बँक व शासनाच्या समन्वयातून फुलशेतीमधून मिळविले हेक्टरी १८ लाखाचे उत्पन्न.
स्टोरी आऊटलुक
पारंपारिक शेतीकडून फुलशेतीचीकडे यशस्वी प्रवास.
वयाच्या पन्नाशीनंतर नवीन मार्ग मिळाला.
पॉलीहाऊसमधील यशस्वी जरबेरा उत्पादन.
८ वर्षात ६३ लाख रु कर्ज, आजपर्यंत ५० लाख रु परतफेड.
एकत्र कुटुंबामुळे शून्य मजुरी खर्च.
बँक व शासन यांच्या योजना प्रभावी राबविल्या.
नोकरीमध्ये साधारणपणे ५८ ते ६० वर्ष वय हे निवृत्तीचे आहे. परंतु शेतकरी कधीही निवृत्त होत नाही तो वयाच्या कोणत्याही वाटेवर एक नवीन सुरुवात करू शकतो. अशीच एक सुरुवात ६० वर्ष वय असणाऱ्या विठ्ठल नारायण भोईटे यांच्या आयुष्यात झाली आहे. आयुष्यभर पारंपारिक शेतीतून जेमतेम उदरनिर्वाहासाठी धडपड करणाऱ्या भोईटे यांनी जरबेरा फुल शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल करून तरुण पिढीसमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. एक हेक्टर क्षेत्रामध्ये उभे केलेल्या ५ पॉलीहाऊसमधून जरबेरा फुलांच्या उत्पादनातून ८ वर्षात घेतलेल्या एकूण कर्जापैकी (६३ लाख रुपये) ५० लाख रुपये परतफेड करून निव्वळ नफा १९ लाख ५० हजार मिळवण्याची किमया पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील आर्वी या गावातील ६० वर्षीय शेतकऱ्याने केली आहे.
पुणे
जिल्ह्यातील हवेली तालुक्यात असलेले सुमारे ३००० लोकसंख्येचे आर्वी हे गाव असून, गावालगतच
खेड शिवापूर औद्योगिक क्षेत्र विकसित झालेले आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी
आपल्या जमिनी उद्योगधंदे उभारण्यासाठी दिल्या आहेत. गावाच्या एका बाजूस सह्याद्री
पर्वताची उपरांग कोलखिंड आहे. याच्या पायथ्याशी आर्वी गावचे शेतकरी विठ्ठल नारायण
भोईटे वय ६० वर्ष हे राहतात. त्यांचे शिक्षण जुन्या काळातील मॅट्रीक (एस. एस. सी.)
पर्यंत झालेले आहे. त्यांची वडिलोपार्जित २ हेक्टर ५८ आर. जमिन असून, त्यातील
डोंगर उताराची जवळपास एक एकरपेक्षा जास्त जमिन पडित आहे. शेतीस कायमस्वरुपी
पाणीपुरवठा नसल्यामुळे ते पारंपारिक पिके ज्वारी, गहु, वाटाणा,
घेवडा
व इतर हंगामी भाजीपाला अशी पिके घेत असत. त्यातून त्यांचा जमेतेम उदरनिर्वाह होत
असे. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. पत्नी व तीन मुले अशी ६ माणसे घरात होती.
पण तुटपुंज्या कमाईवर त्यांनी मुलांना अनुक्रमे १२ पर्यंत शिक्षण देऊन
एमआयडीसीमध्ये नोकरी लावून दिली. २००६ मध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या (कृषी
विभाग) जवाहर विहिर योजनेचा फायदा घेऊन ४० फूट खोल विहिर खोदली. त्यास पाणीही
लागले. २० फूटावरच पाणी लागले. पण उन्हाळ्यात ते कमी पडत होते. म्हणून २००७/०८
मध्ये १८ बाय २० बाय ६ मिटरचे शेततळे घेतले. त्यातून मग गहू उत्पादनाबरोबर
भाजीपाला उत्पादन सुरू केले. तरीही उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागले. म्हणून २००८-०९
मध्ये ३० बाय ४१ बाय ६ मिटरचे दुसरे शेततळे शासनाच्या योजनेतून घेतले. मुलांची लग्न
झाली. ३ सुना, ४ नातवंडे असा संसारवेल फुलला.
नाविन्याचा शोध
शेतातील उत्पन्न कमी असल्यामुळे मन रमत नव्हते. आर्वी गावातच पुण्यातील एका उद्योजकाने नवीन उद्योग उभारण्यासाठी जमीन घेतली होती. मोठा उद्योग उभा करण्यापूर्वी त्यांनी १० गुंठ्यांचे एक पॉलीहाऊस उभे करून तेथे जरबेरा उत्पादन सुरू केले होते. त्यांचे नाव बापूसाहेब अुवागड्डे (जैन) होते. त्यांच्याकडे विठ्ठल भोईटे यांचे जाणे- येणे होते. त्यातून जैन यांनी भोईटे यांना पॉलीहाऊससाठी संपूर्ण मार्गदर्शन करून मार्च- एप्रिलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरून दिला. तोपर्यंत वयाची पन्नाशी गाठली होती. येथून सुरू झाला शेतातून उत्पन्न घेण्याचा प्रवास. २०११ मध्ये पहिले पॉलीहाऊस २८ बाय ३६ मीटरचे उभे राहिले. यामध्ये बेड तयार करण्यासाठी सर्व शेड उभे करण्यासाठी पैशांची गरज होती. जैन यांच्या शिफारशीवरून कर्वेरोड येथील कॉर्पोरेशन बँकेने १२ लाख रुपये मंजूर केले.
