पावसाळ्याची सुरुवात म्हणजे आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट! दरवर्षी वीज पडून अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. विशेषतः शेतीकाम करताना मोठ्या प्रमाणात अशा घटना घडतात. अनेकांच्या संपत्तीचे नुकसान होते. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही, परंतु ती लाखो मेगावॅटची असावी, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
आकाशात वीज कशी तयार होते..
पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो.
आता या विजेपासून बचाव कसा केला पाहिजे..?
वीज कडाडण्याचा आवाज आला; तर प्रथम स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी घरांत किंवा इमारतीत ताबडतोब शिरा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेणाचे शेड तुमचा विजेपासून बचाव करू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवा. एकदा का तुम्ही घरांत शिरलात की कुठलेही वायू असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजा होत असताना तुम्ही शेतात किंवा रस्त्यावर असाल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. हातात छत्री असेल तर बंद करून दूर टाकून द्या. मोकळ्या मैदानांत परंतु झाडापासून दूर उभे रहा. एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अॅट्रॅक्ट) आकृष्ट होते. जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी पळस बागेत फेकून देत असत. ते ह्य़ांचसाठी की वीज तिकडे आकर्षित (अॅट्रॅक्ट) व्हावी व घरावर पडू नये.
मोबाईलची काळजी..
सध्या मोबाईल फोन प्रत्येकाच्या कानाला चिकटलेला असतोच. त्याची पण पावसाळ्यात विशिष्ट काळाजी घेणे आवश्यक आहे. वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) बंद ठेवा. तो चार्जिगला लावला असेल तर चार्जिग बंद करून चार्जरची वायर प्लगमधून बाजूला काढून ठेवा. मोबाईल फोन चार्जिगला लावला असताना त्यावर बोलू नका. मोबाईल फोनमध्ये चुकूनही पाणी जाऊ देऊ नका. मोबाईलची बॅटरी ओली होणार नाही याकडे लक्ष द्या. हाय वोल्टेज लाईन खालून जाताना तसेच रेल्वे इलेक्ट्रीक लाईन खालून जाताना मोबाईल फोन बंद ठेवा. पावसामुळे हवेत ओलावा आलेला असतो. त्यामुळे विद्युत प्रवाह लगेच वाहून मोबाईल फोनमध्ये शिरल्यामुळे अपघात होतो व जीव गमवावा लागतो. मोबाईल पेटल्यामुळे लोकांना इजाही झाली आहे.
Mahiti barobar aahe mi aatta paryant sarv niyamanche palan purnpane palan kelele aahe