कुक्कुटपालनातून वर्षाकाठी ९ लाखांचा निव्वळ नफा
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात असलेले अजनी गांव म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो राजकारणातील सर्वात स्वच्छ व सोज्वळ राजकारणी असलेल्या स्व.आर.आर.पाटील (आबा) यांचा चेहरा तालुक्याच्या गावापासून १५ किमीवर असलेल्या अजनी गावाला संघर्षमय व्यक्तीची वानवा नाही. याच गावात हणमंत शंकर पाटील हे राहतात. संपूर्ण घर २००४ मध्ये वायू गळतीमुळे जाळून खाक झाले तरी त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासातून फोर इलेवन फार्मची स्थापना करून त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. आज कुक्कुटपालनातून वर्षाकाठी ९ लाखाचा निव्वळ नफा ते कमवीत आहेत.
हणमंत पाटील यांची वडिलोपार्जित ३.५ एकर जमीन आहे. पूर्णपणे जिरायत असलेल्या या शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे फारच कमी होते. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यामुळे वयाच्या ९ व्या वर्षी त्यांच्यावर विविध जबाबदाऱ्या आल्या. त्यांनी व त्यांच्या आईने या सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या, घरची अर्धा एकर शेती विकून त्यांनी दोन्ही बहिणीचे लग्न केले. दरम्यान १२-०४-२००४ रोजी गॅस गळतीमुळे त्यांच्या घरात आग लागून संपूर्ण घर नष्ट झाले. अंगावरील कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीही शिल्लक राहिले नाही. शिल्लक राहिले फक्त अर्धवट विरघळलेले सिलेंडर, भारतीय संस्कृतीत लक्ष्मीच प्रतिक असलेली या प्रचंड आगीतही न जळलेली केरसुणी आणि हणमंत पाटील यांची नवनिर्मितीची जिद्द. या अपघातातून सावरत काही दिवस हणमंत यांनी मित्राच्या घरी आश्रय घेतला.
मदतीचा हात
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, तूम्ही फक्त लढ म्हणा!
कुसुमाग्रज यांच्या वरील काव्य रचणेप्रमाणे संपूर्णपणे संसार जरी उद्धवस्त झाला होता तरी त्यांना नवनिर्मितीची जिद्द होती. घरात स्फोट झाल्यामुळे सर्व नष्ट झाले होते त्यामुळे नवीन कर्ज किंवा मदत द्यायला कोणीही पुढे आले नाही. त्यावेळी नेहमीच समाजसेवेचा वारसा लाभलेल्या स्व. आर.आर.आबा यांचे बंधू सुरेश भाऊ यांनी तातडीने २० हजार रु मदत केली. आणि त्यांच्याच पाठपुरावा केल्याने त्यांना शासन स्तरावरुनदेखील मदत मिळाली. त्या मदती मधून त्यांनी हातगाडीवर भाजीपाला विक्री सुरु केला. प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे नक्कीच एका स्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे पाटील यांच्या मागे त्यांची आई व पत्नी खंबीरपणे उभ्या राहून त्यांना प्रत्येक कामात साथ दिली.
फोर इलेवन फार्म नावाने पोल्ट्री फार्म
पाटील यांच्या घरी सकाळी ५ वाजता कामाची सुरुवात होते. संघर्ष व कष्टाचा वारसा लाभलेल्या पाटील यांच्या कुटूंबाने ३०० X ३० असे स्वतःच्या मजुरीतून कुक्कुटपालनासाठी शेड तयार केले त्यामुळे मजुरीचे ५० हजार रु. मजुरी वाचली. पाटील यांना नम्रता व राज हि दोन अपत्ये आहेत. त्यातील मुलाचा जन्म हा ११/११/११ या दिवशी ११.०० वाजता झाला, त्यामुळे या चार ११ मुळे त्यांनी आपल्या व्यवसायाला फोर इलेवन फार्म हे नाव दिले.
