बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनला गती..
मुंबई (प्रतिनिधी) – मान्सूनचे भारताच्या दक्षिणेकडील भागात आगमन झाल्याने मान्सूनला वेग आला आहे. त्याने चेन्नई, चित्तूर, तुमकुरु, शिमोगा, कारवार पार केले आहे. येत्या 48 तासात मान्सून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात धडक मारू शकेल. कोकणातील बहुतांश भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.
बंगालच्या उपसागरातील दबाव क्षेत्र मान्सूनला अधिक गती देईल आणि ते आणखी वेगवान होईल. पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील तापमानात 7 ते 12 डिग्री अंशापर्यंत घसरण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त माहितीनुसार पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत अरबी समुद्राच्या मध्यभागी मान्सूनने दिलेल्या गतीमुळे महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर कोकण, कर्नाटक व रायलसीमा, तामिळनाडूचा उर्वरित भाग, ओडिशा, उत्तर किनारपट्टी आंध्र प्रदेश, तेलंगणा, आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मान्सूनपूर्व पावसामुळे छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेशातील काही भागात 12 जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार पूर्व-बंगालचा उपसागर, नैऋत्य आणि पश्चिम-मध्य अरबी समुद्र व आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हे पाहता हवामान खात्याने या भागातील मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत.
स्कायमेट अंदाज
स्कायमेटच्या मते, 10 जूनपासून उत्तर भारतातील राज्यांमध्ये हवामान बदलेल आणि 13 जूनपर्यंत पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्लीच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशला पावसासाठी दोन दिवस थांबावे लागणार आहे. 12 जून ते 14 जून दरम्यान हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजस्थानात मात्र काही भागात तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचू शकते.
महाराष्ट्रात मुसळधार..
या आठवड्यात मान्सून ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार आगमन करेल. येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. गुजरातमध्ये आठवड्याच्या अखेरीस मान्सून हजेरी लावेल.