भुषण वडनेरे, धुळे
आज महिलांनी समाजातील सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असली तरी विशेषतः ग्रामीण भागातील महिला अजूनही या प्रवाहात आलेल्या दिसत नाहीत. त्यामुळे अशा महिलांना, त्यांच्या बचत गटांना तसेच ग्रामीण युवकांना अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्योगाची वाट धरण्यासाठी प्रवृत्त करणार्या कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ अमृता राऊत यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सुमारे दहा वर्षांपासून त्या करीत असलेल्या मार्गदर्शनामुळे आज अनेक महिला, बचत गट व ग्रामीण युवकांनी शेतीपूरक उद्योगाची वाट धरली आहे. याशिवाय देशातील आयसीआरच्या संस्था व महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेले नवनवीन तंत्रज्ञान जिल्हाभरात तळागाळापर्यंत प्रसारित करण्याचे काम अमृता राऊत या यशस्वीरित्या करीत आहेत.
अॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… 🥭
खालील व्हिडिओ पहा..
श्रीमती अमृता अशोक राऊत यांनी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी या विषयावर एम. टेक.चे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे, 2004 मध्ये सुवर्णपदकासह त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर 2005 ते 2008 पर्यंत नाशिक येथील के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2008 ते 2011 पर्यंत मालवाड (ता. संगमनेर ) येथे अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. परंतु आपण जे शिक्षण घेतले आहे, त्याचा फायदा ग्रामीण भागातील महिला शेतकर्यांना व्हावा अशी श्रीमती राऊत यांची मनोमन इच्छा होती. त्यामुळे त्यांनी मध्यंतरी आलेल्या नोकरीच्या अनेक संधी झुगारल्या. अखेर धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्यांच्याकडे संधी चालून आली. 2011 मध्ये धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी शास्त्रज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती झाली. याठिकाणी गेल्या दहा वर्षापासून त्या महिला शेतकरी, बचत गट व ग्रामीण युवकांना शेतीपूरक उद्योग आणि व्यवसायांचे प्रशिक्षण देत आहेत. महिलांचे शेतीतील श्रम कमी व्हावे यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली यंत्रसामुग्री ग्रामीण भागातील महिलांपर्यंत सुलभतेने पोहचविण्याचे काम त्या करीत आहेत.
महिला, बचत गटांना उद्योग उभारणीस मदत
धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या मध्यमातून अमृता राऊत यांनी कृषी विद्यापीठांमधील होणारे शेतीपयोगी संशोधन शेतकरी महिला तसेच बचत गटांच्या सदस्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य जोमाने सुरू ठेवले आहे. त्यांनी आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था जसे की, महिला आर्थिक विकास महामंडळ, आत्मा धुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच विविध एनजीओ, लुपिन फाऊंडेशन धुळे, संजीवनी इन्स्टिट्यूट ऑफ एम्पॉवरमेंट पिंपळनेर, प्रतिष्ठान पाणी फाउंडेशन यांच्या समवेत बचत गटांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन अन्नप्रक्रिया क्षेत्रात उद्योग उभारणीस मदत करण्याचे मोलाचे कार्य केले असून आजही त्या करीत आहेत.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रसार
राज्यातील कृषी विद्यापीठांनी तयार केलेले काही उल्लेखनीय तंत्रज्ञान महिला शेतकरी तसेच ग्रामीण युवकांपर्यंत सुलभतेने पोहोचवण्याचे काम श्रीमती राऊत करीत आहेत. त्यात डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील मिनी डाळ मिल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील धनशक्ती बाजरी वाणावर आधारित लोहयुक्त बाजरी नानकटाई, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील संशोधित झालेल्या महिलांसाठीच्या श्रम कमी करणार्या विविध कृषी अवजारांचा प्रसार त्यामध्ये भेंडी कात्री, लक्ष्मी विळा, वैभव विळा, आंबा झेला, चिकु झेला, दुचाकी कोळपे, सायकल कोळपे, भुईमूग शेंगा फोडणी यंत्र, कापूस वेचणी यंत्र आदींचा समावेश आहे. आदिवासी क्षेत्रात पिकणारे विविध पर्वतीय तृणधान्य जसे, की नाचणी, भगर, राळा, सावा, राजगिरा इत्यादींवर आधारित नावीन्यपूर्ण बेकरी पदार्थ बनविण्यास तसेच प्रसार करण्यास श्रीमती राऊत या प्रयत्नशील राहिल्या आहेत. कोरडवाहू क्षेत्रात उत्पादीत होणार्या डाळिंब, लिंबू, आंबा, चिंच यासारख्या फळपिकांवर आधारित शीतपेय बनविण्यास व प्रसारीत करण्यास श्रीमती राऊत यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. शेती उपयोगी छोटेछोटे तंत्रज्ञान व सुधारणा यांच्या प्रसारात तसेच महिला बचत गटांसाठी शेती आधारित उद्योग उभारणीस त्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय स्थानिक वृत्तपत्रांमधून वेळोवेळी माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध करणे तसेच केंद्राद्वारे महिलांसाठी विविध प्रकाशने प्रकाशित व प्रसारीत करणे, रेडिओ गटचर्चा आदींच्या माध्यमातून प्रशिक्षण देणे असे कार्य श्रीमती राऊत या करीत आहेत.