जरबेरा शेती सुरुवात
घेतलेल्या कर्जातून शेड उभारणी सुरु झाली. ७५० रुपये स्क्वेअर मीटरप्रमाणे संपूर्ण शेडचा खर्च आला. नंतर त्यात ड्रीप, फीटर हा खर्च वेगळा. बेड तयार करण्यासाठी लाल माती १०० ब्रास (३० ट्रक) सासवडवरून आणली. या मातीमध्ये ३० ब्रास शेणखत, १ टन लिंबोळी पेंड, शिवाय बेसल डोस म्हणून सल्फेट, सम्राटची खते, ग्रॅनाईट व थिमेट मिसळून दीड ते दोन फुट उंचीचे व ३० सें. मी. अंतर दोन ओळीत ठेवून १ मीटर रुंदीचे बेड तयार केले. यासाठी १५ हजार रुपये खर्च बेड तयार करण्यासाठी आला. जरबेराची रोपे मांजीरी येथील के. एफ. रोपवाटिकेतून आणून बेडवर नागमोडी पद्धतीने (झिगझॅग) लावली. रोपांसाठी २८ ते ३२ रुपये प्रतिरोप खर्च झाला. महाराष्ट्रात जे ५ कलर चालतात. ते म्हणजे पांढरा, पिवळा, गुलाबी, वाणी कलर व लालबुंद त्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत. बॅलन, दानामिन, रोजालिन, इंटेक्स व स्टांजा. अशा पचाही प्रकारची रोप लागवड जून २०११ मध्ये केली. यासाठी बाहेरचे कामगार न लावता स्वतः जोडीसह, तीन मुले व तीन सुना अशा घरच्या एकूण ८ जणांनी दोन दिवसात रोपे लागवड केली. पहिली तोडणी गणपती उत्सवात (सप्टेंबर) मध्ये केले.
हंगामाचा श्रीगणेशा
पहिल्या वेळी फक्त १०० फुले मिळाली. म्हणजे १० फुलांचा एक बंच प्रमाणे १० गड्डी. पण दुसरे दिवसापासून फुलांची संख्या वाढू लागली. घरचेच सर्वजण सकाळी फुले तोडत (नोकरी करणारी मुले फुले तोडून नंतर कामाला जात.) १२ ते १४ सें. मी. आकाराचे फुल तोडावयाचे त्यांची लांबी दीड फुटापेक्षा कमी नसायची. अशा १० फुलांची एक गड्डी सायंकाळी ३ ते ४ इंचाच्या प्लॅस्टीक बॅगमध्ये ३ ठिकाणी रबर लावून पॅकिंग करावयाचे व एका कॅरेटमध्ये २० गड्डी ठेवून दुसऱ्या दिवशी गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये पाठवायचे. तेथे २० रुपयेपासून ते ८० रुपयांपर्यंत गड्डीप्रमाणे भाव मिळायचा. फुल तोडल्यानंतर ते ८ ते १० दिवस टिकते. गणपती उत्सव काळात ११० रुपये गड्डी असा सर्वोच्च भाव मिळाला. असे रोज ७/८ क्रेट मार्केटमध्ये विक्री होतात. फेब्रुवारी ते मे या काळात फुलांना मोठी मागणी असते व भावही चांगला मिळतो. सकाळी ६ वाजेपर्यंत मार्केट यार्डमध्ये फुले पाठविली जातात. बिट निघून १ वाजेपर्यंत संपूर्ण माल विक्री होतो. त्याच दिवशी पैसे मिळतात. पूर्वी दलालामार्फत विक्री होत होती. आता विठ्ठल भोईटे हे मार्केटचे सभासद झाले असून, स्वतः विक्री करतात…. त्यामुळे दलाली वाचली. २०११ मध्ये सर्व खर्च, बँक हप्ता वजा जाता ७ लाख रुपये निव्वळ नफा राहिला. तर दुसऱ्या वर्षी ५ लाख रुपये नफा मिळाला. यातूनच २०१३ मध्ये दुसरे पॉलीहाऊस २८ बाय ४० मीटरचे उभे केले. त्यासाठी कॉर्पोरेशन बँकेने १४ लाख रुपये कर्ज दिले. तिसरे पॉलीहाऊससाठी त्याच बँकेने २०१६ मध्ये १२ लाख रुपये दिले. त्यातून २० बाय ५२ मिटरचे शेड उभे केले. २०१८ मध्ये दोन हप्त्यात २० बाय ५२ मीटर व २० बाय ७६ मीटरचे असे दोन पॉलीहाऊस उभे केले. यासाठी इको बँकेने २० लाख रुपये कर्ज दिले. असे एकूण ५८ गुंठ्यात ५ पॉलीहाऊस उभारलेले असून, एकूण कर्ज ६३ लाख रुपये घेतले. त्यापैकी २०१९ अखेरपर्यंत ५० लाख रुपये परतफेड झाली आहे.
