राजे सर्वांचा समाचार घेऊन गडावर आले, तेव्हा काळोख पडायला सुरूवात झाली होती. गडावर शेकडो टेंभे, मशाली जळत होत्या. दिवाळीचा भास होत होता.
राजे गडावर येताच त्यांनी बाजी, नेताजी, जेधे वगैरे खाशा मानकऱ्यांना गोळा केलं. राजे म्हणाले,
‘आता उसंत घेऊन चालणार नाही. नव्या मोहिमेला उद्यापासून सुरूवात व्हायला हवी.’
‘नवीन मोहिम!’ जेधे उद्गारले, ‘राजे, आपण थोडी विश्रांती…’
‘आता विश्रांती नाही. बाजींनी चांगली बातमी आणलेली आहे. आदिलशाही गडावर आता फक्त शंभराचीच शिबंदी आहे. आदिलशाही आणि त्यांचे गड सावध होण्याआधीच आपली मोहीम व्हायला हवी.’
राजे भराभर आज्ञा करीत होते,
‘बाजी, नेताजी, तुम्ही इथली व्यवस्था लावून आपापली कुमक घेऊन उद्या वाई गाठा.’
‘वाई?’ नेताजी उद्गारले.
‘वाई आपल्या कबज्यात आहे.’ राजांनी सांगितलं, ‘जेव्हा खानाचा वध झाला, त्या वेळी आपल्या फौजेनं तिकडं वाई ताब्यात घेतली आहे. एवढंच नव्हे, तर सुपे, इंदापूरच्या खानाच्या छावण्या पण मारल्या गेल्या आहेत. यात शंका बाळगू नका. आमची चाल सहसा फसत नसते.’
त्याच रात्री राजे जेध्यांच्यासह राजगडाकडं रवाना झाले. बाजी, फुलाजी, नेताजी यांनी प्रतापगडाची व्यवस्था लावून पहाटे वाईची वाट धरली.
बाजी वाईच्या तळावर गेले. जावळीच्या खानाच्या छावणीची जी गत झालेली होती, तोच प्रकार जावळीच्या खानाच्या तळावर झाला होता. सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. पाच-सहा हजारांची पागा राजांच्या मावळ्यांनी काबीज केली होती. राजांचे मानकरी वाघोजी तुपे जातीनिशी छावणीचा मालऐवज ताब्यात घेत होते. शरणागत आलेले आशेनं वाघोजींच्याकडं पाहत होते.
बाजींना पाहताच वाघोजी पुढं आले. त्यांनी विचारलं,
‘बाजी! या तोफा, घोडी, उंट हत्ती पोसता येतील, पण आमच्या हल्ल्याबरोबर शरणागत झालेली ही माणसं, त्यांचं काय करुया?’
‘त्यांना सोडून द्या! राजांची तशी आज्ञाच आहे. जे शरणागत असतील, त्यांना मानानं परत पाठवा.’
वाघोजी तुप्यांचं समाधान झालं नाही. मनातला संताप दाखवू न देता त्यांनी विचारलं,
‘आनि आमची हार झाली असती; आनि आमी खानाच्या तावडीत सापडलो असतो, तर…’
‘तर!’ बाजी हसले. ‘वाघोजी, हा काय सवाल झाला? दुर्दैवानं तसं झालं असतं, तर राजांच्यासकट तुमची-आमची गर्दन मारली गेली असती. राजांच्यामध्ये आणि शत्रूमध्ये हाच फरक आहे. शरणागतांना सोडून द्या.’
वाघोजी तुप्यांना धन्यवाद देत शरणागत निघून गेले. जीव वाचला, हे समाधान त्यांना मोठं होतं. वाईच्या तळावर एक एक सरदार आपल्या शिबंदीनिशी गोळा होत होता. दोन प्रहरपर्यंत हजारोंच्या संख्येनं वाईची छावणी गजबजून गेली. खानाच्या कृपेमुळं दाणा-गोट्याची काही कमतरता छावणीवर नव्हती. वाईच्या परिसरातील आया-बहिणी छावणीच्या मीठ-भाकरीची काळजी वाहत होत्या. खुद्द सरनौबत नेताजी पालकर आणि बाजीप्रभू पागा, फौज यांची मोजदाद करीत होते.
राजांची सारी फौज वाईच्या तळावर हजर झाली. दहा हजाराचं घोडदळ सज्ज झालं होतं. त्याखेरीज नेताजी, बाजी यांची कुमक येऊन मिळाली होती.
राजे सायंकाळच्या वेळी वाई तळावर आपल्या फौजनिशी दाखल झाले. राजांच्या स्वागताला सारे गोळा झाले होते. राजांनी खानाच्या पराभूत छावणीची पाहणी केली. मोरोपंतांना ते म्हणाले,
‘मोरोपंत, या छावणीची आणि जावळीच्या छावणीची नोंद घेऊन तुम्ही राजगडावर जा! मासाहेब जशी आज्ञा देतील, त्याप्रमाणे सर्व करा. आम्ही मासाहेबांना सर्व सांगितलं आहे.’
राजांच्यासाठी खानाचा खास डेरा परत उभारण्यात आला होता. तो डेरा पाहताच राजे हसले. ते म्हणाले,
‘बाजी, आम्हांला असलं ऐश्वर्य परवडायचं नाही. आमच्या निवासासाठी एखादा तंबू दाखवा.’
राजांच्यासाठी तंबू उभारला गेला. राजांनी आपले मानकरी गोळा केले.
सरनौबत नेताजी पालकर म्हणाले,
‘राजे, मोहीम केव्हापासून?’
‘उद्यापासून! नेताजी, तुम्ही आपली फौज घेऊन आदिलशाहीत धुमाकूळ घाला. हुक्केरी, गोकाक, लक्षमेश्वर ही ठाणी लुटत विजापूरच्या रोखानं जा. कुठं शत्रू प्रबळ वाटला, तर मान-अपमान न बाळगता माघार घ्या. तोवर आम्ही बाजी-जेध्यांच्यासह आदिलशाही मुलूख जिंकत पन्हाळा गाठतो.’
साऱ्यांच्या मुखांवर एक वेगळाच उत्साह संचारला होता. तळावर हजारो मशाली उजळल्या होत्या. प्रत्येकाच्या मनात नवी ज्योत पेटली होती.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया )