वेळ, श्रम आणि पैशाच्या बचतीसाठी यांत्रीकीकरणावर भर
माहेरी वडीलांकडे शेतीत जावे लागले नसले तरी लग्नानंतर सुवर्णा इखार शेतीत रमल्या. पतीच्या खांद्याला खांदा लावत
कुऱ्हा (ता. तिवसा, जि.अमरावती) येथील शेतीत मागणी असलेल्या भाजीपाला पीकाच्या लागवडीवर भर देत आपल्या कुटूंबाला आर्थिक संपन्नतेकडे नेण्यास त्या सहाय्यभूत ठरल्या आहेत.
माहेरी नाही परंतू सासरच्या शेतीत राबता
सुवर्णा इखार यांचे माहेर घाटलाडकी. त्यांचे वडील जयराज राजस यांचे संत्रा, केळी, आले, हळद या सारखी व्यवसायीक पीक घेण्यात सातत्य आणि हातखंडा. घरच्या शेतीत सहज जावे लागत असले तरी काम कधीच करावे लागले नाही. त्यामुळे शेती व्यवस्थापनाचा कोणताच अनुभव नव्हता, असे त्या सांगतात. 2004 मध्ये लग्नानंतर सासरी आल्यावर त्यांनी मात्र विरंगुळा म्हणून सहज घरच्या शेती व्यवस्थापनाकडे लक्ष दिले आणि आज त्या भाजीपाला पिकातील मास्टर ठरल्या आहेत.
यांत्रीकीकरणावर भर
इखार कुटूंबीयांकडे ट्रॅक्टर आहे. त्याचा उपयोग शेतीकामी होतो. रोटाव्हेटर, पॉवर टिलर, ग्रास मशीन अशी सारी यंत्रे देखील आहेत. शेती कामात मजूरांचा वापर कमीत कमी असावा, असा उद्देश यांत्रीकीकरणामागे असल्याचे त्या सांगतात. यातून वेळेची, श्रमाची आणि पैशाची देखील बचत होण्यास मदत होते.
इखार यांची कुटूंबियांची शेती
इखार कुटूंबियांची साडेदहा एकर शेती. यातील काही क्षेत्र सुवर्णाताईंचे पती नितीन यांच्या तर अडीच एकर क्षेत्र हे सुवर्णा ताईच्या नावावर आहे. या संपूर्ण क्षेत्राचे व्यवस्थापन सुवर्णा आणि नितीन हे दोघेच करतात. साडेदहा एकरावरील शेतीचे वर्गीकरण केल्यास त्यातील सहा एकरावरील संत्रा उत्पादनक्षम आहे. यातील काही झाडे 30, 12 तर काही झाडे आठ वर्षाची आहेत. तीन एकरावर दोन वर्षांपूर्वी नव्याने लागवड केलेला संत्रा आहे, असेही सुवर्णाताईंनी सांगीतले.
पाणी नसल्यामुळे उत्पादकतेत घट
व्यवस्थापनाच्या माध्यमातून 42 ते 45 टन संत्रा उत्पादकता होत होती. यावर्षी मात्र पाण्याअभावी 13 ते 14 टनापर्यंतच उत्पादकता होण्याचा अंदाज त्यांना आहे. पूर्वी 12 लाख रुपयांचे उत्पन्न संत्रा विक्रीतून होत होते. यावेळी उत्पन्नातही मोठी घट होणार आहे. 2018-19 या वर्षात पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण झाले. शेतात दोन विहिरींचा पर्याय आहे. 500-500 फुटाचे दोन बोअरवेल, एक विहिर नव्याने खोदण्यात आली. हे सारे पर्याय निष्प्रभ ठरल्याने नव्या विहिरीत आडवे, उभे बोअर घेण्यात आले. या सर्व कामावर सुमारे सहा लाख रुपयांचा खर्च झाला. परंतू पाण्याची उपलब्धता करण्यात अपयश आले. परिणामी दोन एकरावरील बाग जळाली. यातून फिनीक्स पक्षाप्रमाणे झेप घेत नव्या जोशाने संत्रा बाग आणि भाजीपाला पिकाच्या व्यवस्थापनावर या दांम्पत्याने लक्ष्य केंद्रीत केले आहे. संत्र्याचा क्रेटनुसार व्यापाऱ्याशी व्यवहार केला जातो. गेल्यावर्षी 760 रुपये प्रती क्रेटप्रमाणे संत्र्याला विक्रमी दर मिळाला होता. एका क्रेटमध्ये 22 ते 23 किलो संत्री राहतात, असे सुवर्णाताईंनी सांगीतले.
