जळगाव (प्रतिनिधी) : पिकांचे नुकसान करणार्या किडींवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतांमध्ये फेरोमोन ट्रॅपची आवश्यकता असून हे तंत्र शेतकर्यांसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे याच यंत्रात अजून अद्ययावत संंशोधन करुन ते अधिक परिणामकारक व उपयुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती शास्त्रज्ञ तथा बैंगलोर येथील क्रॉप जी-वन अॅग्रो रिसर्च अॅन्ड डेव्हलोपमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. पुरुषोत्तम देवांग यांनी केले.
अॅग्रोवर्ल्ड कार्यालयाला दिलेल्या भेटीप्रसंगी कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण यांनी त्यांचे दिवाळी अंक भेट देऊन स्वागत केले. आपल्या जीवन प्रवासाविषयी माहिती देताना डॉ. देवांग यांनी सांगितले, की त्यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण वाघळी गावातच झाले. पुढील शिक्षणासाठी ते जळगावात आले. डी. फार्मसीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केल्यानंतर शिक्षकांनीच केलेल्या आर्थिक सहकार्यातून एम. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अॅग्रो केमिकल विषयात पी. एचडी. करुन डॉक्टरेट पदवी संपादन केली. पहिलीपासून ते एम. एस्सी.पर्यंत त्यांनी वर्गात पहिलाच क्रमांक मिळवला. उच्च शिक्षणाच्या बळावर त्यांना तैवानमध्ये नोकरीच्या निमित्ताने आणखीन संशोधन करण्याची संधी मिळाली. त्यानंतर कोरिया, इटली यासारख्या देशातही त्यांनी आपल्या संशोधन कार्यातून वेगळी छाप उमटवली. भारतात परतल्यानंतर त्यांनी सुरवातीचे काही दिवस एका अमेरिकन कंपनीसोबत काम केले. त्यानंतर बैंगलोर येथे स्वतःची कंपनी स्थापन केली.
फेरोमोन ट्रॅपमध्ये संशोधन
पिकांवर किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे कमी साधनांचा वापर करून कमी खर्चात कीडनियंत्रण करण्यासाठी नवीन काही तरी करण्याच्या उद्देशाने डॉ. देवांग यांनी या विषयात स्वतः संशोधन केले. बरेच कीटक आपल्या स्वजातीयांशी संबंध किंवा संपर्क आणि सुसंवाद साधण्यासाठी स्वतःच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा रासायनिक गंध सोडत असतात. यालाच कामगंध किंवा प्रलोभन (फेरोमोन) असे म्हणतात. हे रासायनिक गंध कीटकांमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया निर्माण करून संदेशवहनाचे काम करीत असतात. या गंधामुळे नर किटकाकडे मादी किटक आकर्षित होतात, पुढे त्यांच्या मिलनातून शेकडो अळ्या तयार होऊन किटकांची संख्या वाढते. त्यामुळे या संख्येवर नियंत्रण मिळवले तर किटकांपासून पिकांचे होणारे नुकसान थांबवता येईल, यासाठी डॉ. देवांग यांनी काही विशिष्ट प्रकारचे रसायन तयार केले आहे. या संशोधनासाठी त्यांना भारत सरकारने 50 लाखांचे अर्थसाह्य केले असून या संशोधनातूनच फेरोमोन ट्रॅप विकसित केल्याचे त्यांनी सांगितले.
अन्टीकॅन्सर औषधाची निर्मिती
समाजात कॅन्सरसारख्या गंभीर आजारामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागतात. डॉ. देवांग हे स्वतः अॅग्रो केमिकल विषयातील तज्ज्ञ असल्याने त्यांनी यासंदर्भातील केलेले संशोधनही महत्त्वपूर्ण ठरले आहे. मूळात कॅन्सर कशामुळे होतो हे त्यांनी शोधून कॅन्सरवर औषधच शोधून काढले आहे. हे संशोधन करण्यापूर्वी त्यांनी सुरवातीला उंदरावर नंतर माकड आणि कुत्र्यावर काही प्रयोग केले. हा प्रयोग करुन त्याचा रिझर्ट मिळण्यासाठी इतर शास्त्रज्ञांना सात वर्षे तरी लागली असती. मात्र, डॉ. देवांग यांनी दोनच वर्षांत संशोधन पूर्ण केले. त्यांच्या या कार्याची अमेरिकेने दखल घेतली असून अमेरिकेत अॅन्टीकॅन्सर औषधांचे तीन पेटंट त्यांच्या नावावर आहेत.
स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करा
अॅग्रोवर्ल्ड परिवारातील प्रत्येकाने स्वतःचा ब्रॅन्ड निर्माण करा, तो अॅग्रोवर्ल्डचा ब्रॅन्ड ठरेल. असा ब्रॅन्ड निर्माण करण्यासाठी ज्याच्यावर ज्या कामाची जबाबदारी आहे, ती त्याने निष्ठेने आणि जाणीवपूर्वक पार पाडावी. म्हणजेच प्रत्येकाने स्वतःला आपल्या कामात झोकून द्यावे म्हणजे स्वतःचा ब्रॅन्ड तयार होईल आणि तो आपल्या अॅग्रोवर्ल्डचा ब्रॅन्ड ठरेल, असा मोलाचा सल्लाही शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग यांनी या भेटीप्रसंगी दिला. आनन शिंपी यांनी सूत्रसंचालन तर हेमलता जावळे यांनी आभार मानले.
Jagat tujya sarkhe atishay mahtvache shetkaryansathi va Cancer rogi Sathi oushadacha shod manjech tujhe kutukch aahe waghali gramsta tarpe tujhe Shantaram bhole kutuk karat aahe