उत्पन्न
या काळात २०११ मध्ये खर्च वजा जाता ७ लाख २०१२/१३ मध्ये ५ लाख, २०१४-१५ मध्ये ४.५० लाख, १६-१७ मध्ये ३ लाख, १८-१९ मध्ये आतापर्यंत ५ लाख रुपये एकूण २४ लाख ५० हजार रुपये नफा झाला आहे. या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरील कामगारांवर होणारा खर्च शुन्य आहे. सध्या दररोज किमान ५ हजार रुपये नगदी मिळतात. त्यामुळे घरचे सर्वजण आनंदी असून, ६ नातवंडांपैकी ३ नातवंडे इंग्रजी शाळेत तर ३ प्राथमिक शाळेत आहेत. ४ पॉलीहाऊसची सबसिडी मिळाली आहे. ५ व्या पॉलीहाऊसची सबसिडी मात्र मिळाली नाही. कारण एक एकरच्या पुढील क्षेत्रास एका शेतकऱ्यास ती मिळत नाही.
कीडरोग नियंत्रण
पॉलीहाऊसमधील फुलांवर सुहरा किड व
रोग अॅटॅक येतो. त्यात प्रामुख्याने मावा, नागअळी, तुडतुडे व
क्वचितच मर रोग प्रादुर्भाव होतो. त्यासाठी दर आठ दिवसाला एका शेडमध्ये ७५ ते ८०
पिवळे कार्ड (येलो ट्रप) लावले तर रोगनियंत्रणासाठी ड्रीपद्वारे व फॉगरद्वारे
सल्लागाराच्या सांगण्यानुसार औषधे सोडली जातात. त्यासाठी अविनाश कावडे यांची
नेमणूक केली असून, ते १५ दिवसाला एक वेळेस येतात व सर्व (५ ही)
पॉलीहाऊससाठी खते व औषधे यांचे नियोजन करून देतात.
कृषी अधिकारी श्रीमती सपना ठाकूर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आर्वी गाव व परिसरातील ४० शेतकऱ्यांना पॉलीहाऊस संदर्भात सर्व सहकार्य करून जरबेरा उत्पादक संघ उभा केला आहे. या लहानशा गावात ४५ पॉलीहाऊस आहेत. त्यांच्याकडेही बाहेरचा मजूर लावला जात नाही. विठ्ठल भोईटे यांच्यासह घरातील कोणालाच कोणतेही (तंबाखूसुद्धा) व्यसन नाही. त्यामुळे एकत्र कुटुंबात निरोगी व आनंदी वातावरण आहे. आता फुले मार्केटमध्ये पोचवण्यासाठी स्वतःचे वाहन आहे. (टेम्पो). दररोज ७ ते ८ क्रेट फुले मार्केटला जातात. या क्रेटमध्ये १०० गड्डी बसते. म्हणजे रोज ७ ते ८ हजार फुले मार्केटमध्ये जातात. भोईटे हे स्वतः फुल उत्पादक संघ शिवगंगा हायटेक शेती संघाचे सभासद असून, त्यांच्यामार्फत विविध योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विठ्ठल भोईटे म्हणतात, शेती परवडत नाही हे म्हणणे आळशी व अनुदान आधारीत शेतकऱ्यांना लागू पडते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करताना पाणी नियोजन व बाजार मागणी यांचा मेळ घालून स्वकष्टाने केलेली कोणतेही शेती फायद्याची ठरते. मात्र परंपरागत शेतीला जोडधंदा असला तरच शेती नुकसानीत जात नाही.
विठ्ठल भोईटे -९०११९२६९२४
शेतकरी कर्ज बुडवितात या बँकांच्या आरोपाला विठ्ठल नारायण भोईटे यांचे उदाहरण म्हणजे एक चपराकच आहे. त्यांनी ८ वर्षात ६३ लाख रु कर्ज घेऊन २०१९ अखेरपर्यंत ५० लाख रु परतफेड करत २४ लाख रु नफा अतिरक्त मिळविला आहे. त्यामुळे बँकांनी जर योग्य शेतकऱ्यांना मदत केली तर कोणताही शेतकरी हा कधीच कर्ज बुडवीत नाही. भोईटे यांनी देखील बँकांनी दिलेल्या सहकार्यास तडा जाऊ न देता वेळेवर कर्ज भरून बँक व शेतकरी यांच्यात विश्वासाचे नाते तयार केले आहे.