शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव दि.१३- पोखरा अंतर्गत फळबाग योजना स्थगित असतांना शेतकऱ्यांना मनरेगा अंतर्गत फळबाग योजनेचा मोठा आधार झाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना शासनाची अति महत्वाकांक्षी योजना आहे. वैयक्तीक लाभार्थीच्या शेतावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात येत असून जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी मान्सून सुरु होण्यापूर्वी तालुका कृषी अधिकारी यांचेकडे अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जळगांव मार्फत करण्यात आले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीची अंमलबजावणी नाशिक विभागात सुरु आहे. फळबाग लागवड कार्यक्रमामुळे लाभार्थ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन सहभागी लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होते. वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत शासनाने 2012 मध्ये रोहयो मधून फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. फळबाग लागवडीच्या कामाकरीता कृषि विभाग हा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुका कृषि अधिकारी यांना कार्यक्रम अधिकारी म्हणून घोषित केले असून ई मस्टर निर्गमीत करणे, भरणे, पारीत करणे, कुशल / अकुशल बाबींचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. तांत्रिक मान्यता देण्याचे अधिकार तालुका कृषिअधिकारी, प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
कोणत्या फळांचा समावेश
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत खालीलप्रमाणे फळपिकांचा समावेश करण्यात आला असून यामध्ये आंबा कलम, आंबा रोपे, चिकू, पेरू, डाळिंब, मोसम्बी, संत्रा, लिंबू आदी कलम व रोपे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. फळपिकांचा समावेश करुन शेतकऱ्यांच्या मागणी नुसार घनपध्दतीने लागवडीकरीता तसेच कलमे रोपे लागवडीचे प्रती हेक्टरी सुधारीत मापदंडास शासनाने मान्यता दिली आहे. या पिकांच्या लागवड, रोपे खरेदी, मजुरी, सामुग्री करीता तिसऱ्या वर्षापर्यंत अनुदान देण्यात येते.
आवश्यक कागदपत्रे
फळबाग लागवड कार्यक्रमासाठी लाभार्थीचे नाव असलेले मग्रारोहयो योजनेचे जॉब कार्ड, शेतीचा ७/१२, ८-अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत आदी कागद पात्रांचा समावेश आहे. सदर योजने अंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचे ऑनलाईन सनियंत्रण केले जाते.
लाभार्थीची निवड
वैयक्तीक लाभार्थी म्हणून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील. यामध्ये अनुसुचित जाती, अनुसुचीत जमाती, दारीद्र रेषेखालील लाभार्थी, भु-सुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, स्री करता असलेली कुटुंबे, अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन हक्क मान्य असलेले) अधिनियम, २००६ खालील लाभार्थी आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थीना प्राधान्य देण्यात आल्या नंतर कृषी कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, २००८ यामध्ये व्याख्या केलेल्या लहान व सीमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमीनीवरील कामांना, शर्तीच्या अधिनतेने प्रधान्य देण्यात येईल.
कोणाशी संपर्क कराल
शेतकऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड या योजनेत सहभागी होऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर व कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जळगांव यांनी केले आहे.