सल्लामसलत करुन ठरते पीकाचे नियोजन
बाजारात यापुढील काळात कोणत्या पीकाला चांगले दर मिळतील, याबाबत एकमेकांशी सल्लामसलत केली जाते. त्याच आधारे पीकाची निवड करुन त्याची लागवड करण्यावर या दांम्पत्याचा भर आहे. भाजीपाला बाजारपेठेत मोठी अनिश्चीतता राहते. विकल्या गेली तर भाजी नाही तर पाला, असे भाजीपाला उत्पादकता आणि उत्पादकांसाठी म्हटले जाते. त्यामुळेच बाजारात भाजीच विकल्या जावी आणि भाजीपाला होऊ नये याकरिता खबरदारी म्हणून प्रत्येकवेळी पिक घेण्याआधी बाजाराचा अंदाज घेतला जातो, असेही त्या सांगतात. यावर्षी वांगी भाव खावून गेली. वांग्याचे दर सद्या घाऊक 40 रुपये आहेत. भरताची वांगी घेण्यावरही त्यांचा भर आहे. कारली तीस ते 50 रुपये किलो घाऊक विकल्या जातात. अशाप्रकारे मागणी असलेला भाजीपालाच उत्पादीत करुन वाढीव दर पदरात पाडले जातात.
भाजीपाला पिकात सातत्य
नव्याने लागवड केलेल्या संत्रा बागेत आंतरपीक म्हणून उर्वरित दिड एकर सलग क्षेत्रातही भाजीपाला पिके घेतली जातात. त्यामध्ये कारली, काकडी, टोमॅटो, वांगी यासारख्या पीकांचा त्यामध्ये समावेश आहे. भाजीपाल्याची लागवड बेडवर केली जाते. पाच फुट उंच आणि तीन फुट रुंद याप्रमाणे बेड राहतात. भाजीपाल्याची विक्री आर्वी, शेंदूरजनाबाजार, तिवसा, कुऱ्हा, मंगरुळ दस्तगीर येथील बाजारात भाजीपाला पाठविला जातो. अडत्यामार्फत त्याची विक्री होते. चांगले दर असतील तर आठवड्याला दिड लाख रुपयेही मिळतात आणि दरात घसरण झाल्यास हेच उत्पन्न वीस हजार रुपयांपर्यंत खाली येते, असे सुवर्णा इखार यांनी सांगीतले. भाजीपाल्याची पिके रोटेशन पध्दतीने घेतली जातात.
—-
केळी पिकाने केले निराश
अपर वर्धा प्रकल्पाचा कालवा शेतालगत आहे. परंतू गेल्यावर्षी पाऊसमान कमी झाल्याने प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता होऊ शकली नाही. त्यासोबतच संरक्षीत सिंचनाचे स्त्रोतही आटल्याने पिकांसाठी पाण्याची सोय करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्याचवेळी तीन एकरावर केळी लागवडीचा प्रयोग या दांम्पत्याने केला. 2018 मध्ये उत्तीसंवर्धीत केळीच्या या लागवडीवर एकरी अडीच लाख रुपयांचा खर्च आला. परंतू पाण्याची उपलब्धता न होऊ शकल्याने डोळ्यादेखत केळी बाग जळण्याचे दुःख पचवावे लागले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर पाण्याची उपलब्धता लक्षात घेत पिकांचे नियोजन करण्यावर भर दिला जातो, असे सुवर्णाताईंनी सांगीतले.
भाजीपाला उत्पादकांचे गाव
तिवसा तालुक्यात असलेले कुऱ्हा हे भाजीपाला उत्पादकांचे गाव म्हणून नावारुपास आले आहे. पारंपारीक पिकांपासून फारकत घेत या गावातील बहूतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाच्या लागवडीत सातत्य राखले आहे. त्यात सुवर्णा इखार यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळेच विविध व्यासपीठावर त्यांचा गौरव करण्यात आला. माजी मंत्री सुनिल देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.कृषी विज्ञान केंद्र घातखेडा यांच्या वतीने देखील त्यांचा गौरव करण्यात आला.
सुवर्णा इखार
मो. 9689473124