मोफत प्रशिक्षणातून सखोल मार्गदर्शन
अमृता राऊत यांनी आतापर्यंत जिल्ह्यातील अनेक बचत गटांना, महिला शेतकर्यांना व ग्रामीण तरुणांना विविध प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे, ज्या गावातील महिला किंवा तरुणांना कृषी विज्ञान केंद्रात येणे शक्य होत नाही, अशांसाठी त्यांच्या गावांमध्ये स्वतः त्या जातात आणि त्यांना प्रशिक्षण त्या देतात. शिवाय कृषी विज्ञान केंद्राने दत्तक घेतलेल्या गावांमध्ये जाऊन तेथेही प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्याचे काम त्यांचे आजही सुरुच आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वर्षाला किमान बारा प्रशिक्षण वर्ग घेण्याचे बंधन आहे. श्रीमती राऊत या महिला व युवकांची मागणी लक्षात घेऊन वर्षाला सुमारे 20 ते 25 प्रशिक्षण वर्ग घेतात. हे प्रशिक्षण मोफत असते, त्यात जेवणही मोफत दिले जाते. ज्या ग्रामीण महिलांना व युवकांना उद्योगाची कास धरायची आहे अथवा प्रक्रिया उद्योगात उचित मार्गदर्शन हवे आहे, अशा महिला व युवकांना त्या मार्गदर्शन व प्रशिक्षण देत असतात. आपल्या प्रशिक्षणात त्यांनी पापड उद्योग, डाळ मिल उद्योग, बेकरी उद्योग, टोमॅटो केचप, शीतपेय, लोणचे तसेच महिला शेतकर्यांसाठी श्रम परिहाराची अवजारे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना प्रशिक्षित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य श्रीमती राऊत यशस्वीपणे करीत आहेत. अन्न व प्रकिया उद्योगाबाबतचे प्रशिक्षण हे एक ते तीन दिवस किंवा एक महिन्याचे असते. हे प्रशिक्षण संपल्यानंतरही श्रीमती राऊत या प्रशिक्षणार्थींच्या संपर्कात असतात. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षणार्थीचे व्हाट्सअॅप ग्रुप तयार केले आहेत. नवनवीन संशोधित होणारे तंत्रज्ञान ते या ग्रुपवर टाकतात. त्या तंत्रज्ञानाची माहिती त्या प्रशिक्षणार्थींना देत असतात. यामुळे प्रशिक्षणार्थींना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळते. विशेष म्हणजे, ज्या होतकरू महिला व ग्रामीण भागातील युवकांना अन्न प्रक्रिया उद्योगात पाऊल टाकायचे आहे, अशा महिला व युवकांना प्रकल्प अहवाल तयार करुन देण्यातही त्या मदत करीत असतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आजवर अनेक महिला व बचत गटांची अन्न प्रक्रिया उद्योगात यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे.
महिला व युवकांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न
कृषी विज्ञान विज्ञान केंद्रात लर्निंग बाय डुइंग अर्थात स्वतः करायचे आणि करून दाखवायचे, अशा संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण दिले जाते. आगामी काळात कोणत्या उद्योगाला सुगीचे दिवस येणार आहेत, त्या उद्योगासाठी कच्चा माल कुठे मिळेल, कच्च्या मालाची निवड कशी करावी याबाबतही श्रीमती राऊत या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करीत असतात. प्रशिक्षण संपले म्हणजे झाले असे त्या कधीच करीत नाहीत. तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरही एखाद्या प्रशिक्षणार्थीला मार्गदर्शनाची गरज भासल्यास त्याला मार्गदर्शन करण्यास त्या सदैव तत्पर असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला व तरुणांना नवी दिशा मिळण्यास मदत होत आहे. श्रीमती राऊत म्हणतात, की कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षणार्थींसाठी मोफत प्रशिक्षण व जेवणाची सुविधा आहे. त्यांना केवळ स्वखर्चाने येथे यावे लागते. मात्र, दूरवरील प्रशिक्षणार्थींना येथे निवासाची सोय नाही. त्यामुळे येत्या काही वर्षात राहण्याची सोय देखील करण्याच्या प्रयत्नात आहे. अधिकाधिक महिला बचत गट व ग्रामीण युवक अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळून ते स्वावलंबी व्हावेत, जेणेकरुन त्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू असे त्या सांगतात. केवळ कृषी विद्यापीठांकडून होणारे संशोधन ग्रामीण भागात पोचविणे एवढ्याच कामावर समाधान न मानता, त्या पलीकडे जाऊन हे संशोधन ग्रामीण शेतकरी महिला व तरुणांना साध्या व सोप्या भाषेत कसे समजावून सांगता येईल व हाताळता येईल, यावरही त्या मेहनत घेत असतात. आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन शेतकरी महिला, बचत गट व ग्रामीण युवकांचे उत्थान कसे करता येईल, यासाठी त्या कायम परिश्रम घेत असतात. ज्या महिला व तरुणांना कृषी क्षेत्रात अथवा अन्न प्रक्रिया उद्योगात काही तरी नवीन करायचे आहे, मात्र योग्य मार्ग सूचत नाही, अशा महिला व तरुणांना त्या अन्नप्रक्रिया उद्योगाचे धडे देऊन नवी दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. यामुळे जिल्ह्यातील होतकरू महिला व तरुणांना लाभ होताना दिसत आहे.