पुणे ः कमी जागेत व कमी पाण्यात करता येणारा शेतीपूरक व्यवसाय म्हणून मशरुम शेतीकडे बरेच शेतकरी वळताना दिसत आहेत. मात्र, काही गैरसमज व अफवांमुळे मशरुम शेती काहीसी दुर्लक्षित झाली आहे. मात्र, कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि स्वतः मनापासून ही शेती करण्याची आवड असली तर त्यात हमखास यश मिळते हे अनेक शेतकर्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.
अशी करावी लागवड
मशरूमची शेती करण्यासाठी 50 हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येऊ शकते. त्यासाठी शासनाकडून 40 टक्के सबसिडी देखील उपलब्ध आहे. चांगले व्यवस्थापन व योग्य तंत्रज्ञानाचा वापर केला तरी ही शेती खूपच फायद्याची ठरते. वर्षाला साधारणतः 1 लाख ते 5 लाख रुपयांचा नफा देखील या शेतीतून मिळू शकतो. मशरुम हे अळिंबी नावाने देखील ओळखले जाते. ही बुरशी गटात मोडणारी वनस्पती आहे. तिच्या उत्पादनासाठी कमी जागा व कमी पाणी लागत. मशरूमला बाजारात आजही चांगलीच मागणी आहे. त्यामुळे जगात व्यापारी तत्वावर देखील मशरुमचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. प्रती चौरस मीटर 10 किलो मशरूम तयार करता येऊ शकते. कमीत कमी 40 बाय 30 फूट जागेत तीन तीन फूट रुंद रॅक बनवून मशरूमची लागवड करता येते. यासाठी शासनाकडून अनुदानही मिळण्याची तरतूद आहे.
असे करावे कंपोस्ट खत
भाताचा पेंढा भिजवुन एक दिवस तो कुजवला जातो आणि त्यामध्ये डीएपी, युरिया, पोटॅश, गव्हाचा कोंडा, जिप्सम आणि कार्बोफ्युरान टाकतात. नंतर सुमारे दीड महिन्यानंतर हे तयार होते. मशरूममध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी दिवसात दोन तीन वेळा फवारणी करावी लागते. साधारणतः दोन इंच कंपोस्टचा थर टाकला जातो.
प्रशिक्षण घेऊनच सुरवात करा
मशरूमची शेती करण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. कृषी विद्यापीठांकडून अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. ते एकदा घेतले तरी सहज ही शेती करता येते. मशरूम खाण्यासाठी स्वादिष्ट तर आहेच त्यासोबतच पौष्टिक देखील आहे. मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे, प्रथिने व खनिजे आहेत. त्यामुळे दररोजच्या आहारात मशरूम चा वापर केल्यास फायदा होतो. मशरूममध्ये प्रथिनांचे प्रमाण 2.7 ते 3.9 टक्के असून हे प्रमाण फळे-भाजीपाला यांच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच मशरूम मधील प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही अमीनो सिड असतात जे आपल्या शरीरास उपयुक्त आहेत त्याचसोबत लहान मुलांच्या वाढीसाठी देखील हे अमीनो सिड महत्वाचे असतात. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपित्तावर मशरूम उपयुक्त ठरते.