कुक्कुटपालनाची करार पद्धती
हणमंत पाटील यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात करतांना करार पद्धतीने कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतला. पाटील यांनी सगुणा फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला आहे. या पद्धतीमध्ये कंपनी ४ दिवस वयाचे पिल्लू पुरविते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून औषध, खाद्य देखील पुरविले जाते. इतर कंपनी पेक्षा हि कंपनी जास्त दराने पक्षी खरेदी करते त्याशिवाय सर्व माहिती व देखरेख करण्यासाठी कंपनी अधिकारी असतो. शेतकऱ्यांना तांत्रिक व वैद्यकीय माहिती मिळाल्यामुळे व्यवसायात नुकसानाची पातळी फारच कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा शिल्लक राहतो
पक्षी संगोपन
कंपनी शेतकऱ्यांना एक दिवस वयाचे पिलू पुरविते. पक्षांसाठी ३४ डिग्री सेंल्सिअस तापमान ठेवावे लागते. त्यासाठी १ रॉय ब्रुकर बसवण्यात आले. ३००-४०० पिल्लांसाठी एक कोळश्याची शेगडी ठेवण्यात आली आहे. पिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जमिनीपासून १ फुट उंचीवर पाण्याचे भांडे ठेवले जाते. प्रत्येक ५० पक्षांसाठी १ चिक ड्रिंकर, खाद्यासाठी १फिडर बसवण्यात आले आहे.
रोग नियंत्रण
कुक्कुटपालन करतांना पक्षांना लासोटा, गम्भोर, झेन्ता या प्रमुख रोगांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे लासोटा रोगासाठी ७ व्या दिवशी डोळ्यावाटे लसीकरण केले जाते. गम्भोर या रोगासाठी १३-१४ व्या दिवशी तर झेन्ता या रोगासाठी ७,८,२२ व्या दिवशी मानेतून इंजेक्शन द्वारे लसीकरण केले जाते. त्याचप्रमाणे लासोटासाठी पाण्यातून १८-२० व्या दिवशी औषध दिली जाते.
पक्षांसाठी संगीत व प्रकाश व्यवस्था
कोंबडी हा फार भित्रा पक्षी आहे. परंतु हणमंत पाटील यांनी कुक्कुटपालन करतांना वेगवेगळे प्रयोग केले आहेत. शेडमध्ये नेहमी एफएम रेडीओ द्वारे संगीत सुरु असते. त्याचप्रमाणे तापमान नियंत्रण व प्रकाश संयोजनासाठी प्रति ४०० चौरस क्षेत्रासाठी १ ट्यूबलाईट व फोगेर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तापमानाचा समतोल राखण्यासाठी स्पिंकलरची व्यवस्था शेडवरती करण्यात आली आहे .त्याचबरोबर शेडच्यावरती पेंडीची मोकळी पोती टाकण्यात आली आहे, त्यामुळे शेडमध्ये गारवा टिकून राहण्यास मदत होते. याप्रमाणे पाटील यांनी अल्प खर्चात आपल्या पक्षांसाठी अनुकूल असे वातावरण तयार केले आहे.
उत्पन्न
शेतकऱ्यांना या पद्धतीने करार पद्धतीने जर कुक्कुटपालन केले तर स्वतःचे जास्त भांडवल यात अडकविण्याची गरज भासत नाही. पिल्ले, औषधे, खाद्य, वाहतूक , डॉक्टर हि संपूर्ण सुविधा कंपनी देते. फक्त पक्षांचे संगोपन करून वजनाप्रमाणे भाव देण्यात येतो. एका वर्षात हणमंत पाटील साधारणता ६ बॅचचे संगोपन करतात. यापासून त्यांना वर्षाअखेर ९ लाखाचा निव्वळ नफा शिल्लक राहतो. मागील सहा वर्षा पासून हा व्यवसाय व्यवस्थित ते यशस्वीरीत्या करत आहे.
कमीत कमी भांडवलात जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय
मी या व्यवसायात मिळालेला पैसा हा याच व्यवसायात गुंतवणूक केला व नवीन शेड तयार केले आहे. नविन शेड ४०० x ३० फुटाचे आहे. पडेल ते काम लाज ना बाळगता करण्याची मानसिकता असेल तर यश हमखास मिळते. तरुणांना हा व्यवसाय कमी खर्चात किमान ५०० पक्षांपासून देखील सुरु करता येऊ शकतो. मी आजवर शेड मध्ये १५ लाख रु गुंतवणूक केली आहे आता परिवारासाठी एक चांगले घर बांधण्याचे माझे नियोजन आहे आणि ते या व्यवसायाच्या माध्यमातूनच पूर्ण होईल.
श्री हनमंत शंकर पाटील
मुपो– अंजनी तालुका – तासगाव
जिल्हा- सांगली
फोन नंबर– ७२१९४१६४५०. ९७६६६२०९२६
- –