खासगी बॅंकेत नोकरी करणाऱ्या सावळापूर (ता.अचलपूर) जि. अमरावती येथील अनिल पाटील यांचे नोकरीत मन रमलेच नाही. नोकरीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या अनिल पाटलांनी करारावरील पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. मेहनतीच्या बळावर अल्पावधीतच या क्षेत्रात त्यांनी नवी ओळख निर्माण केली असून आर्थिक उत्कर्षही साधला आहे. या माध्यमातून नोकरी सोडण्याचा आपला निर्णय योग्य होता हे सिध्द करण्यात देखील ते यशस्वी ठरले आहेत. ते ४० दिवसांच्या एका बॅचपासून २ लाख रु उत्पन्न मिळवीत आहेत.
अनिल पाटील यांची शेती
सावळापूर (ता.अचलपूर) येथील अनिल पाटील यांच्याकडे 12 एकर शेती. यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर या सारखी पीक घेतली जातात. रबी हंगामातील पिकांमध्ये गहू घेण्यावर अनिल पाटील यांचा भर राहतो. आजपर्यंत त्यांना कपाशीची एकरी उत्पादकता अवघी 6 ते 7 क्विंटल मिळत होती. यावर्षी पोल्ट्री खताचा वापर केल्याच्या परिणामी ती वाढून 10 ते 11 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
पोल्ट्री व्यवसायाची अशी झाली सुरुवात
अमरावती येथील एका खासगी बॅंकेत अनिल पाटील यांनी लिपीक म्हणून तब्बल 16 वर्ष काम केले. परंतू नोकरीत मन न रमल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा देत पोल्ट्री व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. स्वतःचा व्यवसाय विकसीत करण्याऐवजी करारावरील पोल्ट्री व्यवसायात उतरण्याचे त्यांनी ठरविले. त्याकरिता त्यांनी अशाप्रकारे काम करणाऱ्या कंपन्यांचा शोध सुरु केला. दरम्यान अमरावती येथील डॉ. शरद भारसाकळे यांच्या अमृता हॅचरीजची कार्यपध्दती आवडल्याने त्यांनी त्यांच्यासोबत करार करण्याचा निर्णय घेतला.
गेल्यावर्षी केली सुरुवात
शेतकरी व अमृता हॅचरीज या पुरवठादारामध्ये कराराची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतर ऑगस्ट 2017 मध्ये त्यांना पक्ष्यांचा पुरवठा झाला. या पक्ष्यांना लागणारे खाद्य, औषधी याचा पुरवठा करारदाराकडून होतो. पक्ष्याचे आरोग्य जपण्यासाठी पशुवैद्यकीय सेवा देखील नियमीतपणे पुरवठादाराकडूनच पुरविली जाते, फक्त आपली जागा उपलब्ध करून पक्ष्यांचे संगोपन आपल्याला करावे असे अनिल पाटील सांगतात.
सुसज्ज पोल्ट्रीशेड
या व्यवसायात सुसज्ज अश्या निवाऱ्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे त्यांनी ३५ लाख रु खर्च करून पोल्ट्री व्यवसायाकरीता 30 बाय 1 हजार चौरस फुट आकाराचे शेड उभारण्यात आले. त्याकरिता सुमारे 35 लाख रुपयांचा खर्च आला यातील 15 लाख रुपये बॅंकेकडून कर्ज स्वरुपात घेण्यात आले. उर्वरित पैशाची सोय घरुन करण्यात आली. पोल्ट्री शेडभोवती मका लागवड करुन उन्हाच्या झळा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेडच्या वरील बाजूस पाण्याचा शिडकावा करण्यासाठी मिनी स्प्रींकलर बसविण्यात आले असून त्यासाठी 60 हजार रुपयांचा खर्च झाला, असे ते सांगतात.
पक्ष्याचे वजनानुसार मिळतो दर
40 दिवसात 2 किलो 800 ग्रॅम पर्यंत पक्ष्याचे वजन मिळते, असा त्यांचा अनुभव आहे. किलोमागे 6 रुपये पुरवठादाराकडून दिले जातात. यामध्ये मर्तुंकचे प्रमाण कमी असून 15 हजार पक्ष्यामागे अवघे 2-3 पक्षी असे असल्याचे त्यांनी सांगीतले. मर्तुंकीवर नियंत्रण मिळविल्यास यासाठी कंपनीकडून कधीकधी बोनस सुध्दा देण्याची पध्दत आहे. पशुवैद्यकाची सेवा नियमीत मिळत असल्याने मर्तुंक कमी करणे शक्य होते, असे त्यांनी सांगीतले.
