सेलिंग : मिझोरम परंपरा पाळणारे राज्य आहे. तिथेच भारतातील एक अनोखे गाव आहे जिथे दुकाने आहेत पण दुकानदार नाही. ही आहे नघा लू डावर नावाची इमानदार संस्कृती. जाऊन घेऊ या प्रथेबाबत अधिक काही…
भारत हा खरोखरच एक अद्वितीय असा देश आहे. इथे पावलापावलावर सर्वत्र आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. देशातील प्रत्येक शहरात आणि प्रत्येक राज्यात तुम्हाला असे काहीतरी पाहायला मिळेल, ज्यामुळे तुम्हाला वाटेल, की आपला भारत किती अद्भुत आहे. आज आम्ही तुम्हाला आपल्या देशातील अशाच एका राज्यातील अनोख्या संस्कृती, परंपरेबद्दल सांगणार आहोत.
या राज्यातील एका गावात दुकाने आहेत पण दुकानदारच नाहीत. असे असूनही येथे आजवर कधीही सामानाची चोरी किंवा लबाडी झालेली नाही. रस्त्यावर दुकान थाटलेले असते आणि त्यात विविध वस्तू किंमत लिहून ठेवलेल्या असतात. ग्राहकाला हवी ती वस्तू त्याने घेऊन जावे आणि नमूद किंमतीइतके नेमके पैसे ठेवून जावे. कुणीही तुमच्यावर नजर ठेवत नाही, की सीसीटीव्ही लावलेले नसतात. इमानादारीची ही बेमिसाल परंपरा जाणून घेऊ.
विश्वासाच्या आधारे जपली जातेय संस्कृती, परंपरा
परदेशात अनेक ठिकाणी असे पेपर स्टॉल्स असतात; की जिथे आपण नेमके पैसे ठेवून हवे ते वर्तमानपत्र घेवून जायचे. युरोप, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशात ही काही तशी नवलाई नाही. जपान, चीनमध्येही जागोजागी, रस्त्याच्या कडेला वेंडिंग मशीन असतात. मात्र, ते ऑटोमेटेड असतात. भारतासारख्या अवाढव्य आणि अफाट लोकसंख्येच्या देशातील एका दुर्गम भागात मात्र कुठल्याही तंत्रज्ञानाशिवाय निव्वळ विश्वास आणि माणुसकीच्या आधारे वर्षानुवर्षे ही परंपरा जपली जातेय.
भारतातील एक अनोखे गाव जिथे जपली जातेय मिझोरममधील नघा लू डावर संस्कृती
भारताचा उत्तर-पूर्व भाग म्हणजेच ईशान्य भारत हा समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांसाठी प्रसिद्ध आहे. याच ईशान्य भारतात आहे भारतातील सर्वात लहान राज्य आहे मिझोरम. पूर्वी आसाम राज्यात असलेला हा एक छोटासा जिल्हा, 1987 मध्ये स्वतंत्र झाला. मि म्हणजे लोक, झो म्हणजे पर्वत आणि रम म्हणजे प्रदेश. त्यावरून हे नाव मिझोरम म्हणजे पर्वतीय लोकांची भूमी.
याच मिझोरम राज्याची राजधानी असलेल्या ऐझॉल शहरापासून काही किलोमीटर अंतरावर सेलिंग नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे “नघा लू डावर” संस्कृती नावाची श्रद्धा पाळली जाते. त्या अंतर्गत येथे महामार्गावर, रस्त्याच्या कडेला छोटी-छोटी दुकाने लावली जातात, परंतु त्या दुकानांमध्ये कोणीही दुकानदार नसतात. याद्वारे येथील लोक केवळ वस्तूंचेच वितरण करत नाहीत तर ज्ञानाची देवाणघेवाणही करतात.
दुकाने आहेत पण दुकानदार नाही मग नेमकी कशी चालतात दुकानदार नसलेली दुकाने
या दुकानांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. दुकाने विश्वासाच्या आधारावर चालतात आणि लोकांना एकमेकांमधील विश्वासाची भावना तसेच बंधुभाव निर्माण करण्याची शिकवण देतात. या दुकानांमध्ये फळे, भाजीपाला, मासे आदी खाद्यपदार्थ विकले जातात. त्यांच्या पुढे दर लिहिला आहे. ज्याला माल घ्यायचा असेल तो तेवढे पैसे दुकानात ठेवलेल्या पिशवीत किंवा पेटीत टाकतो आणि मग तिथून हवी असलेली वस्तू घेऊन जातो.
का आहे या भागात अशी अनोखी व्यवस्था?
बहुसंख्य ख्रिश्चन धर्मीय असलेल्या या भागात एका बाजूला म्यानमार तर दुसरीकडे बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमा आहे. रोजगाराच्या संधी खूपच कमी आहेत. ही दुकाने चालवणारे दुकानदार हे मुख्यत: गरीब शेतकरी आहेत, ज्यांना घर चालवण्यासाठी शेती करावी लागते. एकतर तशीही मिझोरममध्ये पर्वतीय प्रदेश असल्याने शेती कमी आहे. आता अशा परिस्थितीत घर चालविणारा दुकानात बसला तर त्याला शेती करायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे कुणी दुकानात बसत नाहीत.
पुरुष शेतात, रानात जातात आणि महिला घर सांभाळतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की आजपर्यंत या दुकानांमध्ये कधीही चोरीच्या घटना घडल्या नाहीत, की कुणी मालाचे कमी पैसे ठेवलेले नाहीत. आजच्या काळात लोकांना घरामध्ये सीसीटीव्ही लावावे लागतात, तर दुसरीकडे अशी दुकानदार नसलेली दुकाने! यावरून एकच गोष्ट लक्षात घ्यावी, आजही जगात प्रामाणिक लोक अस्तित्वात आहेत आणि विश्वासावर आपण नक्कीच जग जिंकू शकतो.
Mizoram : Seling a village few kms away from Aizwal, having shops without shopkeepers. “Nghah Lou Dawr culture” is a year long tradition of trust & humanity.
500 रुपये किलोने विकला जाणारा काळा तांदूळ शेतकऱ्यांना बनवेल करोडपती, जाणून घ्या त्याविषयी सारे काही…
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा👇
- जगातील पहिल्या ड्रायव्हरविना चालणाऱ्या, फुल्ली स्मार्ट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर कंपनीचे आता भारतातही पदार्पण
- इस्राईलमध्ये तयार होतोय नेक्स्ट जनरेशन रोबोटिक मजूर; फळबागांमध्ये करणार फळतोडणी
- आता सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात इस्त्रायली सुपरफूड ॲव्होकॅडो; ब्रिटनमध्ये एमबीए झालेल्या तरुणाने भारतातच सुरू केलीय अनोखी शेती
- गायी, मेढ्यांनी ढेकर दिला तर मालकाला होणार दंड! कुठल्या देशात आणि का लागू होतोय हा अजब नियम ते जाणून घ्या …
Comments 6