल्लार, कर्नाटकी खिल्लार, पंढरपूरी खिल्लार, नकली खिल्लार अशा आहेत.
वैशिष्ट्ये- या गोवंशाचा रंग प्रामुख्याने चमकदार पांढरा असतो, म्हैसूरी खिल्लार आणि नकली खिल्लार यांचे मध्ये रंग काही वेळा कोसा किंवा जांभळट कोसा छटेचा येतो.
या गायींचे प्रथम वेताचे वय 40 ते 50 महिन्यांचे दरम्यान असते, दोन वेतांमधील अंतर 18 ते 24 महिन्यापर्यंत असते, एका वेतामध्ये सलग 8 ते 10 महिन्यांपर्यंत दूध देतात. व्यायल्यानंतर दिवसाकाठी 3 ते 4 लिटर दूध देतात. वासरु दिवसभर गायीबरोबर मोकळे असल्यास या गायी 5 ते 6 वेळा चांगल्या पान्हवतात व दूध पाजतात. या गायींचा माजाचा कालावधी 6 ते 8 तासांचा असतो. या गोवंशाचे बैल शेतीकामासाठी व ओढकामासाठी ताकदवान असल्याने प्रसिद्ध आहेत; तसेच शर्यतीसाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. वयाच्या 3 ते 6 वर्षापर्यंत शर्यतीसाठी व हलक्या कामासाठी धरतात. बैल दाती जुळला की लगेच रक्तीकरण करावे म्हणजे अंगात भरतो देखील चांगला. मारकेपणा कमी होतो व मोठ्या कामांना धरता येतो.
तापटपणा मुळेच काम रागारागाने झटपट करतात. या गायींची किंमत अंदाजे 30 ते 40 हजारापर्यंत असेत तसेच चारदाती खोंडाची किंमत 60 ते 75 हजारापर्यंत आहे व नवथर बढीव बैलाची किंमत रु 40 हजारापर्यंत सहज असते. या गोवंशाच्य खरेदी विक्रीसाठी पुढील बाजार प्रसिद्ध आहेत. पुणे, जिल्ह्यातील चाकण, सांगली जिल्ह्यामधील खरसुंडी, कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, सातारा जिल्ह्यामधील सर्व महत्त्वाच्या देवांच्या यात्रा, सोलापूर जिल्ह्यातील सिद्वेश्वराची यात्रा विशेष प्रसिद्ध आहेत. हा गोवंश अनेक गुणांनी परीपूर्ण असल्याने ग्रामीण लेखकांनी, कवींनी तसेच ग्रामीण चित्रपटांमध्ये ही कौतुक केलेला असा गोवंश आहे. काहीह झाले तरी चालेल एकदा तरी दारात खिल्लार जोडी असावी हे प्रत्येक शेतक-याचे एक स्वप्न असते.
लाल कंधारी (मराठवाडा)
मराठवाड्यामध्ये सातत्याने पडणार्या दुष्काळात तसेच तीव्र उन्हाळ्यामध्ये सुद्धा तग धरुन राहणारा आणि सर्वसाधारण मेहनतीवर जास्त काळ दूध देणारा तसेच राष्ट्रीय स्तरांवरील पशुप्रदर्शनांमध्ये अग्र मानांकने मिळवणारा गोवंश म्हणून फक्त लालकंधारी गोवंशाचीच ओळख आहे. शेतीमधील कामे नेटाने व चपळाईने करणे यासाठी हा गोवंश प्रसिद्ध आहे; नांदेड जिल्ह्यातील कंधार, मुखेड, नांदेड, बिलोली आणि नायगाव या तालुक्यांमध्ये तसेच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर, शिरूर अनंतपाळ औसा, उदगीर आणि बीड जिल्ह्यामधील परळी व हिंगोली या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर हौसेने या गोवंशाची पैदास करतात व विक्री देखील करतात.