पोल्ट्री शेड आणले सिसिटीव्ही नियंत्रणात
पोल्ट्री शेडमधील पक्ष्यांची तसेच साहित्याची चोरी रोखता यावी याकरिता त्यांनी संपूर्ण परिसरात सिसिटीव्ही कॅमेरे बसविले आहे. या यंत्रणेवर सुमारे 70 हजार रुपयांचा खर्च आला, असे त्यांनी सांगीतले. एकूण आठ सिसिटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
असा आहे ताळेबंद
एक बॅंच निघण्यास सरासरी 40 दिवसाचा कालावधी लागतो. 30 दिवसासाठीचा खर्च 30 हजार रुपये होतो. यामध्ये पोल्ट्रीशेडवरील मजूरांना देण्यात येणाऱ्या मजूरीवरील खर्चाचा समावेश आहे. चार मजूर असून त्यांना प्रत्येकी सहा हजार रुपये महिन्याला दिले जातात. यानुसार 24 हजार रुपये मजूरीवर खर्च होतो; उर्वरित सहा हजार रुपयांचा खर्च व्यवस्थापनावर होतो. त्यामध्ये वीजबिलाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगीतले. 15 हजार पक्ष्यांपासून सरासरी 1 लाख 75 हजार ते 2 लाख रुपयांचे उत्पन्न 40 दिवसात मिळते. वर्षभरात सहा बॅंच घेतल्या जातात.
सावळापूर येथील पहिला पोल्ट्री व्यवसाय
आसेगाव-दर्यापूर मार्गावर सावळापूर फाटा आहे. फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर गाव आहे. या गावात शेती हा मुख्य व्यवसाय असून सोयाबीन, कपाशी यासारखी पारंपारीक पीके घेण्यावरच शेतकऱ्यांचा भर आहे. सात हजार लोकसंख्येच्या या गावात संत्रा लागवड यशस्वी होत नसल्यामुळे ती घेतली जात नाही. त्यामुळे या गावात शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाकडे वळणारे अनिल पाटील हे पहिलेच ठरले आहेत.
पोल्ट्री खताची होते विक्री
15 हजार पक्ष्यांच्या एका बॅंचपासून सरासरी बारा ट्रॉली कोंबडी खताची उपलब्धता होते. एक ट्रॉली खताची विक्री सरासरी 6 हजार रुपयांप्रमाणे केली जाते. गावातील शेतकऱ्यांचीच या खताला सर्वाधीक मागणी असून गेल्यावर्षी खल्लार भागातील डाळींब उत्पादकांनी देखील खत मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बागेसाठी नेले. कोंबडी खत हे देखील अतिरिक्त उत्पन्नाचा पर्याय ठरले आहे. कंपनीकडून पुरवठा होणाऱ्या खाद्याचे पोते (बारदाना) रिकामे झाल्यानंतर पाच रुपये प्रती नगाप्रमाणे बाजारात विकल्या जाते. 40 दिवसात 800 ते 1000 पोते खाद्य लागते. खाद्य वापरानंतर रिकामी पोते गावातच शेतकरी विकत घेतात. बाजारात हेच पोते 60 रुपयात मिळते; त्यामुळे स्थानिक शेतकरीच रिकाम्या पोत्यांना मागणी करतात.
बॅंचपूर्वी आंथरलेले जाते गव्हाचा भुसा
शेडमध्ये गहू किंवा धानाचा भुसा आंथरल्या जातो. बॅच निघाल्यानंतर भुशासोबत खतही काढले जाते. त्यानंतर पुन्हा नव्याने भुसा आंथरला जातो. स्वतःच्या शेतात उत्पादीत गव्हाच्या भुशाचा याकामी वापर होतो. फक्त एकदाच धान भुशाची खरेदी करण्यात आल्याचे ते सांगतात. त्यानंतर स्वतःच्या शेतातील गव्हाचा भुसाच आजवर वापरला गेला. त्यामुळे यावरील खर्चात बचत झाली आहे.
पाण्यासाठी बोअरवेलचा पर्याय
अनिल पाटील यांच्या शेतापासून चार पाच शेत सोडले की पूर्णा नदी वाहते. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. अनिल पाटील यांच्या शेतात पाण्याकरीता बोअरवेलचा पर्याय असून त्याला मुबलक पाणी राहते. उन्हाळ्यात देखील हा स्त्रोत आटत नसल्याचे ते सांगतात.
“पक्ष्याचे अपेक्षीत वजन मिळाल्यानंतर कंपनीकडूनच मांसल कोंबड्यांची उचल थेट शेडवरुन होते. त्यामुळे बाजारपेठ शोधण्याकरीता अतिरिक्त श्रम खर्ची होत नाहीत, त्यामुळे अशाप्रकाराचा करारावरील पोल्ट्री व्यवसाय आजच्या घडीला फायदेशीर ठरतो’
– अनिल पाटील
सावळापूर (ता.अचलपूर) जि. अमरावती
7972832928
Great work