वैशिष्ट्ये- या गोवंशाच्या गायी मध्यम आकारामानाच्या व आटोपशीर असतात. या गायीचा रंग किंचीत लालसर फिकटसर छटा ते लालसर गडद छटा यांमधील विविध छटांमध्ये असतो. या गायींमध्ये अन्य कोणत्याही रंगाचा ठिपका किंवा पट्टा नसतो. या गायींचे मस्तक कानाच्या वरच्या बाजूला किंचीत आत गेलेले व मध्यभागी फुगीर असते, शिंगे कधीही कोचर नसतात बाहेरच्या बाजूला निघालेली फुगीर काळी किंवा लालसर काळी असतात, कान पसरट आखूड व टोकाला गोलाकार असतात तसेच जमिनीला समांतर असतात. नाकपुडी संपुर्णत: काळी, जबडा चेहर्याच्या मानाने किंचीत रुंद असतो, डोळे टपोरे तेजस्वी काळेभोर व अत्यंत बोलके असतात, डोळ्या भोवती काळ्या रंगाचे आकर्षक वर्तुळ असते. पाय शरीराच्या मानाने उंच व भक्कम असतात, खूर काळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे परंतु जरा विलग असतात, पाठ सपाट व मागील चौक उताराचे असतात, या गायींची कास आटोपशीर आणि शरीराबाहेर किंचीत दिसणारी असते. चारही सड (आचळ) लहानसर व गुलाबी असतात, बहुतेक गायी व मेणकासी असतात. शेपूट लांबलचक मागच्या नखीपर्यंत पोचणारी असते, शेपूट गोंडा काळा असतो, या बेलांचे वशिंड गडद कालसर छटेचे देखणे व भरदार असते. पूर्ण वाढ झालेल्या बहलाचे वजन 400 ते 450 कि.ग्रॅ पर्यंत तर गायीचे वजन 300 ते 350 कि.ग्रॅ. पर्यंत असू शकते.
या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजावर कालावधी फक्त 8 ते 10 तासांचा असतो त्यामुळे माज लक्षात येताच त्वरीत संकर घडवून आणावा. ऐन दूध देण्याच्या भरामध्ये दिवसाकाठी 4 ते 5 लिटर लूध सहज देतात, परंतु सलग दूध देण्याचा कालावधी 10 ते 12 महिन्यापर्यंतचा आहे. नवजात वारसाचे वजन 12 ते 15 कि.ग्रॅ. असते पण या वासरांचा वाढीचा वेग विलक्षण असतो. दुधातील स्निग्धतेचे प्रमाण 3.50 ते 4.00 पर्यंत असते. दोन वेतांमधील अंतर 18 ते 20 महिन्यापर्यंत असते व संपूर्णत: भाकड कालावधी 120 ते 180 दिवसापर्यंत असू शकतो.
खिलारी गोवंशा खालोखाल या बैलांमध्ये चपळाई असते. या गायी एकाजागी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यावर 10 ते 12 वेणी सहज देतात तसेच 18 ते 20 वर्षे बैल उत्तम पद्धतीने काम करतात ह्या गोवंशांमध्ये मारेकपण सहसा नसतो. आपल्या मराठवाड्यातील मु.पो. मावलगाव येथील प्रगतीशील शेतकरी व निष्ठावान गोसेवक श्री. शरद पाटील ह्यांना ह्या गोवंशाचे संवर्धनाबद्दल केंद्र शासनाचा बाबू जगजीवन राम किसान पुरस्कार प्राप्त झाला आहे. ह्या जातीच्या उत्तम बैलजोडीची किंमत रु. 1.50 लाखापर्यंत तर उत्तम गायीची किंमत 35 ते 40 हजारापर्यंत आहे. कंधारी बैलजोडी दारात असणे ही मराठवाड्यामधील शेतक-याचे दृष्टीने भूषणाची गोष्ट आहे.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
सवाई मुकटी